श्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवेनम: । श्रीरामसमर्थ । ब्रह्मचैतन्य गुरुवर ।
ह्मणती करूं देशांतर । भार्या सद्‍गुणी चतुर । गुरुसमागमें येऊं ह्मणे ॥१॥
अखंड करी नामस्मरण । परी वचनीं विश्वास पूर्ण । सदा ध्यायी पतिचरण । पतिव्रता गुरुभार्या ॥२॥
धन्य पतिव्रता माउली । जी ऐसें पद पावली । वरी सत्वगुणें शोभली । चंद्रकांती जैशी ॥३॥
सद‍गुरु सतेज दिनकर । प्रभा सरस्वती सुंदर । दर्शनें श्रमपरिहर । संसारिकांचा होतसे ॥४॥
पाळिलें मायबाप बोला । प्रपंच सर्व नेटका केला । त्वरित चालिले देशाला । जगदोध्दात करावया ॥५॥
शके सत्राशें शाहाण्णवी । बाहेत निघे गोसावी । भार्या शुध्दभावी बरवी । गुरुदर्शना घेतली ॥६॥
दोन प्रहर रजनीसी निघाले भार्येसरसी । शरण रिघाले तुकाइसी । उभयतां चरणीं लोळती ॥७॥
पाहोनि शुध्दभाव परम । संतोषले तुकाराम । जोडी शोभे सीताराम । वदती दुजी मर्त्यलोकीं ॥८॥
तुकाराम वदती सती । काय इच्छा तुजप्रती । माग माग शीघ्रगती । पूर्ण होय निश्चयें ॥९॥
सती वदे पुत्ररत्न । व्हावें पतीसमान । हेंचि द्यावें वरदान । महाराजा समर्था ॥१०॥
देहवृक्ष सफलीत । होतां होईन पुनित । वांझपणा वृथाजात । लोक निंदाकारण ॥११॥
ऐकोनि ऐसें वचन । उभयतां करिती हास्यवदन । मायेने मोहिलें ह्मणोन । पुत्ररत्न इच्छिलें ॥१२॥
तुकाराम तथास्तु म्हणती । उभयतांसी निरोप देती । मग पावले नाशिक प्रांती । पंचवटी समीप ॥१३॥
सद्‍गुरु वदती भार्येसी । काय आठवली विवसी । मागिरलें पुत्रवरासी । मोक्षदात्या संनिध ॥१४॥
कामधेनू गृहीं आली । क्षीर सेवून सोडली । ऐसी तुवां करणी केली । माया मोहीत होवोनि ॥१५॥
अवचटे परिस गवसला । तो भिंतिमाजीं चिणिला तेणें सुवर्णलाभा मुकला । अभागी जैसा ॥१६॥
अथवा कल्पतरूखालीं बसुनि । अभागी कल्पना करी मनीं । भूत झडपील मजलागोनी । या निर्जन अरण्यांत ॥१७॥
राजा बहू संतुष्ट झाला । इच्छिले म्हणे देईन तुजला । अभागी वदे देई मजला । जीर्ण वस्त्र एखादें ॥१८॥
अत्तरें माखलीं पादत्राणी । हिरा बैसविला अंगणीं । घरीं धान्य नसे गोंई । ऐसें आजि तुवां केलें ॥१९॥
कण फेकून भूस भरिलें । अथवा चंदनें पाणी तापविलें । तैसें आजि तुवां केलें । पुत्रस्नेहा भुलोनि ॥२०॥
जो मोक्षश्रियेचा दाता । जन्म मरणाअतें चुकविता । चिदानंदासीं भोगविता । कृपासागर सद्‍गुरु ॥२१॥
तो झालिया प्रसन्न । इच्छिसी पुत्रसंतान । न वांछिसी भक्ती अनन्य । रामसेवा घडावी ॥२२॥
चौर्‍यांशीक्षलयोनी फिरतां । किती पुत्रांची झालील माता । जन्म मरणा सोडवितां । एकही कोठें दिसेना ॥२३॥
नरदेह दोदिवसाची वस्ती । कोण कोणाचा सांगाती । कन्या पुत्र आणि पति । देहसंबंधी सकळ ही ॥२४॥
तो देह नाशिवंत । तत्संबंधीही अशाश्वत । ज्याचें त्यानें करावें हित । सद्‍गुरुकृपें ॥२५॥
पुमान नरका पासोनी । म्हणती पुत्र तारील झणी । तरी नरकीं जावें कोणी । वासनाक्षय झालिया ॥२६॥
वासना निमालिया पाठीं । स्वर्ग नरकाची आटाआटी । पापपुण्य उठाउठी । लया जाय मिथ्यत्वें ॥२७॥
उध्दरील बेचाळिस कुळाते । ऐसे बोलती जाण्दते । उध्दरणें तें स्वर्गापरतें । आन नाहीं ॥२८॥
स्वर्ग क्षीणते ते पावे । त्यासि हित कैसें म्हणावें । तोडितां संसृतीचे गोवे । हित साधिलें साधकें ॥२९॥
जन्मा आलियाचें सार्थक । कांही करावा विवेक । जेणे फिटेल हें दु:ख । संसृतीजन्य ॥३०॥
गुरुकृपें होईल सुत । परी अल्पायुषी अशाश्वत । तेणे तुज काय प्राप्त । होईल सांग निश्चयें ॥३१॥
प्रकृतीपासोनि सुख । इच्छिती ते परम मुर्ख । दु:खमूळ हा नि:शंक । मायाजनित पसारा ॥३२॥
सरस्वती माय खोचली । म्हणे मज भुली पडली । जेणें होय सार्थकता भली । ती सोय सांगावी ॥३३॥
सुख एक रामचरणीए । सुखदाता तोचि धनी । इतर ते निर्वाणी । दूर होती पारिखे ॥३४॥
तुम्ही साधू महाज्ञानी । मज ठाव द्यावा चरणीं । लीनदीन उत्सुक म्हणोनि उपेक्षां करुं नये ॥३५॥
जेणें मायामोह सुटेल । अनन्यभक्ती पाविजेल । मन रामी रत होईल । ऐसें करावें ॥३६॥
आपण या देहाचे धनी । देह सार्थकी लावावा झणी । वरी करिते विनवणी । कृपाळुवा दीनानाथा ॥३७॥
परिसोनि कांतेचें वचन । संतोषले दयाघन । योगदीक्षा तिजलागोन । दिधली तेव्हां गुरुरायें ॥३८॥
वटदुग्धें जटा वळल्या । कांच बांगड्या काढिल्या । तुळसी माळा करी बांधल्या । कंठी सूत्र तुळशीचें ॥३९॥
श्वेतवस्त्र परिधान । भूशय्या व्योम प्रावर्ण । अखंड करविती नामस्मरण । योगमुद्रा सांगितल्या ॥४०॥
प्राणायाम करविती । उभयतां समाधी लाविती । उपदेश वचनें बोधिती । नित्यकाळीं ॥४१॥
नदीतटाक गुह्यावास । वाटे रामाचा वनवास । सीमा नसे आनंदास । तया स्थानीं ॥४२॥
वाटे ऋषीचा आश्रम । उपासना चालिली दुर्गम । नित्य ध्याती आत्माराम । सद‍गुरु आणि माउली ॥४३॥
कमलसुमन शोधीत भुंगे । धांवती जैसे मनोवेगे । मुमुक्षुजन तैसा रिघे बोधामृत सेवाया ॥४४॥
आयाचित भिक्षा घेती । कित्येक उपोषणें घडती । तेंही समाधान मानिती । नामामृत सेवूनि ॥४५॥
ऐसा काळ गेला कांही । माऊली होय विदेही । न गुंते माया मोहीं । ऐसे जाणिलें गुरुदेवे ॥४६॥र
रामनामीं तल्लीन झाली । नि:संदेह वृत्ती बनली । सद्‍गुरु निघाले ते काळी । सोडूनिया कांतेसी ॥४७॥
नाना तीर्थे नाना देश । वनोपवनीं भाषा विशेष । उत्तर दक्षिण भागास । फिरत फिरत चालिलें ॥४८॥
इकडे सरस्वतीमाऊली । म्हणे स्वारी कोठें गेली । गृही जाणेची आज्ञा झाली । असे पूर्वी मजलागी ॥४९॥
नाशिक ग्रामीं गुरुभक्त । कृष्णभट त्रिंबकसुत । तेथें जावोनि वदत । मज गृही पोचवावें ॥५०॥
गृहा आली । देखतांची नमस्कार घाली । आमची झोपडी पावन केली । म्हणूनिया भाग्य वद्तसे ॥५१॥
दोन दिवस हेंचि माहेर । करावा दीक्षेचा उपसंहार । मग जाऊ सत्वर । आपले ग्रामीं ॥५२॥
न्हाऊ माखू घातलें । चोळी कंकण लुगडें दिलें । सुग्रास जेवूं घातलें । अत्यानंद मानिला ॥५३॥
दोन दिवस ठेवोनी । निघाले संगे घेवोनी । नातेपोतेमाजीं भगिणी ।होते तेथे पोचविलें ॥५४॥
इकडे सकळ चिंता करित । होते तयां कळली मात । तें आनंदे भेटो येत । विचार पुसती मार्गीचा ॥५५॥
कैसे साधन कैसे भजन । कैसें करविलें अनुष्ठान । योगदीक्षा  किती गहन । सांगतसे सकळांते ॥५६॥
भेटले तुकाराम सद्‍गुरु । मागितला म्या पुत्रवरु । तेणे कैसा झाला विचारु । आल्हादकारी ॥५७॥
कैसें घडे अन्नग्रहण । कै होई उपोषण । परी न ड्ळमळे समाधान । सदा आनंदिआनंद ॥५८॥
माय कुरवाळोन बोले । कष्ट्लीस नाजुक वाळे ।दैवी असे जे लिहिले । उपाय नसे तयासी ॥५९॥
कन्या वदे गे आई । कष्टवांचोनी सुख नाही । तुम्ही जोडिला जावई । धन्य भाग्य तुमचें ॥६०॥
तेणें मज समाधान दिलें । पूर्व सुकृत फळ आलें । धन्य वंदावीं पाउलें । थोरथोरां दुर्लभ ॥६१॥
ऐसें बहुत बोलोन । करी सकळांचे समाधान । सदा ध्यायीं पतिचरण । रामनाम घेतसे ॥६२॥
गीता रावजीस कळली मात । सांत वृत्तांत । त्वरीत येतील निश्चित । चिंता कांही न करावी ॥६३॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते षष्ठोध्यायांतर्गत द्वितीयसमास: । ओंवीसंख्या ॥६३॥
॥ श्रीसद‍गुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP