प्राणवहस्त्रोतस् - उरोग्रह

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


शारीर
फुप्फुस आणि हृदय असें महत्त्वाचे अवयव जेथें येतात त्या उराशीं संबंधित असलेली विकृति उरोग्रह या शब्दानें अभिप्रेत आहे. उरामध्यें फुफ्फुस आणि हृदय या अवयवांना व्यापून असणारा जो कोश तोहि तितकाच महत्त्वाचा असा भाग आहे. साक्षात् हृदयविकृतिप्रमाणें त्याच्या ह्या कोशाच्या विकृतिहि उरस्थानीं निरनिराळ्या प्रकारच्या पीडा उत्पन्न करुं शकतात.

व्याख्या
उरामध्यें वेदना उप्तन्न होणें, जडपणा वाटणें, जखडल्या सारखे वाटणें हे उरोग्रह या व्याधीचें स्वरुप आहे. उरोग्रह हा व्याधि वंगसेन व योगरत्नाकर या दोन्ही ग्रंथकारांनीं हृद्गोगानंतर लगेच दिला आहे. हृद्रोगाच्याच एका विशिष्ट अवस्थेंतील भेद स्पष्ट करुन चरकादींपेक्षां अर्वाचीन असलेल्या या दोन ग्रंथकारांनीं त्याचें वेगळें वर्णन केलें आहे. प्रकारांतील सूक्ष्मता लक्षांत घेऊन वेगळें नामकरण करण्याची पुढील ग्रंथकारांची प्रवृत्ति शास्त्राच्या व्यवहारोपयोगी विस्ताराच्या दृष्टीनें आवश्यक अशीच आहे. प्रवाहिका, आमवात, अम्लपित्त, शूल या व्याधीमध्ये असेंच झाले आहें. कांहीं एक संप्राप्तिविशेष लक्षांत घेऊन चरकानंतरच्या या दोन ग्रंथकारांनीं हृद्रोगापासून उरोग्रह व्याधि वेगळा केला आहे. उरोग्रह व्याधीमध्येंहि आणखी कांहीं प्रकार संप्राप्तिभेदानें पाडणें शक्य आहे व अवश्यहि आहे असें उपलब्ध वर्णानाचा विचार करतां लक्षांत येतें. हा व्याधि बाह्य लक्षणांच्या दृष्टीनें चरक, सुश्रुत, वाग्भट या ग्रंथकारांच्या हृद्रोगवर्णनांतच समाविष्ट आहे.

स्वभाव
व्याधि मर्माश्रित स्वरुपाचा असल्यामुळें दारुण स्वभावाचा असतो.

मार्ग
मध्यम.

हेतू
अत्यभिष्यन्दि गुर्वन्नशुष्कपूत्यमिषाशनात्
वंगसेन उरोग्रह, पान ४६३

दहि, मीठ, तिलगुड या सारखे अभिष्यंदि पदार्था, पचावयास जड असलेलीं द्रव्यें अधिक प्रमाणांत सेवन करणें, शिळें, कुजलेलें, वाळलेलें मांस वा अन्न भक्षण करणें या कारणांनीं उरोग्रह व्याधि उत्पन्न होतो.

संप्राप्ति
सास्त्रं मांसं यकृत्प्लीहं सद्यो वृद्धिं यथा गतम् ॥
उरोग्रहं तदा कुक्षौ कुरुत: कफमारुतौ ।
वंगसेन उरोग्रह, पान ४६३-६४

कफ, वात हे दोन दोष प्रकुपित होऊन मिथ्याहारादिमुळें विगुण झालेल्या रसरक्तमांसांची दुष्टि करुन कुक्षीमध्यें उराच्या डाव्या बाजूला उरोग्रह हा व्याधि उत्पन्न करतात. यकृत, प्लीहा एकाएकी विकृत झाल्यास या आशुकारी दुष्टीचा परिणाम म्हणूनहि उरोग्रह व्याधि उत्पन्न होतो.

पूर्वरुपें
ज्वर, गौरव, प्राणोपरोध, हृदयभागीं शूल, अरति अशीं अव्यक्त स्वरुपाचीं लक्षणें पूर्वरुपें म्हणून असतात.

रुपें सस्तम्भं सरुजं घोरं रुक्षं स्पर्शासहं गुरुम् ॥
आध्मानकुक्षिहृच्छोथवातविण्मूत्ररोधता
तन्द्रारोचकशूलानि तत्र लिड्गानि निर्दिशेत् ॥
वंगसेन उरोग्रह, पान ४६४

तीव्रवेगी ज्वर येतो, छातीमध्यें जखडल्यासारखें वाटतें. छाती कोरडी कोरडी झाल्यासारखी वाटतें. छातींत जडपणा वाटतो. पोट फुगतें, वातमूत्रप्रवृत्ति नीट होत नाहीं, तोंडाचा चव असत नाहीं, झांपड येते. छातीमध्यें, कुशीमध्यें, पोटांत तीव्र स्वरुपाचा शूल असतो. शूलाच्या ठिकाणीं विशेषत: हृदयभागीं स्पर्शासहत्व असतें. हृदयाला सूज येतें. (पार्श्वभागींहि सूज येते.) चरकाने मर्मैकदेशे संक्लेदं रसश्चास्योपगच्छति हें जें वर्णन त्रिदोषज हृद्रोगामध्यें उत्पन्न होणार्‍या कृमिज हृद्रोगाच्या अवस्थेचे केले आहे, त्याच स्वरुपाची संप्राप्ति येथे होते. अपथ्यादि कारणांनी वृद्ध झालेल्या रसरक्ताचा पित्ताच्या अनुबंधानें क्षोभ होऊन (हृदयाला वा कुक्षीला) शोथ येतो. त्या ठिकाणीं क्लिन्न झालेला हा रस संचित होतो, क्लिन्न रसाचें स्वरुप वातकफपित्त यांचें आधिक्य असेल त्याप्रमाणें द्रव, तनु, आविल, गुरु वा पूयसदृश असें असतें. हृदयाचे ठिकाणीं आलेल्या शोथाचा परिणाम म्हणून ज्वर, स्तंभ, श्वास, शूल, आध्मान हीं लक्षणें अधिकाधिक वाढत जातात. हृद्रोगानंतर उरोग्रह हा व्याधि दिलेला असल्यामुळें विशिष्ट संबंधानें व्याधीचा अनुक्रम लावण्याची प्राचीन ग्रंथकारांची जी पद्धति आहे ती विचारांत घेतां उरोग्रहाची संप्राप्ति स्पष्टपणें घडण्यापूर्वी कोणत्याना कोणत्या तरी स्वरुपाची अल्प वा प्रभूत अशीं हृद्रोगलक्षणें पूर्वी असणें आवश्यक आहे असें म्हणतां येतें. हृद्रोगामध्यें उत्पन्न होणार्‍या कृमिज हृद्रोगासारखींच कारणें या व्याधींत दिलेलीं आहेत. हें लक्षांत घेतलें म्हणजे हाहि एक हृद्रोगाचा प्रकारविशेष आहे असें आम्ही म्हणतो त्याची उचितता पटेल. रोगारंभक दोष पुन्हां घडलेल्या अपथ्यानें वा मूळचेच बलवान असल्यानें अधिकाधिक प्रकुपित होऊन व्याधीला धातुगत करतात व त्यामुळें रसरक्तमांसाची दुष्टी होते. रक्तमांसांच्या दुष्टीनें यकृतप्लीहा या कुक्षिसमीपस्थ अवयवांची वृद्धि होते किंवा हृदयांतील रसरक्त क्लिन्न होऊन ते हृद्‍शोथ उत्पन्न करतात किंवा स्थानवैगुण्य मिळाल्यास पार्श्वशूल किंवा पार्श्व (कुक्षि) शोथ उत्पन्न करतात; प्रत्येक वेळीं व्याधि धातुगत झाल्यानंतरच या अवस्था उत्पन्न होतात असें नाहीं. विशेषत: यकृतप्लीहा वृद्धि, पार्श्वशूल, पार्श्व शोथ हे व्याधि स्वतंत्रपणें उत्पन्न होऊ शकतात (पार्श्वशूलाचें वर्णन पुढें स्वतंत्र व्याधि म्हणून येणारच आहे.)

वृद्धिस्थान क्षय
रोग वाढला असतां हृदयकोशाला आलेली सूज फार वाढल्याचा परिणाम म्हणून श्वास, स्तंभ, शूल, अरति हीं लक्षणें फार वाढतात. व्याधी असाध्य स्वरुपाचा असल्यामुळें योग्य त्या उपचारानें याप्य या अवस्थेमध्यें रहातो. रस क्लिन्न होऊन संचित झाला नसेल, व्याधीमध्यें तीनहि दोषांचा प्रकोप विशेष झाला नसेल तर क्वचित् व्याधि बरा होण्याची शक्यता असते. हृद्‍स्पंदन हृदध्वनि प्रकृत होणें, आयासानें श्वास न वाढणें; ज्वर, कास, शोथ, शूल हीं लक्षणें पूर्णपणें बरी होणें यावरुन व्याधि क्षीण वा नष्ट झाल्याचें समजतें.

उपद्रव
श्वास, वैवर्ण्य, शूल, मूर्च्छा, तीक्ष्ण ज्वर

उदर्क
हृद्‍ध्वनि-हृद्‍स्पंद विकृति स्थिरस्वरुपांत राहाते.

साध्यासाध्यविवेक
व्याधि अत्यंत कष्टसाध्य व असाध्य आहे.

रिष्ट लक्षणें
तीव्रज्वर, महोर्ध्वछिन्नश्वास, कृष्णता, मूर्च्छा

चिकित्सासूत्र
अत्राऽऽशु स्वेदनं युक्त्या वमनं रक्तमोक्षणम् ।
तीक्ष्णैर्निरुहणं चैकं क्रमाल्लड्घनमाचरेत् ॥
यो.र. उरोग्रह, पान ५३५

यो वा नरस्यात्र वृतस्य कर्मणो
विधिर्विरुद्धो न भवेन्मनागपि ।
यथाबलं वीक्ष्य च शुद्धविग्रहं
तथाविधं पथ्यमपि प्रयोजयेत् ॥
यो.र.उरोग्रह, पान ५३५

उरोग्रहामध्यें स्वेदन, वमन, रक्तमोक्षण, तीक्ष्ण द्रव्यांनीं निरुह व लंघन हे उपचार अवस्थानुरुप करावेत. स्वेदन, तापस्वेद स्वरुपाचें व सौम्य वापरावें. वमन शक्यतों देऊं नये आणि लंघन प्राणविरोधी होणार नाहीं अशी काळजी घ्यावी. व्याधि मर्माश्रित असल्यामुळें कोणताहि उपचार अल्पहि विरुद्ध होणार नाहीं अशीं दक्षता ठेवली पाहिजे. रोग्याचें बलाबल पाहून शोधन व इतर पथ्योपचार करावेत.

द्रव्यें व कल्प
त्रिफला, कटुका, दारुहरिद्रा, हरिद्रा, कुमारी, गुडुचि, पुनर्नवा, त्रिकटु, शालिपर्णी, बला, अश्वगंधा, चतुर्भुज, लक्ष्मीविलास, सूक्ष्मत्रिफला, गंधकरसायन, त्रिभुवनकीर्ति, वातविध्वंस, त्रैलोक्यचिंतामणि, कुमारीकल्प, कुमारी आसव, दशमूलारिष्ट, द्राक्षासव, अर्जुनारिष्ट;

अन्न
यूष, मंड, सुंठीसिद्ध ताक, गोधूम, द्राक्षा-दाडिम रस.

विहार
श्रम वर्ज्य, संपूर्ण विश्रान्ति.

अपथ्य
व्यायाम, चिंता, भय, क्रोध, अजीर्ण

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP