श्रीमद् गोपाल गीत - पद्मपुष्प तिसरे

मराठी जनास हे गीतोपनिषद, गीता ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतुने गोपाळाने केलेले हे `गोपाल गीत'.


श्रीकृष्ण योगेश्वराला,
अर्जुन पुसता झाला ॥:-

बुद्धि श्रेष्ठ जर कर्माहून,
मते तुझिया रे जनार्दन ।
युध्द कर्मात, घोर मजसी,
का मग, केशवा, तू योजशी ? ॥१/१॥

संदिग्धशा तव वाक्याते,
मति माझी मोहवी तूं ।
क्षेमकारी मज काय जे,
एक निश्चित बोल तूं ॥२/।२॥

श्री योगेश्वर कृष्ण बोलीला,
मोहे व्याप्त त्या अर्जुनाला ॥(श्री भगवान):-

लोकी ह्या असती निष्ठा दोन,
तुज पूर्वी, कथील्या अर्जुन ।
सांख्यांची असे ती ज्ञान योगीं,
निष्ठे कर्मात, सदैव योगी ॥३/३॥

पुरुषा कैसी, कर्मबंधमुक्ति ती ?
कार्यारंभ हि त्या नच करता ।
सिध्दि हि कार्यात मिळेकशी ती ?
कार्या करणे, मूळात त्यजता ॥४/४॥

क्षण एक ही कश्चित,
कर्म रहीत, न कोणी राहती ।
कर्मवशे, कार्यरत,
सर्वाकरवी स्वभावे प्रकृति ॥५/५॥

कर्मेंद्रियाशी दामूनी जो,
स्मरणे परी, विषया चिंती ।
मूढ जीव तो, मिथ्याचारी,
म्हणती तयाते, दांभिक भारी ॥६/६॥

परी मनाने, इंद्रिये दामून,
योगारंभ जो करी, अर्जुन ।
योग असक्ता हि कर्मेंद्रियाते,
कर्मयोगी तो, विशेष योग्यते ॥७/७॥

करी रे नित्य, तव तूं कर्म
कर्मरतेची नैष्कर्मे उत्तम ।
जीवन सफलतेचे मर्म,
`बीना कर्म नसणे,' हेची जाण ॥८/८॥

यज्ञार्थ कर्म ती, `तया कारणी,
हे लोक, अन्यथा कर्माबंधनी ।
फलासक्ति मुक्ता कौंतेय, सारी
`त्यां' प्रित्यर्थची, ती कर्म आचरी ॥९/९॥

सृजुनी प्रजा, यज्ञ संयुक्त ती
प्रजापति ते, पूर्विच बोलती ।
`अभ्युदया' हा यज्ञ, तुम्हां जणू,
सकलाते, कामना, कामधेनू ॥१०/१०॥

ह्या यज्ञे तुम्ही तोषवून देवां,
देवही तुष्टवोत तुम्हा सर्वा ।
परस्पर तुष्टवोंनी उभयां,
साधावे कल्याण, परमश्रेया ॥११/११॥

यज्ञे संतोषित देवांनी,
इष्टफल तें, देतां दानी ।
भोगी जो, न अर्पिता देवे,
चोरची तो ! की रें स्वभावे ॥१२/१२॥

यज्ञशेषां - भक्षक ते थोर,
मुक्तची सर्व, पाप-दोषां घोर ।
पापाते जणुं, पापी भक्षणीं,
पचविती जे, स्वार्थार्थ, कारणीं ॥१३/१३॥

उद्भव भूतां, अन्नामधूनी,
संभव अन्नां, तया पर्जनीं ।
होई यज्ञे पर्जन्य सकळ,
यज्ञही तो, असे, कर्मा फळ ॥१४/१४॥

जाण कर्म तें, ब्रह्मनिर्माण,
ब्रह्मोद्भवतो अक्षरांतून ।
सर्वगामी हे, ब्रह्म म्हणोन ।
यज्ञी नित्य त्यां, ते प्रतिष्ठाण ॥१५/१५॥

ऐसे ईश्वरप्रवर्तिते चक्रे,
इहालोकी न जो, अनुसरे ।
पापी जीव तो इंद्रीयाराम,
व्यर्थची, पार्था, त्याचे जीवन ॥१६॥

जो आत्मरत, आत्म मग्ना,
आत्मतृप्त तो, आत्माराम ।
आत्मी संतुष्ट त्यां मानवां,
जगी सदैव, कार्याराम ॥१७/१७॥

नसे तयां, न करण्यात अर्थ ।
त्यां, वा तयाच्या करण्यात स्वार्थ ।
जगी भूतमात्री, संबंधची काही,
तया स्वार्थ कोठें, गुंतलाच नाही ॥१८/१८॥

म्हणून करी सदैव कार्ये,
नसता आस, कर्म फलाची ।
आचरी निरासक्त कर्तव्ये,
मोक्ष मिळवी, पुरुष तोची ॥१९/१९॥

कर्मद्वारेची, जनकादिकांनी,
मिळविले सुयश ते सर्वत्र ।
लोकसंग्रहा ती दृष्टी ठेऊनी,
तुज कर्म करणेची उचीत ॥२०/२०॥

आचरती जे जे महाजन,
ते ते ची करती, इतर जन ।
कर्तृत्वची श्रेष्ठांचे प्रमाण,
अनुसरती तेची सर्वजण ॥२१/२१॥

नसे पार्था, मज कर्तव्य काहीं,
तिही लोकांत या किंचित ही ।
प्राप्ताप्राप्त लाभण्या आस नसे,
तरी रे मी, येथ कष्टतसे ॥२२/२२॥

ऐसे करी मी, न कार्य,
जरी तंद्रीत न राहून ।
मनुष्यें सर्वशा, पार्थ,
अनुसरती, ते वर्तन ॥२३/२३॥

मी न करी, हे कर्म जरी,
विचलतील हे लोक तरी ।
दोष मज संकरकर्ता,
वा होई मी, प्रजाहित घ्नाता ॥२४/२४॥

राहून जेवी कर्मासक्त,
भारता, करती कार्य मूढमती ।
ईर्षये लोकसंग्रहार्थ,
ज्ञानिया, करणे कार्य अनासक्ति ॥२५/२५॥

मूढमति नी कर्मनिष्ठ,
असती कार्यरत जे ।
न भेदति बुद्धितें, श्रेष्ठ,
धीमती कदापि त्याते ॥
ज्ञानिये होऊनी कर्मयुक्त,
करवावी कार्ये जोषयुक्त ॥२६/२६॥

प्रकृति-स्वभाव गुणे,
कर्त्याकरवी क्रिया त्या ।
अहंकारे मूढ माने,
`मीच कर्ता' क्रियेते त्या ॥२७/२७॥

`गुण' आणि `कर्म' विभाग द्वयाचे,
जाणकार तत्वा, परंतु तयाचे
`गुण विचरे गुणांत' तो ह्या भावो,
असक्त ना ते तयांत महाबाहो ॥२८/२८॥

प्रकृति गुणें ते संमोहित,
गुणकर्मात आसक्त चित्त ।
अनभिज्ञ त्या, मंदमतिस
सुज्ञा करणे न विचलित ॥२९/२९॥

(वृत्त इंद्रवज्रा)
ती कर्म सारी मज कारणी तूं,
अध्यात्म चित्ते, मज अर्पुणी तूं ।
सोडूनी आशा, नि ममत्व बुध्दि,
तू गंडहिना, लढशिल युध्दि ॥३०/३०॥

श्रध्दया, असूयाहिन नित्य,
माझिया मतानुसरती जे ।
मानव तेची, होती रे मुक्त,
सर्व कर्मबंधनातून ते ॥३१/३१॥

परंतु जे बा, मत्सर युक्ते,
ना अनुसरती माझे मत ।
जाणे, ज्ञानात सर्वा, मूढ ते,
विवेकहीनची नष्ट चित्त ॥३२/३२॥

स्वप्रकृति अनुरुप ज्ञानीहि,
वागती सर्व, तैसे प्राणीहि
(प्रकृति स्वभाव ऐसा नामी)
निग्रह तयारे, काय कामी ? ॥३३/३३॥

इंद्रिये नी इंद्रिय-विषयी,
राग द्वेष स्वभावेची राही ।
न हो वशीभूत राग, द्वेषी,
तेची दोन्ही ह्या, मार्ग घातकी ॥३४/३४॥

धर्म न्यून हि तो, श्रेष्ठ आपूला,
सुकर धर्मा अन्याते, त्या भला ।
स्वधर्मात मरता श्रेय, मिळे,
परधर्म भयावह बापुडे ॥३५/३५॥

अर्जुन पुसता झाला,
त्या श्रीकृष्ण वार्ष्णेयाला । (अर्जुन)

करी कोण प्रेरीत ?
पापा आचरण्या, पुरुषां ह्या ।
योजी कोण बलात,
(पापा), वार्ष्णेय, अन्न्‍ इच्छिया ? ॥३६/३६॥

भगवंत श्री मग, अर्जुना बोलती
पापास कोणत्या प्रवृत्त करती ? (श्री भगवान)

काम हाची तो, क्रोध ही हाची,
उपजिला, रजोगुणातची ।
महाभक्षक, महापातकी,
वैरी हाची, जाणी इहालोकी ॥३७/३७॥

झाकी अग्नीस धूम्र,
धुळे आणि आरसा जैसा ।
वार वेष्टीत गर्भ,
काम, क्रोध, ह्या लोकी तैसा ॥३८/३८॥

वेष्टीले त्याने ज्ञानासी,
वैरी नित्य तो, ज्ञानिया ।
अतृप्त रे, अनलची,
कामरुपी तो, कौंतेया ॥३९/३९॥

म्हणती, तयाची ही अधिष्ठाणं,
असती इंद्रिये, बुध्दि नी मन ।
विमोहित मनुजा, हे ह्या द्वारे,
झाकून ज्ञान ते, तयाचे सारे ॥४०/४०॥

म्हणूनी तु रें, भारत,
दामूनी इंद्रिये आधि ।
ज्ञान, विज्ञान नाशक,
पापी काम, हाची त्यागी ॥४१/४१॥

म्हणतात, इंद्रियेची श्रेष्ठ !
इंद्रियाहूनी `मन' उत्तम ।
मनाते परी मति वरिष्ठ,
मतीते हि तो `आत्मा' परम ॥४२/४२॥

जाणूनी ऐसे तूं, महाबाहो,
परम, बुध्दिहून हि, आत्म्याते ।
एकात्मतेने, नाश करी हो ।
दुरात्याज्य त्या कामशत्रु ते ॥४३/४३॥

गोपाल गिते अनुवादिले हे
श्री मद्भगवद गीत यथार्थ सारे ।
भगवद्भावे पद्म हे तिसरे
गोपालकृष्णां गोपाळे वाहिले ॥४४/अ३)

ऐसे हे श्रीमद्भगवद गीत उपनिशडे ब्रह्मविद्येत
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादात
कर्मयोग नामेश्रुत
हे गोपाळ रचित गोपाल गीत
तृतीय पुष्प.
(श्लोक संख्या ४४)

N/A

References : N/A
Last Updated : February 05, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP