प्राणवहस्त्रोतस् - स्वरभेद

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


शारीर
कंठस्थानी असलेले स्वरवहस्त्रोत्स व त्या भोवतीचा गलकंठ भाग.

व्याख्या
स्वरभेद: स्वरोपघात: ।
सु.उ. ५३-१ टीका

स्वराचे जे प्रकृतस्थितींतील स्वरुप असतें त्यामध्यें पालट होऊन कांहींतरी वेगळ्याच प्रकारचा ध्वनि उत्पन्न होतो त्यास स्वरभेद असे म्हणतात. विशिष्ट वर्णरहित जो ध्वनि तो स्वर आणि ओष्ठदंततालुमूर्धा या अवयवाच्या सहाय्यानें उत्पन्न होणारा तो शब्द हा भेद लक्षांत ठेवला पाहिजे. विकार स्वराशीं संबद्ध आहे.

स्वभाव
कांहीं तात्कालिक कारणांनीं उत्पन्न झालेला व्याधि बहुधा सौम्य स्वरुपाचा असतो. गंभीर कारणांनीं उत्पन्न होणारा व्याधि (उपद्रवात्मक) चिरकारी व त्रासदायक असतो.

प्रकार
दोषैर्व्यस्तैस्समस्तैश्च क्षयात् षष्ठश्च मेदसा ।
वा.नि. ५-२४, पान ४८०

भवति चापि हि षड्विध: स: ॥
सु.उ. ५३-३. टीका, पान ७७१

षड्‍विध: षट्‍प्रकारक:; पृथक् वातादिभिस्त्रिय:, सन्निपातेनैक;,
मेद:क्षयाभ्यां प्रत्येकमेक:; एवं षट्‍प्रकार: ।
ननु, समानतन्त्रे `वातात् पित्तात् कफात् कासाद्रक्तवेगात् सपीनसात्'
(च.चि.अ.८) इत्यत्र यथा षड्‍विध: स्वरभेद उक्तस्तेन्
सार्ध कथं न विरोध: । सत्यं, कासजप्रतिश्यायजयोर्लिड्ग-
त्वेनोक्तत्वाद्गहणं, रक्तजस्य तु कफग्रहणेनैव ग्रहणं, यतो
रक्तं कफयुक्तं स्वरभेदं करोति समानतन्त्रोक्तवात् ।
यद्येवं तर्हि कथं न संख्याधिक्यं ? सत्यं, कासजप्रतिश्यायजयोर्वा-
तिकत्वेन ग्रहणम् । अत्युच्चभाषणेत्यादिको हेतु:, प्रकुपिता:
पवनादय इत्यादिका संप्राप्ति:, भवति चापि हि षड्‍विध: स
इति संख्या ।
सु.उ. ५३-३ टीका पान ७७१

वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक, क्षयज, आणि मेदोज असें स्वरभेदाचे सहा प्रकार होतात. चरकानें वातज, पित्तज, कफज, कासज, रक्तज, आणि पीनसज असे स्वरभेदाचे वेगळेच सहा प्रकार सांगितले आहेत.

वातात्पित्तात कफाद्रक्तात् कासवेगात्सपीनसात् स्वरभेदो भवेत् ।
च.चि. ८-५३

यामुळें स्वरभेदाची संख्या जास्त होते. सुश्रुताच्या टीकाकारानें यावर कांहीं वर्गवारी सुचविली आहे. आमच्या मतें चरकोक्त कासज, रक्तज आणि पीनसज स्वरभेदांचा समावेश अनुक्रमानें वातज, पित्तज व कफज स्वरभेदांत वा प्रकृतिसमसमवायानें उत्पन्न होणार्‍या संसर्गज स्वरभेदांत यथोचित रीतीनें करावा.

हेतू
अत्युच्चभाषणविषाध्ययनातिगीत
शीतादिभि: प्रकुपिता: पवनादयस्तु ।
सु.उ. ५३-३, पान ७७०

अत्युच्चभाषणेत्यादि । अध्ययनम् अनवरतं वेदादिपाठ: ।
अतिगीतं निरन्तरं मड्गलादिगानम् ।
शीतादिभिरित्यत्रादि शब्दात् पित्तकफकोपहेतवो गृह्यन्ते ।
यदत्र अत्युच्चभाषणादीनां वातकोपहेतूनामेव साक्षात् कथनं कृतं न
पित्तकफकोपहेतूनां तत् स्वरोपघातकर्तृत्वे वायो: प्राधान्यख्यापनार्थ ।
अन्ये तु शीतादित्यत्र आदिशब्देन गुरुलघुस्निग्धरुक्षादीन् गुणान् गृहन्ति ।
सु.उ. ५३-३ टीका पान ७७०-७१

अतिशय मोठयानें बोलणें, सतत पाठान्तर करणें, अतिगायन करणें, निज व अगन्तु कारणांनीं आभिघात होणें; शीत, अम्ल, विदाही, अतिउष्ण या गुणाच्या द्रव्यांचें सेवन करणें, ऋतुविपर्यामुळें दोषप्रकोप होणें; धूम, रज, यांचा परिणाम होणें. या कारणांनीं दोष प्रकोप होऊन स्वरभेद उत्पन्न होतो. सुश्रुताच्या मूळ ग्रंथांतील अतिगीत या पाठापेक्षां माधवनिदानानें स्वीकारलेला अभिघात हा पाठभेद अधिक बरा. कारण अत्युच्च भाषण व अध्ययन यांच्या वर्गात अतिगीत समाविष्ट होतें. अभिघात निज आणि आगन्तु कारणांनीं होतो असें म्हटलें आहे त्याचें स्पष्टीकरण असें. अगन्तु कारणांनीं होतो असें म्हटलें आहे त्याचें स्पष्टीकरण असें. अगन्तु कारणांनीं होणारा अभिघात हा बाहेरुन कण्ठप्रदेशीं बसलेल्या मारामुळें होतो. निजस्वरुपाचा अभिघात हा कण्ठ-गल या प्रदेशामध्यें उत्पन्न होणार्‍या शोथ, ग्रंथि, अर्बुद; विद्रधि या कारणांनीं स्वरवहस्त्रोतसांचें पीडन होऊन होतो.

संप्राप्ति
स्त्रोत:सु ते स्वरवहेषु गत: प्रतिष्ठां
हन्यु: स्वरं भवति चापि हि षड्‍विध: स: ॥
सु.उ.५३-३ पान ७७०

स्वरवहेषु स्त्रोत:सु शब्दवाहिनीषु धमनीषु, ते वातादय:,
गता: प्राप्ता:, प्रतिष्ठां स्थितिम् ।
सु.उ. ५३-३, टीका, पान ७७१

कंठाच्या आश्रयानें असलेलें आणि प्राणोदानाच्या प्रेरणेनें कार्यकारी होणारें जें स्वराची उत्पत्ति करणारें स्त्रोतस् त्यामध्यें दोषांचे संचिती होऊन हा व्याधि उत्पन्न होतो. स्वरहस्त्रोतसांत भाग घेणारे जे कोमल-कोमलतर अवयव त्यामध्यें या दोषामुळें शोथ, स्तंभ, दाह, क्षोभ, क्वचित् ग्रंथि अशा विकृति उत्पन्न होऊन स्वरोत्पत्तीचें कार्य नीट होत नाहीं. त्यामुळें स्वर घोगरा, बसलेला, चिरका अडखळलेला असा होतो. स्वरभेदामध्यें प्राणोदान हे वायु, रसरक्तमांस ही दूष्यें असतात. त्यामुळें स्वरभेद हा रसरक्ताद्भव आहे असें म्हणतां येईल. कण्ठ हें त्याचें अधिष्ठान असून उरस्थान व शिर हें त्याचें संचारक्षेत्र आहे.

पूर्वरुप
घशामध्यें स्त्रोतोरोध वा लिप्तता जाणवतें. खाकरावेसें वाटतें.

रुपें
स्वर आवळल्यासारखा गद्‍गद्‍ घोगरा, चिरका, फुटल्यासारखा होणें. घसा खवखवणें, दुखणें, छातीमध्यें जडपणा वाटणें.

वातज स्वरभेद
वातेन कृष्णनयनाननमूत्रवर्च: ।
भिन्न: शनैर्वदति गद्गदवत् स्वरं च ।
वातिकरस्वरभेदलक्षणमाह - वातेनेत्यादि ।
कृष्णशब्दो नयनादिभिर्वर्च: पर्यन्तै: संबध्यते ।
भिन्नम् अनवस्थितम् । उक्तं च तन्त्रान्तरे
``स्वरभेदो भवेद्वाताद्रूक्ष: क्षामश्चल: स्वर:''
(च.चि.अ.८) - इति ।
`गद्गदवत्, स्वरम् इत्यत्र केचित् `गर्दभवत् स्वरं' इति पठन्ति ।
सु.उ. ५३-४ सटीक पान १७१

कासाति वेगात् कषण: ।
च.चि. ८-५५

वातामुळें स्वर रुक्ष, क्षीण, गद्‍गद्‍, कंपित, फुटलेला, गाढवाप्रमाणें कर्कश, सावकाश उमटणारा व कमी अधिक होणारा असा असतो. घसा व छाती यांत दुखतें. नेत्र, मुख, मूत्र, पुरीष यांचा वर्ण श्याव होतो. कासाच्या अतिवेगामुळें उत्पन्न होणार्‍या उपद्रवीभूत स्वरभेदामध्यें कण्ठ हा अतिशय बसून त्यांतून कष्टानेंहि शब्द उमटत नाहीं असें होतें. कषण या पदाचें स्थानीं करुण असा पाठ आहे. त्याचा अर्थ स्वर केविलवाणा होतो असा आहे. कषण हाच पाठ अधिक चांगला.

वातज स्वरभेद
पित्तेन पीतवदनाक्षिपुरीषमूत्रो
ब्रूयाद्गलेन परिदाहसमन्वितेन ॥

पित्तजस्वरभेदलक्षणमाह - पित्तेनेत्यादि ।
पीतशद्बो वदनादिमिर्मूत्रान्तै: संबध्यते ।
`स विदाहसमन्वितेन' इति केचित्
पठन्ति, तत्र स इति स्वरभेदी पुरुष: ।
सु.उ. ५३-४ सटीक पान ७७१

तालुकण्ठपरिप्लोष: पित्ताद्वक्तुमसूयते ।
च.चि.८-५४ पान १०७५

सन्नो रक्तविबद्धत्वात् स्वर: कृच्छात्प्रवर्तते ।
च.चि. ८-५५ पान १०७५

पित्तामुळें बोलणें नकोसें होतें. तालु आणि कण्ठ यामध्यें लाली येते. घशाची आग होते. क्वचित् तृष्णा ज्वर हीं लक्षणें असतात. रक्तदुष्टीमुळें उत्पन्न होणारा व्याधि मूलत: पित्तजन्यच आहे. लक्षणेंहि पित्तजाप्रमाणें असून शब्द मोठया कष्टानें उमटणें, स्वर जखडल्यासारखा वाटणें हीं लक्षणें अधिक असतात. पित्तज स्वरभेदामध्यें नख, नेत्र, मूत्र, पुरीष, वदन हीं पीतवर्णाची होतात. नख, नेत्र मूत्रादींचे ठिकाणीं वर्णन केलेलें हे तत्तद्‍दोषानुरुप वर्ण क्वचित् आढळणारे असून दोषनिश्चिति करितां त्यावर अवलंबून राहाणें इष्ट नाहीं. दुर्बल शरीरामध्यें नखनेत्रादींच्या ठिकाणीं घेऊन स्ववर्ण प्रगट करण्याइतकी दोषप्रकोप होण्याची आवश्यकता असत नाहीं. थोडयाशा दोषप्रकोपानेंहि व्याधि उत्पन्न होऊन त्याची लक्षणें प्रगट होतात. व्याधि उत्पन्न झाल्यानंतर दीर्घकाल उपेक्षा झाली व मिथ्याहारविहार चालूं राहिले तरच नखनेत्रादींच्या ठिकाणचे त्या त्या दोषांचे वर्ण उत्पन्न होतील सर्व व्याधींत सामान्यत: असेंच घडतें.

कफज स्वरभेद
कृच्छ्रात् कफेन सततं कफरुद्धकण्ठो
मन्दं शनैर्वदति चापि दिवा विशेष: ।
कफजस्वरभेदलक्षणमाह - कृच्छ्रादित्यादि ।
सततं अनवरतम् । कफरुद्धकण्ठ: श्लेष्मावृतकण्ठ: ।
मन्दं शनैरिति मन्दं मन्दमित्यर्थ: ।
दिवा विशेष इति दिवसे विशेषो भवेत, कफक्षयात ।
`दिवा विशेषात' इति केचित् पठन्ति; रात्रौ तावत्
कफरुद्धकण्ठत्वान्न वदत्येव, दिवा पुन:
कफापचयाद्विशेषो भवति, तस्माच्च विशेषान्मंदं मन्दं
वदतीति व्याख्यानयन्ति ।
सु.उ. ५३-५ सटीक पान ७७१

कफाद्‍भेदो विबद्धश्च स्वर: खुरखुरायते ।
च.चि. ८-५४ पान १०७५

पीनसात् कफवातिक: ।
च.चि. ८-५५

कफानें कण्ठ रुद्ध होऊन स्वर नीट उमटत नाहीं. स्वर अडखळल्यासारखा होतो. स्वरामध्यें खरखर जाणवते. दिवसा कसातरी थोडासा स्वर उमटतो पण रात्रीचे वेळीं तर मुळींच उमटत नाहीं. कारण रात्रीच्या शीतकाळीं घसा कफानें अधिक दाटलेला असतो. पीनसोत्पन्न स्वरभेदामध्यें कफवाताचीं लक्षणें दिसतात.

त्रिदोषज स्वरभेद
सर्वात्मके भवति सर्वविकारसंप -
दव्यक्तता च वचसस्तमसाध्यमाहु.॥
सान्निपातिकस्वरभेदलक्षणमाह - सर्वात्मक इत्यादि ।
सर्वात्मके सन्निपातोत्थस्वरभेदे ।
सर्वविकारसंपद्‍ वातादिलिड्गप्रादुर्भाव:।
अव्यक्तता च वचस: अस्पष्टवाक्त्वम् ।
तं सान्निपातिकस्वरभेदम् ।
सु.उ. ५३-५ सटीक पान ७७१

त्रिदोषज स्वरभेदामध्यें सर्वच दोषांचीं लक्षणें दिसतात. स्वर अगदीं अस्पष्ट असतो. घशामध्यें दुखणें, आग होणें आणि घसा आवळल्याप्रमाणें वाटणें, त्यामुळें ध्वनीची प्रवृत्ति कष्टानें होणें अशीं तीनहि दोषांचीं लक्षणें सामान्यत: असतात.

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP