श्रीमद् गोपाल गीत - पद्मपुष्प पाचवे

मराठी जनास हे गीतोपनिषद, गीता ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतुने गोपाळाने केलेले हे `गोपाल गीत'.


अर्जुन पुसता झाला,
त्या श्री योगेश्वराला । (अर्जुन):-

संन्यास योगे, कर्मा ब्रह्मार्पण,
पुन: प्रसंशसी, कर्म योग हि ।
सुनिश्चित मज तूं, बोली, कृष्ण
योग एक जो, श्रेयकर दोहीं ॥१/१॥

श्रीकृष्ण तो परमात्मा,
निरुपितसे मग, अर्जुना ! (श्री भगवान):-

कर्मयोग, कर्मब्रह्मार्पण,
मोक्षद ते योग दोन्ही, अर्जुन ।
कर्म ब्रह्मार्पण योगाहून,
विशेषची योग कर्मानुष्ठान ॥२/२॥

(वृत्त इंद्रवज्रा)
नो द्वेषकारी, नहि आस ज्यारे,
तो नित्य संन्यासिच, जाणिला रे
द्वंद्वा समस्ता, सुटता हि पार्था,
तो मुक्त-बंधात, सुखे सर्वथा ॥३/३॥

भिन्न ते `ज्ञान' नी `कर्म' योग दोन्ही,
म्हणती न कदा ज्ञानवंत ।
योग सम्यग् आचरीता एकही,
उभय योगफल, ते प्राप्त ॥४/४॥

(वृत्त इंद्रवज्रा)
जे लाभ्य स्थानोत्तम, सांख्यद्वारे,
पावेहि तेची, परी योग द्वारे ।
`सांख्या' नि `योगा' स समे विलोकी,
पाहीच तो, सर्व, तोची खरे की ॥५/५॥

वीनायोगे त्या कर्म ब्रह्मार्पणी,
मिळतसे दु:खमय संन्यास ।
कर्मयोगे परी युक्त त्या मुनी,
झडकरी मिळे, तो ब्रह्मन्यास ॥६/६॥

जेता मनेंद्रिया, अंतरी शुद्धा,
सर्वाभूतीं जीव, दयाळू व्याप्त ।
योगे युक्त, करीता कर्मे सदा,
कर्ता जरी तो, कर्मात अलिप्त ॥७/७॥

तत्ववित्, योगयुक्त माने,
कार्य किंचित हि, करी न मी ।
दर्शनात, श्रवणीं, श्वसने,
खाणे वा चालणे, करी न मी ॥८/८॥

स्पर्शन्, `घ्राण', `वाक्' `त्याग', तीं
नेत्रपट ही हलवे न मी ।
धारणा मात्र अशी तयां, ती,
इंद्रिये विषयार्थेची झटती ॥९/९॥

(भुजंग प्रयात)
फलासंग त्यागून, कर्मे हि सारी,
करी जो परी ती हि ब्रह्मार्पणी रे ।
नलीनी धरीना, जसे पर्णीवारी,
अलिप्तची पापात, तोही तसा रे ॥१०/१०॥

कार्य करी, योगी तो केवळ,
इंद्रिये तन, मन, बुध्दिते ।
त्यागूनी फलासंग समूळ,
करण्या निज, आत्म शुध्दिते ॥११/११॥

कर्मफला त्यागून योग युक्त,
मिळवितसे, शांति न इच्छिता ।
फलेच्छेहि, कर्मयोग रहित,
फलासक्ते प्राप्य कर्मबध्दता ॥१२/१२॥

त्यागून मनाने, कर्म सर्व ती,
न कर्ता, करविता न ही ।
नवद्वारे युक्त, नगर देही,
राही तो, सुख चित्तेनहि ॥१३/१३॥

निर्मितनसे लोकी त्यां, देव,
कर्तृत्व आणि कर्मे सर्व ती ।
कर्माशी कर्मफल संयोग,
उपजे, स्वभावेची प्रकृति ॥१४/१४॥

पाप वा सुकृत, कुणाचे पुण्य,
विश्वंभर त्या, करी न ग्रहण ।
ज्ञान तयाचे झाकीले अज्ञाने,
मोहती जीव, सकळ ते तयाने ॥१५/१५॥

परी जयाचे, ते अज्ञान जीवीचे,
नाशीले त्याने, आत्मज्ञानें केवळ ।
परम ते ज्ञान, अंतरी तयाचे,
प्रकाशिते, आदित्य जेवी उजळ ॥१६/१६॥

सर्वा लोकी महेश्वर मी ऐसा,
यज्ञ, तपसा रे मोहित ।
जाणे जो मजशी, कैवारी सखा,
शांति अक्षय तो पावत ॥२९/२९॥

गोपालगीते अनुवादिले हें,
श्री मद्भगवद्गीत यथार्थ सारे ।
भगवद्भावे हे पद्म पाचवे,
गोपाल कृष्णां, गोपाळे वाहिले ॥३०/अ५॥

ऐसे हे श्रीमद्भगवद्गीत उपनिषदे ब्रह्मविद्येत
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादात
कर्मसंन्यास योगनामे श्रुत
हे गोपाळ रचित गोपाल गीत
पद्मपुष्प पांचवे असे
(श्लोक संख्या ३०)
=======

श्री गोपाल गीत
पद्मपुष्प सहावे
ध्यान योग
॥ योग भुमिका ॥

आतां हा मात्र खरा योग !
ज्यांत नसे योगायोग ॥
भगवंतयोगेश्वरे, कथीला,
योगी अवलंबती सदैव ह्याला ॥
मना, इंद्रीयांचे करुनी नियंत्रण,
अष्टांग योगे परब्रह्म चिंतन ॥

ह्या स्वयंसिध्द (सदैव सिध्द) ध्यान योगाने, चित्त-विजय मिळवून, अंतरात्म्यावर केंद्रित कसे करायचे ? आत्मसंयम, आत्म्यावर नियंत्रण इत्यादि विधि ह्या अध्यायांत सविस्तर सांगीतला आहे; की ज्या द्वारे योगी ध्यानाने शेवटी समाधि स्थिती अनुभवतो. आत्म नियंत्रणाने आपण आपला उध्दार करु शकतो. आत्मा आपला तारक मित्र आहे. सखा आहे. आणि तसचे तो आपला घातक शत्रु हि होऊ शकतो. म्हणून आत्मसंयम करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच हा भगवंतप्रिय ध्यान योग सर्वोत्तम आहे, ह्या ध्यान योग्याची महती सांगतांना अख्रेरीस योगेश्वर भगवंत सांगतात-

तपस्व्याहून श्रेष्ठ ध्यानयोगी
योगी हा ज्ञानीये हि मज अधिक ।
अधिकची कर्मनिष्टया, हा योगी,
योगी हो ! अर्जुना, तु अंतरीक ॥४६/गो.गी.
म्हणून आत्मसंयम योग, वा ध्यानयोग, अवलंबिण्यास भगवंत अर्जुनास उपदेशितात.
==========

श्री गोपालगीत
॥ पद्मपुष्प सहावे ॥
(ॐ नमो परमात्मने)

पुढती बोलती वासुदेव छान,
योग, अर्जुनास सखोल तो ध्यान । (श्री भगवान):-

(वृत्त इंद्रवज्रा)
ना आसरा, कर्म फलां धरी जो,
कर्तव्य कर्मास, सदा करी जो ।
`संन्यासी' नी `योगी' हि तोच खरा,
निष्क्रिय ना, त्यागहि नाग्निहोत्रा ॥१/१॥

म्हणती जयासी संन्यास, पांडवा,
योग तोहि, कर्मयोगची, जाण बा ।
ना त्याग कामना तो, संकल्पे जरी,
कर्मयोगी बने कुणी हि न परी ॥२/२॥

योगारंभ्या, सिध्दिसाधकां,
म्हणती साधन, `कर्म' तें भलें ।
परी तेची ते योगसिध्दां,
साधन `मनोनिग्रह' बोलिले ॥३/३॥

इंद्रियभोगास, नासक्त जेंव्हा,
नाहि कर्मात जो, ओढला ।
त्यागीता, सर्व कामना हि तेंव्हा,
योगारुढ तो, म्हणविला ॥४/४॥

आत्मोध्दारी स्वयंमात्रा,
आत्मनाशही करु नयें ।
आत्मा तोंची, स्वयंभ्राता,
आत्माच, आत्मशत्रु स्वयें ॥५/५॥

(वृत्त इंद्रवज्रा)
बंधू तयाचा मग तोची आत्मा,
जिंकी स्वये जो, निज अंतरात्मा ।
ना अंतरात्मा, वश तो जयाशी,
त्या शत्रुवत्, वर्तन तें स्वत:शी ॥६/६॥

मना जिंकिता, त्या शांतिधारका,
व्यापिता आत्मा, सर्वत्र सारीखा ।
दु:खा, सुखाते नी शीतल, उष्णी,
मानापमाने तैसेची आणि ॥७/७॥

इंद्रिये जिंकीले रे जयाने,
ओतप्रोत हि विज्ञान, ज्ञाने ।
या अंतस्था, म्हणती युक्तत्मा,
समान ज्या मृद, हेम, आश्मा ॥८/८॥

इष्टचिंतक, मित्र ते तटस्थ,
वैरी, बंधुद्वेषी आणि मध्यस्थ ।
साधु वा दुर्जन, त्या समानची,
योगी समबुध्दि तो विशेषची ॥९/९॥

ध्याने निरंतर, योगी अंतरी
सोडून कामना, संग्रहा सारी ।
चित्तात्मने परमेश्वरी नित्य,
राहून एकांती, आवरी चित्त ॥१०/१०॥

पवित्र सुस्थानी स्थापून,
सखलतम, प्रदेशावरी ।
स्थिरोन्नत, निजासन,
धूतवस्त्र, चर्म, दर्भाबरी ॥११/११॥

करुनी वश, चित्तेंद्रिया योगी,
मन तेथं, एकाग्र त्याते लागी ।
आसनाते मग बसावे स्वस्थ,
योग मात्रे, करण्या चित्तशुध्द ॥१२/१२॥

मस्तक, मान आणि शरीर,
निश्चल सम, धरुनी सुस्थिर ।
विलोकुनी नासिकाग्रे निजस्वये,
अविचल, अवलोकनी चक्षुद्वये ॥१३/१३॥

शांत अती मनीं,
भय रहित बनूनी,
व्रते ब्रह्मचर्ये स्थिरावला ।
मना संयमूनी,
मत्भाव चित्त धरुनी,
मत्पर होऊनी, जोनुरला ॥१४/१४॥

योगीया ऐसे लीन चित्त सतत,
सतत नियमूनी, जोनिजचित्त ।
चित्तशांती परम लाभे नितांत,
नितांत मोक्ष जे, मजठांयी युक्त ॥१५/१५॥

जयाचा रे, आहार हि खूप,
वा झोपहि, जया ती अमाप ।
अयोग्यची, अर्जुना, त्यांयोग तो,
उपाशीच अति, वा जो जागतो ॥१६/१६॥

अथा योग्य आहारे,
निद्रा, कर्मविहारी ।
सुलभची तयारे,
योग हा, दु:खहारी ॥१७/१७॥

ते निग्रहित चित्त एकाग्र,
आत्म्यांतची, स्थिरावते जेंव्हा ।
निरीच्छ होतां, कामनी सर्व,
म्हणती त्यां, युक्त ऐसे तेव्हां ॥१८/१८॥

उपमा रे ऐसी,
ठायीं, त्या निर्वात,
तो दिप, मिणमिने जेवी ।
आठवे बा तैसी,
मनी संयमित,
योगी, योगांत लीन तेवी ॥१९/१९॥

योगद्वारे चित्ता,
नियमूनी जिथें,
दिव्यानुभूति, ती परम ।
आणि डोकावित,
जिथे अनुभवे,
आत्म्यातची तोषिते आत्म ॥२०/२०॥

बुध्दिग्राह्यचि, ते,
इंद्रियांतीत दिव्य,
सुख जें, अत्यंतिक आगळे ।
जाणीले हे तये,
तत्वत: जेथं (भव्य)
स्थितीते सोडवेना वेगळे ॥२१/२१॥

(वृत्त इंद्रवज्रा)
जी लाभता त्यां, `स्थिति' ती सुखाची,
अन्याहि लाभा, सर ना तयाची ।
स्थित्युत्तमे त्या रममाण होता,
दु:खे हि मोठया, न ढळे स्थ्रिरता ॥२२/२२॥

दु:ख संयोग, जेथे नष्ट,
त्या जाण नांव `योग' ते मोठं ।
आचरावे, त्यां योगा दृढ,
अवीट नी सदा चित्तारुढ ॥२३/२३॥

त्यागूनी शेषरहित, सर्व रे,
कामना प्रभावित संकल्प ते ।
नियम्युनी इंद्रिये मनद्वारे
इंद्रीय ग्राम सर्व संपूर्ण ते ॥२४/२४॥

हळूच परम धरुनी धीर,
बुध्दियोगे मनाते बळी ।
करुनी आत्मसंस्थे मनस्थिर ।
ना चिंतिता, किंचीत मुळी ॥२५/२५॥

जैसे, जैसे, भटके रे मन,
अस्थिर नी चंचल स्वभावे ।
तैसे, तैसे तया नियम्यून,
आधिन आत्म्याच्याच करावे ॥२६/२६॥

ब्रह्मभूत तो, अपाप मनी,
शान्तहि निमाला रजोगुणी ।
मने प्रशांताहि त्या योगीया,
लाभे सुख तें, उत्तम तया ॥२७/२७॥

(वृत्त भुजंगप्रयात)
असा अंतरी, योगमग्ना सदातो,
विमुक्ता हि दोषे, अपापा मुनी तो ।
सदा ब्रह्मसंनिध स्पर्शा-सुखाला,
सुलभ्योत्तमाते करी प्राप्त त्याला ॥२८/२८॥

(वृत्त इंद्रवज्रा)
वास्तव्य चित्ते, सकला हिभूतीं,
भूते हिं सारी, निज अंतरी ती ।
तो योग युक्ता, समदर्शि आत्मा,
सर्वत्र ठायी, बघतो समत्वा ॥२९/२९॥

पाही जो, मज चराचरी,
नि माझ्यात विश्वची सारे ।
नसे नष्ट मी, त्यासी परी,
तोहि मज अक्षय बारे ॥३०/३०॥

सर्वाभूतीं स्थित मजशी,
अभिन्नतेने मज भजतो ।
तोसर्वत्र संचारिता हि,
योगी, मजठायीच, परी तो ॥३१/३१॥

स्वत:वरुनी जो सर्वत्रां,
पाही, अर्जुना, समानता ।
सुखा वा दु:खा हि जो सम,
योगी मज, तोची परम ॥३२/३२॥

शंखेखोर त्या, जिज्ञासु मने,
पुसिले प्रश्न कृष्णां अर्जुने ॥(अर्जुन):-

(वृत्त भुजंगप्रयात)
कथीला मला जो, मधुसूदना हा,
समत्वेचि तत्वे, मिळे योग जो हा ।
मना माझिया नादिसे (लक्षणा ते),
जयाने स्थिती स्थीरण्या चंचला तो ॥३३/३३॥

मस्तवाल ते, दृढ हो । अती मन,
अच्युता, चंचल हि, नी बलवान ।
वाटे मज कठीण, ते आवरणे,
वार्‍यावरती, जणु मात करणे ॥३४/३४॥

करण्या, अर्जुना, ते शंकानिरसन,
बोलती त्याते, असे भगवान ॥ (श्री भगवान)

अती बा, चंचल, मना निग्रहणं,
महाबाहो, रे नि:संशय, ते कठीण ।
अभ्यासे नी, त्यागुनी संग्रहीपण,
कौंतेया, ते साध्य आवरणे मन ॥३५/३५॥

(वृत्त इंद्रवज्रा)
स्वाधीन ना चित्त परी जयाते,
दृष्प्राप्य वाटे, मज योग त्यांते
चित्ता परी त्यां करिताहि वशा,
तो साध्य यत्ने, मग त्या पुरुषा ॥३६/३६॥

पुनरपि पुसतां झाला,
अर्जुन त्या योगेश्वराला । (अर्जुन)

प्रयत्नाने स्वल्पा, श्रध्दायुक्ता,
योगे परी तो; विचलित चित्ता ।
असफला त्या, ना प्राप्त सिध्दी,
मिळे, कृष्ण, ती कोणरे, स्थिती ? ॥३७/३७॥

दोहास त्या, मुकता, महाबाहो,
त्या नष्ट प्रतिष्ठा, त्याब्रह्ममार्गी
विमूढास त्या, विनाशची ना, हो !
जैसे (नभी) ढग विदीर्ण जेवी ॥३८/३८॥

हा संशय माझा, शेषहीन,
तूच फेडावा, जनार्दन ।
फेडण्या संशय, तुजविण,
योग्य नसे दुजा, कुणी अन्य ॥३९/३९॥

त्या शुध्दचित्तां, अर्जुना, ते पुढती,
फेडीत संशय, भगवान बोलती ॥ (श्री भगवान)

इहलोकी वा परलोकी,
विनाश त्याचा नसे कधी ।
कल्याण करी, पार्थ, कुणी,
नसेची कर्त्या अधोगती ॥४०/४०॥

वर्ष अनेका, सवे हि शाश्वत,
राहून लोकीं पुण्यकृता ज्यां ।
योगच्युत तो, त्या शुध्द, सात्विक,
घे घरी जन्मा, त्या श्रीमंतांच्या ॥४१/४१॥

जन्म होतसे, अथवा त्यांते,
बुध्दिमान त्या योगीया कुळें ।
दुर्लभ अतीरे, ह्या लोकी तें,
अशा तर्‍हेचा, तो जन्म मिळे ॥४२/४२॥

बुध्दि संयोगे त्या जन्मपूर्व,
तिथे तयासी, लाभ मिळे ।
झटे पुन्हा तो, योग सिध्यर्थ,
कुरुनंदना, अधिक बळे ॥४३/४३॥

योगा आसक्त, नसताहि तो,
पुर्वाभ्यासे, योगातची ओढे ।
योग उत्सुके, दावी मग तो,
ज्ञान, शब्दब्रह्म, अति गाढे ॥४४/४४॥

यत्न करीत, बहु नेटके,
विशुध्द तो, निष्पाप योगी ।
संसिध्द तो जन्मात अनेके,
परम पदाप्राप्त अनेके,
परम पदाप्राप्त जाई ॥४५/४५॥

तपस्व्याहून श्रेष्ठ `ध्यान योगी',
योगी ज्ञानीये तो मज अधिक ।
अधिकची कर्मनिष्ठया तो योगी,
योगीं हो, अर्जुना, तू अंतरीक ॥४६/४६॥

(वृत्त इंद्रवज्रा)
त्या योगियाते सकळा, परी रे,
चित्तांतरी मन्मय भाव दाटे ।
श्रध्दाभरे जो, भजतो मला रे,
सर्वोत्तमा तो, मज युक्त वाटे ॥४७/४७॥

`गोपाल गीते' अनुवादिले हें,
श्री मद्भगवद्गीत यथार्थ सारे ।
भगवद्भावे, पद्म हे `सहावे'
गोपाल कृष्णा, गोपाळे वाहिले ॥४८/अ-६॥

ऐसे हे श्रीमद्भगवद्गीत उपनिषदे ब्रह्मविद्येत
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादात
ध्यान योगनामे श्रुत
हे गोपाळ रचित गोपाल गीत
पद्मपुष्प सहावे असे
(श्लोक संख्या ४८)

N/A

References : N/A
Last Updated : February 05, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP