श्री गणेशायनम: । श्रीसद्‍गुरुवेनम: । श्रीरामसमर्थ । इंदुरी महत्व वाढलें । गोंदावल्यासी वर्तमान कळलें । दादोबा गोपाळ निघाले । स्नेहसंबंधी श्रीचे ॥१॥
समजुतीनें आणाया कारणें । दोघासी केलें पाठवणें । इंदुरीं दोघे पाहुणे आले । शोध करित ॥२॥
चरणी लोटांगण घालिती । गोंदवलीची वार्ता सांगतीई । बहूत दिवस आपणा प्रती । जावोनिया जाहले ॥३॥
काकू शोक करिते फार । उघडे पड्लें घरदार । तुम्हासी आणाया सत्वर । आम्हां उभयतांसी बोळविले ॥४॥
सकलही चिंता करिती । तुम्ही चला शीघ्र गती । नानापरीनें सांगती । ज्ञानीयासी उभयतां ॥५॥
बरे म्हणोनि कुरवाळिलें । जाऊं म्हणोनि राहाविले । स्थिती पाहून चकित झाले । राजयोग साजिरा ॥६॥
उष:कालीं भूपाळ्या म्हणती । मंजुळ स्वरें काकड आर्ती । प्रभात होता पूजा करिती । चरण तीर्थप्राशन ॥७॥
भाळी शोभे केशरी टिळा । कंठी घालिती पुष्पमाळा । मस्तकी वाहती तुळसीदळा । भक्त अनेक ॥८॥
नानापरिचे नैवेद्य । देवोनि धरिती श्रीगुरुपद क। सर्वास वाटिती प्रसाद । सद्‍गुरू स्वहस्तें ॥९॥
नित्यसमाराधना होती । बहुपरीची पक्कान्नें करिती । कित्येक खाती जेवती । गणती नाही ॥१०॥
रोगग्रस्त भूतग्रस्त । आपत्तीनें जाहले व्यस्त । विनवणी करिती समस्त । उध्दती आम्हां दयाळा ॥११॥
कोणी दरिद्रे त्रस्त झाले । कोणी व्यंगत्व पावले । निपुत्रिकही तेथें आले । पुत्रवांछा धरोनि ॥१२॥
आशा मुळ प्रकृती । कामना अनंत उठती । कोणी करावी गणती । आर्त तितुके धांवले ॥१३॥
तैसे बध्द मुमुक्षु । साधक आणि जिज्ञासु । सेवाया धांवती रसू । गुरुवाक्य बोध ॥१४॥
ऐसिया गर्दीत गवसले । कार्या आलेले विसरले । बहुतां दिवशीं स्मरण झालें । उभयतांसी गोंदवलीचें ॥१५॥
पुन:प्रार्थना करिती । सत्वर चला हो म्हणती । महाराज अनुमोदन देती । कठीण वाटे सकळांसी ॥१६॥
बेत ठरविला जाण्याचा । निरोप घेती सकळांचा । नयनी पूर अश्रूंचा । लोटतसें भक्तांचें ॥१७॥
पुनरपि येऊं परतोन । ऐसें देती आश्वासन । निघते झाली तेथून । गोंदावलीसी पातले ॥१८॥
आनंद झाला सर्वासी । भेटले लहान थोरांसी । महाराज आले ग्रामासी । गांवोगांवी वार्ता गेली ॥१९॥
भक्त मंडळी धांवली । यात्रा भरली गोंदावली । नाम नौबत दुमदुमली । भक्ती प्रेम स्फुरतसे ॥२०॥
खातवळी पाठविला दूत । भार्या आणविली त्वरीत । संसारी राहोनि वर्तत । अलिप्तपणें विदेही ॥२१॥
घरची व्यवस्था लागली । माता बोधे शांतविली । अण्णांनी देहयात्रा संपविली । सदगुरु संनिध ॥२२॥
मुक्ताबाई बहीन सती । खातवळीं दिली होती । ती गेली स्वर्गाप्रती । अल्प वया माझारी ॥२३॥
सरस्वती माय गरोदर राहिली । ओट्या भोजनें चालली । सद्‍गुरु म्हणती काय भुली । पडली या लोकांसी ॥२४॥
नऊ मास पूर्ण झाले । पुत्ररत्न जन्मास आलें । बारसें करूं नाहीं दिलें । अल्पायुषी म्हणोनि ॥२५॥
एक संवत्सरा आंत । पुत्र झाला असे मृत । पुन्हां मायही जात । पुत्रासी भेटाया ॥२६॥
असो स्नुषा निवर्तली । गीता दु:खित झाली । सद्‍गुरुंनी माया त्यजिली । वृत्ति-शून्य ॥२७॥
कांही काळ निघोन गेला । गीताबाईनें आग्रह धरिला । दुजा विवाह पाहिजे केला । पुरवी आस येवढी ॥२८॥
होय ना करितां रुकार । देते झाले गुरुवर । स्वयें शोधुनी सुंदर । आणीन मी नोवरी ॥२९॥
आश्वासुनी मातेसी । गेले आटपाडी महालासी । वधू शोधिली सुंदरसी । दोनीं नेत्रीं आंधळी ॥३०॥
बहुत कन्या दाविती । परी सर्वही नाकारिती । सखारामपंताची करिती । कन्या पसंत सुलक्षणी ॥३१॥
देशपांडे उपनामे ब्राह्मण । चिंता करी रात्रंदिन । कन्या व्यंग नेत्रहीन । वर कैचा मिळेल ॥३२॥
तव महाराज अवचित । आळशावरी गंगा लोटत । तैसे पावले तेथ । पूर्व पुण्य वधूचे ॥३३॥
पाहोनि हस्तरेषा । जोडा जमला म्हणती खासा । परी मी गोसावी ऐसा । विचार करुनी पाहावें ॥३४॥
शिळे तुकडे उदर भरणें । त्यासी वाढली पक्कान्नें । जाणोनि हे पितयानें । तिथी निश्चय ठरविला ॥३५॥
आट्पाडीस जाहले लग्न । भार्येसह गोंदवलीस जाण । येवोनि वंदिले चरण । माउलीचे उभयतां ॥३६॥
मायगृही यमुना म्हणती । सासरी जाहली सरस्वती । आईसाहेब सकळ वदती । शिष्यवर्ग ॥३७॥
पुनरपी गृहस्थाश्रम । धरिला जो दे आराम । तीन्ही आश्रमा परम । साह्यकारी ॥३८॥
ऐसे गेले कांही दिवस । उपासना वाढली विशेष । गृही बांधावे मंदिरास । योजिलें मनीं ॥३९॥
तडवळें येथील कुळकर्णी । त्यांनीं राममूर्ती कोंदडपाणी । लक्ष्मणसीतासह तिन्ही । आणविल्या होत्या ॥४०॥
राममंदीर बांधावयाला । पैसा बहुत जमविला । आणि सर्वही खर्चिला । वाडा बांधिला सुरेख ॥४१॥
तेणें ईश्वरी -क्षोम होय । गृह दुग्ध होवोनि जाय । न घडे मूर्तीसी अपाय । अघटित करणी देवाची ॥४२॥
ठेविल्या होत्या गृहांत । तयासी कळली मात । गोंदवलेकर भगवद्‍भक्त । गृही मंदीर बांधिती ॥४३॥
तयानें आणोन दिधल्या । म्हणे या सार्थकीं लागल्या । गुरुगृही कैशा शोभल्या । मूर्ती नव्हे प्रत्यक्ष ॥४४॥
मक्ताधीन पुरुषोत्तम । भक्तह्र्दयीं आत्माराम । भक्त गृही शोभतो परम । दर्शनें श्रमपरिहार ॥४५॥
कुंभार सरवैर कामगार । परम कुशल चतुर । तया करवी श्रींचे मंदीर । आठराशें तेरांत बांधिलें ॥४६॥
म्हसवड्कर बापूसाहेब माने । श्रीमंत असोन सत्वगुणें । अधिक होता तयानें । केली मेघडंबरी ॥४७॥
तैसेंचि बांधिले सिंहासन । कुसरी आणी शोभायमान । वरी बैसविले ठाण । रामसीतालक्ष्मण ॥४८॥
स्थापनोत्साह अपूर्व झाला । वैदिक समुदाय जमविला । रामचरणा भेटी मग आला । महानद्यासह सागर ॥४९॥
अन्नपूर्णा जाहली उदार । केला गांव भंडार । भक्ताधीन परमेश्वर । मग काय उणें ॥५०॥
प्रत्यक्ष ठाकला श्रीराम । जेथें अनंत पावले विश्राम । पावती पावतील परम । भाग्यें घडें दर्शन ॥५१॥
जेथें वसे नाम सतत । वाटे निर्जिवही बोलत । समोर उभा हनुमंत । हस्त द्वय जोडोनी ॥५२॥
देवभक्त आणी नाम । अपूर्व त्रिवेणी संगम । पिडीत पावती आराम । स्नान ध्यान केलिया ॥५३॥
नित्य घड्ती साक्षात्कार । ध्यान सतेज गंभिर । हास्य मुद्रा चापशर । शोभतसे हस्तकीं ॥५४॥
एकदां ऐसा प्रकार घडला । महाराज करीतां भजनाला । करी नाम प्रसाद आला । गुलाब कुसुमें ॥५५॥
महाराज काशीस निघाले । राम नयनी अश्रु आले । सत्वर येऊं म्हणतां राहिले । जन समस्त पाहती ॥५६॥
साक्षात्‍ उभे अयोध्यावासी । निश्चय वांटे सर्वासी । ऐसे परी मंदिरासी । स्थापना केली गृहामाजीं ॥५७॥
एके दिवशी गीता माउली । गणपतीसी बोलूं लागली एक । इच्छा असे राहिली । महायात्रेची ॥५८॥
स्नान घडावे भागिरथीचे । दर्शन श्री विश्वेश्वराचें । सार्थक होईल देहाचें । ऐसें करी सत्वर ॥५९॥
पुरविती मायेची आस । निघाले काशीयात्रेस । भार्या धाडिली माहेरास । पुन्हां जाऊं म्हणितले ॥६०॥
सदनी तुळसीपत्र ठेविलें । विप्राकरवीं लुटविलें । लोभ मूळ संसार जाळें । तोडिलें मायेचें ॥६१॥
दहावेळा काशी केली । म्हणती पायवाट पडली । संगे मंडळी निघाली । शेंपन्नास ॥६२॥
काशीस गेले आजवरी । परी एकले पादचारी । तैसे नव्हे या अवसरी । विश्व कुटुंवी जाहलें ॥६३॥
प्रयागी गंगा भेट केली । वेणीमाधवा चरणी घातली । तीर्थश्राध्दें सकल केली । अक्षयवट दाविला ॥६४॥
दाविला त्रिवेणी संगम । किल्ला त्रिकोनी दुर्गम । करविला दानधर्म । माउली हस्तें ॥६५॥
त्रिरात्र करोनि वस्ती । निघाले श्री काशीप्रती । जेथें नांदे उमापती भू-कैलास प्रत्यक्ष ॥६६॥
लिंगमय दिसे काशी । दर्शनें जी अघनाशी । ती दाविली मायेसी । गंगा आणि मनकर्णिका ॥६७॥
धुंडीराज दंड्पाणी । अष्टभैरव दावोनी । मग विश्वेश्वर भवानी । करविलें अन्नें ॥६८॥
दानधर्म बहूत केला । करिती तीर्थ श्राध्दाला । विप्र समुदाय तोषविला । पडूस अन्नें अर्पोनी ॥६९॥
पंचक्रोषी अरूणा अशी । दाविली श्री व्यास काशी । मनिषा पुरवोनी ऐशी । गया क्षेत्री निघाले ॥७०॥
विष्णू पदीं अर्पिला पिंडा । जो चुकवी यमदंड । धर्म करुनी उदंड । पंडयांची हाव शमविली ॥७१॥
बेचाळीस कुळें उध्दरिली । अन्य अनंत तारिली । परी लौकिक करणी केली । गुरु माउलीनें ॥७२॥
दर्शनें समाधान पावती । मार्गी बहू अनुग्रह देती । बोलका देव प्रत्यक्ष म्हणती । पावला आम्हां ॥७३॥
धर्मकेंद्र काशीपुर । तेथे नामाचा केला गजर । शास्त्री पंडित विद्वान थोर । राम भजनी लाविले ॥७४॥
जेथें कर्मठ ब्राह्मण । भक्तिपंथा करिती छ्ळण । तयासी प्राकृत नामस्मरण । करावया लाविलें ॥७५॥
काशी निवासी विद्वान थोर । बाबू भट नामें द्विजवर । सद्‍गुरुचे झाले किंकर । वास करिती श्रीजवळी ॥७६॥
कलियुगीं नामची सार । दावोनी तारिले अपार । धन्य कूळ धन्य संसार । जे गुरुवचनी विश्वासिले ॥७७॥
असो करोनि त्रिस्थळीं । आयोध्ये आले भक्तबळी । मातृआज्ञा प्रतिपाळी । ऐसा विरळा ल॥७८॥
अयोध्यें गीता माउली । अकस्मात विकृती पावली । देहयात्रा संपविली । पुण्यक्षेत्री ॥७९॥
दशदानें सुवर्ण दानें । सवत्स दुभती गोप्रदानें । विहित तितुकी दिधली दानें । सच्छील द्विजासी ॥८०॥
नमोत्साह करविला । अन्न वाटलें गरिबाला । अंतकाळ सांग केला । माउलीचा ॥८१॥
समुदाय पाठविला ग्रामाप्रती । नैमिषारण्य़ीं स्वयें जाती । पुनरपी एकदां अयोध्येप्रती । स्वारी आली यात्रेसी ॥८२॥
दहिवडीकर जानकीबाई । विनोदें वदती तिजसी पाही । सोबातीस तुम्हीं राहता कायीं । माउलीचे आमुच्या ॥८३॥
पुण्य क्षेत्र शरयुतीर । वरी सन्निध सद्‍गुरुवर । जाणोन देती प्रत्युत्तर । होजी होजी म्हणोनि ॥८४॥
निमित्तमात्र आला ज्वर । ठेविलें तिने कलेवर । मुक्ति दाता सद्‍गुरुवर । सुसंधी साधिली ॥८५॥
तिजसी ही तिलांजली । सद्‍गुरुनीं स्वयें दिली । अनंत सुकृतें फळांश आली । धन्य जाहली उभयलोकीं ॥८६॥
 इति श्रीसद‍ गुरुलीलामृते षष्ठोध्यायांतर्गत चतुर्थ समास: । ओंवीसंख्या ॥८६॥
॥ श्रीसद‍गुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP