मेदोवहस्त्रोतस - मेदोरोग

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या

मेदाच्या वृद्धीमुळें उत्पन्न होणारा व्याधी.

स्वभाव

चिरकारी, पीडाकर, याप्य.

मार्ग

बाह्य.

निदान

तदतिस्थौल्यमतिसंपूरणाद्‍गुरुमधुरशीतस्निग्धोपयोगाद-
व्यायामादव्यव्यायाद्दिवास्वप्नाद्धर्षनित्यत्वादचिन्तन्दाद्वी-
जस्वभाच्चोपजायते ।
च. सू. २१-४ पान २४४.

गुरु, मधुर, शीत, स्निग्ध या गुणांचीं द्रव्यें अतिप्रमाणांत भक्षण करणें, व्यायाम न करणें, मैथुन न करणें, दिवसा झोपणें, जीवन सुखी असणें, काळजी नसणें, कुलामध्यें मेद अधिक असण्याची प्रवृत्ति असणें या कारणांनीं प्रथमत: मेदाची संचिति होते.

संप्राप्ति

तस्य ह्यतिमात्रमेदस्विनो मेद एवोपचीतये न तथेतरे
धातव: ।
च. सू. २१-४ पान २४४.

मधुरोऽन्नरस: प्राय: स्नेहान्मेद: प्ररर्धयेत् । मेदसाऽऽवृत-
मार्गत्वात् पुष्यन्त्यन्ये न धातव: ॥
मा. नि. मेदोरोग पान २६५

मेदसाऽऽवृतमार्गत्वात्वायु:  कोष्ठे विशेषत: । चरन्
सन्धुक्षयत्यग्निमाहारं शोषयत्यपि ॥५॥
तस्मात् स शीघ्रं जरयत्याहारमभिकाड्क्षति ।
विकारांश्चाश्नुते घोरान् कांश्चित् कालव्यतिक्रमात् ।
च. सू. २१-५, ६ पान २४४.

मधुर अन्न रसामुळें मेदाची वृद्धि होते. वृद्ध झालेल्या मेदामुळें स्त्रोतोरोध होऊन इतर धातूंची पुष्टी होत नाहीं. तसेंच मेदानें उत्पन्न झालेल्या मार्गावरोधामुळें प्रतिरुद्ध गति झालेला वायु कोष्ठांतल्या कोष्ठांत संचार करीत जाठराग्नीचें संधूक्षण करतो. आहाराचें शोषण करतो व त्यामुळें अधिक खाण्याची इच्छा होते. अधिक आहारामुळें मेदाची वृद्धि अधिक होते.

पूर्वरुपें -
 
मेदस्त सर्वभूतानामुदरेष्वेव तिष्ठति ।
अत एवोदरे वृद्धि: प्रायो मेदस्विनो भवेत् ॥३॥
मा. नि. मेदरोग ४ पान २६५

सामान्यत: मेदाचे प्रमाण इतर शरीरापेक्षा उदरावर थोडें अधिक असतेंच मेदाची संचितीही तेथेंच होऊं लागते. त्यामुळें पोट सुटतें, आळस वाढतो, घाम जास्त येतो, थोडासा दम लागतो.

रुपें

मेदस्तु चीयते तस्मादशक्त: सर्वकर्मसु ।
क्षुद्रश्वासतृषामोहस्वप्नकथनसादनै: ।
युक्त: क्षुत्स्वेददौर्यन्ध्यैरल्पप्राणोऽल्पमैथुन: ॥२॥
मा. नि. मेदोरोग पान २६५

तस्मादस्यायुषो ह्नास: शैथिल्यात् सौकुमार्याद्‍गुरुत्वाच्च
मेदसो जवोपरोध: शुक्राबहुत्वान्मेदसाऽऽवृतमार्गत्वाच्च
कृच्छ्रव्यवायता, दौर्बल्यमसमत्वाद्धातूनां, दौर्गन्धं मेदो-
दोषान्मेदस: स्वभावात् स्वेदनत्वाच्च, मेदस: श्लेष्म-
संसर्गाद्विष्यन्दित्वाद्वहुत्वाद्‍गुरुत्वाद्वयायामसहत्वाच्च
स्वेदाबाध:, तीक्ष्णाग्नित्वात् प्रभूत-कोष्ठवायुत्वाच्च क्षुद-
तिमात्रं पिपासातियोगश्चेति ॥४॥
च. सु. २१-४ पान २४४.

आयुष्य कमी होणें, चालण्याचावेग आडखळणें, म्हातारपणची पीडा लवकर होणें, मैथुन कष्टानें होणें, मैथुनाची इच्छा कमी असणें, घाम झास्त येणें, घामाला दुंर्गधी असणें, अशक्तपणा वाटणें, क्षुद्रश्र्वास लागणें, तृष्णा, मोह, निद्राधिक्य, कण्हणें, घशांत
आवाज होणें किंवा श्वासाला अडथळा होणें, शक्ति कमी होणें, अंग गळून जाणें, भूक फार लागणें अशीं लक्षणें होतात. चरकानें कांही लक्षणांच्या उत्पत्तीची कारणें दिलीं आहेत. सर्व धातूंचें पोषण योग्य तर्‍हेनें न झाल्यामुळें आयुष्य कमी होतें. मेदाच्या शिथिल, मृदु आणि गुरु गुणामुळें वेगाला अडथळा होतो किंवा म्हातारपण लवकर येतें, शुक्र कमी झाल्यामुळें आणि मेदोवृद्धीनें अडथळा आल्यामुळें मैथुन अल्प वा कष्टदायक होतें. [शुक्राल्पतेप्रमाणेच मेदाच्या आवरणामुळें स्त्रियांच्यामध्यें आर्तवामध्येंही वैगुण्य उत्पन्न होऊन रज:क्षीणता उत्पन्न होते तसेंच मध्यववयाच्या शेवटी आर्तवाला दौर्बल्य प्राप्त झाल्यानंतर स्त्रियांच्या सर्व शरीर व्यापाराला धारक असलेलें तेज वा ओज दुर्बल होऊन त्याचा परिणाम धात्वाग्निमांद्यांत होतो आणि त्यामुळेही मेदोवृद्धी हे लक्षण उत्पन्न होते.] धातूच्या विषमतेमुळें दौर्बल्य येतें. मेदांतील पिच्छिलत्वादिदोषामुळें किंवा दोषानीं झालेल्या मेदोदुष्टीमुळें घाम जास्त येतो. त्यामुळें अंगाला घाण येते. कफाच्या संसर्गामुळें मेद अधिक शिथिल होतो, प्रमाणानें वाढतो. मेदाच्या जडपनामुळें व्यायाम करवत नाहीं. त्यामुळें घामाचा त्रास होतो. फार उकडतें, थोडयाशा अमानेंही शरीर घामाघूम होतें. वायू कोंडला जाऊन अग्निसंधुक्षण झाल्यामुळें क्षुधा व तृषा वाढते. अग्निसंशुक्षण होत असेल तर मेदाची वृद्धी कशीं होते ? अग्निमांद्यापासून आम नाहीं आणि आमावांचून धातुवृद्धी होणार नाहीं ? यावर उत्तर असे. प्रतिरुद्धगति वायूनें केवळ जाठराग्नीचें संधुक्षण होतें. धात्वग्नीचें संधुक्षण होतें असें वर्णन नाहीं. त्यामुळें या स्वरुपाची शंका येण्याचे कारण नाहीं. टीकाकारानें मधुर, स्निग्ध, गुरु द्रव्यापासून निर्माण झालेला आहाररस आमसदृश असतो असें वर्णन केलें आहे. त्यापेक्षां धात्वग्निमांद्याचा विचार करणें अधिक बरें (मा. नि. मेदोरोग ९ म. टीका)

उपद्रव

मेदस्यतीव संवृद्धे सहसैवानिलादय: ।
विकारान् दारुणान् कृत्वा नाशयन्त्याशु जीवितम् ॥८॥
मेदोमांसातिवृद्धत्वाच्चलविस्फगुदरस्तन: ।
अयथोपचयोत्साहो नरोऽतिस्थूल उच्यते ॥९॥
च. सू. २१-८, ९ पान २४४

विकारांश्चाप्नुते घोरानिति वातविकाराणामन्यतमान्; ।
मा. नि. मेदोरोग ९ म. टीका पान २६६

मेदाच्या अतिवृद्धीमुळें उदर, स्तन फार मोठे होऊन लोंबकळणें, उत्साह नसणें, प्रमेह, प्रमेहपीडिका, ज्वर, भगंदर, विद्रधि, वातरोग (पक्षवधादि) असें उपद्रव होतात.

साध्यासाध्य विवेक

वाग्भटानें ``न हि स्थूलस्य भेषजम्'' असें सूत्र सांगून हा व्याधी असाध्य असल्याचें सुचविलें आहे. व्याधि स्वभावामुळें धात्वग्निमांद्यामुळें आणि कराव्या असल्याचें सुचविलें आहे. व्याधि स्वभावामुळें धात्वग्निमांद्यामुळें आणि कराव्या लागणार्‍या उपचारांच्या अप्रियतेमुळें व्याधि असाध्य होतो. अत्यंत निष्ठेनें संयम राखण्याची शक्यता असली व योग्य ते उपचार दीर्घकालपर्यन्त करीत राहिलें तर व्याधी कष्टसाध्य वा याप्य होतो.

चिकित्सासूत्रे

गुरु चातपर्ण चेष्टं स्थूलानां कर्शनं प्रति ।
च. सू. २१-२० पान २४६

एवं स्थूलकृशौ प्रतिपाद्य तयोर्योजनीयं भेषजमाह गुर्वित्यादि ।
गुरु चातर्पणं च तथा - मधु; एतद्धि गुरुत्वाद्‍वृद्धमग्निं यापयति,
अतर्पणात्वाच्च मेदो हन्ति ।
एवं प्रशातिकाप्रभृतीनामतर्पणानां संस्कारादिना गुरुत्वं कृत्वा
भोजनं देयम् ।
टीका च. सू. २१-२० पान २४६

वातघ्नान्यन्नपानानि श्लेष्ममेदोहराणि च ।
रुक्षोष्णा बस्तयस्तीक्ष्णा रुक्षाण्युद्वर्तनानि च ॥२१॥
च. सू. २१-२१ पान २४६

प्रजागरं व्यवायं च व्यायामं चिन्तनानि च ।
स्थौल्यमिच्छन् परित्यक्तुं क्रमेणाभिप्रवर्धयेत् ॥२८॥
च. सू. २१-१८ पान २४६

स्थूलाकरितां वापरावयाचीं आहार द्रव्यें पचावयास जड असून ज्याच्यामध्यें सारभाग कमी असेल अशीं असावींत. कफ व मेद यांचा नाश करणारें असूनही अन्नपान वातघ्न असावें. रुक्ष उष्णगुणांचे बस्ती व रुक्ष उद्‍वर्तन वापरावे. जागरण, व्यायाम, मैथुन आणि कांहीतरी चिंता यांचें प्रमाण क्रमाक्रमानें वाढवीत न्यावें.

कल्प :-

कुंभा (साल), शिलाजतु, त्रिफळा, गोमूत्र, निंब, कुंभजतु,

आहार :-

जोंधळा, जुनीं धान्यें, कुळीथ, वरी, नाचंणी, यव हीं धान्यें खावींत.

विहार :- व्यायामाचें प्रमाण थोडेंथोडें वाढवीत न्यावें व सातत्य राखावें.

अपथ्य

स्निग्ध गुरु पदार्थ, पोटभरुन जेवण, विश्रांति, दिवास्वाप वर्ज्य करावें.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP