संत कान्हो पाठक अभंग भावार्थ – २
कान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त्यांनी लौकिक खेळाचे रूपांतर आध्यात्मिक खेळामध्ये केले. कान्होबा महाराज कुणी मेले तर त्याचे दु:ख मानत नाहीत आणि जिवंत झाल्याचा आनंद मानत नाहीत ; म्हणूनच ते एका अभंगामध्ये म्हणतात , ' मरण माझे मरोनि गेले। मज केलें अमर। '
कान्हो जन्मूनिया उत्तम कुळीं । केली संसाराची होळी ॥१॥
पैका जमूनिया फार । पोशी दारा आणि कुमर ॥२॥
सदा निंदी साधुसंता । नेणे धर्म कर्म व्रता ॥३॥
कान्हो पाठक कथितो नर। अंती भोगी नरक घोर ॥४॥
मानवदेह मिळूनही जे त्याचा उपयोग करून घेत नाहीत, त्यांची निर्भत्सना महाराज या अभंगात करतात.
कान्हो जन्मूनिया उत्तम कुळीं । केली संसाराची होळी ॥१॥
पैका जमूनिया फार । पोशी दारा आणि कुमर ॥२॥
ज्यांना नरदेह मिळाला ते भाग्यवान आहेत, असे अनेक संतांनी शास्त्रांनी म्हटले आहे. “बडेभाग मानव तनु पावा । अथवा भाग्ये आलेती मनुष्य देहा ॥ अथवा भरतखंडी नरदेह प्राप्ती । हे परम भाग्याची संपत्ती ॥” कारण हा देह दुर्लभ आहे. “नरदेह दुर्लभ जाणा ।” यामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. या देहाने जीवत्वाचा नाश करून, देवत्वाची प्राप्ती करून घेता येते. “नरदेह निधान लागले हाती । उत्तम सार उत्तम गती । देवची होईन म्हणती ते होती । तरी का चित्ती न धरावे ॥” अशी सुवर्णसंधी प्राप्त होऊनही म्हणजे उत्तम कुळात जन्म मिळूनही कान्होबा महाराज सांगतात त्यांनी आपल्या नरदेहरुपी संसाराची होळी अर्थात् वाटोळे केले. कसे? तर ज्या देहाने परमार्थाची साधना करून दुःख, अज्ञान, मृत्यु यावर विजय मिळविण्याचे सोडून पैसा मिळविण्यात आणि बायका- -मुले यांचे पोषण करण्यात व्यर्थ घालविला.
सदा निंदी साधूसंता । नेणे धर्म कर्म व्रता ॥३॥
आपण कर्तव्य करावे ती देवाची सेवा आहे पण त्यात अहंकार वा अभिलाषा नसावी. “तस्मादसक्त सततं कार्य कर्म समाचर ।” असे भगवंतांनी सांगितले आहे. ते सोडून देऊन हा असे आचरण करतो, एवढेच नाही तर सतत आत्म कल्याणाच्या साधनाचे अनुष्ठान करून लोकांना त्यामध्ये प्रवृत्त करणारे जे महात्मे आहेत त्यांच्या विषयी- सतत त्यांची निंदा करतो. निंदा हा पापाचा कारखाना आहे. “येती निंदकापाशी अशेषही पापे” अथवा “निंदा दुरीते ब्याली” असे ज्ञानोबारायांनी म्हटले आहे. त्यात पुन्हा संतांची निंदा हे तर घोर पाप आहे. ज्याला विना थांबा गाडीने नरकाला जाण्याची इच्छा आहे त्यांच्याकरीता हा मार्ग आहे. “आणीक एक कोड । नरका जाण्याची चाड । तरी संत निंदा गोड । करी कवतुके सदा ॥” असे जे करू नये ते करतो आणि जे करणे आवश्यक आहे, धर्माचरण, व्रताचरण, सत्कर्माचरण हे कांहीच करणे जाणत नाही. अर्थात् त्याचा परिणाम त्याला भोगावा लागतो. तो परिणाम काय आहे ते महाराज शेवटच्या चरणांत सांगतात.
कान्हो पाठक कथितो नूर अंती भोगी नरक घोर ॥४॥
मनुष्य शेवटी घोर अशा नरकाचे दुःख भोगतो. सुखदुःखाचे कारण मानव जन्मातील कर्मच आहे. हा सिद्धांत अनेक ठिकाणी सांगितलेला आहे. “केले कर्म झाले । तेचि भोगा आले ॥ तुका म्हणे येथे झाकतील डोळे । भोग देता बेळे येईल कळो” ॥१॥ अथवा “विषयाचे सुख येथे वाटे गोड । पुढे अवघड यमदंड ।” म्हणून असे कोणीही करू नये हे तात्पर्य
N/A
References : N/A
Last Updated : August 22, 2026

TOP