श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीगुरुभ्यो नम: । श्रीराम समर्थ ॥
इकडे ब्रह्मानंदांनीं । गुरुआज्ञा आणोनि ध्यानीं । न येती गुरुसदनीं । तेथेचि उच्छाह मांडिला ॥१॥
व्यंकटापूर मंदिरांत । नामसप्ताह उभारित । दातृत्वासी नाही मित । याचक बहु तोषविले ॥२॥
जे सिध्द ज्ञानी विरक्त । परम प्रतापी गुरुपूत । वियाग न शिवे तेथ । अनन्य भक्त सच्छिष्य ॥३॥
गोप्रदानें धनदानें । नाना अन्नसंतपर्णे । नाना उपदेशवचनें । अत्यंत जीव शांतविती ॥४॥
इकडे गोंदावल्याची स्थिती । परिसा चालली कशा रीती । राम-दत्तमंदिराप्रती । सेवा कैसी चालली ॥५॥
समर्थे आधींच संवत्सर । यथाविधी नेमले मुखत्यार । जमिनी वाटल्या सत्वर । राम दत्त शनीकडे ॥६॥
कांही जमीन कुटुंबासी । ठेविली असे निर्वाहासी । बाकी सर्व अधिकार पंचासी । आपुलेपरि दिधले ॥७॥
पंच परिसावें चतुर । ब्रह्मानंद भक्त थोर । आप्पासाहेब भडगांवकर । साठये आणि तात्याराव ॥८॥
थोरले राममंदीरांत । पुजारी गोपाळराव अद्वैत । धाकटे मंदिरीं मेहुण्याप्रत । रामसेवा सांगितली ॥९॥
दत्त आणि श्रीशनेश्वर । येथील पूजाधिकार । बाळभटट कुरवलीकर । यासी दिधले गुरुरायें ॥१०॥
नित्य नेम पूजाविधान । आल्या अतिथा अन्नदान । यथाशक्ति समर्पून । रामसंस्थान चालवावें ॥११॥
ऐसी व्यवस्था गोंदावलीसी । पंचामार्फत केली खासी । कोणी करील कुचराईसी । तरी दुजा नेमाचा ॥१२॥
जैसा देश तैसा वेश । ह्मणोनि लेख विशेष । येरवीं त्रिकाळ सत्ताधीष । सद्‍गुरु अंतर्बाह्य ॥१३॥
इकडे समाधिस्थानावरती । भवानराव पाहती । जतन करोनि अस्थी । उपासना चालविली ॥१४॥
अस्थि न्यावया प्रयागासी । मागों जातां तयापासी । न देति दिवानिशी । प्राणापरि सांभाळी ॥१५॥
तंव ब्रह्मानंद यांनीं । पत्र दिधलें लिहोनी । हरिभाऊ हरिदासयांनी । अस्थि न्याव्या प्रयागीं ॥१६॥
पत्र दावितां तयासी । निमुटपणें दे त्वरेसी । घेऊन चालिले प्रयागासी । हरिभाऊ गुरुभक्त ॥१७॥
पंतोजी येरळवाडीकर । हेही निघाले बरोबर । तंव पत्र देती जालनेक।र । तोही प्रकार परिसावा ॥१८॥
आनंदसागर महाभक्त । श्रीचे आधी देह ठेवित । घेवोनि त्यांचे अस्थीप्रत । गंगास्नाना निघाले ॥१९॥
मार्गी हर्द्यासी महाराज । दर्शना अनुज्ञें गेले सहज । तंव वदले सद्‍गुरुराज । अस्थी येथेंच ठेवाव्या ॥२०॥
आम्हीं जाऊं सत्वरी । तेव्हा नेऊं गंगेउदरी । म्हणोनी कपाटाभीतरी । स्वहस्तें अस्थि ठेविल्या ॥२१॥
यापरी समर्थ कांही । हर्द्यासी पुन्हां गेले नाही । योग दिसे ऐसाचि पाही । अस्थिसंगे अस्थि न्याव्या ॥२२॥
समर्थ निघाले स्नानासी । मुक्काम जाहला हर्द्यासी । संगे घेवोनि सच्छिष्यासी । मार्ग क्रमिते झाले ॥२३॥
जालना मठीचें पत्र आलें । तैसे हर्द्यासी उतरले । भैय्यासाहेब राहिले । इंदुरकर गुरुआज्ञे ॥२४॥
मागें श्रीगुरु आज्ञापिती । आम्ही शीघ्र येवू पुढती । तंववरी येथेंचि रहा निश्चिती । रामसेवा करोनी ॥२५॥
अस्थिरुपें श्रीसमर्थ । आले ऐसा धरोनि हेत । तेही निघाले त्वरित । अस्थिसंगे इंदुरीं ॥२६॥
विष्णुबुवा कुंभोजकर । हेही आले सत्वर । अस्थि घेऊनि सपरिवार । त्रिवेणीसी चालिले ॥२७॥
मसुरियादीन शिवमंगल । उपाध्ये श्रीचें तेथील । अस्थि घेऊनि भक्तमंडळ । पावले तयाठायीं ॥२८॥
बाबुभटट काशीकर । पटाईत मावशी भाविक चतुर । ताई आल्या इंदुरकर । अस्थिविसर्जनाकारणें ॥२९॥
आणि भक्त बहुत येती । कांही केली उपपत्ती नामगजरें दोन्ही अस्थि । त्रिवेणीसंगमीं मेळविल्या ॥३०॥
द्र्व्यद्वारें गोप्रदानें । दिधली भक्तमंडळीनेम । नानापरीनें स्तवनें । मुखी गाती समर्थाची ॥३१॥
असो हरिभक्त हरिदास यांनी । अस्थि विसर्जन करोनी । निघाले शीघ्र तेथोनी । गुरुभुवनीं यावया ॥३२॥
इकडे माहुलीसंगमाप्रत । रक्षा पोचवावी हा हेत । धरोनि निघाले भक्त । भडगांगकर आदिकरोनी ॥३३॥
अण्णासाहेब घाणेकर । श्रीगुरुचे भक्त थोर । बाबासाहेब दांडेकर । इत्यादि भक्त निघाले ॥३४॥
माहुली पवित्र संगमस्थानीं । रक्षा दिधली सोडूनी । सवेंचि निघाले तेथूनी । सज्जनगडीं पावले ॥३५॥
तेथील समर्थसमाधी । पाहतां हरल्या मनव्याधी । ऐसी श्रींची समाधी । बांधूं ऐसें योजिती ॥३६॥
दर्शन घेवोन परतले । मनीं चिंतिती पाउले । बहुत उदासीन झाले । संतसंगतीवियोगें ॥३७॥   

==
समास दुसरा

प्रयाग माहुलीसीं जन । आले कार्ये करुन । मनी ध्याती श्रीगुरुचरण । वियोगदु:ख अनिवार ॥३८॥
ब्रह्मानंद सच्छिष्य । आले रामनवमीस । उत्साह दहा दिवस । आनंदिआनंद बहु केला ॥३९॥
बोध करुनि सकळांसी । वदती समर्थ नसती दूरदेशी । प्रगट गुप्त भेदासी । दुजा भेद असेना ॥४०॥
गुरुआज्ञा जे मानिती । वचनी विश्वास ठेविती । साधनीं देह झिजविती । तयां पूर्वीसारिखे ॥४१॥
तयांसी घडे दर्शन क। तयांसवें संभाषण । नाना संकटी धांवोन । पाठीपोटी रक्षिती ॥४२॥
सद्‍गुरु त्रिकाळ शाश्वत । येविशी न धरावी किंत । भाव ठेवाल तैसा हेत । पुरेल जाणा निश्चयें ॥४३॥
जेथें भाविक सच्छिष्य । तये ठायीं अखंड वास ल। गोंदाविली नित्य प्रत्यक्ष । समाधिठायीं वास करिती ॥४४॥
याची पहावी प्रचीति । समाधी घेतल्यावरती । तैलंगणचे लोकांप्रती । अनुग्रह माला दिधली असे ॥४५॥
कित्येकांसी दृष्टांत झाले । कित्येकां प्रत्यक्ष भेटले । कित्येकांसी आज्ञापिलें साधनमार्ग साधाया ॥४६॥
समाधीची सेवा करितां । पुरविती भाविकांचे आर्ता । रामनाम मुखीं गातां । ह्रदयीं वास प्रत्यक्ष ॥४७॥
वारंवार वदत होते । सगुण जाईल विलयातें । शाश्वत सद्‍गुरुपदातें । दृढ ध्यानी धरावें ॥४८॥
येथें आळस ज्यानें केला । तया वियोग भासला । आज्ञाधारकासी भरला । अंतर्बाह्य सद्‍गुरु ॥४९॥
तुह्मी श्रीचे सच्छिष्य । विविक ज्ञानी विशेष । तरी शोकें न व्हा उदास । अज्ञानासारिखे ॥५०॥
गुरुचरणीं भाव धरा । अखंड नाम पियूष झरा । सेवितां वियोग न स्मरा । क्षणार्धही मायेचा ॥५१॥
असो ऐसें बोधून सकळा । दु:खभार दूर केला । मग पुढील कार्याला । आखोन देती ॥५२॥
आप्पासाहेब भडगांवकर । दुजे दामले भाविक चतुर । यांसी नेमून मुख्यत्यार । समाधिसेवा चालविली ॥५३॥
 सज्जनगडीं जैशी रीतीं । भूगर्भी श्रींची वस्ती । वरती ठाण रघुपती । ध्यान शोभे साजिरें ॥५४॥
तैसेंचि गोठणीं सुंदर । दहनस्थानीं काढिलें विवर । पाये भरुन सत्वर । चिरेबंदी बांधिलें ॥५५॥
दूर देशींचे पाषाण । आणिले शुभ्र शोभा यमान । मृदुत्वें दुजे दर्पण । चित्रविचित्रे रंगाचे ॥५६॥
मुंबापुरीहून सिंहासन । घाणेकर देती करवोन । श्रीभागवत कुर्तकीटीहुन । पादुका आणविती ॥५७॥
श्रींचे आज्ञेवरोनी । पूर्वीच करविल्या भागवत यांनी । सुशोभित नागभूषणीं । चित्त वेधिती सकलांचे ॥५८॥
असो श्रीब्रह्मानंद । साहित्य जमविती शुध्द । कारागीर आणवोनि प्रसिध्द । समाधिस्थान शोभविलें ॥५९॥
शके आठराशें छत्तिसांत । मार्गशीर्ष कृष्णपक्षांत । प्रतिपदी शुभमुहूर्त । वेदोक्त पादुका स्थापिल्या ॥६०॥
विद्वान सत्वस्थ ब्राह्मण । आणविलें देशोदेशींहून । वेदोक्त विधिविधान । आणिक प्रचंड नामगजर ॥६१॥
जे स्वानंदसुखाचे भोक्ते । ब्रह्मानंद स्थापिती स्वहस्तें । अनंत भावना एकचित्तें । गुरुरुपें दृढ झाल्या ॥६२॥
गोमयें स्थान शुध्द केलें । वरी श्री शोभविले । ब्रह्मानंदें प्रकट केलें । वेदोक्त भक्तिमार्गानें ॥६३॥
अनंत जीवांच्या यातना । हरती घडलिया दर्शना । समाधी पाहतां समाधान । वरितें मन ॥६४॥
प्रत्यक्ष नांदे गुरुराव । किती वर्णू मी वैभव । समक्ष पहावा अनुभव । विकल्प रहित भावनेनें ॥६५॥
असो प्रतिपादेपासोनि । उच्छाह पुण्यतिथीदिनीं । दशमी दिधला नेमोनी । ब्रह्मानंद साधुवरे ॥६६॥
नामस्मरण अन्नदान । पुराण कीर्तन आणि भजन । पादुका शिबिकारोहण । मिरवणूक रामभेटी ॥६७॥
दहा दिवसपर्यंत । उच्छाह नाम गजरांत । चहुं देशींचे येती भक्त । गुरुपदी नत व्हाया ॥६८॥
श्रीसमर्थ संस्थान गोंदवलें । हें संस्थेचें नाम ठेविले । सूज्ञ पंच नेमियले । ब्रह्मानंद सिध्दांनीं ॥६९॥
दामले आणि भडगांवकर । श्रींचा प्रसाद तयांवर । अंतरी राहोनि गुरुवर । कार्यभाग चालविती ॥७०॥
लोकसंग्रहे कार्यकर्ते । अति लीन गुरुपदातें । साधनी दक्षजे निरुते । गुरुभक्त पुढारी ॥७१॥
समाशी प्रथम संवत्सरी । श्रीब्रह्मानंद यांची स्वारी । स्वयें करोन चाकरी । मार्ग अकोन ठेविला ॥७२॥
तैसाचि चालिला परिपाठ । नाम भेदी स्वर्गकपाट । अन्नसंतर्पण अफाट । देव प्रसाद वांच्छिती ॥७३॥
देशोदेशींचे गुरुभक्त । साधक सिध्द पंडित । वैदिक भाविक सत्वस्थ । किती येती कळेना ॥७४॥
पुराणिक आणि हरिदास । गायक करिती स्तुतीस । नवसीकही बहुवस । नवस फेडिती नानापरी ॥७५॥
कोणी लोंटांगणें घालिती । कोणी शर्करा वाटिती । वार्‍या तरी किती करिती । गुरुवार आणि पौर्णिमा ॥७६॥
कोणी प्रदक्षिणा घालिती । कोणी गुरुद्वारी झाडिती । सेवा ऐसी नानारीती । किती प्रकार सांगावा ॥७७॥
कामना पुरती अनेक । देहव्याधी कितीयेक । मुक्त करिती गुरुनायक । सेवा करितां भक्तीनें ॥७८॥
असो प्रपंच आणि परमार्थ । समाधी पुरविते आर्त । साक्षात सद्‍गुरु समर्थ । वास करिती ॥७९॥
ऐसें तीर्थ श्रीक्षेत्र । विख्यात होईल सर्वत्र । बहुत साधितील अर्थ । प्रपंची आणि परमार्थी ॥८०॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते द्वादशोध्यायांतर्गत द्वितीय समास :। ओवीसंख्या ॥८०॥
॥ श्रीसद्‍गुरुनाथार्पणमस्तु  ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP