कृष्णजयंती - कृष्ण जन्मकथा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


आज्ञा द्यावी मज, कथा आरंभाया । जन्मवृत्त गाया तुझे ईश ॥१॥
श्रावणांत झाला तुझा अवतार । कृष्णनामे थोर जगती या ॥२॥
कृष्णाष्टमी दिन मध्यान्ह रात्रीसी । तुवां प्रगटतेसी धरियेले ॥३॥
उद्धराया संत तारावया जन । पृथ्वी सोडवण करावया ॥४॥
भाराकान्त भूमी शरण देवांसी । जाती ब्रह्मयासी ते शरण ॥५॥
देव आणि भूमी ब्रह्मया स्तविती । अभय मागती विनयाने ॥६॥
ब्रह्मदेव तेव्हां जाय क्षीरसागरा । जावोनि उद्धारा प्रार्थितसे ॥७॥
क्षीरसागरी श्रीविष्णुशेषशायी । तयाचे तो पायी शरण होत ॥८॥
व्यापने तुजला श्रीविष्णु बोलती । रक्षण मागती तुझे पायी ॥९॥
सर्वाचा तूं एक संरक्षिता देव । तुजपाशी भाव सकळांचा ॥१०॥
सकळ व्यापोनी नित्य तूं रहासी । म्हणती तुजसी नारायण ॥११॥
जलामाजि तुवां कल्पियेले शयन । ह्रदय व्यापोन जगताचे ॥१२॥
दैत्यथोर जगी माजले असती । उन्मत्त वागती पापवृत्ती ॥१३॥
पापात्मे ते थोर तयां थोर बळ । किती खळबळ उडालिसे ॥१४॥
भूमी देवराया जाई रसातळी । दैत्य आतुर्बळी भार थोर ॥१५॥
पापाचे ते राशी अधर्माच्या मूर्ती । संहार करिती गाईचा ते ॥१६॥
गाईब्राह्मणांसी थोर पीडा देती । साधु कष्टविती अधर्माने ॥१७॥
मारहाण तयां विध्वंस करिती । द्विजांते पळविती रानोरानी ॥१८॥
त्यांच्या धाकी द्विज दडोनि बैसले । सकळ राहिले यज्ञतप ॥१९॥
हाहा:कार थोर पृथ्वीवरी झाला । हंबरडा भला फ़ोडिती गाई ॥२०॥
एकसरे गाई ब्राह्मण मारिती । देवांसी घालिती बंदीमाजी ॥२१॥
स्वर्ग मृत्यु आणि नागलोकांसीही । पादाक्रांत पाही त्याही केले ॥२२॥
गेला गेला धर्म लोपला समुळी । कली झाला बळी दैत्य बळे ॥२३॥
जागा होई आतां देवा आम्हांसाठी । कोण जगजेठी संरक्षील ॥२४॥
दीन देव आले तुजला शरण । तयांचे रक्षण कोण करी ॥२५॥
येई गाईसाठी ब्राह्मणाचेसाठी । देवांचीयेसाठी विधि सांगे ॥२६॥
प्रगट होई आतां ह्र्दयस्थ देवा । निरोप ऐकावा आम्हांलागी ॥२७॥
तयां निरोप देत स्वये भगवान । विवेक धरुन वाट फा ॥२८॥
अशरीरिणी वाणी सहसा उद्भवली । तेव्हा स्पष्ट भली भिऊं नका ॥२९॥
वसुदेवापोटी घेतो अवतार । तुम्ही यादव वीर देव व्हावे ॥३०॥
यदुवंशी तुम्ही आतां जन्मा यावे । मज साह्य व्हावे दैत्यनाशी ॥३१॥
सहस्त्रमुखी माझा अनंत बळराम । रोहिणीचा परम गर्भ होई ॥३२॥
घेवोनि लक्षुमी येतो लवकरी । स्वस्थ व्हा अंतरी वाणी सांगे ॥३३॥
घेणे आहे मज अवतार जगी । भाव अंतरंगी दृढ धरा ॥३४॥
त्यांनी यादवांत जन्मासी घेतले । अक्रुरादि झाले सुरवर ॥३५॥
सकळ सिद्धता होतां देवकाजी । मथूरेच्यामाजी लग्न होई ॥३६॥
उग्रसेन कन्या कंसाची बहिण । महाथोर लग्न मथुरेसी ॥३७॥
विवाह होय तेथे समारंभ झाला । कंसाने घेतला पुढाकार ॥३८॥
बहिणीचे लग्न भावास आनंद । परम सुखद मानीतसे ॥३९॥
वर्‍हाड  ते झाले करी बोळवण । रथांत आपण कंस बैसे ॥४०॥
देवकी वसुदेव रम्य वधुवरे । रथांत सत्वरे बैसवीत ॥४१॥
स्वये रथ हांकी प्रेमाने बहुत । आकाश गर्जत तव मृत्यु ॥४१॥
झाली आकाशवाणी कंस जागा होई । आठवा गर्भ घेई तुझा जीवा ॥४३॥
अष्टम गर्भ हीचा करिल रे अंत । ऐकतां हे वृत्त खळबळे ॥४४॥
घेई शस्त्र हाती तोडायासी मान । वसुदेव नमन करी त्यासी ॥४५॥
मग समेट करी वसुदेव त्यासी । हीचीये गर्भासी देईन मी ॥४६॥
तवं प्रथम गर्भ देवकीचा भला । देत त्या दुष्टाला वसुदेव ॥४७॥
तंव दया आली तया राक्षसासी । वैर अष्टमासी भले माझे ॥४८॥
सुत परत केला तंव नारदाने । आपुल्या वचने उपदेशीला ॥४९॥
कोणता आठवा काय याप्रमाण । देवां सत्यपण काय असे ॥५०॥
मानले ते नीचा गर्भ आपटीला । शिळेवरी भला मत्ताने त्या ॥५१॥
थरारले जग पाह्तां घोर कृत्य । निर्दया अकृत्य काय जगी ॥५२॥
पिता बंदीमाजी दृढ तो ठेविला । दुष्टांसवे केला मंत्र जगी ॥५३॥
उपद्रवा तुम्ही साधुसंत द्विज । त्यागा आतां लाज अंतरीची ॥५४॥
जेथे जेथे तुम्हां यज्ञ आढळती । विध्वंस त्वरिती करा त्यांचा ॥५५॥
भंगा देवालये मोडा यज्ञशाळा । ब्राह्मण आफ़ळा शिळेवरी ॥५६॥
ब्राह्मणांचे बळ दुभत्या गाईना । तयांसी बधोनी टाका आधी ॥५७॥
गाईब्राह्मणांचा करा तुम्ही नाश । धर्म लवलेश नुरो भला ॥५८॥
ऐसा मंत्र झाला खळ समाजांत । दुर्वृत्त वर्तत तेव्हां खळ ॥५९॥
निगडित केली वसुदेव देवकी । हाहा:कार लोकी थोर झाला ॥६०॥
सहा गर्भ ऐसे मारिले दुष्टाने । नृशंस मनाने पापीयाने ॥६१॥
तेव्हा अनंतासी म्हणती अनंत । देवकी गर्भात प्रवेशावे ॥६२॥
सात महिन्यांचा गर्भ तो वाढतां । मायेसी तत्वतां आज्ञापिले ॥६३॥
वसुदेवजाया रोहिणी गोकुळी । तिचे उदरी बळी गर्भ ने तो ॥६४॥
नासवला गर्भ मात बोभाटली । गर्भिणी जाहली रोहिणी ती ॥६५॥
अपवाद हातां बोले देववाणी । वसुदेवाचा झणी गर्भ जाणा ॥६६॥
आठव्याचा आला समय जेधवां । प्रसन्न तेधवां जगत्रय ॥६७॥
वसुदेव मनी प्रवेशला देव । मग आविर्भाव गर्भी होई ॥६८॥
वाढला तो गर्भ तेज प्रगटले । कंसमन भ्याले अनिवार ॥६९॥
थरथरां कांपे, अंतक म्हणे आला । मज मारायाला माझा वैरी ॥७०॥
अशनी शयनी पानांत भोजनी । संशय तन्मनी प्रवेशला ॥७१॥
संशयग्रस्त मन ओढवला नाश । येत जगदीश गर्भामध्ये ॥७२॥
नवमास होता प्रगटले बाळ । परम वेल्हाळ पांच वर्षी ॥७३॥
तेव्हां दोघे स्त्रोत्रे करिती देवाची । भिती मानसीची सांगताती ॥७४॥
मागिल जन्माची स्मृती तयां देत । गुज त्यां सांगत स्वये देव ॥७५॥
मग बाळ झाले देवकीचे पुढे । यश जाण गाढे भक्तीचे हे ॥७६॥
उचलीत बाळ घेऊनि निघत । रक्षक घोरत पडीयेले ॥७७॥
तुटल्या त्या बिड्या अंध:कार होय । तशांतून जाय वसुदेव ॥७८॥
वर्षे थोर मेघ गर्जत आकाशी । विजेच्या प्रकाशी जात असे ॥७९॥
अथांग भरली असे ती यमुना । मार्गाते देईना चिंता झाली ॥८०॥
मग कृष्णदेवे पायी स्पर्शियेले । दुभंग ते झाले जळ तात्काळ ॥८१॥
शेष करी फ़णा कृष्णजीचे शिरी । तयाने निवारी पर्जन्याते ॥८२॥
गोकुळांत सारे गवळी झोपले । व्दार उघडिले नंदजीचे ॥८३॥
सूतिकागृहांत यशोदा निजली । तीस कन्या झाली नकळत ॥८४॥
उचलिली कन्या ठेविला तो बाळ । तेथोनी तात्काळ निघाला तो ॥८५॥
पुन्हा बंदिवास पुन्हां बिड्या पायीं । दु:खित ह्रदयी थोर झाला ॥८६॥
कन्या बोभाटली दैत्य जागे झाले । वृत्त कळविले राक्षसासी ॥८७॥
धांवतची आला काळांतक यम । उन्मत्त परम पापी दुष्ट ॥८८॥
वांचवी कन्येला बोलत देवकी । पुत्र हा विलोकी नोहे जाण ॥८९॥
डर मना नाही घेत हिसकावूनी । शिळेसी आपटोनी मारायाला ॥९०॥
आपटितां कन्या वरचेवर गेली । तयासी बोलिली घोर वाचा ॥९१॥
तुझा वैरी मूर्खा जन्मा आला असे । समज तूं खास मारिल तुज ॥९२॥
इकडे यशोदा जंव जागी झाली । सुतमूख भली पाहतसे ॥९३॥
आनंदीआनंद गोकुळी जाहला । नंदतनयाला पाहोनियां ॥९४॥
जातकर्म आणि उत्सवा करिती । सकळांस प्रीति बाळकाची ॥९५॥
भगवान आले स्वये अवतरोनी । सकळांच्या मनी महानंद ॥९६॥
विनायक म्हणे उल्हासले मन । करावे कीर्तन कृष्णजीचे ॥९७॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP