संत कान्हो पाठक अभंग भावार्थ – ६

कान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त्यांनी लौकिक खेळाचे रूपांतर आध्यात्मिक खेळामध्ये केले. कान्होबा महाराज कुणी मेले तर त्याचे दु:ख मानत नाहीत आणि जिवंत झाल्याचा आनंद मानत नाहीत ; म्हणूनच ते एका अभंगामध्ये म्हणतात , ' मरण माझे मरोनि गेले। मज केलें अमर। '


वेद गणितां मर्यादला । तरि तूं अगाध बा विठ्ठला ॥१॥
येवढें माप कैचें थोर । ज्याणें उमाणे तुमचा पार ॥धृ॥
शेष वर्णितां श्रमला । जिव्हा दुखंड होउनि ठेला ॥३॥
म्हणौनि कान्हो पाठक उगा । मौनें मवी पांडुरंगा ॥४॥

या अभंगात कान्हुराज महाराज आपण वर्णन न करता शांत का राहिलो ते सांगतात-भगवंताचे स्वरूप अगाध आहे.

म्हणूनच त्याचे अनंत हे नांव आहे आणि ते अत्यंत सार्थ असेच आहे.

त्याच्या स्वरूपाचा देशाने अन्त होत नाही, कालाने अन्त होत नाही व वस्तुनेही अन्त होत नाही.

“न व्यापित्यात्वेशतोन्तोनित्यत्वान्तापि कांलतः । न वस्तुतोऽपि सार्वत्म्यादानंत्य ब्राह्मणि त्रिधा ॥”

असे त्याचे वर्णन आहे. स्वरूप अगणित, अपार आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात तो येत नाही असे महाराज प्रथम चरणांत सांगतात.

बेद गणितां मर्यादला । तरि तूं अगाध बा विठ्ठला ॥१॥ एवढा मोठा वेद. “वेद काय काय न बोले ।” पण तोही कुंठीत झाला, मर्यादीत झाला. आता तुला कव घालील असे जगांत कोणते माप मोठे आहे? “एवढे माप कैचे थोर ।” देवा तुझे गुणही अनन्त आहेत. त्याचे वर्णन करताना एक हजार तोंडांचा शेष थकला आणि त्याच्या जिभा चिरल्या. शेष वर्णितां श्रमला । जिव्हा दुखंड होउनि ठेला ॥२॥ “जिव्हा चिरुनी पलंग झाला । शेष शिणला । झाल्या सहस्र जिभा जिभा ॥ “ जेथे वेद, शेष, महेश, गणेश, हेही कमी पडतात. मायावाचातीत तुझे हे स्वरूप । म्हणोनिया माप भक्ती केले ॥ भक्तिचिया मापे मोजितो अनंता । इतराने तत्त्वता न मोजवे ॥ तु.म.॥ कान्हुराज महाराज म्हणतात मी आता मौनानेच तुझे मोजमाप करतो.

संत कान्हो पाठक अभंग भावार्थ समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 22, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP