समाधी पहातां समाधान होतें । तनू कष्टवी त्यासि आनंद देते ॥
मनीं भावितां कामना पूर्ण होती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति १२

श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवे नम: । श्रीमहारुद्र हनुमतेनम: । श्रीराम समर्थ ।
जयजय सद्‍गुरु पूर्णब्रह्मा । विश्वचालका निष्कामा । विश्वात्मया चित्सुखधामा । निर्विकारा सद्वस्तु ॥१॥
सजीव निर्जीव दोहीं ठायीं । अंतर्बाह्य व्यापून राही । अलिप्त अखंड भेद नाही । निराकारा निरुपमा ॥२॥
प्रकृति पुरुषांचा सोहळा । मायोद्‍भव ब्रह्मांडगोळा । अहंकार वासना जिव्हाळा । व्यापून वेगळा तूं येक ॥३॥
आधी मध्य अंतरहित । सर्वव्यापी सकळातीत । रंगरुप कल्पनातीत । सद्‍गुरुपद स्वयंप्रभ ॥४॥
मनें शोधिता उन्मन झाले । बुध्दीचा निश्चय डळमळे । चित्त दृश्य चिंतूं लागलें । गुरुपद अदृश्य ॥५॥
वेदशास्त्रें कशिली कंबर । उपनिषदें वदती आम्हीं चतुर । शोधू निघालीं परत्परा । ज्ञानमदें करोनी ॥६॥
पूर्वपक्ष उत्तरपक्ष । करितां पडला शोष । अलक्षी लावू वदती लक्ष । परी सिध्दांत होईना ॥७॥
शब्दजननी ओंकार । तेथेंचि जाहले स्थीर । एवं शब्दांचे विचार । शब्दब्रह्मीं मावळले ॥८॥
वायूनें शोधितां आकाश । तो स्वयेंचि पावला नाश । तैसें शोधितां नि:शब्दास । शब्द नाश पावले ॥९॥
बर्फ मारी आपुली प्रौढी । सागरीं देवोनियां बुडी । आणीन मी रत्नें गाढी । क्षण स्थीर रहावें ॥१०॥
ऐसें वदोन सागरी गेल । तव वरतीच तरंगोनी विराला । पुन्हां वार्ता सांगावयाला । आला नाही रत्नांची ॥११॥
ऐशी स्वरुप ओळखण । जवळी असोन चुकले जन । ज्ञानाज्ञान द्वैतभान । गुंतले देवा एलीकडे ॥१२॥
शाश्वत पद चित्तीं धरिलें । ज्यांचे द्वैतभान हारपलें । सद्‍गुरु भेटतांच जाहले । सद्‍गुरुरुप ॥१३॥
निजरुप ओळखण । तंचि तुमचें कृपादान । सदा निकट सुप्रसन्न । परी पाहणें जड वाटे ॥१४॥
पाहों जातां दुर नाही । विचार करितां दुजें नाहीं । मानीव पडळ जीव कांहीं । मानिलें तें सोडीना ॥१५॥
असत्याचा ऐसा स्वभाव । असत्य सामुग्री हावभाव । असत्य काळ बोलणें वाव । असत्य असत्या जमवीतसे ॥१६॥
जैसा नट नाटयागारीं । असत्य क्रिया करी सारी । पुरुष असोनिया नारी । भासवोन मोही बहुतांसी ॥१७॥
अमावास्यें चंद्रकिरण । चेतवी तयाचा मदन । रात्रीं प्रखर सूर्यकिरण । ताप देती तयासी ॥१८॥
घराचें जाहलें रान । उजेडी अंधार पडला दारुण । समेसी तस्कर येवोन । चोरी करी येकांती ॥१९॥
पाहणार मानिले पाषाण । म्हणे हें निर्मनुष्य कानन । कृत्रिम व्याघ्र येवोन । झडप घाली तयावरी ॥२०॥
ऐसें असत्य कौतुक । जाणती सकळ प्रेक्षक । परी गोडी लागली अधिक । असत्य प्रिय असत्या ॥२१॥
तैसें आम्हीं द्वैत मानिलें । अहंकारें वेगळीं केलें । म्हणोनी अदृश्य जाहलें । तुमचें स्वरुप अज्ञानें ॥२२॥
आतां हीच विनवणीई । दैताची काढोनि गवसणी । स्वस्वरुप दावी झणीं । कृपाळूवा गुरुमूर्ते ॥२३॥
कोसलाकोंडी आपुला प्राण । स्वयेची कोश करोन । तैसें आम्हीं संसारबंधन । अनंत जन्मीं बांधिलें ॥२४॥
सकळ व्यसना माजीं व्यसन । संसार हे महाव्यसन । सभाग्या दास करोन । दारोदार हिंडवितें ॥२५॥
इतर सुटे एक जन्मीं । हें न सुटे जन्मोजन्मीं । कांही काल येते उर्मी । याची उर्मी सुटेना ॥२६॥
इतरा निद्य मानिती । यासी सभाग्यामाजी गणती । तेणे विशेष आसक्ती । चडतें बंधन मानवा ॥२७॥
ऐसें हें कोशबंधन । बांधिले सुखेच्छा धरुन । परि शेवटी कोंडोनी प्राण । इहपर नाश करील ॥२८॥
पंचविषय देहासक्ती । ही संसारशब्दव्याप्ती । आणिक लक्षणें बहुत ग्रंथी । बहुता प्रकारें बोलिलीं ॥२९॥
ऐसी संसार गवसणीं । माजी कोंड्ले स्वतंत्र प्राणी । नरदेह छिद्रामधोनी । तुजला हाकां मारितसे ॥३०॥
धांवोन येई सत्वरीं । अज्ञान ग्रंथी मुक्त करी । बाह्य येवोन चरणाव्री । लोळेन सगुण साक्षित्वें ॥३१॥
भज्य भजक आणि भजन । हें सगुणींच लाभे धन । भक्ती सोहळा आनंदपूर्ण । अनंत जन्मीं भोगावा ॥३२॥
परी व्हाया सगुणसेवा । मोकली गा वासना गोवा । मग तो आनंदाचा मेवा । चाखितां रोगभय नाहीं ॥३३॥
गुरुसेवा नाही घडली । बहुत शिष्यें बहुत केली । आम्हां अल्पकाळींच मुकली । सगुणब्रह्म गुरुमूर्ती ॥३४॥
अज्ञानियां अदृश्य झाले । भाविकां भावनेने दिसले । ज्ञानियां आले ना गेले । सद्‍गुरुपद शाश्वत ॥३५॥
उपासका उपासनेलागी । समाधीरुप नटले योगी । अनंत कामना पुरविती वेगीं । साक्षात्कारें सेवकां ॥३६॥
ती कथा कैसी झाली । वदाल नाहीं परिसिली । तरी वंदोनी गुरुमाउली । गुरुप्रसाद कथन करुं ॥३७॥
शके अठराशेपस्तीस । मार्गशीर्ष कृष्णपक्ष । नवम्योत्तर दशमीस । सतेज भानू मावळला ॥३८॥
रवीसोमसंधि वार । पहाट उद्या घडीभर । समाधिस्त झाले गुरुवर । योगनिद्रा घेतली ॥३९॥
ब्रह्मानदांची वाट पाहिली । मग गोठणीं चिता सिध्द केली । विमानी मूर्ती बैसविली । पूजा आरत्या करोनी ॥४०॥
रामनाव गजर करिती । बुक्का सुमनें उधळिती । तुळशीमाळा कंठी घालिती । नमन करिती वेळोवेळां ॥४१॥
जेव्हा बलभीमरुप देखिलें । तेव्हां भक्त आनंदले । शोक अल्हाद एके वेळे । नांदातसे गुरुक्षेत्रीं ॥४२॥
एक दशी भौमवारीं । गोठणीं राहिली स्वारी । पंचभूतांची सामुग्री । पंचभूतीं मेळविली ॥४३॥
केळीचे खुंट बांहिले । दहनस्थान सुशोभित केलें । गोमयें सडे सिंचिले । रांगोळया गुलाल घालिती ॥४४॥
आप्तसंबंधी श्रीचे । श्रीपती चुलतबंधू साचे । वेदोक्त अंत्यविधीचें । कार्य करविती त्याकरवीं ॥४५॥
चितेसी दिधला अग्न । तंव भगवानराव नामेंकरुन । भक्त होते भावसंपन्न । उडी घेऊं धांवती ॥४६॥
बहुती तया आवरिला । दु:खाचा कडेलोट झाला । गोंदवल्याचा आत्मा गेला । सोडोनि आम्हां दीनांसीं ॥४७॥
चहुदेशीं पसरली मात । धावोन येती गुरुभक्त । अंतयोग किंनिमित्त । केला वदती गुरुरायें ॥४८॥
अप्पासाहेब भडगांवकर । आले सोडून पंढरपूर । गुरुचरणी भाव थोर । दु:खी अत्यंत जाहले ॥४९॥
ते दिवसापासोनी । व्यवस्था सर्व केली त्यांनी । यात्रा भरली गुरुभवनीं । नामगजर अखंड ॥५०॥
तिसरे दिवशीं रक्षा भरणें । करिती सर्वही दु:खानें । आईसाहेब यांची कंकणें । निघाली पूर्वीसारिखीं ॥५१॥  
चतुर्दश दिनपर्यंत । अखंड नामगजर होत । अन्नसंतर्पत वेदोक्त । विधी सर्व सांग केला ॥५२॥
समाधाचे तिसरे दिवशीं । कांही वैश्य तैलंगणदेशी । आले अनुग्रह घ्यावयासी । तों विपरीत दिखिलें ॥५३॥
धाय मोक लोक रडों लागले । संजसज्जनी अव्होरिले । आमुचें भाय्त नाही उदेलें । आतां आम्हां गती कैसी ॥५४॥
आम्ही सत्य प्रारब्धहीन । माय गेली आम्हा त्यजून । समजाविती समस्त जन । स्थीर रहा म्हणोनी ॥५५॥
ब्रह्मानंद शीघ्र येतील । तुम्हां अनुग्रह करतील । गुरुरुप ज्ञाते सखोल । पूर्ण अधिकरी ॥५६॥
ऐसें तयांसी कथिलें । हो जी म्हणोनी राहिले । रात्रीं तेथें अभिनव घडलें । ते परिसा सज्जनहो ॥५७॥
पहाटे सर्वासी दृष्तांती । दर्शन देत गुरुमूर्ती । ब्रह्मानंद शीघ्र न येती । मीत देतों अनुग्रह ॥५८॥
संकल्प पूजा करवोन । अनुग्रह दिधला तयालागोन । सर्वाचें आनंदलें मन । वारंवार वंदिती ॥५९॥
तुमचा कार्यभाग झाला । जावें वदती स्वस्थानाला । तैसीच जयाप्रति माला । प्रत्यक्ष तेथें ठेविली ॥६०॥
प्रात:काळीं उठोन वदती । आम्हीं देखिली गुरुमूर्ती । एकमेकांसी तेंच कथिती । अनुग्रह दिधला सद्‍गुरुनीं ॥६१॥
वृध्दा सांगे वृत्तात । स्वप्नी माळा मजप्रत । दिधलीती पोह्यांत । प्रत्यक्ष पाहोन आनंदती ॥६२॥
ऐसा घडला चमत्कार । पाहों येती नारीनर । नमन करिती वारंवार । गुरुप्रसाद माळेसी ॥६३॥
आणिक बहुतां दृष्टांत । जाहले मी येथें सत्य । मानू नका मनीं किंत । भाव तैसा भेटेन ॥६४॥
माझे आज्ञेनुसार चालतां । जवळचि असे मी सर्वथा । अज्ञानापरि शोक करितां । यास काय म्हणावें ॥६५॥
ऐसें बहुतां निरुपिलें । तेंचि आम्हीं अनुभविलें । समाधी पाहतांच झालें । परम समाधान ॥६६॥
संकटीं दृष्टातें बोधिती । अपरोक्षपणें साह्य करिती । भाविकापाशीं नित्य वस्ती । सदगुरुमहाराजांची ॥६७॥
असो दहनाचे तिसरे दिवशीं । काढोन ठेविले अस्थीसी । रक्षा माहुली संगमासी । न्यावया भरोनि ठेविली ॥६८॥
इकडे लोकव्यवहारकारण । नित्य देती पिंडदान । मुक्तासी कैचें बंधन । आधींच त्रैलोक्य जिंकिलें ॥६९॥
परी समर्थाची शिकवण ऐसी । सिध्द असोन साधनासी । आदरें करिती जिवानिशीं । वदती व्यवहार न सांडावा ॥७०॥
तोचि क्रम करिती येथ । क्रिया करिती वेदोक्त । दशमदिनी भागवत । आले संत गुरुक्षेत्रीं ॥७१॥
ज्ञानदाता पित्यासमान । बहुती मानुनियां जाण । ते दिनी करिती मुंडण । मायबाप गुरुराव ॥७२॥
ऐसा चतुर्दश दिनपर्यंत । उच्छाद केला अपूर्व बहुत । पादुका स्थापोन तेथ । उपासना चालविती ॥७३॥
गोप्रदानें धनदानें । अन्नदानें वस्त्रदानें । करिती विप्रांची पूजनें । गुरुरुप मानोनी ॥७४॥
कोणी तेथें लोळण घेती । घिभूती अंगी लाविती । पूजाअर्चा समग्र करिती । कोणी घालिती प्रदक्षिणा ॥७५॥
येणेपरि गुरुमाउली । समाधिरुप दृश्य नटली । अखंडत्वें असे भरली । अंतर्बाह्य व्यापक ॥७६॥
आतां मागील व्यवस्था । पुढील समासी येईल कथा । श्रोती स्थिर करोनी चित्ता । अमृतपान करावें ॥७७॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते द्वादशोध्यायांतर्गत पहिला  समास :। ओवीसंख्या ॥७७॥
॥ श्रीगुरुचरणारविंदर्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP