मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
घन तमीं शुक्र बघ राज्य करी !

घन तमीं शुक्र बघ राज्य करी !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


घन तमीं शुक्र बघ राज्य करी,

रे खिन्न मना, बघ जरा तरी ! ध्रु०

ये बाहेरी अंडें फोडुनि

शुद्ध मोकळ्या वातावरणीं,

कां गुदमरशी आंतच कुढुनी ?

रे ! मार भरारी जरा वरी. १

प्रसवे अवस सुवर्णा अरुणा,

उषा प्रसवते अनंत किरणं,

पहा कशी ही वाहे करुणा

कां बागुल तुं रचितोस घरीं ? २

फूल हसे कांट्यांत बघ कसें,

काळ्या ढगिं बघ तेज रसरसे,

तीव्र हिमांतुनि वसंतहि हसे,

रे, उघड नयन, कळ पळे दुरी. ३

फूल गळे, फळ गोड जाहलें;

बीज नुरे, डौलांत तरु डुले;

तेल जळे, बघ ज्योत पाजळे;

का मरणिं अमरता ही न खरी ? ४

मना, वृथा कां भीशी मरणा ?

दार सुखाचें तें हरि-करुणा !

आई पाही वाट रे मना,

पसरोनि बाहु कवळण्या उरीं ५

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - नववधू

राग - केदार

ठिकाण - इंदूर

दिनांक - २९ ऑक्टोबर १९२०

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP