श्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवेनम: ।  श्रीरामसमर्थ ।
नमो प्रचंडा कोदंड विहारी । जनक दुहिता चित्त हारी । दशमुख दर्प विदारी । अयोध्याधीशा ॥१॥
भार्गवरामा लाजविले । क्षत्रिय तेज उर्जित केलें । दशराथात्मजा चरण युगलें । कृपा करोनि दाखवी ॥२॥
ऐसा गुरुचा संसार । नित्य चाले जगदोध्दार । वर्णिता शिणले अपार । पामरें काय बोलावें ॥३॥
परी मनें धरिला हाव । कौतुक पुरवी गुरुराव । आवडीचा नसे ठाव । त्रिभुवनीं दुजा ॥४॥
नित्य नवी आवडी उठो । चरणी मन ये लिगटो । वासना संसार फाटो । विनंती माझी ॥५॥
बहुतांचे संसारशिरीं । घ्यावयाची हौस भारी । तेवी माझा म्हणतो तोही करी । धरोनि घालवी मोहाते ॥६॥
असो गुरुगृहीची स्थिती । दृढ धरा एक चित्तीं । जेथें नांदे रमापती । सकला घटीं दृगोचर ॥७॥
आईसाहेब सत्वशील । प्रसूत झाल्या तीन वेळ । दोन कन्या येक बाळ । यथा कालक्रमानें ॥८॥
परी ती नाहीं जगलीं । बाळपणीं स्वर्गी गेली । शांतीनामें होती राहिली । तीन वर्षापर्यंत ॥९॥
सिध्दांचिया पोटीं । यावया पुण्यकोटी । आत्मा प्रत्यक्षपणें उठी । अधिकार नव्हे सामान्य ॥१०॥
जे मोक्षाचे अधिकारी । परी राहिली कांही कसुरी । तेची जन्मत्ती या घरीं । प्रारब्धशेष भोगाया ॥११॥
मातोश्रीसी लोभ फार । भक्त येती अनिवार । वस्त्रेंभूषणें धनालंकार । अर्पिती गुरु मायेसी ॥१२॥
त्या आदरें संरक्षिती । कधी कोणाही न देती । लोभ विघातक परमार्थी । जाणिलें गुरुदेवें ॥१३॥
तेव्हां ऐसा प्रकार घडला । गुरुमाये ज्वर भरला । वाढतां वाढतां वाढला । लोक झाले भयचकित ॥१४॥
सद्‍गुरु वद्ती ते समयीं । आतां तुझा नेम नाहीं । सर्वस्व अर्पी द्विजपायीं । भक्तिभावें करोनिया ॥१५॥
संकल्पें उदक सोडविलें । झांकलें बाहेर काढलें । द्वीजस्त्रियासी अर्पिलें । स्वहस्तें श्रीगुरुनीं ॥१६॥
उंची वस्त्रें भर्जरी । अलंकार रत्नें गोजिरी । विप्रा भासे शनी उदरीं । आजि आला आम्हांसी ॥१७॥
अंगावरील वस्त्राविण । सर्वही लुटविता जाण । प्रकृतीस आला गुण । अघटित करणी सद‍गुरुंची ॥१८॥
याउपरी कन्या एक । श्रीगुरु घेती दत्तक । वर पाहोन सुरेख । दान करिती सालंकृत ॥१९॥
तिचें विठाबाई नांव । मार्डीकर वासुदेवराव । चतुर सुगुणी सवैभव । जामात केला तयासी ॥२०॥
लग्नसोहळा चालू असतां । अद्‍भूत घडली वार्ता । श्रवण करितां सद्‍गुरुसत्ता । कळों येईल ॥२१॥
गांवोगांवीचे पाहूणे । आले घेवोनी वाहनें । त्यांतील एक घोडे तरणें । बांधिलें होतें मांडवी ॥२२॥
व्याधिग्रस्त होतें बहूत । अकस्मात झालें मृत । विप्र जमोनि विचार करित । आतां कैसे करावें ॥२३॥
अत्यंज आणिला मांडवांत । शुभकार्या अशुभ होत । आम्हीं नेताही अनुचित । दिसेल कीं निश्चये ॥२४॥
बहुत चिंतेमाजीं पडले । महाराजांसी श्रुत केले । काय उचित ये वेळें । सांगा तुम्हीं सर्वज्ञ ॥२५॥
महाराज म्हणती द्विजांसी । पाहूं चला अश्वासी । निजले असेल समयासी । तुम्हा वाटे मृत झालें ॥२६॥
अश्वासमीप जावोनी । कृपादृष्टी पाहती झणीं । वरद हस्ते कुरवाळोनी । म्हणती चैतन्य संचलें ॥२७॥
तंव तेथें काय झालें । घोडे झडकरी उठलें । चारा खावो लागलें । देखतदेखतां ॥२८॥
आश्चर्य वाटलें सकळांसी । अघटित घटना केली कैसी साक्षात ईश्वर निश्चयेसी । लोकोध्दारा अवतरले ॥२९॥
नयनी आनंदाश्रु आले । सर्वागीं रोम थरारिलें । क्षणाक्षणा नमवूं लागले । चरणावरी मस्तक ॥३०॥
असो विवाह सांग झाला । सकलां आनंद वाटला । संतती संपत्तीनें भरला । संसार विठाईचा ॥३१॥
य़ापरी आणिक किती । गरिबांचे विवाह करिती । जांवयास नाहीं मिती । त्यांत मुख्य सप्तक ॥३२॥
सुखवस्तु श्रीमान । सात साहेब मुख्य जाण । संगती सुखालागोन । नित्यवास गुरुगृहीं ॥३३॥
बहुत सिध्द होवोनि गेले । त्यांत चवदा मुख्य गणिले । साधनीं अनंत लागले । सीमा नाहीं ॥३४॥
कोणी बुध्द्चि राहिलें । कोणी मुमुक्षु झाले । कनिष्ठ उत्तम आणि भले । शिष्य झाले अपार ॥३५॥
मायबापसासूस्वशूर । कांता पती कन्या कुमर । इष्टमित्राहुन गुरुवर । प्रिय वाटती सकळांसी ॥३६॥
हितगुज गोष्टी सांगती । युक्ति प्रयुक्ती बोध घेती । जेणें होय दु:ख मुक्ती । विनविती ते गुरुरायां ॥३७॥
कोणा साधन नामस्मरण । कोणा करवी अनुष्ठान । करवोन दु:खें हरण । करिती ते सकळांची ॥३८॥
शिष्यसमुदाय रामभक्त । परी देवाहून प्रिय संत । महाराज वदती ऐसे । उचित नोहे बापा ॥३९॥
आधीं देवा नमावें । मग गुरुसी वंदावें । परी तें कोणी आयकावें । बोलका देव आमुचा ॥४०॥
जनीं जनार्दन ओळखिला । तो देवचि स्वयें झाला । प्रत्यक्ष सांडोन प्रतिमेला । पुसे कोण ॥४१॥
अनंत अन्याय क्षमा करिती । परी अहंकार नावडे गुरुमूर्ती । साक्षात्कारें छेदन करिती । क्षण एक न लागतां ॥४२॥
जाणोन परांचे अंतर । नेमकें देती प्रत्युत्तर । ऐसा घडतां साक्षात्कार । समाधान पावती ॥४३॥
कोणी कांही करिती प्रश्न । तात्काळ एकचि वचन । तेंचि सत्य होय जाण । कालत्रयी पालटेना ॥४४॥
आशा धरोनी पुनरावृत्ती । पुन्हां मांडितां प्रश्नोक्ती । तैसेच बोलोन शांतविती । परी पहिले ढळेना ॥४५॥
दक्ष तो लक्ष देई । इतरां न कळे कांहीं । आशेनें आंधळें लवलाही । करोनि सोडिले ॥४६॥
प्रकृती तितुक्या विकृति । अनेक जातीचे जन येती । चहाडखोर व्यसनी अतिती । कर्मठ आणि तामसी ॥४७॥
अंतरी ओळखुनी अवगुण । तयासी करिती सावधान । न दुखवितां अंत:करण । बोध करिती ॥४८॥
समजा कोणाची वस्तु गेली । महाराजा श्रुत झाली । सर्वज्ञ म्हणोनि ओळखिली । दुर्बुध्दी कोणाची ॥४९॥
एकांती जावोनी भेट घेती । वस्तु काढोनि आणिति । म्हणती सांपड्ली आम्हांप्रती । मार्गावरी ॥५०॥
दुर्बुध्दी मनीं खोंचले । म्हणती येथें कांही न चले । सद्‍गुरुबोधें त्यागिलें । दुर्गण कित्येकीं ॥५१॥
श्रीगुरुतपजेजाखालीं । दुर्गुणाची होळी झाली । नरनारी एकत्र नांदली । चोर आणि धनीक ॥५२॥
कित्येकांसी साधनबळें । दुर्गुण त्यजाया लाविले । स्वर्गाहून अधिक शोभले । सद‍गुरुधाम ॥५३॥
स्वर्गी कामक्रोधाच्या राशी । ईषणा मत्सर भूतासी । क्षय होय सुकृतासी । नित्यकाळीं ॥५४॥
तैसें नव्हें गुरुधाम । सकाम होती निष्काम । सुकृते जोडिती अनुपम । देवादिकां दुर्लभ ॥५५॥
कित्येक ते अपत्काळीं । धांवती ते सद्‍गुरु पदकमळीं । विनविती जी जावली । दारिद्रदु:खें ॥५६॥
तयांसी साह्य करिती । व्रतबंधा नाही मिती । विवाह करुनिया देती । गरिबागुरीबांचे ॥५७॥
नामस्मरण अन्नदान । यांची गणती करील कोण । दुष्काळीं करिती अन्नदान । कित्येकां लागून साह्य केलें ॥५८॥
जेथें नांदे लक्ष्मीपती । तेथे सहज लक्ष्मीवस्ती । दानधर्मासी नाहीं मिती । सद्‍गुरु घरीं ॥५९॥
चिंतूबुवा कुलगुरुसी । आणविले गोंदावलीसी । क्षेत्र देऊनि तयासी । राहविलें तेथेंचि ॥६०॥
घरची शेती वाढविली । विहीर जमीन सोज्वळ केली । रामसंस्थानाकडे दिली । नूतन मोलें घेऊनी ॥६१॥
रुद्र स्वहाकार केला । तैसे गायत्री पुरश्वरणाला । द्र्व्य देवोनि तृप्त केला । अनेक वेळा विप्रगण ॥६२॥
दुष्काळीं आटपाडिसी । दारिद्रें पीडित विप्रांसी । बैसविले नामजपासी अन्नवस्त्र देउनी ॥६३॥
अठरा कारखाने चालती । प्रतिवर्षी नूतन इमारती । करोनि बहु शोभविती । गोंदावलीसी ॥६४॥
पहिले मंदीर लहान होतें । यास्तव दुजे बांधिलें तेथें । दिवसेंदिवस दाटी होते । ऐसे मनीं अणोनी ॥६५॥
धर्मशाळा बांधिली मोठी । दत्तमंदिर ज्ञानवापितटी । भोजनशाळा बांधली मोमटी । तैसें मंदिर शनीचें ॥६६॥
भक्तजन उतरायासी । जागा होईना पुरेसी । जाणोनि कांही गृहासी । बांधविती नूतन ॥६७॥
गोठणीं केली गोशाळा । ओढयासी घाट बांधिला । दुरुस्त झाली पाकशाळा । पार आणि वृंदावनें ॥६८॥
भाऊसाहेब केतकर । सद्भक्त चतुरकामगार । तया करवी गुरुवर । देखरेख ठेविती ॥६९॥
उभय राममंदिरापाशीं । शिवालयें बांधिली खाशी । ऐक्य दाखविलें हरिहरासी । येणे प्रकारें ॥७०॥
श्रीगुरुची सेवा करोनी । देह झिजविला जयांनीं । त्यांची नांवे श्रोते जनी । अल्पस्वल्प परिसावी ॥७१॥
महाभागवत कुर्तकोटीकर । छ्त्र धरिती गुरुवर । पादुका वागविती निरंतर । समागमें राहोनी ॥७२॥
भागवतां निरोप झाला जेव्हां । तदनंतर गोविंदबुवा । ऐसीच करिती भावें सेवा । मानवां जी दुर्लभ ॥७३॥
पंतोजी कोल्हापुरकर । गोरक्षणीं दक्ष फार । वस्त्रें धुताती सुंदर । वामनराव ज्ञानेश्वरी ॥७४॥
दाढे जे अंताजीपंत । दामोदर दुजेभक्त । श्रीधरभटट स्वदेह झिजवित । खजीनदार गुरुघरचे ॥७५॥
द्रोणपत्रावळी लक्ष्मण । पुरवी एकनिष्ठे करुन । भवानराव निळकंठबुवा जाण । इंधनासी पुरविती ॥७६॥
हरभट चिंचणीकर जोशी । प्रेमें भजन करिती हर्षी । मर्ढेकरशास्त्री पुराणासी । नित्य वाचिती मंदिरा ॥७७॥
भाऊसाहेब जंगलाधिकारी । वाईकर रामशास्त्री । हेही वाचती मंदिरी । धर्मग्रंथ ॥७८॥
विश्वनाथ अश्व पाळी । मुक्ताबाई पाकशाळी । आणीकही भक्त मंडळी । देह झिजविती गुरुगृहीं ॥७९॥
ज्यांचीं भाग्यें उदया येतीं । तेचि गुरुगृहीं राबती । अभागी आम्हीं मंदमती । चरणधूळ वंदूं तयांची ॥८०॥
कोणी रांगोळ्या घालिती । गुरुचरण प्रक्षाळिती । उष्टावळी कोणी काढिती । दळण दळती गुरुभगिनी ॥८१॥
दामुबुवा कुरवलीकर । सेवें झिजविलें शरीर । सिध्दपणें महिवर । विचरती आतां ॥८२॥
गुरुगृहीं काढून केर । नाशिला सर्व संसार । ऐसे असती अनेक नर । वंदन करुं साष्टांगें ॥८३॥
ही गोंदावलीची स्थिती । इतरत्र बहु असती । ग्रंथ वाढेल या भिती । स्वल्प संकेत दाखविला ॥८४॥
असो ऐसा संसार । कुंटुंबी जन अपार । अखंडा चाले कारभार । उसंत नाहीं ॥८५॥
इतुकी करुनी व्याप्ती । सदैव नांदे जेथें शांती । वृत्तीशून्य योगेश्वर वदती । अनुभवा येई प्रत्यक्ष ॥८६॥
ज्ञानी स्वप्नीचें वैभव । खोटे पाहे सावयाव । असत्य जाणूनी लाघव । सत्यपणें पाहे जैसा ॥८७॥
नित्य जलामाजीं वस्ती । परी जलबिंदुही न धरिती । कमलपर्णे जैशा रीती । तैसे वागती गुरुराव ॥८८॥
अथवा आकाश जगव्यापक । माजीं कार्ये होतीं अनेक । चहूंभूतांचे कौतुक किती म्हणोनि सांगावें ॥८९॥
सो सो वारा वाही । धुरोळा उठवी ठाई ठाई । वाटे आकाश भेदोनि जाई । दिव्य लोकीं ॥९०॥
धुमाचे चालिले लोट । विजांचा उठे कडकडाट । मेघ फिरती घनदाट । ठायीं ठायीं अंबरी ॥९१॥
परी ते कांही मळेना । भिजेना हलना उडेना । व्यापकता शांति सोडिना । जैसे तैसे ॥९२॥
अखंडा व्यापार होती जाती । वरिवरी विकारले दिसती । परी डळमळेना शांती । अलिप्त स्वरुपानुसंधानें ॥९३॥
जनकराजा कलियुगींचा वाटे सद्‍गुरु आमचा । करोनि दीर्घ प्रपंचा । विदेहतां नित्य भोगी ॥९४॥
असो जन समुदाय वाढला वेळोवेळी बोध केला । जेणें भावें ह्र्दयीं धरिला । भोगिती व जीवन्मुक्ती ॥९५॥
त्यांतील कांहीसा भाग । त्यांचेची शब्दें बोलू मग । श्रवणीं निवेल तगमग । मनन क्रिया केलिया ॥९६॥
पुढील अध्याय निरुपण । सद्‍गुरु वचनें होईल पूर्ण । चित्ती धरितां अनुसंधान । समाधान पावेल ॥९७॥
प्रपंच आणि परमार्थ । तरोनी साधेल स्वार्थ । सद्‍गुरुवचन सिध्दांत । येईल हातां ॥९८॥
सप्तमाध्याय महौषधी । सेवितां शमे भवव्याधी । स्थीरकरोनिया बुध्दी । श्रवण मन्न करावें ॥९९॥
कामधेनू गृहीं आली । पूजें अर्चनें तोषविलीं । सहज होईल पान्हावली मनो पुरविल ॥१००॥
इतिश्री सद्‍गुरुलीला । श्रवणीं स्वानंद सोहळा । पुरविती रामदासीयांचा लळा । कृपा कटाक्षें ॥१०१॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते षष्ठोध्यायांतर्गत षष्ठम समास: । अध्याय ओंवीसंख्या ॥५००॥
॥ श्रीगुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP