मांसवह स्त्रोतस् - वातकंटक

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


रुक् पादे विषमन्यस्ते श्रमाद्वा जायते यदा ।
वातेन गुल्फमाश्रित्य तमाहुर्वातकण्टकम् ॥
वातकण्टकमाह - रुगित्यादि । यदाविषमपादन्यास - कुपित:
अमकुपितो वा वायुर्गुल्फे वेदनां जनयति, तं वातकण्टक-
मित्याहु:, अयमेवान्यत्र `खुडुकवात' इत्युक्त: ॥६१॥
मा. नि. वातव्याधी ६१ पान २०८ म. टीकेसह

पाय वेडावाकडा पडल्यामुळें वा अत्यंत ताण पडल्यामुळें, सारखे श्रम झाल्यामुळें वात प्रकुपित होऊन तो पायामध्यें विशेषत: गुल्फाच्या ठिकाणीं वातकंटक नांवाचा व्याधी उत्पन्न करतो. यालाच खुडुका वात असें नांव आहे. या तर्‍हेचा विकार पावलांमध्यें विशेषत: होत असला तरी, गुढगा, वंक्षणसंधि, कटि,पार्श्व, पृष्ट, खांदे, कोपर, मनगट, मान अशा एकदम वेडीवाकडी हालचाल होऊं शकणार्‍या वा वेडावाकडा ताण पडणार्‍या इतर अवयवांमध्येंही वातप्रकोपानें हा विकार होऊं शकतो. विषमन्यास वा श्रम यानें त्या त्या अवयवांतील स्नायु व सिरा यांची विकृति होते व शूल, क्रियाहानि, शोथ अशीं लक्षणें उत्पन्न होतात. यालाच व्यवहारांत लचक भरणें, मुरगळणें, उसण भरणें असें म्हणतात. स्थानवैगुण्यामुळें एकाच जागीं अन्य स्वल्प कारणानें पुन:पुन्हा उत्पन्न होण्याची या व्याधीची प्रवृत्ति असतें. या व्याधीस विषमन्यास वा श्रम या स्वरुपाचें व्यंजक वा सन्निकृष्ट कारण आवश्यक असले आणि कित्येक वेळां व्याधीच्या उत्पत्तीस तेवढेंच कारण पुरेसें होत असलें तरी स्थानवैगुण्य असणें व त्या स्थानवैगुण्याच्या जोडीनें शरीरांत आमसंचयाची प्रवृत्ति असणें, हेंही कारण उत्पादक हेतूच्या दृष्टीनें विचारांत घेतले पाहिजे. विशेषत: ज्याला आपण उसण भरणें असें म्हणतों त्या व्याधीचा आणि आमचा संबंध अधिक निकटचा आहे. मुरगळणें हा विकार मात्र बहुत अंशी आगंतु कारणानेंच उत्पन्न होतो. व्याधी साध्य व कष्टसाध्य असतो. स्थानवैगुण्य बलवान् असल्यास व्याधीचें स्वरुप याप्य होतें.

चिकित्सा --

स्नेहन, स्वेदन, शोधन, मर्दन, पीडन, त्रिफळा, गुग्गुल, एरंडस्नेह, वातविध्वंस वातगजांकुश आमपाचक वटी, विषगर्भ तेल, लेपगोळी.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP