प्राणवहस्त्रोतस् - हृद्रोग

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


शारीर -
हृद्रोगाच्या वर्णनापूर्वी हृदय या अवयवाचें स्थान, स्वरुप, कार्य, तदाश्रित भावविशेष यांचा विचार केला पाहिजे

द्वारमामाशयस्य च स्त्वादिधाम हृदयं स्तनोर: कोष्ठमध्यगम् ॥
हृदयं नाम यन्मर्म तदपि सद्योघ्नम् । तच्चामाशयस्य द्वारंमुखम् ।
तेन हि द्वारेणान्नपानमामाशये प्रविशति ।
तच्च सत्वादीनां - सत्वरजस्तमसां, तथा विज्ञानस्य - इन्द्रियाणां
चार्थपञ्चकस्य, तथा ऽऽत्मनं:- चेतस:, धाम-स्थानम् ।
तच्च स्तनोर:कोष्ठमध्यगम् । स्तनौ चोरश्च कोष्ठश्च स्तनोर:
कोष्ठं, तस्य मध्यं, तत्र गच्छति-स्थितिं बध्नाति, कोष्ठवक्षसो:
स्तनयोश्चमध्ये स्थितमित्यर्थ: ।
वा.शा. ४-१३, सटीक, पान ४१०

कफरक्तप्रसादात्स्याद्‍धृदयं स्थानमोजस: । चेतनानुगभावानां परमं चिन्तियस्य च ।
मांसपेशीचयो रक्तपद्माकारमधोमुखम् । तस्य दक्षिणत: क्लोम यकृत्फुफ्फुसमास्थितम् ।
वा.शा. ३-१२, टीका, पान ३८७

अर्थे दश महामूला: समासक्ता महाफला: ।
महच्चार्थश्च हृदयं पर्यायैरुच्यते बुधै: ॥
षडड्गमड्ग विज्ञानमिन्द्रियाण्यर्थपञ्चकम् ।
आत्मा च सगुणश्चेतश्चिन्त्यं च हृदि संश्रितम् ॥
च.सू. ३०-३, ४ पान ३८८

तत्र हृदये दश धमन्य: प्राणापानौ यतो ।
बुद्धिश्चेतना महाभूतानि च नाभ्यामरा इव प्रतिष्ठितानि ।
च.सि. ९.४

यद्धि तत्स्पर्शविज्ञानं धारि तत्तत्र संश्रितम् ॥
तत्परस्यौजस: स्थानं तत्र चैतन्यसंग्रह: ।
हृदयं महदर्थश्च तस्मादुक्तं चिकित्सकै: ॥
च.सू.३०-६,७; पान ३८९

तेन मूलेन महता महामूला मता दश
ओजोवहा: शरीरेस्मिन् विधम्यन्ते समन्तत: ॥
च.सू. ३०-८, पान ३९०

हृदयं मनस: स्थानमोजसश्चिन्तितस्य च ।
मांसपेशीचयो रक्तपद्माकारमधोमुखम् ।
योगिनो यत्र पश्यन्ति सम्यग्‍ ज्योति: समाहिता: ।
वा.सू. १२-१५, टीका, पान १९४

हृदय हा मांसपेशींनी घटित असा अवयव आहे. गर्भावक्रान्तीमध्यें त्याची उत्पत्ति रक्त व कफ यांच्या प्रसादभावापासून होते. (सु.शा. ४-३१) हृदय हे अधोमुखकमलाच्या आकाराचें असून तें उरामध्यें दोन स्तनाच्या मध्यें किंचित् डाव्या बाजूला आमाशयाच्या मुखाजवळ असते. रस, रक्त, ओज हे धातूंचे धारण पोषण करणारें भाव शरीराला पुरविण्याचें कार्य या अवयवांतून होतें. सत्व, रज, तम, हे तीन गुण, चैतन्य, विषयग्रहण सामर्थ्य, सर्व शरीराची नियंत्रण शक्ति हें सर्व परमार्थत: हृदयांत असते असें योगशास्त्राचें मत असून त्याचाच अनुवाद आयुर्वेदीयांनीं केला आहे.

व्यानेन रसधातुर्हि विक्षेपोचितकर्मणा ।
युगपत्सर्वतोऽजस्त्रं देहे विक्षिप्यते सदा ॥
च.चि. १५-३६, पान १९९१

संतत्या भोज्यधातूनां परिवृत्तिस्तु चक्रवत् ॥
च.चि.१५-२१, पान १९८९

रसो य: स्वच्छतां यात: स तत्रैवावतिष्ठते ।
ततो व्यानेन विक्षिप्तं कृत्स्नं देहं प्रपद्यते ।
वा.सू. १२-१५ स: टीका, पान १९४

रसविक्षेपणाचें कार्य ज्या वाताच्या प्रेरणेवर अवलंबून असतें तो व्यान हृदयाच्या आश्रयानें रहातो. हृदयाचा संकोच-विकास घडवून तद्वारां सर्व शरीरभर रसरक्ताचें विक्षेपण करतो. या संकोच-विकासामुळें हृदयाच्या ठिकाणीं लयबद्ध अशीं विशिष्ट ध्वनीची निर्मिती होते. या स्पंदनामुळेंच हृदयामध्यें असलेला प्रसादरुप पोषक असा आहाररस व शरीराचे जीवन करणारे रक्त सर्व धातूंचे पोषण करण्यासाठी रसवाहिनीतून सर्व शरीरभर विक्षिप्त होतें आणि तेथून पुन: प्राणाचें अनुवर्तन व्हावें यासाठीं परत हृदयात येते. हृदयांतून बाहेर शरीरांत जाणें व बाहेरुन हृदयांत परत येणें या घटनेचें वर्णन परिवृत्तिस्तु चक्रवत् या शब्दांनीं आयुर्वेदीयांनीं केलें आहे.

हृदयस्थ भावविशेष
हृदयाचे शारीर व कार्य यासवेंच हृदयामध्यें रहाणार्‍या इतर भावविशेषांचाहि विचार लक्षांत घेतल्यावाचून हृद्गोगाची संपूर्ण कल्पना येणें अवघड आहे. यासाठीं येथें क्रमाक्रमानें हृदयांतील भावविशेष व त्यांची प्रकृत विकृत कर्मे यांचा विचार केला पाहिजे. हृदय हा अवयव ज्यानें घटित आहे असा मांसधातु, शरीराचे पोषण करणारा रस धातु, रसासवे सर्व शरीरांत फिरणारा जीवनगुणयुक्त रक्तधातु, जीवनाधार असे अष्टबिंद्वात्मक ओज, वर्ण, कान्ति, बल, उत्साह, कार्यक्षमता यांना कारणीभूत होणारे शुद्ध, प्रकृत, कफस्वरुपाचे अर्धाजलि प्रमाण ओज; अवलंबक कफ, साधक पित्त, प्राण, व्यान, उदान हे वाताचे प्रकार-इतके भाव हृदयामध्यें रहातात. हृदय हे रसवह व प्राणवहस्त्रोतसांचे मूल म्हणूनहि सांगितले आहे.

ओज
हृदि तिष्ठति यच्छुद्धं रक्तमीषत्सपीतकम् ।
ओज: शरीरे संख्यातं तन्नाशान्ना विनश्यति ॥
च.सू. १७-७४ पान २१८

स्निग्धं सोमात्मकं शुद्धमीषल्लोहितपीतकम् ।
यन्नाशे नियतं नाशो यस्मिंस्तिष्ठति तिष्ठति ॥
बा.सू. ११-३८ पान १८९

ओजस्तु तेजो धातूनां शुक्रान्तानां परं स्मृतम् ।
हृदयस्थमपि व्यापि देहस्थितिनिबन्धनम् ॥
वा.सू. ११-३७, पान १८९

सर्व धातूंच्या साररुप प्रसाद भागापासून उत्पन्न झालेलें तेजोमय असें जें द्रव्य हृदयांत राहून सर्व शरीराचें धारण करतें त्यास ओज असें म्हणतात. हें स्निग्ध, शीत, शुद्ध, रक्तपीत वर्णाचें असून प्रमाणानें अष्ट बिंद्वात्मक आहे. याच्या अस्तित्वावरच जीव अवलंबून असतो. या ओजाचा नाश झाला असतां, तत्क्षणीं मृत्यु ओढवतो. त्याच्या कोणत्याहि स्वरुपाच्या विकृतीचा परिणाम एक मृत्यु हाच आहे.

ओज (अर्धाजलि)
दश मूलसिरा हृत्स्थास्ता: सर्व सर्वतो वपु: ॥
रसात्मकं वहन्त्योजस्तन्निबद्धं हि चेष्टितम् ।
वा.शा. ३-१८, पान ३८९

प्राकृतस्तु बल श्लेष्मा विकृतो मल उच्यते ।
स चैवौज: स्मृत; काये स च पाप्मोपदिश्यते ॥
च.सू. १७-११७, पान २२३

एतेन द्विविधमोजो दर्शयति परमपरं च, त तत्रार्धाञ्जलिपरिमाणमपरम्, -
``तावदेव परिमाणं श्लेष्मणश्चौजस:'' (शा.प्र.७) इति अल्पप्रमाणं तु परम्,
यदभिप्रेत्योक्तम् ``हृदि तिष्ठति यच्छुद्धं रक्तमीषत्सपीतकम्'' (सू.अ.१७) इति ।
तन्त्रान्तरेऽप्युक्तम - ``प्राणाश्रयस्यौजसोऽष्टौ बिन्दवो हृदयाश्रिता:'' इति ।
किंच, सति हि परे चापरे चौजसि `परस्य' इति विशेषणं सार्थकं भवति, नत्वेकरुपे ।
अर्द्धाञ्जलिपरिमितस्यौजसो धमन्य एव हृदयाश्रिता: स्थानम्,
तथा प्रमेहेऽर्ध्दाञ्जलिपरिमितमेवौज: क्षीयते, नाष्टबिन्दुकम्, अस्य हि किंचित्क्षयेऽपि
मरणं भवति, प्रमेहे तु ओज: क्षये जीवत्येव तावत्
ओज: शब्दश्च यद्यपि रसेऽपि वर्तते, यदुक्तम् रसश्चौज: संख्यात:' (नि.अ.४) इति, तथा -
`मली भवति तत्प्राय: कल्पते किंचिदोजसे' (चि.अ.८) इति ।
तथापि, इह सर्वधातुसारमोजोऽभिधीयते एतच्चोज: उपधातुरुपं केचिदाहु: ।
धातुर्हि धारणपोषणयोगाद्भवति; ओजस्तु देहधारकं सदपि न देहपोषकम् तेन, नाष्टमो धातुरोज: ।
केचित्तु शुक्रविशेषमोज: प्राहु:; तच्च न मन: प्रीणाति ।
ये तु ब्रुवते सर्वधातूनां सारसमुदयभूतमोज; ; ते रसादिसाररुपतया रसादिभ्यो भिन्नमोज इति
पृथग्धातुत्वेनोपधातुत्वेन वा न निर्देश्यमिति पश्यन्ति ।
वचनं च - `भ्रमरै: फलपुष्पेभ्यो यथा संचीयते मधु ।
तद्वदोज: शरीरेभ्यो गुणै: संभ्रियते नृणाम्' (सू.अ.१७) इति ।
च.सू.३०-७, टीका, पान ३९०

ओज: सोमात्मकं स्निग्धं शुक्लं शीतं स्थिरं सरम् ।
विविक्तं मृदु मृत्स्नं च प्राणायतनमुत्तमम् ॥
देह: सावयवस्तेन व्याप्तो भवति देहिन: ।
तद्‍भावाच्च शीर्यन्ते शरीराणि शरीरिणाम् ॥
सु.सू. १५-२१, २२; पान ७१

हृदि श्लेष्मानूपश्लिष्टामाश्यावं रक्तपीतकं ।
तदोजो वर्धते जंतु: तद्‍ वृद्धौ क्षीयते क्षये. ।
(का. सं रोगाध्याय पान ४१)

ओज दोन प्रकारचे आहे. पर ओज आणि अपर ओज. परओज जीवनाधार असून अष्टबिंद्वात्मक आहे. अपर ओजाला श्लेष्मल ओज असें म्हणतात. हें प्रमाणानें अर्धांजलि असून प्रकृत कफाच्या स्वरुपाचें असतें. कफाचे सहा अंजली सांगितलेलें प्रमाण एकूण सर्व कफाचे आहे. तावदेव श्लेष्मलस्यौजस: (प्रमाणं अर्धाजलि:) च. शा. ७-१५ । रसासवें हृदयांतून सर्व शरीरांत या ओजाचा संचार होत असतो आणि धातूंचें धारण त्यामुळें होतें. रस धातु हा धातूंचें पोषण करतो हें ओज स्निग्ध, शीत, शुक्ल, स्थिर, सर, श्रेष्ठ गुणाचें, कोमल, पिच्छिल व गुरु आहे. शरीरांतील अग्नीचे व प्राणाचेंहि ते धारक आहे.

तत्र बलेन स्थिरोपचितमांसता सर्वचेष्टास्वप्रतिघात: स्वर-
वर्णप्रसादो बाह्यानामाभ्यन्तराणां च करणानामात्मकार्यप्रति पत्तिर्भवति ॥
सु.सू. १५-२०, पान ७१

या ओजामुळे शरीराचे स्थैर्य टिकतें. मांस व इतर धातूंचा उपचय होतो. शरीराचे सर्व व्यापार कार्यक्षम रीतीनें होतात. स्वर व वर्ण यांची प्रसन्नता रहाते. कर्मेंद्रियें व ज्ञानेंद्रियें आपापल्या विषयव्यापारामध्यें समर्थ राहातात. मन आणि बुद्धि यांच्या क्रिया उत्तम प्रकारें होतात. हे ओज विकृत झाले तर विकार उत्पन्न करते. ओजाच्या विकृतीची कारणें सुश्रुतानें पुढील प्रमाणें दिलीं आहेत.

अभिघातात्क्षयात्कोपाच्छोकाद्धयानाच्छ्रमात्क्षुध: ।
ओज: संक्षीयते ह्येभ्यो धातुग्रहनानि:सृतम् ॥

तेज: समीरितं तस्माद्विस्त्रंसयति देहिन: ॥
इदानीमभिघातादिभिर्हेतुभिराजेस: क्षयं निर्दिसन्नाह -
अभिघातादित्यादि । एभ्योऽभिघातादिहेतुभ्य: । धातुग्रहण-
मिति धातवो गृह्यन्ते यैस्तानि धातुग्रहणानि धातुवाहीनि
स्त्रोतांसि, तेभ्यो नि:सृतं निर्गतं सर्वधातुस्नेहपरम्परारुपेण
अथवा धातुग्रहणं हृदयं धातुवहस्त्रोतसां स्थानत्वात्
तस्माघ्दृदयान्नि:सृतं स्त्रोतसो मुखैरेव । अन्यैस्तु हृदयमेव
धातून् गृहातीति धातुग्रहणशब्देनैव हृदयमुच्यते तेज:पित्तं,
समीरितं सम्यक्प्रेरितं `वातेन' इति शेष: । तस्मात्
हृदयात्; विस्त्रंसयति च्यावयति ।
सटीक, सु.सू.१५-२३, पान ७२

आघात, धातुक्षय, क्रोध, संताप (दोष प्रकोप) शोक, चिंता, श्रम, लंघन अपतर्पण या कारणांनीं हृदयांतून निसृत होऊन सर्व शरीरांतील धातूंचें धारण करणारें ओज विकृत होते. ओजाच्या विकृतीमुळें शरीराची निरनिराळी कर्मे नीटपणें होईनाशी होतात. ओजाची विकृति तीन प्रकारची असल्याचें वर्णिले आहे.

तस्य विस्त्रंसो व्यापत् क्षय इति (त्रयो दोषा:) लिड्गानि
भवन्ति सन्धिविश्लेषो गात्राणां सदनं दोषच्यवनं क्रियास-
त्रिरोधश्च विस्त्रंसे, स्तब्धगुरुगात्रता वातशोफो वर्णभेदो
ग्लानिस्तन्द्रा निद्रा च व्यापन्ने, मूर्च्छा मांसक्षयो मोह:
प्रलापो मरणमिति क्षये ॥
तस्यौजस: क्षयभेदान् साध्यासाध्यज्ञानार्थ स्वलक्षणैर्निर्दि-शन्नाह,
- तस्येत्यादि । विस्त्रंस: स्थानाच्च्युतिरभिघातादिभिरेव ।
व्यापदन्यथापत्ति:, सा दुष्टदोषदूष्यसंसर्गात् ।
क्षय: स्वप्रमाणात् शोकध्यानक्षयादिभि: ।
`लिड्गानि व्यापन्नस्य भवन्ति' इति केचित् पठन्ति; व्यापन्नस्य
दोषदूषितस्य । विस्त्रंसादीनामोज: क्षयभेदानां किं लिड्गमित्याह,
सन्धिविश्लेष इत्यादि । सन्धिविश्लेष: सन्धीनां विघटनम् ।
दोषच्यवनं स्वस्थानाद्वातादीनां भ्रंश: अन्ये ``दोषै: कृत्वा च्यवनमोजस:''
इति वदन्ति, ``दोषच्यवनं मलानां च्यवनं'' इति केचित् ।
क्रियाणां कायवाड्वानसीनां सन्निरोध:, ``क्रियाशब्दाग्रे नञ लुप्तो
द्रष्टव्य:, नञ ईषदर्थे, तेन क्रियाणामीषत्सन्निरोध:''
इत्यन्ये व्याचक्षते । चकाराद्वलस्य प्राकृतकर्महानि: ।
एवं व्यापत्तौ क्षये च चकारप्रयोजनम् ।
एतानि विस्त्रंसे लिड्गानि भवन्तीति योज्यम् ।
स्तब्धगुरुगात्रतेति स्तब्धगुरुभ्यां गात्रतेति संबध्यते;
स्तब्धगात्रता जान्वादेरनमनसामर्थ्यम् । वर्णभेदो गौरादिवर्णान्यत्वम् ।
ग्लानि: अप्रहर्ष: । तन्द्रा इन्द्रियार्थेऽकर्मण्यता ।
व्यापन्ने `लिड्गानि भवन्ति' इत्यनुवर्तते ।
मूर्च्छेत्यादि मूर्च्छा विज्ञानेन्द्रियनिरोध: । मोह: वैचित्यम् ।
प्रलाप: असंबद्धभाषणम् । क्षये `लिड्गानि भवन्ति' इत्यनुवर्तते ।
सटीक, सु.सू. १५-२४ पान ७२

त्रयो दोषा बलस्योक्ता व्यापद्विस्त्रंसनक्षया: ।
विश्लेषसादौ गात्राणां दोषविस्त्रंसनं श्रम: ॥
अप्राचुर्य क्रियाणां च बलविस्त्रंसलक्षणम् ।
गुरुत्वं स्तब्धताऽड्गेषु ग्लानिर्वर्णस्य भेदनम् ॥
तन्द्रा निद्रा वातशोथो बलव्यापादि लक्षणम् ।
मूर्च्छा मांसक्षयो मोह: प्रलापोऽज्ञानमेव च ॥
पूर्वोक्तानि च लिड्गानि मरणं च बलक्षये ।
सु.सू.१५-२५ ते २७, पान ७२

ओजो विकृति
१) विस्त्रंस -
स्वस्थानापासून भ्रष्ट होणें.
२) व्यापत् -
दुष्ट दोषांच्या संसर्गामुळें दुष्ट होऊन स्वरुपामध्यें बदल होणें.
३) ओजक्षय -
प्रमाणानें उंणावणें.
अशा ओजाच्या तीन विकृति आहेत. त्यांचीं लक्षणें पुढीलप्रमाणें असतात.

(१) ओजो विस्त्रंस -
सांधे ढिले होणे, अवयव गळून जाणें, दोष स्थानभ्रष्ट होणें, थकवा येणें, शरीरव्यापारामधील सहजता नाहीशीं होणें वा उणावणें, शरीराच्या क्रिया मंदावणें अशी लक्षणें ओजाच्या विस्त्रंसरुप विकृतीमुळें उत्पन्न होतात.

(२) ओजोव्यापत् -
सर्व शरीर वा तो तो अवयव जखडल्यासारखे होणें, स्तब्ध होणें, जडपणा वाटणें, वर्ण पालटणें, शोथ, ग्लानी, तंद्रा, निद्रा येणें, अशीं लक्षणें ओजाच्या व्यापद्‍रुप विकृतीमध्यें होतात.

(३) ओज:क्षय -
मूर्च्छा, मांसक्षय,मोह, प्रलाप, विषय ग्रहण न होणें, हीं लक्षणें होतात.

या व्यक्तिरिक्त ओजक्षयामध्यें विस्त्रंस आणि व्यापत् यामध्यें सांगितलेलींहि लक्षणें होतात, मृत्यू येतो.

तेजोऽप्याग्नेयं क्रमश: पच्यमानानां धातूनामभिनिर्वृत्तमन्त-
रस्थं स्नेहजातं वसाख्यं स्त्रीणां विशेषतो भवति; तेन मार्दव
सौकुमार्यमृद्वल्परोमतोत्साहदृष्टिस्थितिपक्तिकान्तिदीप्तयो
भवन्ति, तत् कषादीतक्त गुरुशीतरुक्षविष्टम्भिवेग
विघातव्यवायव्यायामव्याधिकर्षणै (र्शनै) श्च विक्रियते
तस्यापि पारुष्यवर्णभेदतोदनिष्प्रभत्वानि विस्त्रसंने भवन्ति
कार्श्य मंदाग्निताऽधस्तिर्यक्प्रच्चुतिर्व्यांपत्तौ, दृष्टयग्निबल-
हान्यनिलप्रकोपमरणानि क्षये । तत्र स्नेहपानाभ्यंगप्रदेह
परिषके स्निग्धलध्वन्नानि क्षयादृते विदधीत'' ।
सु.सू. १५-२८ टीका ७३ पान.

कांही टीकाकारांनीं घेतलेल्या सुश्रुताच्या एका पाठाप्रमाणें पुरुषामध्यें जसें ओज त्याप्रमाणें स्त्रियांच्यामध्यें तेज नांवाचें सारभूत द्रव्य असतें असें म्हटलें आहे. या तेजामुळेंच स्त्रियांच्यामध्यें मार्दव, सौकुमार्य, रोम मृदु व थोडे असणें, उत्साह, दृष्टी, स्थैर्य, पचनशक्ति, अंगकांती असे भाव उत्पन्न होतात आणि या तेजामध्यें उत्पन्न झालेली विकृती अनेक स्त्रीविशिष्ट पीडा उत्पन्न करते. [रजो निवृत्तीच्या काळीं या तेजाला स्वभवत:च वैगुण्य येत असल्यामुळें अनेक विकार त्यावेळीं निर्माण होतात.] सुश्रुताचे तेजासंबंधीचे विशिष्ट वर्णन विचार करण्यासारखें आहे. ओजाप्रमाणेंच सर्व धातूंचे सारभूत व आर्तवोत्पन्न असें हें तेज मानावे.

अवलंबक कफ
उरस्थ: स त्रिकस्य स्ववीर्यत: ।
हृदयस्यान्नवीर्याच्च तत्स्थ एवाम्बुकर्मणा ॥
कफधाम्नां च शेषाणां यत्करोत्यबलम्बनम् ।
अतोऽवलम्बक: श्लेष्मा ।
वा.सू. १२-१५ पान १९४

अवलंबक कफ हा उरामध्यें - हृदयामध्यें - राहून स्वत:च्या सामर्थ्यानें त्रिकाचे, अन्नाच्या सारभागानें हृदयाचें व उदकव्यापारानें शरीरातील सर्व कफस्थानांचें धारण व रक्षण (अवलंबन) करतो. सुश्रुतानें सर्व स्थानांतील कफावर अनुग्रह करणारा म्हणून आमाशायांतील क्लेदक कफाचा उल्लेख केला आहे. (सु.सू. २१-१३,१४) वाग्भटानें हें कार्य अवलंबक कफाचें सांगितलें आहे. आमच्या मतें दोन्हीहि आपापल्या परीनें योग्य आहेत. परन्तु अवलंबन व अनुग्रह करण्याच्या त्यांच्या कर्माचें स्वरुप परस्परापेक्षां भिन्न स्वरुपाचें आहे क्लेदक कफ हा पोषण करणारा कफ असून तो सर्व कफांचें पोषण करुन अनुग्रह करतो तर अवलंबक कफ हा सर्व कफांचे धारण करणारा असून कफधारण रुपानें त्यावर अनुग्रह करतो. ओजाला प्रकृतिस्थितींतील कफ म्हटल्याचें वर सांगितलें आहे. ओज शुद्ध वैद्यकामध्यें अनेक अर्थानीं येतो.

``धातूनां तेजसि रसे तथा जीवितशोणिते ।
श्लेष्माणि प्राकृते वैद्येराज: शब्द: प्रकीर्तित: ।
वा.सू. ११-३८ आ.र. टीका, पान १९०

धातूंचे तेज, आहारस, निषेककालीं गर्भप्रविष्ट होणारें जीवितशोणित या जीवशोणित या नांवानें संबोधिलें जाणारें शुद्ध रक्त, आणि प्राकृत कफ ह्या सर्वांना ओज असें म्हणतात. प्राकृत कफ या शब्दानें ह्या ठिकाणीं अवलंबक कफ घ्यावा असें आम्हास वाटतें. ओजाचें म्हणून जे रसवर्णादि गुण सांगितले आहेत (स्निग्धादि) ते वस्तुत: अवलंबक कफाचेच आहेत. या अवलंबक कफाच्या वीर्याला, सामर्थ्याला ओज किंवा बल्क असें म्हणावें.

तत्र रसादीनां शुक्रान्तानां यत् परं तेजस्तत‍ खल्वोजस्त-
देव बलमित्युच्यते, स्वशास्त्रसिद्धान्तात् ॥
सु.सू. १५-१९ पान, ७१

रसापासून शुक्रापर्यन्तच्या धातूंचे जे सारभूत वा श्रेष्ठ असें तेज त्यालाच ओज वा बल असें म्हणतात. आमच्या (आयुर्वेद) शास्त्रांत हा सिद्धान्त आहे. या सूत्रावर टीका लिहीत असतांना सुश्रुताच्या टीकाकारानें बल आणि ओज ह्यांचें वेगळेपण सांगितलें आहे.

तत् खलोजस्तदेव बलमित्युच्यत इति, इयं चाभेदोक्तिश्चिकित्सार्था,
परमार्थस्तु बलौजसोर्भेद एव; यथा भेदस्तदुच्यते -
सर्वधातुस्नेहभूतस्योपचयलक्षणस्योजसो रुपरसौ
वीर्यादि च विद्यते, बलस्य तुस भारहरणादिशक्तिगम्यस्य
रसवीर्यवर्णादिगुणा न विद्यन्ते, अतोऽनयोर्भेदोऽस्त्येवेति;
तथाच बलौजसोर्भेदो वेदोत्पत्तावध्याये उक्त:,
``प्राणिनां पुनर्मूलमाहारो बलवर्णौजसां च'' (सु.अ.१) - इति ।
तन्त्रान्तरे तु ओज: शब्देन रसोऽप्युच्यते, जीवशोणिततमप्याज:
शब्देनामनन्ति केचित्, ऊष्माणमप्योज: शब्देनामनन्ति केचित्,
ऊष्माणमप्योज: शब्देनापरे वदन्ति ।
सु.सू. १५-१९, टीका, पान ७१

टीकाकार म्हणतो, दोघांकरितां करावी लागणारी चिंकित्सा एक आहे, येवढयापुरतेंच व्यवहाराच्या सोयीच्या दृष्टीनें दोघांचें ऐक्य मानून ओजालाच बल म्हटलें आहे. वस्तुत: ओज आणि बल हें एक नव्हेत. बल आणि ओज हे शब्द देखील वेगवेगळे वापरले आहेत. उदा. सूत्रस्थान अ.१-२८ मध्यें आहार हा बलवर्ण ओज यांचें कारण म्हणून सांगितलें आहे. याठिकाणीं बल आणि ओज या दोन्ही शब्दांचा प्रयोग एकाच वेळीं आला असल्यामुळें बल म्हणजे ओज नव्हें हे स्पष्ट होते. टीकाकाराने बल आणि ओज यांचा भेद दाखविण्यापेक्षां ओज नव्हें हे स्पष्ट होते. टीकाकाराने बल आणि ओज यांचा भेद दाखविण्यापेक्षां ओज व श्लेष्मा यांचा भेद तशाच कारणाकरितां दाखविला असता तर योग्य झाले असतें. कदाचित् बल शब्दानें त्याला श्लेष्मा अभिप्रेत असेलहि. आमच्या मतें अग्नि आणि पित्त यांचा जसा परस्पर संबंध आहे तसाच ओज आणि कफ यांचा असला पाहिजे. ओजाला तेज, उष्मा अशीं नामान्तरें आहेत तीं त्याच्या सूक्ष्मत्वाची, शक्तिमत्वाची द्योतक असून ह्या दृष्टीनें पित्ताश्रित अग्नीशीं त्याचें सादृश्य आहे. सर्व शरीराला भरण, धारणासाठीं तत्वत: हितकारी असणारे जे अग्निषोम त्यातील अग्नि हा पाचक पित्ताच्या आश्रयानें राहून शरीर रक्षण करतो आणि सोम (षोम) हा ओजोरुपानें अवलंबक कफाच्या आश्रयाने राहून शरीर रक्षण करतो. पित्त आग्नेय असल्यामुळें कोणत्याहि प्रकारच्या पित्तांत उणाअधिक अग्नीचा अंश असतोच. त्याप्रमाणेंच कोणत्याहि कफांतहि ओजाचे - सोमाचे अंश असतात असें आम्हास वाटतें. ओजाला सौम्य सोमात्मक असें म्हटलेलें प्रसिद्ध आहे.

साधक पित्त
बुद्धिमेधाभिमनाद्यैरभ्रिप्रेतार्थसाधनात् ॥
साधकं हृद्गतं पित्तं ।
स.-यत्तु हृद्गतं - हृदयस्थं पित्तं तद्‍बुध्यादिभि: करण-
भूतैरभिप्रेतस्यार्थस्य बाह्यग्रहणस्मरणादिरुपेण साधनात्साधकमुच्यते ।
वर्तमानकाले या मनोर्थसंशयस्य निश्चयं कर्तुं तदर्थाध्यवस्यायोपारुढा सा-बुद्धि: ।
बुद्धिविशेषो मेधा ।
आ.र. साधकस्याह - बुद्धीति । साधकस्य हृदयं स्थानम् बुद्ध्यादिद्वारेणाभीष्टार्थसाधनं कर्म ।
अभिमान: अहड्कार: ।
वा.सू. १२-१३, सटीक, पान १९४

साधक पित्त हृदयांत राहातें. बुद्धि, मेधा, अभिमान यांच्या साहाय्यानें इष्ट त्या बाह्यविषयाचें ग्रहण करणें वा स्मरण करणें हें साधक पित्ताचें कार्य आहे. साधक पित्ताच्या वर्णणावरुन त्याचें अधिष्ठान हृदयापेक्षां मस्तकामध्यें सांगितलें असतें तर बरें झालें असतें असें वाटणें स्वाभाविक आहे. कांहीं तज्ञ हृदयाचेच दोन अर्थ करुन एकानें उरांतील हृदय व दुसर्‍यानें शिरांतील हृदय ग्रहीत धरावें असें म्हणतात. बुद्धेर्निवासं हृदयम् असा हृदयाचा सविशेषेण उल्लेख माधवानें व चरकानें उन्मादाच्या संप्राप्तीमध्यें केला आहे. (मा.नि. उन्माद ५). शिरस: शून्यभाव: असें लक्षण चरकानें उन्मादाचीं पूर्वरुपे सांगत असतांना निदानस्थानांत दिलें आहे. (च.नि.७-६) हृदयं च शून्यम् असें लक्षण उन्मादाच्याच पूर्वरुपांत चिकित्सास्थानांत सांगितलें आहे. (च.चि. ९-१०) यावरुन हृदय या शब्दाचे दोन अर्थ असले पाहिजेत आणि त्यांतील मनबुद्धीचा आश्रय असलेलें हृदय उरोगत नसून शिरोगत असलें पाहिजे हें स्पष्ट होतें. भेलसंहितेनें शिरस्ताल्वन्तरगतं सर्वेंद्रियपरं मन:' (भेल उन्मादचिकीत्सा पृ १४९) असें म्हणून मनाचें स्थान शिरामध्यें असल्याचें स्पष्टपणें आहे. यावरुन वैद्यकाच्या सोयीसाठीं तरी मनबुद्धि मेधादींचें स्थान शिर हेंच मानावें हें बरें. असें मानले तरी योगशास्त्रांतील अत्यंत प्रगत अवस्थेमध्यें शिरोगत बुद्धिमेधादि भावांचा व इंद्रियनियंत्रणाचा अनुभव उरोगतहृदयांत स्थित असणार्‍या चैतन्याच्या साक्षात्कारानें व ज्ञानसिद्धानें येतो असें वर्णिलें असल्यामुळें उरोगत हृदयामध्यें शिरापेक्षांहि श्रेष्ठ असे बुद्धि, इंद्रिय यांच्या नियंत्रनाचें सामर्थ्य रहातें असें म्हणतां येईल. `हृदयं शिरस: परं' हें वचन यासाठीच योगशास्त्र सांगतें.

व्यान वायु
व्यानो हृदि स्थित: कृत्स्नदेहचारी महाजव: ॥
गत्यपक्षेपणोत्क्षेपनिमषोन्मेषणादिका: ।
प्राय: सर्वा: क्रियास्तस्मिन् प्रतिबद्धा: शरीरिणाम् ॥
स.-व्यानो हृदये स्थित: प्राधान्येन कृत्स्ने - सर्वस्मिन् शरीरे चरति ।
तथा, महाजव:- शीघ्रगति: प्राणाद्यपेक्षया तथा, गत्यादिका: क्रिया:
प्राय: सर्वदेहिनां तस्मिन् व्याने, प्रतिबद्धा:-तदायत्ता: ।
गति: चड्क्रमणम् । अपक्षेपणं अड्गस्याधोनयम् ।
उत्क्षेप: अड्गस्योर्ध्वनयनम् । निमेष:- अक्ष्णोर्निमीलनम् ।
उन्मेष: - तयोर्विकास: । आदिग्रहणेन जृम्भणान्नास्वादनविशोधनादिपरिग्रह: ।
वा.सू. १२-६,७; सटीक, पान १९३

कृत्स्नदेहचरो व्यानो रससंवहनोद्यत: ॥
स्वेदासृक्स्त्रावणश्चापि पञ्चधा चेष्टयत्यपि ।
क्रुद्धश्च करुते रोगान् प्रायश: सर्वदेहगान् ॥
नि.सं. - रससंवहनोद्यत इत्यत्रदिशब्दो द्रष्टव्य:, तेन रसा-
दिसंवहनोद्यत इत्यर्थ:; संवहनं प्रेरणम् ।
पञ्चधा चेष्टयत्यपीति प्रसारणाकुञ्चनविनमनोन्नमनतिर्यग्गमनानि पञ्च चेष्टा;,
अन्ये तु `गतिप्रसारणोत्क्षेपणनिमेषोन्मेषै: पञ्चभि: प्रकारै: पञ्चधा' इति व्याख्यानयति ।
सर्वदेहगान् ज्वरातीसाररक्तपित्तप्रभृतीन् ।
सु.नि.१-१७,१८ सटीक, पान २०६-६१

व्यानवायु हा रससंवहन, स्वेदप्रवृत्ति रक्तसंचार यांना प्रेरणा देणारा असून शरीरांतील आकुंचन, प्रसारण, विनमन (वाकविणें), उन्नमन (उचलणें) तीर्यक् गमन (हलविणें), डोळ्याची उघडझाप करणें, चालणें, घेणें, टाकणें या सर्व शारीरिक क्रियांना कारणीभूत होतो. व्यानाच्या विकृतीमुळें सर्व शरीरभर निरनिराळ्या प्रकारचे विकार उत्पन्न होतात. हृद्रोगांतील लक्षण विस्ताराची कल्पना नीटपणें यावी यासाठीच हृदयस्थ भावांच्या प्रकृतिविकृतीचें वर्णन आतार्पयन्त केलें.

हृद्गोग व्याख्या
हृदिअ बाधां प्रकुर्वन्ति हृद्रोगं तं प्रचक्षते ।
मा.नि.हृद्रोग २ पृ. २३८

हृदय या अवयवामध्यें निरनिराळ्या प्रकारची विकृति उत्पन्न होते व व्याधीचीं लक्षणें दिसूं लागतात म्हणून या व्याधीस हृद्रोग असें म्हणतात.

स्वरुप
हृद्रांग: कष्टद: ।
च.सू. १७-२६

हृदय हें मर्म असल्यामुळें हृद्रोग हा कष्टद दारूण असा व्याधि आहे.

मार्ग
मध्यम.

प्रकार
हृदामय: पंचविध: प्रदिष्ट: ।
मा.नि.हृद्रोग १

वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक आणि कृमिज असे हृद्रोगाचे पांच प्रकार आहेत.

हेतू
अत्युष्णगुर्वन्नकषायतिक्तश्रमाभिघाताध्यशनप्रसड्गै: ।
संचिन्तनैर्वेगविधारणैश्च हृदामय: पञ्चविध: प्रदिष्ट: ॥
मा.नि.हृद्रोग १ पान २३८

व्यायामतीक्ष्णातिविरेकबस्ति- चिन्ताभयत्रासगदातिचारा: ।
छर्द्यामसंधारणकर्शनानि हृद्रोगकर्तृणि तथाऽभिघात: ॥
च.चि. २६-७७, पान १४१२

वेगाघातोष्णरुक्षान्नैरतिमात्रोपसेवितै: ।
विरुद्धाध्यशनाजीर्णैरसात्म्ययैश्चापि (ति) भोजनै: ॥
सु.उ. ४३-३ पान ७२७

तेषां गुल्मनिदानोक्तै: समुत्थानैश्च संभव: ।
अ.सं.नि. ५, पान ३५

व्यायाम, वेगविधारण, विशेषत: छर्दि वेगविधारण'; शोधन, लेखन, अपतर्पण या कर्मानीं कर्षण होईल असें वागणें, मार लागणें, तीक्ष्ण विरेचन वा तीक्ष्ण बस्ति यांचा अति योग होणें, अतिगुरु, कषाय, तिक्तरसप्रधान, अतिरुक्ष, अतिस्निग्ध, असें अन्न सेवन करणें; विरुद्ध असात्म्य, अजीर्ण असें भोजन करणें, अध्यशन करणें, (आमवातादि) रोगांचे उपचार व्हावें तसें न होणें; भीति, काळजी, शोक, त्रास या मानसिक विकारांनीं पीडित होणें, ह्या हेतूंनीं हृद्रोग उत्पन्न होतो. वाग्भटानें गुल्माची जीं कारणें सांगितलेली आहेत तीच हृद्रोगामध्यें असतात असें म्हटलें आहे. गुल्मांच्या कारणामध्यें उल्लेखिलेल्या हेतूंपैकीं (वा नि. ११-३३ ते ३६) बरीचशीं कारणें वर येऊन गेलीं आहेत. भोजन केल्यानंतर शरीराच्या विशेष हालचाली करणें, व्याधिकर्षित होणें, वातकर पदार्थ सेवन करणें, अभिष्यंदी द्रव्यें खाणें हीं कारणें त्यांपैकीं विशेष आहेत. ह्यांचाहि हृद्रोग कारणांत समावेश करावा.

दूषयित्वा रसं दोषा विगुणा हृदयं गता: ।
कुर्वन्ति हृदये बाधां हृद्रोगं तं प्रचक्षते ॥
सु.उ.४३-४, पान ७२७

तस्य संप्राप्तिं सामान्यलक्षणं चाह - दूषयित्वेत्यादि ।
दूषयित्वा रसमिति रसस्य हृदयाश्रयत्वात् । विगुणा: कुपिता: ।
हृद्रोगमिति वाच्ये यद्वाधाग्रहणं, तद्दोषभेदेन बाधावैचित्र्यज्ञापनार्थ;
बाधाशब्देन चात्र नानाविधा पीडेति जेज्जट:, भड्गवत् पीडेति गयदास: ।
हृद्रोगमिति `वा शोकष्यञ्‍रोगषु' इति रोगे परे हृदयस्थ हृद्भव:,
अथवा हृदो रोगो हृद्रोग: ।
मा.नि. हृद्रोग २, म. टीका, पान २३८

निदानामध्यें सांगितलेल्या कारणांनीं दोषप्रकोप होऊन ते दोष रस धातूलाहि दुष्ट करतात. हा दुष्ट झालेला रसधातू चिंताव्यायामादि कारणांनीं वैगुण्य उत्पन्न झालेल्या हृदयामध्यें येतो, त्यावेळीं तेथेंच त्याचा संग होऊन हृद्रोग हा व्याधि उत्पन्न होतो. हृद्रोगाचा उद्भव रसधातूमध्यें अधिष्ठान हृदय या अवयवांत आणि संचार व्यान, प्राणोदानांच्या क्षेत्रांत होतो. कश्यपानें बालकाचे कोणते व्याधि कसे जाणावेत याचें वर्णन करतांना इतर कांहीं रोगासवेंच उरोघात कसा ओळखावा हें सांगतांना पुढील वर्णन केलें आहे.

मुहुर्मुखेनोच्छ्‍वसिति पीत्वा पीत्वा स्तनं तु य: ।
स्त्रवतो नासिके चास्य ललाटं चाभितप्यते ॥
स्त्रोतांस्यभीष्णं स्पृशति पीनसे क्षौति कासते ।
उरोघाते तथैव स्यान्निष्टनत्युरसाऽधिकम् ॥
का.सं वेदनाध्याय; ३७,३८; पान ३६

बालक लक्षणें तोंडानें सांगू शकत नसल्यानें त्याच्या हालचालीवरुन लक्षणें जाणावीं लागतात. दुखत असलेली जागा कुरवाळणें ही एक नैसर्गिक प्रेरणा असल्यामुळें अनुमानानें वरचेवर होणार्‍या हस्तस्पर्शादि लक्षणांनीं वेदना ज्या उरस्थानीं होणार्‍या सर्वच व्याधींचा प्रतिनिधीस्वरुप असावा. वेदनास्थलावरुन त्याचे प्रकार पाडावेत असें आम्हास वाटतें. कश्यपांचे हे वर्णन रुपावरुन समजून येणार्‍या हृद्रोगांतील विकृतिचे बोधक आहे. यावरुन हृद्रोगांत पुढीलप्रमाणें पूर्वरुपें होतात असें म्हणतां येते. भीति वाटणें, छातीमध्यें कधीं कधीं धडधडणें, केव्हांतरी हृदयभागीं शूल उत्पन्न होणें, नाडीची गति विषम होणें, उरोभागीं गौरव वाटणें, जखडल्यासारखे वाटणें, झोपेंतून मधूनच दचकून वा छाती आवळल्या गेल्यासारखी वाटून किंवा उरावर ओझें पडल्यासारखें वाटून जाग येणें, श्रम करतांना हृदयांत वेदना होणें, श्वासोच्छ्‍वास केव्हांतरी अडखळल्यासारखा होणें अशीं पूर्वरुपें होतात.

वैवर्ण्यमूर्च्छाज्वरकासहिक्का श्वासास्यवैरस्यतृषाप्रमोहा: ।
छर्दि:कफोत्क्लेशरुजोऽरुचिश्च हृद्रोगजा:स्युर्विविधास्तथाऽन्ये ॥
च.चि. २६-७८, पान १४१२

वैवर्ण्येत्यादौ हृद्रोगजा इति वचनाद्‍घृदोगानंतरकालभावि-
तया वैवर्ण्यादीनामुपद्रवत्वमिच्छन्ति; ये तु वैवर्ण्यादीनां
सामान्यहृद्रोगलक्षणत्वमाहु:, ते हृद्रोगेण समं जायन्ते इति
हृद्रोगजा इति विग्रहाल्लिड्गत्वं व्युत्पादयन्ति ।
च.चि. २६-८० टीका, पान १४१३

त्वचेचा रंग पालटणें (निस्तेज पाण्डु वा श्याव कृष्ण होणें), मूर्च्छा, ज्वर, कास, हिक्का, श्वास, मुखामध्यें मधुर, तिक्त, कषाय इ. रस जाणवणें, तहान लागणें, विषयज्ञान नीट न होणें (प्रमोह), कफाचा उत्क्लेश होणें, (घशाशीं येणें, लाळ सुटणें, थुंकी येणें), छर्दि, रुजा (उरोभागीं), अरुचि अशीं लक्षणें होतात. `विविधास्तथान्ये' या वचनावरुन हृदयाच्या प्रकृत भावांच्या विकृतीमुळें उत्पन्न होणारी व हृदिबाधा या शब्दानें सहज लक्षांत येणारीं जीं लक्षणें तींहि या ठिकाणीं अभिप्रेत आहेत. हृदयांच्या संकोचविकासशीलतेमध्यें व्यत्यय उत्पन्न होऊन वैषम्य आल्यामुळें हृदयाच्या गतीचा लय विकृत येणें, अवलंबक कफाच्या विकृतीमुळें हृदयाचा आकार पाहिजे तसा प्रकृत न रहातां तो मोठा होणें (द्रवता हृदयेन), थकवा वाटणें, थोडयाशां हालचालीनें दम वाटणें; बोलणें खाणें नकोसें होणें हीं उदानाच्या विकृतीचीं लक्षणें होतात. ओजोव्यापत्तीमुळें आणि व्यानाच्या विक्षेपण-आक्षेपण क्रियेंत व्यत्यय आल्यामुळें शोथ हें लक्षण उत्पन्न होतें. अकस्मात् घाम येणें, अंग गळून जाणें, दीनता वाढणें, भीति वाटणें, निष्प्रभ होणें, उत्साह नष्ट होणें अशीं ओजाच्या विकृतीमुळें उत्पन्न होणारीं लक्षणें हृद्रोगामध्यें विकृतीच्या गांभीर्याप्रमाणें लवकर वा उशीरा दिसूं लागतात.

हृदयाभिघात
तत्र हृद्यभिहते कासश्वासबलक्षयकंठशोषक्लोमाकर्षण
जिव्हानिर्गममुखतालुशोषापस्मारोन्मादप्रलापचित्त नाशादय:स्यु:; ।
च.सि. ९-६ पान १७२०

चरकाच्या सिद्धिस्थानामध्यें हृदयाभिघात या नांवानें एक विकार उल्लेखिल्यासारखा दिसतो. हा स्वतंत्र विकार मानावा का नाहीं तें निश्चित सांगता येत नाहीं. आमच्या मतें, हा लक्षणसमुच्चय हृद्रोगांतच समाविष्ट होतो. या ठिकाणीं उल्लेखलेंली लक्षणें मात्र महत्त्वाची आहेत. कास, श्वास, बलक्षय, घसा कोरडा वाटणें, क्लोम प्रदेशांत ओढ लागणें, जीभ बाहेर पडणें, तोंड व टाळूं कोरडी पडणें, उन्माद व अपस्मारासारखीं लक्षणें दिसणें, चित्ताचीं कर्मे विकृत होणें अशीं लक्षणें होतात.

वातज हृद्रोग
शोकोपवासव्यायामरुक्षशुष्काल्पभोजनै: ।
वायुराविश्य हृदयं जनयत्युत्तमां रुजम् ॥
वेपथुर्वेष्टनं स्तम्भ: प्रमोह: शून्यता दर: ।
हृदि वातातुरे रुपं जीर्णे चात्यर्थवेदना ॥
च.सू. १७-३०, ३१, पान २१०

हृच्छून्यभावद्रवशोषभेदस्तम्भा: समोहा: पवनाद्विशेष: ।
च.सू. २६-७९, पान १४१२

वातेन शूल्यतेऽत्यर्थ तुद्यते स्फुटतीव च ॥
भिद्यते शुष्यति स्तब्धं हृदयं शून्यता द्रव ।
अकस्माद्दीनता शोको भयं शब्दासहिष्णुता ।
वेपुथुर्वेष्टनं मोह: श्वासरोधोऽल्पनिद्रता ।
वा.नि. ५-३९, ४४, पान ४८२

आयम्यते मारुतजे हृदयं तुद्यते तथा ।
निर्मथ्यते दीर्यते च स्फोटयते पाट्यतेऽपि च ॥
वातिकहृद्रोगलक्षणमाह आयम्यत इत्यादि ।
आयम्यते दीर्घीक्रियत इव; मारुतजे हृद्रोगे तुद्यते प्रतोदेन
व्यथ्यत इव, निर्मथ्यते विलोडयत इव, दीर्यते आरयेव,
पाठ्यते द्विधा क्रियत इव ।
सु.उ. ४३-६ सटीक; पान ७२७

शोक, उपवास, व्यायाम, व रुक्ष, शुष्क, अल्प, शीत भोजन या कारणांनी प्रकृपित झालेला वात हृदयांत स्थानसंश्रय करुन विकृति उत्पन्न करतो. नाना प्रकारच्या वेदना उत्पन्न होणें, हें या प्रकारामध्यें विशेष लक्षण असतें. हृदय पातळ होऊन ताणलें गेल्यानें आकारानें मोठें होतें. (द्रव, आयम्यते) शरीर कापतें. हृदय हें आवळल्यासारखें, जखडल्यासारखें, टोचल्यासारखें, चिरल्यासारखें, फाडल्यासारखें, फुटल्यासारखें, आंत कांहीं घुसल्यासारखे दुखतें. हृदयामध्यें शून्यता जाणवतें, एकाएकी शोक होणे, दीन होणें, भयभीत होणें अशी लक्षणें होतात. आवाज सहन होत नाहीं. श्वास अडखळल्यासारखा होतो. झोप थोडी येते. विषयग्रहण नीट होत नाहीं. हृद्‍स्पंद, हृदगति वैषम्य अशीं लक्षणेंहि होतात.

पित्तज हृद्रोग
उष्णाम्ललवणक्षारकटुकाजीर्णभोजनै: ।
मद्यक्रोधातपैश्चाशु हृदि पित्तं प्रकुप्यति ॥
हृद्दाहस्तिक्तता वक्त्रे तिक्ताम्लोद्गिरणं श्र (क्ल) म: ।
तृष्णा मूर्च्छा भ्रम: स्वेद: पित्तहृद्रोगलक्षणम् ॥
च.सू. १७-३२,३३; पान २१०,११

पित्तात्तमोदूयनदाहमोहा: संत्रासतापजवरपीतभावा: ॥
च.चि. २६-७९, पान १४१३

तृष्णोष्मादाहचोषा: स्यु: पैत्तिके हृदयक्लम: ।
धूमायनं च मूर्च्छा च स्वेद: शोषो मुखस्य च ॥
मा.नि. हृद्रोग ४ पान २३९

आ. - पैत्तिकमाह -तृष्णेत्यादि । उष्मा प्रादेशिको दाह:, हृदि किंचिद्दाह इत्यर्थ: ।
दाह: सर्वाड्गिक:, चोष: चूप्यते इव, हृदये क्लमो हृदयाकुलत्वं ग्लानिरित्यर्थ: ।
धूमायनं धूमोद्गिरणमिव, क्लेद: किंचित् दुर्गन्ध: सटित इव मुखस्यैव शोषश्च ।
मा.नि. हृद्रोग ४, आ. टीका, पान २३९

उष्ण, अम्ल, लवण, क्षार, कटु या रसाचाअतियोग, अजीर्ण भोजन, मद्यपान, क्रोध, उन्हांत फिरणें या कारणांनीं पित्त प्रकुपित होऊन हृदयास विकृत करते. यामुळें तोंड कडु पडणें, आंबट कडु अशी उलटी होणें, तहान लागणें, घाम येणें, ज्वर येणें, अंग गरम वाटणें, हृदयांत दाह होणें, तोंड कोरडें पडणें, हृदयामध्यें क्लेद उत्पन्न होणें, घुसमटल्यासारखें वाटणें, चक्कर येणें, मूर्च्छित होणें, अंधारी येणें, अस्वस्थता वाटणें, नखनेत्रादीच्या ठिकाणीं पीतता दिसणें, अशीं लक्षणें होतात.

कफज हृद्रोग
अत्यादानं गुरुस्निग्धमचिन्तनमचेष्टनम् ।
निद्रासुखं चाभ्यधिकं कफहृद्रोगकारणम् ॥
हृदयं कफहृद्रोगे सुप्तस्तिमितभारिकम् ।
तन्द्रारुचिपरीतस्य भवत्यश्मावृतं यथा ॥
च.सू. २७ ३४,३५, पान २११

स्तब्धं गुरु स्यात् स्तिमितं च मर्म
कफात् प्रसेकज्वरकासतन्द्रा: ।
च.चि. २६-८०, पान १४१३

गौरवं कफसंस्त्रावोऽरुचि: स्तम्भोऽग्निमार्दवम् ।
माधुर्यमपि चास्यस्य बलासावतते हृदि ॥
मा.नि. हृद्रोग ५, पान २३९

आ. - श्लेष्मिकमाह - गौरवमित्यादि । बलासावतते हृदि
कुपितकफव्याप्ते, दुष्टा दोषा दूषयितारो भवन्तीत्युक्तत्वात् ।
गौरवं हृदयस्य; स्तम्भो जडता, मार्दवं जलप्लुतमिव, माधुर्य मुखे ।
मा, नि. हृद्रोग ५, आ. टीका, पान २३९

कफज हृद्रोगामध्ये शरीर जड होणें, हृदयभागीं जडता वाटणें, जखडल्यासारखें वाटणें, छातीवर जणू धोंडा ठेविला आहे व त्यामुळें हृदय दडपलें गेलें आहे असे वाटणें, ओल्या कपडयानें अंग गुंडाळल्यासारखे वाटणें, कास, तंद्रा, ज्वर अशीं लक्षणें होतात. वेदना फारशा नसतात. तोंडास पाणी सुटते. चव नसतें, तोंड गोड पडतें, कफ फार पडतो, अग्निमंद होतो.

सान्निपातिक हृद्रोग
हेतुलक्षणसंसर्गादुच्यते सान्निपातिक: ।
च.सू. १७-३६, पान २११

विद्यात्त्रिदोषं त्वपि सर्वलिड्गम् ।
च.चि. २६-८०, पान १४१३

सान्निपातिक हृद्रोगामध्यें तीनहि दोषामुळें उत्पन्न होणार्‍या हृद्रोगांतील लक्षणें समुच्चयानें दिसतात. लक्षणांना तीव्रता असते. वैवर्ण्य, श्वास, शूल, ज्वर, शोथ, हृद्‍ध्वनि, विकृति हीं लक्षणें प्रामुख्यानें असतात. तंद्रा, मोह, मूर्च्छा अशीं लक्षणें व्याधीच्या गंभीर अवस्थेंत प्रकट होतात.

कुमिज हृद्रोग
त्रिदोषजे तु हृद्रोगे यो दुरात्मा निषेवते ॥
तिलक्षीरगुडाडीनि ग्रन्थिस्तस्योपजायते ।
मर्मैकदेशे संक्लेदं रसश्चास्योपगच्छति ॥
संक्लेदात् क्रिमयश्चास्य भवन्त्युपहतात्मन: ।
मर्मैकदेशे संजाता: सर्पन्तो भक्षयन्ति च ॥
तुद्यमानं स हृदयं सूचीमिरिव मन्यते ।
छिद्यमानं यथा शस्त्रैर्जातकण्डूं महारुजम्
हृद्रोगं क्रिमिजं त्वेतैर्लिड्गैर्बुद्‍ध्वा सुदारुणम् ।
त्वरेत जेतुं तं विद्वान्विकारं शीघ्रकारिणम् ॥
च.सू. १७-३६ ते ४० पान २११

विद्यात्रिदोषं त्वपि सर्वलिड्गं तीव्रार्तितोदं क्रिमिजं सकण्डूम् ।
उत्क्लेद: ष्टीवनं तोद: शूलं हृल्लासकस्तम: ।
अरुचि: श्यावनेत्रत्वं शोथश्च क्रिमिजे भवेत् ॥
म.-सान्निपातिकमाह - विद्यादित्यादि । सर्वलिंगमित्यनेन
प्रकृतिसमसमवायारब्धत्वमुक्तं, तेन चिकित्साऽप्यस्य प्रत्येकं
वातादिजस्य या सा मिलितैव कार्या ।
अपचाअराच्चेह ग्रन्थिरुत्पद्यते तत: क्रिमिसंभव: ।
उक्तं हि चरकेण, - ``त्रिदोषजे तु हृद्रोगे यो दुरात्मा निषेवते ।
तिलक्षीरगुडादीनि ग्रन्थिस्तस्योपजायते ॥
मर्मैकदेशे संक्लेदं रसश्चास्योपगच्छति ।
संक्लेदात् क्रियमश्चास्य भवन्त्युपहतात्मन:'' (च.सू. स्था.अ.१७)-इति ।
तस्यैवेदं लक्षणमाह, - तीव्रार्तितोदं क्रिमिजं सकण्डूमिति ।
उत्क्लेद इत्यादिना तमोन्तं त्रिदोषजहृद्रोगलक्षणं; तत्र तोदशूले वातात् ।
उत्क्लेदहृल्लासौ कफात्, तम: पित्तात्, ष्टीवनं कफपित्तात्;
अरुचिरित्यादिना क्रिमिजस्येति जेज्जट: ।
गयदासस्त्वाह-श्यावनेत्रत्वपर्यन्ततेन त्रिदोषजलक्षणमिति ।
स्यादेतत्, त्रिदोषजपदं न तावदत्र सुश्रुतेन पठितं; अत: सर्वमेव
उत्केदादि शोथान्तं क्रिमिजलक्षणं भविष्यति ।
नैवं; ``विद्यात्रिदोषं त्वपि सर्वलिड्गं तीव्रार्तितोदं क्रिमिजं सकण्डूम्''
(च.चि.स्था.अ.२६) - इति दृढबलस्य वाक्यात् ।
उत्क्लेद इत्यासिस्तु एव एव श्लोक: सुश्रुतेन पठित:, नतु पृथक्
सन्निपातलक्षणं, ततस्त्रिदोषजस्यानभिधाने सुश्रुते स्यात् ।
त्रिदोषाश्मरीवत्तस्यासंभव एवेति चेत ? नैवं, तन्त्रान्तरेषु पठितत्वात् ।
तथाच हारीत:, - ``सर्वाणि रुपाणि च सन्निपातच्चिरोत्थितं चापि
वदन्त्यसाध्यम् '' - इति । चरकेऽप्युक्तं - ``हेतुलक्षणसंसर्गादुच्यते सान्निपातिक:''
(च.सू.-स्था.अ.१७) - इति; तथा, - ``त्रिदोषजे तु हृद्रोगे यो दुरात्मा निषेवते''
(च.सू.स्था. अ. १७) - इत्यादि ।
कण्ठरवेण तु त्रिदोषजपदं यन्न पठितं सुश्रुतेन, तत् क्रिमिजस्यापि
त्रिदोषजत्वख्यापनार्थमित्याचक्षते । ननु, दोषजावान्तरावस्थाविशेषत्वात्
क्रिमिजोऽपि दोषज एव, तत् कथं हृदामय: पञ्चविध इति ? नैवं,
रोगजस्यापि रोगस्य पृथक्त्वदर्शनात । यदुक्तं, -``निदानार्थकर' इत्यादि ।
द्विदोषजस्त्वनुक्तोऽपि प्रकृतिसमवायत्वाद्वोध्य: ।
मा.नि.हृद्रोग ६ म. टीकेसह, पान २३९-४०

उत्क्लेश: ष्ठीवनं तोद: शूलो हृल्लासकस्तम: ।
अरुचि: श्यावनेत्रत्वं शोषश्च कृमिजे भवेत् ॥
सु.उ. ४३-९, पान ७२७.

त्रिदोषज हृद्रोगामध्यें जो रोगी तीळ, दूध, गूळ असे कफकर पदार्थ खातो त्याच्या हृदयामध्यें एकप्रकारची ग्रंथी उत्पन्न होते. हृदयाचा कांही भाग विकृत होऊन तेथील रसाचा क्लेद बनतो. या क्लेदामध्यें पुढें कृमि उत्पन्न होतात. आणि ते हृदयाचा भाग कुरतडतात. या कृमि संभवामुळें हृदयामध्यें सुया टोचल्यासारखी, शस्त्रानें तोडल्यासारखी तीव्र स्वरुपाची वेदना होते. घशाशीं येतें, थुंकी फार सुटते, अतिशय दुखतें, अंधारी येते, श्वास लागतो, तोंडाची चव जाते, डोळ्याभोंवती काळेपणा येतो, अंग सुजतें. सुश्रुत व माधवनिदान यांच्यामध्यें `उत्क्लेश:' इत्यादि श्लोकावर व टीकाकार टीकाकारांनीं कांहीं भाष्य केलें आहे. प्रत्यक्ष सुश्रुतामध्यें सान्निपातिक हृद्रोगाचा नामोल्लेख नसल्यामुळें व चरक - वाग्भटांनीं तो केला असल्यामुळें समन्वय साधण्यासाठीं उत्क्लेशादि श्लोकांचे दोन विभाग करुन पहिल्या ओळींतील लक्षणें सान्निपातिक हृद्रोगाची व दुसर्‍या ओळींतील लक्षणें कृमिज हृद्रोगाचीं आहेत असें टीकाकारांनीं सांगितलें आहे. सर्वच लक्षणें सान्निपातिक हृद्रोगाचीं मानावींत असें एक मत आहे. उलट कांहीं लोक सान्निपातिक हृद्रोग होतच नाहीं, तें या व्याधीचें वैशिष्टय आहे असें मानणारे असल्याचें टीकाकारानें उल्लेखिलें आहे. परन्तु टीकाकार म्हणतो, इतर अनेक ग्रंथकारांनीं सान्निपातिक हृद्रोगाचा उल्लेख केला असल्यामुळें प्रकार म्हणून त्याची गणना करणें आवश्यक आहे. तीनहि दोषांचीं लक्षणें असलेले हृद्रोगी प्रत्यक्षामध्यें आढळूनहि येतात. आमच्या मतें सुश्रुतोक्त लक्षणें ही सर्वच्या सर्व कृमिज हृद्रोगाचींच मानावीत कारण चरक - वाग्भटानें `सर्वलिंगस्त्रिभिर्दोषै:' असें म्हणून त्रिदोषांचीं लक्षणें स्वतंत्र न देतां दोषज लक्षणांतील वर्णनावर बोट ठेविलें आहे. वाग्भटानें शंकेला जागा राहूं नये अशा स्वरुपाचे `कृमिभि:' या पदाने सुरुवात करुन जें वर्णन केलें आहे त्यां हृल्लास तमप्रवेश, शूल हीं सुश्रुतानें सांगितलेलीं लक्षणें स्पष्टपणें कृमींचीं म्हणूनच सांगितलीं आहेत. हृद्रोग उत्पन्न करणारे किंवा सान्निपातिक हृद्रोगांतील विशिष्ट अवस्थेमध्यें मिथ्योपचारानें उत्पन्न होणारे कृमि हे अणुपरिणाम असल्यानें सूक्ष्म, अदर्शन अशा स्वरुपाचे असतात. हृदयाचे अंश कुरतडून खाणें हा त्यांचा स्वभाव असतो. यासाठींच त्यांना हृदयाद असें नांव मिळालें आहे. हे कृमि कफज असतात. यांच्या दृश्यादृश्यतेसंबंधीं सुश्रुतानें कांहीं वर्गवारी केली आहे. (सु.उ. ५४-१९) पण ती योग्य नाहीं असें आम्हास वाटतें. चरकानें कृमीचें पुरीषज, कफज, रक्तज, मलज (स्वेदज) असें प्राधान्यानें चार वर्ग केले आहेत. त्या प्रत्येकामध्यें अणुपरिणाम वा सूक्ष्म कृमि सांगितले आहेत व तेच योग्य आहे असें आमचें मत आहे. (च.वि.७-१९ ते १३)

वृद्धि-स्थान-क्षय
हृद्रोग वाढला असतां श्वास, शोथ, कास, ज्वर, मूर्च्छा, तंद्रा, शूल, तृष्णा, स्पंद, हृद्‍ध्वनि, विकृति, वैवर्ण्य हीं लक्षणें वाढत जातात. धातुगतावस्था प्राप्त झाल्यास रसधातुगततेची म्हणून शोथ, ज्वर, तंद्रा हीं लक्षणें दिसतात. रक्तगतता आल्यास रक्तवह स्त्रोतसांच्या मूलस्थानीं असलेले यकृतप्लीहा हे अवयव वृद्धि पावतात. त्यांचा परिणाम म्हणून वा शोथाचा परिणाम म्हणून उदर हा विकारहि उत्पन्न होतो. उदर आणि हृदय या दोनहि व्याधींत प्राणवहस्त्रोतसाची दुष्टी असल्यामुळें एका व्याधीनें दुसरा व्याधि उपद्रव म्हणून होऊं शकतो.

शोणितात् हृदयं तस्य जायते हृदयात् यकृत् ।
यकृतो जायते प्लिहा प्लीहा फुफ्फुसमुच्यते ।
परस्पर निबद्धानि सर्वाण्येतानि भार्गव ॥
का.सं. पान ७४

अवयवोत्पत्तीच्या काळीं हृदय व फुप्फुस यांचा यकृत-प्लीहेशीं संबंध असतो. त्यामुळें त्यांच्यांतील विकृती परस्परांचा उपघात करणार्‍या होऊं शकतात हृद्रोगामध्यें यकृत वाढतें असें जें कांहीं वेळां आढळतें तें याच कारणानें होय. हृद्रोग हा असाध्य स्वरुपाचा व्याधि आहे. उत्पन्न झाल्यानंतर प्रत्येक वेळीं तो लगेच मारक होतो असें नाहीं तरी व्याधि पूर्णपणें नाहींसा असा क्वचितच होतो. व्याधि स्वरुपानें याप्यच असतो. त्यामुळें हृदयांतील ध्वनिविकृति, स्पंदनाचें वैषम्य वा हृदयाला प्राप्त झालेली द्रवता पूर्णपणें नाहींशीं होत नाहीं. हृदयाला बल देणारी व दोषघ्न अशीं औषधें यांच्यामुळें इतर लक्षणें नाहींशीं होतात. नाहींशा होणार्‍या लक्षणामध्यें श्वास, कास, श्रम, शूल, शोथ, वैवर्ण्य, हृद्‍स्पंदाची तीव्रता हीं लक्षणें असतात. रुग्ण सामान्यपणें कांहीं विशेष कटाक्ष पाळलें तर नेहमींसारखा वागूं शकतो. मिथ्योपचारानें व्याधि पुन: पुन: उलटण्याचें भय सतत असतें.

चिकित्सा संदर्भानें लक्षणें
आनाह, गुल्म (च.चि. २६-८१)
हृदशूल, पृष्ठशूल, उदरशूल, योनिशूल, (च.चि. २६-८६)
श्वास, कास, पाण्डुरोग, हलीमक, ग्रहणी (च.चि. २६-८९)
जीर्णज्वर, रक्तपित्त, (वंगसेन पान ४६०.)
श्वास, कास, क्षय, हिक्का (वंगसेन हृद्रोग ४२ पृ. ४६२)
शूल, उरक्षत, रक्तपित्त, वातरक्त
पार्श्वशूल, कर्णशूल (पृ.यो.र.पृ.५३३)
अपतंत्रक, श्वास (अ.सं. चि. ८ पृ. १५९)
पार्श्वशूल, उदरशूल, योनिशूल, उदर ('')

उपद्रव
भ्रमक्लमौ साददोषो ज्ञेयास्तेषामुपद्रवा: ।
वातादिजानां कृमिहीनानां हृद्रोगिणामुपद्रवानाह - भ्रमेत्यादि
भ्रम: चक्रारुढस्येव भ्रमणं, क्लम: अनायास: श्रम: ।
साद अड्गसाद: । शोषोमुखस्य धांतूनां च ।
यद्यपि भ्रमादयो वातपित्तात्मकास्तथाऽपि व्याधिस्वभाच्छैष्मिकेऽपि भवन्ति ।
सु.उ. ४३-१०, सटीक, पान ७२७

कृमिजे कृमिजातीनां श्लैष्मिकाणां च ये मता: ॥
कृमिजस्योपद्रवानाह - कृमिजे कृमिजातीनामित्यादि ।
श्लैष्मिकाणामिति कृमिजातीनामित्यस्य विशेषणम् ।
तेन श्लैषिणा कृमिजातीनां य एव उपद्रवास्त एव कृमिजे
हृद्रोगे मता इत्यर्थ: ।
सु.उ. ४३-१०; सटीक; पान ७२७

शिरोहृद्रोगवमथुप्रतिश्यायकराश्च ते ॥
तेषां सर्वेषामेव कर्माण्याह - शिरोहृद्रोगेत्यादि ।
रोगशब्द: शिरोहृद्‍भ्यां संबध्यते, तेन शिरोरोगो, वमथु:
छर्दि चकारात् अन्यानपि कफजव्याधीन् कुर्वन्ति
ते कफजा: कृमय: ।
सु.उ. ५४-१४, सटीक, पान ७७३

वातज, कफज, पित्तज व सान्निपातिक या चार प्रकारच्या हृद्रोगामध्यें भ्रम, श्रम, अंगसाद व धातूंचा शोष होणें हे उपद्रव होतात. कृमिज हृद्रोगामध्यें प्रसेक, प्रतिश्याय, शिरोरोग, छर्दि, शोथ हे विकार उपद्रव म्हणून उत्पन्न होतात. सामान्यपणें हृद्रोगांच्या प्रकारचे उपद्रव वेगवेगळे दिले असले तरी त्यामध्यें असा कांटेकोरपणा असतोच असें नाहीं. हृद्रोगाच्या सामान्य वा विशेष लक्षणांमध्यें उल्लेखिलेले कास, श्वास, शोथ, वैवर्ण्य, ज्वर हे विकार विशेष स्वरुप प्राप्त होऊन उपद्रव म्हणून व्यक्त होतात.

उदर्क
व्यायामासहत्व, हृद्‍ध्वनिविकृति, दौर्बल्य, दैन्य हीं लक्षणें हृद्रोगांतील सामान्य विशेष लक्षणें नाहींशीं झाली तरी हृद्रोगाचा परिणाम म्हणून रुग्णाच्या ठिकाणीं स्थिर झालेलीं दिसतात.

साध्यासाध्यत्व
हा व्याधि असाध्य आहे. क्वचित् अगदीं नुकतांच उत्पन्न झालेला असेल, रोग्याचें बल चांगलें असेल व लक्षणें अल्प असतील तर कष्टानें साध्य होतो.

रिष्ट लक्षणें
ऊर्ध्व किंवा छिन्न श्वास; नख, नेत्र, मुख, त्वचा यांचे ठिकाणीं श्यावता, शीतगात्रता, तीव्रशूल, स्वेदातिरेक हीं लक्षणें रिष्ट समजावींत.

चिकित्सासूत्र
तन्महत्ता महामूलास्तच्चौज: परिरक्षता ।
परिहार्या विशेषेण मनसो दु:खहेतव: ।
हृद्यं यत्स्याद्यदौजस्यं स्त्रोतसां यत्प्रसादनम् ।
तत्तत्सेव्यं प्रयत्नेन प्रशमो ज्ञानमेव चेति ॥
संप्रति हृदिस्थस्य: परिपालनहेतुमाह तन्महदित्यादि ।
तन्महदिति षडड्गादिस्थानं हृदयम् ।
ता महामूला = इत्योजोवहा धमन्य: । तच्चौज इति -
``येनौजसा'' - इत्यादिनोक्तगुणमोज: प्रशम: = शान्ति ।
ज्ञानं = तत्त्वज्ञानम् ।
च.सूं. ३०-१३, १४ सटीक, पान ३९२

हृदयाचें, हृदयाशीं संबद्ध असलेल्या रसरक्तवाहिन्याचें, हृदयस्थ ओजाचें चांगल्या रीतीनें संरक्षण करावयाचें असेल तर मनाल दु:खदायक होतील. अशा सर्व गोष्टी पूर्णपणें वर्ज्य केल्या पाहिजेत. कोणत्याहि कारणानें मनाला आकस्मिकरीत्या धक्का बसणें, मन हेलकावणें अनिष्ट आहे. त्यासाठीं चिंता, शोक, भय, क्रोध, उत्कंठा, मत्सर, लोभ असे विकार उत्पन्न होणार नाहींत वा निदान मनुष्य त्याच्या आधीन होणार नाहीं येवढी तरी काळजी घेतली पाहिजे. सर्वदा शान्त रहाण्याची संवय प्रयत्नपूर्वक लावून घेतली पाहिजे. तत्वज्ञानाच्या विचारांचा वा अध्यात्मिक भावनांचा त्यासाठीं चांगला उपयोग होतो. आहार व उपचारांतहि हृदयाला हितकर होतील, ओजोवर्धक असतील आणि स्त्रोतसांना प्रसन्नता देतील (संकोच करणारीं नसतील) अशीं औषधीं द्रव्यें व आहार द्रव्यें वापरावीत.

वातोपसृष्टे हृदये वामयेत् स्निग्धमातुरम् ।
सु.उ. ४३-११

वातज हृद्गोगावर प्रथम स्वेदन स्नेहन नंतर अगदीं सौम्य स्वरुपाचें वमन द्यावें.

शीताप्रदेहा परिसेचनानि तथा विरेको हृदि पित्तदुष्टे ।
च.चि. २६.९०

हृदयावर शील लेप किंवा शीत परिषेक करावेत आणि हृद्य असें विरेचन पित्तज हृद्रोगावर वापरावें.

स्विन्नस्य वांतस्य विलंघितस्य
क्रिया कफघ्नी: कफमर्मरोगे ।
च.चि. २६.९६

कफ हृद्रोगावर स्वेद, वमन, लंघन हे उपचार करुन चिकित्सेसाठीं कफज द्रव्यें वापरावींत.

त्रिदोषजे लड्घनमादित: स्यादन्नं च सर्वेषु हितं विधेयम् ।
हीनातिमध्यत्वमवेक्ष्य चैनं कार्य त्रयाणामपि कर्म शस्तम् ॥
(च.पा.) त्रिदोषजे आदौ लड्घनविधानं हृदयस्य कफ-
स्थानतया तद्गते त्रिदोषजेऽपि कफ एवादौ लड्वनेन जेय इति मत्वा कृतम् ।
त्रिदोषजे तूल्बणदोषचिकित्सासूत्रमाह - हीनातीत्यादि ।
हीनत्वमधिकत्वं मध्यमत्वं च दोषाणामवेक्ष्य यत्
कर्म शस्तमधिकदोषविजेतृतया तत् कार्यमिति वाक्यार्थ: ॥
च.चि. २६-१००, सटीक, पान १४१५

त्रिदोषज हृद्रोगामध्यें प्रथम लंघन द्यावें. नंतर हितकर असा लघु संतर्पण आहार द्यावा. दोषांचें बलाबल पाहून त्या प्रमाणें चिकित्सा करावी.

प्रायोऽनिलो रुद्धगति: प्रकुप्यत्यामाशये शोधनमेव तस्मात् ।
कार्य तथा लड्वनपाचनं च सर्व कृमिघ्नं कृमिहृद्गदे च ॥
(च.पा) अत्र विरेचनोपपत्तिमाह - प्रायोऽनिल इत्यादि ।
अत्र चानिलकोपे यद्यपि बस्तिरुचित:, तथाऽप्यामाशयापे-
क्षयाऽऽमाशयशोधनं विरेचनमेव देयम् । कृमिघ्रमिति व्याधि-
तरुपीये (वि. अ. ७) कृमिहरत्वेनोक्तं विधानम् ।
च.चि. २६-१०३, सटीक, पान १४१५-१६

कृमिज हृद्रोगामध्यें वायूची गति रुद्ध होते. त्यासाठीं मार्गशोधन म्हणून विरेचन देऊन आमाशय शुद्ध करावा. नंतर लंघन पाचन उपचार करुन कृमिघ्न द्रव्यें द्यावींत. आयुर्वेदीय ग्रंथामध्यें निरनिराळ्या व्याधीवरील चिकित्सा वाचीत असतांना कांहीं आशंका वाचकांच्या मनामध्यें उत्पन्न होत असतात. पंचकर्मोपचारांच्या वर्ज्यावर्ज्य प्रकरणीं ज्या रोगावर जे उपचार करुं नयेत असें वर्णन केलेलें असतें त्याच रोगांची चिकित्सास्थानामध्यें ज्यावेळीं स्वतंत्र चिकित्सा विस्तारानें सांगितली जाते त्यावेळीं मात्र तें (पूर्वी वर्ज्य म्हणून सांगितलेले) उपचार करावेत असें सांगितलें जातें. या विसंगतीच्या परिहारासाठीं चरकानें एके ठिकाणीं उत्सर्ग (करावें असें विधान) आणि अपवाद यासंबंधीं एक सूत्र सांगितले आहे.

प्रवृत्तिनिवृत्तिलक्षणसंयोगे तु गुरुलाघवं संप्रधार्य सम्यगध्यवस्येदन्यतरनिष्ठायां ।
च.वि. ८-१३८ पृ. ५९२

चरक म्हणतो, एके ठिकाणीं करुं नये व दुसर्‍या ठिकाणीं करावे असें सांगितले असल्यास वैद्यानें करावें वा करुं नये यांतील गुरुलाघवाचा विचार करुन नंतर जें योग्य वाटेल तें करावें. कांहीतरी गुण असतात म्हणून करावें असें सांगितलें जातें. कांहीतरी दोष असतात म्हणून करूं नये असें सांगितलें जाते. एखाद्या प्रसंगीम घटना अशी घडलेली असते कीं तिच्यामध्यें गुण आणि दोषांची शक्यता सम्मिश्र स्वरुपाची असते. वैद्यानें अशावेळीं केलेल्या उपचारामुळें जरी थोडेसे दोष उत्तर उत्पन्न होणार असले तरी ते पुढें निस्तरता येतील अशा स्वरुपाचे आहेत आणि होणारा लाभ मात्र रोग्याच्या दृष्टीनें त्वरित व परिणामीहि हितकरच आहे, असें आढळल्यास सामान्यपणें वर्ज्य म्हणून सांगितलेले उपचारहि करावयास अडचण नाही. कांहीं वेळां वर्ज्य म्हणून सांगितलेला उपचार त्याच्या संपूर्ण स्वरुपांत वर्ज्य म्हणून सांगितलेला असातो. ज्याचे परिणाम खोलवर व्हावयाचे नसतात असें सौम्य स्वरुपाचे, तात्कालिक महत्त्व असलेले उपचार प्रसंगविशेषीं तत्वत: वर्ज्य असले तरी विशिष्ट व तात्पुरत्या कारणाकरितां योजले जातात. सर्वदेहशुद्धीसाठीं व दोषांच्या शोधनासाठीं करावयाचें वमन विरेचनादि उपचार वर्ज्य म्हणून सांगितले असले तरी महास्त्रोतसांतील संचित दोषमलांच्या निरासार्थ वमनविरेचनादि उपचार वर्ज्य म्हणून सांगितलेल्या रोगांतहि आरंभींच दिले आहेत. राजयक्ष्म्यासारख्या `बलं तस्य हि विट्‍बलं' अशा व्याधींतहि वाग्भटासारखा मान्यवर ग्रंथकार आरंभीच `उर्ध्वार्ध: शोधनं हितं' असें लिहितो. त्यामागची भूमिका काय स्वरुपाची असते, तेंच वर विशद करुन सांगितलें आहे. हृद्रोग हा वमनवर्ज्यात सांगितला असतांना याठिकाणीं कफजच केवल नव्हे तर वातज हृद्रोगांतहि वमन द्यावें असें सांगितलें आहे, त्यासंबंधी शंका येऊं नये म्हणून उत्सर्गापवादांतील गुरुलाघवाचा विचार येथें सांगितला आहे.

द्रव्यें व कल्प
अर्जुन, शालिपर्णी, द्राक्षा, दाडिम, हरमल, कुचला, कण्हेरमूळ, पिंपळमूळ कर्पूर, शृंगम, कस्तुरी; मौक्तिक, अभ्रक; सुवर्ण; वंग; अकीक; लक्ष्मीविलास; त्रैलोक्यचिंतामणी; हेमगर्भ; अर्जुनारिष्ट; द्राक्षासव.

अन्न
द्रव; लघु, संतर्पण अशीं द्रव्यें. तांदुळाची; रव्याची खीर; फलरस (द्राक्षा दाडिमादि)

विहार
विश्रान्ति

पथ्य अपथ्य
शालिर्मुद्गा यवा मांसं जाड्गलं मारिचान्वितम् ।
पटोलं कारवेल्लं च पथ्यं प्रोक्तं हृदामये ॥
यो.र. हृद्रोग पान ५३४

तैलाम्लतक्रगुर्वन्नकषायश्रममातपम् ।
रोषं स्त्रीनर्म चिन्तां वा भाष्यं हृद्रोगवांत्स्यजेत् ॥
यो.र. हृद्रोग, पान ५३५

व्यायाम, शोक, क्रोध, चिंता, मलावष्टंभ, अजीर्ण, मैथुन वर्ज्य करावे.

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP