श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीगुरुभ्यो नम: । श्रीराम समर्थ ॥
श्री समाधिस्थ झाल्या वरी । मागें वर्तलें कैशापरी । तें आतां श्रोते चतुरी । स्थीर र्चित्ते परिसावें ॥१॥
आनंदसागर अनन्यभक्त । जालना मंदिरीं होते वसत । उपासना वाढविली बहुत । कीर्ती पसरली चहूं देशी ॥२॥
अंबड येथें मंदीर । बांधोनी स्थापिले रघुवीर । अन्नदान नामगजर । सिध्दपणें वाढविले ॥३॥
समर्थ असतां सगुणदेहीं । आनंदसागएर झाले विदेही । परिसतां आनंद होयी । सिध्दकरणी अघटित ॥४॥
माघ शुध्द पौर्णिमेसी । निघाली स्वारी भिक्षेसी । दासनवमी उत्सवासी । सामुग्री पाहिजे ॥५॥
मायेसी केला नमस्कार । जो बहुतां दिवशीं होता स्थिर । पाहोन आश्चर्य नारीनर । मनी मानूं लागले ॥६॥
विदेशीं प्रयाणानिमित्त । करोनि आज्ञा घेतली त्वरित । माउली खोचली मनांत । पुढील भविष्यार्थ जाणोनी ॥७॥
आज्ञा घेवोनि निघाले । एके ग्रामी वस्तीस आले । तेच दिनी ग्रस्त केलें । राहुनें चंद्रासी ॥८॥
भजन निर्याण अभंग । करुणारसीं होती दंग । चतुर श्रोतयां तगमग । होवो लागली अतिशय ॥९॥
वासुदेव नामें सुतारासी । पाचारिले एकांतासी । वदले जाऊं वैकुंठासी । इच्छा असेल ते माग ॥१०॥
तों तो करुं लागला शोक । हास्य करी गुरुनायक । अरे हे शोकाचें कौतुक । पुढें आहे ॥११॥
सगुणी सगुण लोपले । निर्गुण जैसें तैसें भरलें । त्यांत विपरीत काय झालें । वाया शोक न करावा ॥१२॥
ऐसें करितां शांतवन । हस्त जोडोनि बोले दीन । इच्छा होईल तें दर्शन । येच स्वरुपीं मज द्यावें ॥१३॥
बरें बोलोनि तयासी । आले पुनरपी भजनासी । प्रेमें अश्रु नयनासी । आणिलें समस्त जनांच्या ॥१४॥
वरंवार पुसो लांगले । ग्रहण सुटलें न सुटलें । सुटलें म्हणताच संपविलें । निरुपण तेसमयीं ॥१५॥
नामगजर सुरु केला । देह श्रीचरणी ठेविला । आत्मा रामरुपी मिळाला । ठाईचे ठायीं ॥१६॥
शोक करिती नारीनर । दिधला अग्निसंस्कार । समाधी बांधावेई हा विचार । शिष्या अंतरी प्रगटला ॥१७॥
तंव आज्ञा झाली दृष्टांतासी । करितां रामसेवेसी । आह्मां पावेल निश्चयेसी । समाधी वेगळी करूम नये ॥१८॥
आनंदसागर वैराग्यशील । समाधी उपाधी केवळ । त्यजोनि राहिले निश्वल । रामरुप होवोनी ॥१९॥
असो जननी भार्या दोन सुत । दोन कन्या तयांप्रत । पांडुरंगबुवा जामात । समर्थे शोधोनि काढिला ॥२०॥
रामाजीबुवा शिष्य भले । पांडुरंग दुजे वहिले । दोनी संस्थान चालविलें । श्रीचे आज्ञेवरोनी ॥२१॥
वडईल सुत नामस्मरणीं । देह ठेविता झाला धरणीं । धाकला पुरुषोत्तम म्हणोनी । अज्ञान बालक मठपती ॥२२॥
दुजे शिष्य ब्रह्मानंद । ज्यांनी जाणिले गुरुपद । तयांची कथा प्रसिध्द । अल्पशी कथन करुं ॥२३॥
श्रींची समाधी स्थापिली । उत्साहपूजा आखोन दिली । उपासना अत्यंत वाढविली । कर्नाटक प्रांती ॥२४॥
परि स्वयें राहिले अलिप्त । कृष्णातिरी समाधिस्थ । जाहले तो प्रकार संत । सज्जनीं थोडा परिसावा ॥२५॥
शके अठराशेचाळीस । भाद्रपद कृष्णमास । फिरत आले कागवाडास । रामभेटीनिमित्त ॥२६॥
विश्रांती घेऊं चार दिवस । म्हणोनि सांगती सर्वास । मुंडलाप्पा नामें शिष्यास । कर्नाटकीं धाडिलें ॥२७॥
एकही शिष्य ते वेळीं । नसे ठेविला जवळी । गुरुभक्तांचे मेळीं । राहिले काळ क्रमित ॥२८॥
सांगलीहुनि हरिदास । आले तेथें दर्शनास । बरें म्हणोन तयास । ठेवोन घेती आनंदे ॥२९॥
आम्हां पोंचवावें आणि जावें । ऐसें वदती स्वभावें । परि सूक्ष्म अर्थाचे गोवे । उमजेना कवणासी ॥३०॥
वद्त चतुर्दशी गुरुवार । प्रात:काळी उठोनि सत्वर । रामदासी कागवाडकर । हरिभाऊस पाचाचिलें ॥३१॥
सहज विनोदें बोलती । क्वचित झाल्या देहगती । अग्न न द्या तयाप्रती । कृष्णगर्भी सोडावा ॥३२॥
स्नान करोनि मोकळी । व्हावें दु:खावेगळें । संतमाहात्म्य न कळे । कोणाएकासी ॥३३॥
आप्पासाहेब कागवाडकर । गुरुभक्त इनामदार । नवबाग नामें सुपीक थोर । कृष्णातीरी मळयासी ॥३४॥
तेथें गेले स्नानासी । बाळेश्वर क्षेत्रासी । स्नान करोनि वस्तीसी । राहिले तेथें गुरुवारी ॥३५॥
गुरुसेवा उपोषण । करिती शेवटचा म्हणोन । हरिभाऊसंगती जाण । एकले एक ॥३६॥
अनंत शिष्य अनंत शरण । सकलां दूर करोन । राहिले करीत नामस्मरण । नवबागीं कदंबछाये ॥३७॥
सायंकाळीं केलें भजन । आळविले दयाघन । गुरुपादुका वंदोन । स्तवन करिती बहुपरी ॥३८॥
त्यांतची निरुपण केलें । हरिदास श्रोते भले । देहबंधनानें भुलले । मानोनि जीवदशा ॥३९॥
ही देहरुप उपाधी । मानीव चाळविते बुध्दी । खर्‍याची दवडोन शुध्दी । जीवात्म्यासी गुंतवी ॥४०॥
चार देह चार अवस्था । ज्ञानी राहे यापरता । तयासी लिंगहेह सोडितां । गुंती नाही तिळभरी ॥४१॥
ऐसें करोनि निरुपण । पुनरपि करोनि भजन । धूप दीप आरती करोन । सांग केली गुरुसेवा ॥४२॥
एक प्रहर राहतां निशी । नाम श्वासधारेसरसी । स्थीर करोनि वृत्तीसी । एकलयें चालविली ॥४३॥
तेज फाकलें चहुंकडे । दृष्टीसी दृष्टी न भिडे ।  स्थूलापासोन मुरडे । चैतन्य श्रीरामरुपी ॥४४॥
प्रात:काळ समयासी । घेवोनि आले रामदासी । रामचरणतीर्थासी । ब्रह्मानंदी द्यावया ॥४५॥
आनंदें मुख पसरोनी । तीर्थ घेतलें तयांनी । श्रीरामप्रभूचे चरणीं । वंदन केलें द्वयहस्तें ॥४६॥
अमावास्या शुक्रवार । रवि येतां एक प्रहर । कृपादृष्टीं सर्वावर । हास्यमुखें टाकिती ॥४७॥
इकडे चालिला नामगजर । ब्रह्मानंद झाले स्थीर । पाहतां पाहतां व्यापार । दृष्य स्थीर झालेसें ॥४८॥
नामगजरें कलेवर । नेलें संनिध बाळेश्वर । पूजा आरत्या करोनि सत्वर । जलसमाधी दिधली ॥४९॥
सकळांसी जाहलें दु:ख । अनिवार करिती शोक । दुजे आमचे गुरुनायक । तीही त्यजिलें आम्हांसी ॥५०॥
असो नवबागीं बांधिती समाधी । दर्शना येते भक्तमांदी । श्रीमंते पूजाअर्चनविधी । व्हावया भुमी दिधली असे ॥५१॥
इकडे व्यंकटापूर देवस्थानीं । समाधी पूर्वीच बांधोनी । तेथेंच पादुका स्थापोनी । भक्त करिती उत्साव ॥५२॥
श्रीपादभटट व जोगळेकर जाण । साधक शिष्य अनन्य । तयांसी कथिलें संस्थन । चालवावें श्रीसेवे ॥५३॥
बेलधडीई आणि बिदरहळ्ळी । येथील देवस्थानें भली । पूर्वीच व्यवस्था केली । जेथील तेथें ॥५४॥
गोंदावली कळली मात । सकलही झाले दु:खित । आईसाहेब वदती तेथ । श्रोते तेंही परिसावें ॥५५॥
समर्थ गेलियानंतर । ब्रह्मानंदे केलें स्थिर । असतां मी गुमचा कुमर । शोक कायसा करावा ॥५६॥
वारंवार उपदेशुनी । बोधें चित्त शांतवुनी । गुरुभक्तां गुरुजननी । वाडे दुजी अवतरली ॥५७॥
तोही झाला समाधिस्त । आतां काय करणे जीवित । ह्मणोनी अन्न वर्जित । गुरुभार्या गोंदावली ॥५८॥
पय:पान क्वचित्‍ करिती । मनीं पतिचरण ध्याती । एक मासाउपरांती । देह धरणीं ठेविला ॥५९॥
आश्विन कृष्ण दर्शतिथी । आईसाहेब आह्मां सोडिती । दहन करुन समाधी करिती । श्रींचे नाम भागाप्रती ॥६०॥
प्रती वर्षी उत्सवास । करिताती अमावास्येस । स्नान पूजा नैवेद्यास । नित्य चाले उपासना ॥६१॥
बत्ताशा श्रीचें वहान । परम भक्त जो अनन्य । तेणेहीं त्यजिला प्राण । श्रींचें चरणासमोर ॥६२॥
तयाची बांधिती समाधी । श्रीचें पुढें भक्तमांदी । दर्शन घडे श्रीचे आधी । गुरुसेवा परम भाग्य ॥६३॥
असो ऐसा इतिहास । समाधीचा कथिला नि:शेष । श्रवण करितां वैराग्यास । वरील मन निश्चायें ॥६४॥
उपजेल तितुकें मरेल । घडेल तितुकें विघडेल । सत्कीर्ती श्रवणी पडेल । अनंतकालपर्यंत ॥६५॥
सत्कर्म अथवा दुष्कर्म । उभयतांचा एकचि धर्म । भोग भोगवील परम । सुख:दुख निश्चयें ॥६६॥
यास्तव संतचरित्र । विवरोन व्हावें स्वतंत्र्य । कर्मबंधनांचें सूत्र । बंधनापासोन सुटावें ॥६७॥
नरदेही रत्नपेटी । भोगें न करावी करंटी । सध्दर्मी लावोन शेवटी । अलिप्त असावे ॥६८॥
असो महाभागवत कुर्तकोटीई । जगद्‍गुरु झाले करवीर मठीं । एकी करोन शेवटी । स्वयें राहिलें अलिप्त ॥६९॥
भय्यासाहेब इंदुरकर । श्रीचईरणी ठेवाया शरीर । आले सांडोन इंदुर । गुरुभक्त बहू ज्ञानी ॥७०॥
सकलां सांगती मात । गुरुक्षेत्री महिमा अनंत । तेथे ठेवितां देहाप्रत । पुनर्पि जन्म त्या नाही ॥७१॥
कोणी माझे अस्थीसी । न न्याव्या प्रयागासी । अर्पितो श्रीचरणासी । परम पावन क्षेत्र हें ॥७२॥
ऐसें बोलितां चालतां । देह ठेविला तत्वतां । गुरुभक्तीनें गुंता । सोडविला बहु जन्मींचा ॥७३॥
असो ऐसी भक्त मंडळी । समाधी समाधान पावली । उपासना कैसी चालली । तीही श्रोती परिसावी ॥७४॥
सद‍गुरु समर्थाचे शिष्य । तैसेचि जे शिष्यानुशिष्य । बहु मंडळी लक्षानुलक्ष । दुरित नशिति कलियुगी ॥७५॥
जागोजागी नामसप्ताह । पुण्यतिथी आदि महोत्साह । अखंड चालिला प्रवाह ह्र्दयीं ध्याती कितीएक ॥७६॥
श्रवणीं संगती किती तरती । त्यांची नाहीं नाही मिती । घरोघरी पादुका स्थापिती । पूजाअर्चा करावया ॥७७॥
वर्‍हाडीं ग्राम सेंदुरजन । तेथें मठ ब्रह्मचैतन्य । दक्षिणें करवीरक्षेत्री जाण । ब्रह्मचैतन्यमदिर स्थापिलें ॥७८॥
ऐसी उपासना चालली । दिगंत कीर्ती पैसावली । तेंही लिहितां लेखणी भागली । गुरुलीला अगम्य ॥७९॥
आतां ही सद्‍गुरुलीला । त्रयोदशी जाय विश्रांतीला । ह्रदयीं ध्याऊं पदाला । म्हणजे प्रसाद होईल ॥८०॥
गुरुलीला बोधरसा । जरी उमटे ह्र्दयीं ठसा । तरी चुकेल हा वळस । जन्ममृत्युचा ॥८१॥
इति सद्‍गुरुलीला । श्रवणी स्वानंद सोहळा । पुरविती रामदासी यांचा लळा । कृपाकटाक्षें ॥८२॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते द्वादशोऽध्यायांतर्गत चतुर्थ समास :। ओवीसंख्या ॥२८४॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणारविंदार्पणमस्तु  ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
॥ इति द्वादशोध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP