भागवतमाहात्म्याचा सारांश

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


सत्‍ चित्‍ आनंदस्वरुपी श्रीकृष्णाचें स्मरण करुन श्रीमद्भागवत माहात्म्य श्रवण करुं या. या धर्महीन कराल कलिकालांत केवळ विषयांत रंगून गेलेल्या आसुरी वृत्तीचा सुळसुळाट झाला. साध्वी भक्तिदेवीचे ज्ञान आणि वैराग्य हे दोन सुपुत्र आपल्या दारुण मातेसमोर वृद्ध होऊन पडले. त्यांना आरोग्य लाभावें म्हणून भक्तिदेवी त्यांना घेऊन देशोदेशी हिंडली पण तिला कोणीच वैद्य भेटेना. वृंदांवनांत तिला नारद भेटले. त्यांना तिची दया आली. त्यांनीं देवदेवाची करुणा भाकली; तेव्हां आकाशवाणी झाली कीं, ‘नारदा, भिऊं नकोस. साधु तुला मार्ग दाखवितील !’ दीनवत्सल नारदांनीं भक्तीला अभय देऊन तुझी घरोघरी स्थापना ऐकून भक्तीला त्यांनीं धीर दिला व ते साधूच्या शोधार्थ निघाले. बदरीवनांत त्यांना सनत्कुमारांची भेट झाली. भक्ती व तिच्या ‘ज्ञान वैराग्य’ या पुत्रांसाठीं नारद त्यांना शरण गेले. त्यांनीं दुष्कृत्यामुळें शेषालाही पृथ्वीचा भार झाला आहे, हें जाणून नारदाला कलियुगांत सर्वांचा उद्धार करणारा सुलभ उपाय सांगितला. ते म्हणाले भगवंताच्या गुणानुवादांनीं ओतप्रोत भरलेला असा भागवत सप्ताहरुपी ज्ञानयज्ञ, गंगाद्वारानजिक आनंदनामक वैरभावरहित पुण्यस्थळीं जाऊन कर. तेव्हां नारदाच्या प्रार्थनेवरुन सनत्कुमारच आनंदवनांत गेले व तेथें त्यांनीं भक्ति ज्ञान वैराग्यां समोर भागवत सप्ताह केला. त्यांत प्रथम त्यांनीं भागवत माहात्म्य सांगितलें. ते म्हणाले या शुकशास्त्राचा महिमा अगाध आहे. या कल्पवृक्षाला बारा स्कंध - शाखा असून त्या अठरा सहस्त्र श्लोकरुपी अमृत फळांनीं ओथंबलेल्या आहेत. यांतील एक श्लोक देखील मोठया भाग्यानें लाभला तरी कल्याण होतें. या द्वादशस्कंधांतील एकादशस्कंध हा स्वत: भगवंतांनीं निजधामाला जातांना परमभक्त उद्धवाला सांगितला; आणि आपलें तेज भावतांत समाविष्ट केलें. असा हा ग्रंथ मूर्तिमंत कृष्णरुपच आहे. याचें तन्मयतेंने श्रवण केल्यानें संसारांत अनायासानें वैराग्य प्राप्त होऊन भगवद्भक्ती उत्पन्न होते, पातकें नष्ट होतात, आणि मोक्षलाभ सुलभ होतो. पुढें सनत्कुमारानीं सप्ताह केला. त्यावेळीं ज्ञान वैराग्य सचेतन झाले. आणि भगवत्प्रेमानें भक्तीसह ते आनंदानें नाचूं लागले, तेव्हां तेथे साक्षात्‍ परमात्मा प्रगट झाला. त्या आनंदाचें वर्णन काय करावें ! सनत्कुमार म्हणाले नारदा, सप्ताह श्रवणानें सर्व पापें व पापप्रवृत्ती नष्ट होतात. कलियुगांत याच्यासारखा कल्याणाचा दुसरा मार्गच नाहीं. पुढें त्यांनीं तुंगभद्रेच्या तीरावरील आत्मदेव, धुंधुली, धुंधुकारी आणि गोकर्ण यांची एक रोमहर्षक कथा सांगून भागवत माहात्म्य निवेदन केले तें सर्व वृत्त पुढील अभंगांत सविस्तर कळेल.

N/A

References : N/A
Last Updated : November 08, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP