श्रीमद् गोपाल गीत - पद्मपुष्प पहिले

मराठी जनास हे गीतोपनिषद, गीता ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतुने गोपाळाने केलेले हे `गोपाल गीत'.


महाभारती ते समरांगणी,
कौरव, पांडव जमले दोन्ही ।
सैन्य सज्ज, लढण्या उभया,
पुसे धृतराष्ट्र, प्रश्न संजया ॥..१ (धृतराष्ट्र)

धर्मस्थळ नी कुरुक्षेत्री ह्या,
युध्दा इच्छुक, त्या जमलेल्या ।
माझ्या आणि पांडुपुत्रांनी त्या,
काय केले ते, सांग संजया ! ॥...२

व्यासकृपे जे देखत डोळा,
संजय सांगे ते धृतराष्ट्राला । (संजय)

पाहता हि तेव्हां, तो दुर्योधन,
पांडवसेनेची व्युह रचना ।
आचार्या द्रोणांजवळी, राजन,
जाऊनी बोलीला, तो त्या वचना ॥३/२

पहा हो ! तुम्ही आचार्य,
सैन्या महान, पंडुसुत चमूते ।
व्युहाते रचती थोर,
विद्वान, धृष्टद्युम्न, शिष्य तुमचे ॥४/३

इथे वीर मोठे, धनुर्धर पाणि,
भीमार्जुना सारीखे, शुर रणी ।
विराट आणि सात्यकी - युयुधान,
द्रुपदही तो महारथी महान ॥५/४

काशीराज आणि धृष्टकेत,
तो चेकीतान ही वीर्यवन्त ।
कुंतीभोज बंधु पुरुजीत,
शैबहि तो नर बलवंत ॥६/५

उत्तमौजा वीर युधामन्यु
विक्रांत सौभद्र अभिमन्यु ।
पुत्र द्रौपदीचे आणि पांच,
असती महारथी सारेच ॥७/६

आतां आपुल्या सैन्यांत,
असती जे हि विशिष्टा ।
नायका जाणी, संज्ञार्थ,
सांगतो ते, द्विजश्रेष्ठा ॥८/७

सर्वत्र जयी कृप,
तुम्ही, भीष्म आणि कर्ण ।
सोमदत्त तैसेची,
अश्वत्थामा नी विकर्ण ॥९/८

आणिक हि शुर बहुत किती,
त्यजण्यार्थ, जीवीत मजप्रती ।
अति कुशल हि योध्दे ते,
नाना शस्त्र-संभार जाणते ॥१०/९

अफाट आमुचे सैन्यबल तें,
भीष्मानी रक्षिलेले
तुटपुंजेची, परी तयांचे,
भीमानी रक्षिलेले ॥११/१०

(वृत्त इंद्रवज्रा)

म्हणून, क्षेत्रात यथाहि स्थानी,
सर्वाच ह्या तुम्हि उभे राहूनी ।
भीष्मासची रक्षण सर्वथा हो,
तुम्हा परी ते करणे हि त्याहो, ॥१२/११

कौरव जेष्ठ प्रतापी भीष्म,
त्यास तेव्हां खुष करण्या ।
फुंकीत झाले, शंख उंच,
करुनी मोठी सिंहगर्जना ॥१३/१२

शंख भेरी, नगारे, ढोलक,
गोमुख कर्णे, तेंव्हा गर्जिले ।
रणवाद्ये वाजता, अचानक,
भीषण स्वर दुमदुमले ॥१४/१३

रथारुढहि माधव, पांडव,
शुभ्र घोडयांच्या रथांत, त्या भव्य ।
वाजवू लागले, शंख ते तव,
आपापले, मग उभय दिव्य ॥१५/१४

श्रीकृष्णे वाजवीला, पांचजन्य
देवदत्त तो, वाजवी अर्जुन ।
महाशंख तो दिव्य पौंड्र नाम,
तया वाजवी वृकोदर भीम ॥१६/१५

कुंतीपुत्र युधिष्ठीरे, राजन,
अनंत विजय फुंकीला ।
सहदेवे तो मणिपुष्पक,
सुघोष, नकुले वाजवीला ॥१७/१६

धनुर्धारी काशीराज,
शिखंडी, महारथी ।
धृष्टद्युम्न, विराट,
अपराजित, सात्यकी ॥१८/१७

पंचपुत्र द्रौपदीचे, नी द्रुपद
महाबाहु अभिमन्यु तो सौभद्र ।
वाजविती, हे राजा, हे सर्व,
भिन्न, भिन्न शंख ते अनेक दिव्य ॥१९/१८

तुमुळ नाद ते मग, सर्वा ।
हृदयें विदारती कौरवा ।
धरणीं आणि नभ हि घुमले,
भीषण नांदे, ते दुमदुमले ॥२०/१९

(वृत्त इंद्रवज्रा)
पाहून सज्ज, धृतराष्ट्र पूतां,
शस्त्राप्रवृत्ते, धनु घेई पार्था ॥२१/२०

नेण्यास मध्यांत, रथा रणी तो,
कृष्णा वदे, राज, कपिध्वजा तो ॥२२/२१

धनु धरुनी अर्जुन हाती,
हृषीकेशां बोले वचना तीं । (अर्जुन):-

(वृत्त इंद्रवज्रा)
पाहीन मी ह्या, हजाराहि सार्‍य़ा,
युध्देच्छुकां या जमलेल्या वीरा ।
कोणासवे युध्द असे जरुरी
युध्दा प्रसंगी मज ह्या समरी ॥२३/२२

दुर्बुद्धिने योजल्या युध्दात या,
प्रिय करण्या, दुर्योधन ।
मनी ईर्षा धरुनी जमले, ज्या,
म्हणतो मी, तया पाहीन ॥२४/२३

बोलीले कृष्णास, ते ऐकता कानी,
धृतराष्ट्रास बोले, संजय आणि । (संजय):-

(वृत्त भुजंग प्रयात)
गुडाकेश ऐसे कथीता हि, राया ।
रया उत्तमा तो, दलाते उभया ।
हृषीकेश आणून, मध्ये रणांते,
करुनी उभा, स्थापूनी त्या रथाते ॥२५/२४

(वृत्त भुजंग प्रयात)
गुरुद्रोण भीष्मापुढें आणि त्यांच्या,
नृपा सर्व सन्मूख, सार्‍या जगीच्या ।
हृषीकेश बोले, गुडाकेश - पार्थे,
बघे पार्थ, एकत्रीता, कौरवा हे ॥२६/२५

(वृत्त भुजंग प्रयात)
पहाता सखे सोयरे पांडवा तो,
पिता, पितृ-पित्या, सख्या बांधावतो ।
उभे देखिले, तेथं दोन्ही दलाही,
गुरु, मातुला ते सुता, नातवा ही ॥२७/२६

(वृत्त भुजंग प्रयात)
तया सज्ज पाहून, सर्वा हि बंधू ।
करुणामये ग्रस्त तो कुंतिनंदू ।
असे बोलिला तो विषादे हि कृष्णा,
अती व्याकुळा तो सखेदे विषण्णा ॥२८/२७

(वृत्त इंद्रवज्रा)
युध्दी समुदाय बघुमी सारा,
आप्तेष्ट सर्वा, स्वजना हि वीरा ।
सज्ज रणी त्या लढण्या सशस्त्रु,
पार्था परी त्या, नयनीच आश्रु ॥२९- (अर्जुन)

पाहता मी स्वजन सारे,
जमलेले हे युध्द इच्छुक ।
गात्रे, कृष्णा, शीथिल बा, रे,
पडले मुख ते, माझे शुष्क ॥३०/२९

कंपित अंगीरोम दाटले,
त्वचा हि सारी मम दाहली ।
गांडीव हस्तीं, थरथरते,
अंगी स्थिरता नच राहीली ॥३१/३०

राहू अस्वस्थे, शके न स्थीर,
मन माझे जणु भ्रमले रे ।
वाटे, केशवा, विपरीत ते,
आरिष्ट सूचक, निमित्त रे ॥३२/३१

हत्तेने, मम स्वजनांच्या,
युध्दि न दिसे मज हीत ।
(श्रेय तयाने काय मिळे?
न गमे, मज रे, अच्युत) ॥३३/३१

नसे ही कांक्षा मज विजयाची,
तैसेचि राज्य वा सुखाची ।
कशास, गोविंद, हवि आस ही ?
राज्य, भोग वा जीवीताची ॥३४/३२

राज्य, भोग आणि सुखही,
ज्यांचे साठी, इच्छीले आपण ।
ते (स्वजन) जमले युध्दीं,
प्राण धन सर्व ही त्यजुन ॥३५/३३

आचार्य, पितृ आणि पुत्र,
तैसेची पितामह, मातुल ।
सासरे, नातु संबंधित,
शालक, तैसेही गोतावळ ॥३६/३४

(वृत्त इंद्रवज्रा)
गेलो वधीला, मधुसुदना ही,
ना मारण्या इच्छि तया परी मी ।
त्रैलोक्य राज्या, मिळण्या, न हेतु,
त्या पृथ्वी राज्या मग काय किंतु ! ॥३७/३५

धृतराष्ट्र पुत्रां, मारण्या आम्हा,
असेल प्रित कशी ! जनार्दना ।
वधुनी ह्या आततायी यांना
पापची आश्रयेल, आपणा ॥३८/३६

(वृत्त इंद्रवज्रा)
ना योग्य आम्हां, म्हणुनी तयांची,
हत्या कुरुंची निजबांधवांची ।
मारुन बंधूजन आपलेसे,
होऊ सुखी, माधव, आम्ही कैसे ॥३९/३७

लोभा मोहित भ्रष्ट बुध्दि ते,
जरी पाहती कदा न यांते ।
`दोष ते केल्या, कुलक्षया त्यां,
पापे आणिक मित्र द्रोही त्यां' ॥४०/३८

सूज्ञ, जनार्दन, आपण त्यातें,
दोष सकल ते, कुलक्षयाते ।
परावृत्त ना त्या पापापासून,
(मुळी) कळे न, कसे ना आपण ॥४१/३९

कुलाचार ते कुळी सनातन,
नाश तयाते कुलक्षयातून ।
धर्म नष्टता, कुळांत सारा,
म्हणे, अधर्मा वाढे पसारा ॥४२/४०

कुळी व्याप्तल्या अधर्मातून,
कुलस्त्रीया त्या नासती, कृष्ण ।
स्त्री-भ्रष्टते, मग चारी वर्ण,
वर्णी, वार्ष्णेय उपजे मिश्रण ॥४३/४१

(वृत्त भुजंग प्रयात)
तया मिश्रणे, निश्चये वाट नर्का,
कुला आणि तैसे कुलाते घातकां ।
अध:पात पित्रां, मिळे नर्क त्याते,
जया संपले, श्राध्द नी तर्पणा ते ॥४४/४२

संकरा कारी ह्या, त्या वर्णीचे,
दोषां ते ह्या कुलघातकीचे ।
जाती, धर्म ते, नष्ट पावती,
शाश्वत धर्म, कुळी संपती ॥४५/४३

नष्टता, जनार्दन, धर्म मानवा,
नर्कवास, सदा, श्रुत हे केशवा ॥४६/४४

(वृत्त इंद्रवज्रा)
त्या राज्य-लोभा, सुख लालसेने,
उद्युक्त आम्हि स्वजना बघण्या ।
आश्चर्य ची बाप । प्रवृत्त होणें,
पापा महा ह्या करण्या जघन्या ॥४७/४५

(वृत्त इंद्रवज्रा)
शस्त्राधराते, मज शस्त्रहीना,
मी ना करीता प्रतिकार रणा ।
त्या कौरवांनी, जर मारील रे
ते क्षेमकारीच, मपा परी रे ॥४८/४६

उदास अर्जुन शोकावेगे,
खिन्न मनाते कृष्णा सांगे ।
ऐकुन सारे, संजय वदला,
वृत्त वर्तमान धृतराष्ट्राला ॥४९-(संजय)

(वृत्त इंद्रवज्रा)
बोलूनि अर्जुन, अशा परी ते,
बैसे रणी तो, जवळी रथाते ॥
त्यागून चापास, सवे हि बाणा,
शोके हि उद्विग्न, मनी विषण्णा ॥५०/४७

गोपाल गीते अनुवादिले हे,
श्री `मद्भगवद्गीत' यथार्थ सारे ।
भवद्भावे पद्म हे `पहिले',
गोपाळकृष्णा गोपाळे वाहिले ॥५१॥

ऐसे हे श्रीमद्भगवद् गीत उपनिषिदे ब्रह्मविद्येत
योगशात्रे श्रीकृष्णार्जुन संवादात
अर्जुनविषाद योग नामेश्रुत
हे गोपाळ रचित गोपाल गीत
प्रथम पुष्प
(श्लोक संख्या ७८)

N/A

References : N/A
Last Updated : February 05, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP