श्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसद्‍गुरुभ्योनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीरामसमर्थ ।
नमन करूं सीतापती । कोंदंडधारी शाममूर्ती । कमलनयन दिव्यकांती । महामेरुसत्वाचा ॥१॥
विश्वामित्रा सहाय्य केलें । असुर सर्व संहारिले । चरण स्पर्शे पावन केले । अहिल्यासतीसी ॥२॥
साष्टांगेसी प्रणिपाअत । करूं सद्‍भावनायुक्त । गुरुलीला अगम्य बहूत । दासामुखीं वदवावी ॥३॥
सद्‍गुरु गेले नैमिषवनीं । राहिले एकांत सादूनी । उध्दरावया अज्ञानी पुन्हां इंदुरीं पावले ॥४॥
सकळांसी श्रूत झाले । गुरुमहाराज येथें आले । आनंदोर्मीनें धांवले । गुरुदर्शना कारणें ॥५॥
पंचक्रोशी दशक्रोशी । लोक येती दर्शनासी । आनंदी आनंद सर्वांसी । होता झाला ॥६॥
तेथोन आले हर्द्याप्रती । जेथें सूज्ञ विप्र वसती तेथेंही उपासना वाढविती । अनुग्रहप्रसाद देवोनी ॥७॥
काशिनाथ भैया सावकार । तया करवीं बांधिले मंदीर । पटटाभिषिक्त रामसुंदर । स्थापन केली श्रींनी ॥८॥
पूजा नैवेद्य दीप जाण । आल्या अतिथा अन्नदान । व्हावया शेती करोन । दिधली असे समर्थे ॥९॥
महादेव भटट इंदोरकर । पुजारई नेमिला सत्वस्थ फार । बहुतदिवस गुरुवर । सकुटुंब तेथें राहती ॥१०॥
उपरी गोंदवलीस आले । अपारिमित भक्त झाले । रामनाम जप चाले । चहूंकडे सारिखे ॥११॥
एक कोट तीन कोट । कोणी सिध्द पदवी पावले । कोणी वैराग्यातें धरिलें । शाळेमाजीं सद्‍गुरुंचे ॥१३॥
दीक्षेचे अधिकारी कोणी । चित्तशुध्दी पावले झणी । कोणी सद्‍गुरुरुप होवोनी । सर्वाधिकारी जाहले ॥१४॥
कोणा चिंतामणी गवसोन । आळसें दारिद्य भोगिती जाण । ऐसे अभागी किती जन । होवोनि गेले ॥१५॥
नित्य उत्साह गुरुगृहीं । आनंदासी सीमा नाहीं । धनिक गरीब सर्वही । नांदती एकेठायी ॥१६॥
विद्वान आणि अज्ञानी । पुरुष आणि माय बहिणी । नांदती सद्‍गुरुसदनीं । मत्सर रहित नीतीनें ॥१७॥
सुधारणा पुराण मतवादी । सात्विक राजस तमोबुध्दी । आळसी द्क्ष वाकभेदी । एके छत्री वावरती ॥१८॥
व्याघ्र आणि अजापुत्रा । दरवेशी बांधी एक सूत्रा । सद्‍गुरु तपतेज छत्रा । खाली निवैर नांदती ॥१९॥
सकळांचे ध्येय एक । सकळां साधनही एक । गुरुकृपा मजवरी अधिक । वाटते सकळांसी ॥२०॥
बाल तरुण आणि वृध्द । सकलां सारिखा संवाद । रोगासारिखे औषध । वैद्य जैसा देतसे ॥२१॥
शक्ती पाहोन सेवा सांगती । कामिकांच्या कामना पुरविती । आशा सूत्रासी वळविती । भक्ति मार्गे हळूहळू ॥२२॥
जाणोनि सकळांचे अंतर । तोचि देती प्रत्युत्तर । खूण पटतां साक्षात्कार । समाधान होतसे ॥२३॥
कोटयावधी शिष्य झाले । सकलांतरी गुरु खेळे । साधनी अड्ले भुलले । त्यांसी लाविती मार्गासी ॥२४॥
कोणा प्रत्यक्ष सांगत । कोणा होय दृष्टांत । दुजेंरुप धरोनि हेत । पुरविती कोणाचा ॥२५॥
ज्याने संकटी करुणा भाकिली । तेथें सत्वर धांव घाली । ऐसी सद्‍गुरुमाउली । संकटकाली पावतसे ॥२६॥
उदय होता गभस्ती । अनेक बिंबे प्रकाशतीं । तैसी ही गुरुमूर्ती । सर्वाघटीं वास करी ॥२७॥
सद्‍गुरुकृपा प्रकाशे । साधन होई उल्हासे । न पडती संसृतीचे फासे । तयावरी ॥२८॥
शुध्दभाव जयापाशी । तया अनुभवाच्या राशी । देशी असो वा विदेशी । सदा संनिध महाराज ॥२९॥
शिष्य जरी झोपी जाये । तरी सद्‍गुरु उभा आहे । जाणोनि अपाय उपाय । साह्यकरी सर्वदा ॥३०॥
जैसी होय चित्त शुध्दी । तैसी क्रिया साधन विधी । लावोनिया भव नदी । तारोनि नेती गुरुमाय ॥३१॥
कोणा घालिती कौपिन । कोणा कफनी टोपी पूर्ण । कोणा धरविती मौन । कांही कालपर्यंत ॥३२॥
कोण्दा सांगती गुरुसेवा । कोणा म्हणती देव पुजावा । कोणी एकांत सेवावा । ऐसी आज्ञा होतसे ॥३३॥
ब्रह्मचर्य कोणा सांगती । कित्येकांची लग्नें करिती । कोणाच्या जटा वाढविती । कोणाचें करविती मुंडण ॥३४॥
कोणा करविती संनिध वास । कित्येकासी दूर देश । गृही बैसोन जपास । कित्येकांस करविती ॥३५॥
कोणा देउनिया दीक्षा । मागविती नित्य भिक्षा । ॐभवती यापक्षा । रक्षण करविती ॥३६॥
कोणा करवी देवालय । बांधविती सद्‍गुरु माय । आल्या अतिथा द्या आश्रय । ऐशी आज्ञा होतसे ॥३७॥
सिध्द झाले शिष्य थोर । तया देती अधिकार । करावा आतां जगदोद्वार । भक्तिपंथ वाढवावा ॥३८॥
जाणोन अंतरस्थिती । वर्तमान भूत भविष्य गती । कठिण सुलभ आज्ञा करिती । भक्तालागीं दयासिंधू ॥३९॥
पाहतां सद्‍गुरु दरबार । वाटे हें कैलास शिखर । भूतगण दिसती फार । चित्र विचित्र ॥४०॥
वरि सांगितले वेष । आणिक प्रकार बहुवस । माला मुद्रामणी विशेष । असती तयामाझारी ॥४१॥
यावरी हें सुधारणा युग । अनंत पोशाखें नटलें जग । वर्णन करितां दिसेल व्यंग । महाराष्ट्र बोली ॥४२॥
चिंधी बांधिली गळयांत । हाडके हातीं कंठात । निर्जिव चर्म वागवित । मस्तकावरी कित्येक ॥४३॥
निष्कारण अंधळे किती । नेत्रा उपनेत्र लाविती । रोगग्रस्ता सारिखे किती । झाकिती हातपाय्व ॥४४॥
जैसा देश तैसा वेष । धरिता लाहिजे सुखास । नातरी हा हव्यास । काचोळा करील त्वचेचा ॥४५॥
ऐसे दिसती बहू प्रकार । सांगता ग्रंथ होय विस्तार । नाना देशीचे नर । रीतरिवाज वेगळे ॥४६॥
एकाचें एका कळेना । ऐसे भाषा प्रकार नाना । हिंदुस्थानी कानडी जाणा । तैलंगू गिर्वाणादिक ॥४७॥
कोणी पिशाच्चे झाले ग्रस्त । रोगें केलें कोणा ग्रस्त । कोणी भ्रमानें बरळत । भूतगण समर्थांचे ॥४८॥
सकल चरणसेवा करिती । पाहतां चित्रविचित्र दिसती । वाटे दुजे भूतपती । महाराज आमुचे ॥४९॥
वैदिक शास्त्री विद्वान । गरीब आणि धनवान । संगती सुखा लागोन । सकुटुंब राहती ॥५०॥
ऐशा कुटुंबीयांचा संसार । चालविती गुरुवर । विश्वकुटुंब म्हणती नर । याजसाठी ॥५१॥
कांही होतें । बहुत येती । जाती तयास । सीमा नाही ॥५२॥
भाऊसाहेब केतकर । बापूसाहेब पाटखळकर । जतकर आणि  फारिष्टर । शाळीग्राम व गुरुजी ॥५३॥
दादोबा अंताजीपंत । व्यंकण भट गोडसे वदत । रामशास्त्री व पिटके वंदित । वाई क्षेत्रनिवासी ॥५४॥
गोविंद नामें आळतेकर । पोतनीस जाहगीर । सखारामपंत देशपांडे श्वशूर । रामपुजे लाविले ॥५५॥
मुक्ताबाई परम भक्त । श्रीचरणी देह ठेवीत । मथूबाई विख्यात । सेव करी गुरुची ॥५६॥
आम्मानामें मद्रासी । देहकष्ट बहू सोसी । द्वादश वर्षे मौनासी । धरती झाली गुरुआज्ञे ॥५७॥
जर लोकर रेशीम । सुबक करी विणकाम । शोभवी सदगुरू श्रीराम । भक्तीभावे करोनी ॥५८॥
चंद्राबाई परमभक्त । मंदीरी वाची भागवत । ताई सुस्वर गाणी गात । बेळगांवची रहिवाशीं ॥५९॥
आणीक एक भक्त । आणिक भक्तबहू असती । नित्य गुरुसेव करिती । भाग्य आले उदयाप्रती ॥६०॥
बुवा शास्त्री रामदासी । साहेबपंत संन्यासी । राव भटट ब्रह्मचार्‍याशी  । सीमा नाहीं ॥६१॥
मामलेदार न्यायाधिश । सरवीर आणि फडणवीस । वैद्य जाती विशेष । तात्या नामें संबोधिती ॥६२॥
अठता पगड याती जमाति । सकलां एक रुप पाहती । सांभाळोनि धर्मनीती । नाम घेवविती मुखानें ॥६३॥
सेवा प्रकार बहु असती । अल्प बोलूं संकेती । जेणें श्रवण पावन होती । भाविकांचे ॥६४॥
अखंड मुखीं रामनाम । हा एक मुख्य नेम । ध्यान पूजा अध्यात्म । अवतारलीला वर्णावी ॥६५॥
याही वरी सद्‍गुरुसेवा । सेविती सुखाचा ओलावा । तोहि प्रकार परिसावा । श्रोते जनी ॥६६॥
कोणी खडावा धरिती । कोणी छत्र वागवती । पीक पात्न धरोनि हातीं । कोणी उभे सर्वदा ॥६७॥
कफनी फलगुरु कौपिन । पात्रें पडशी भरोन । उभे नित्य संनिधान । सद्‍गुरुपाशीं ॥६८॥
ऐसें करावया कारण । शेती पाहावया फिरता जाण । तैसेचि जाती ग्रामालागून । क्वचितकाळीं बहू दूर ॥६९॥
कोणी पाय चेपती । कोणी अंग रगडती । उष्ण काळीं पंखा वारिती । किती एक ॥७०॥
कोणी आणिती पाणी सडासंमार्जन कोणी । देहा अर्पितीं सद्‍गुरु चरणीं । अनन्य भक्त नरनारी ॥७१॥
सेवा सुलभ वा कठिण । समाधान करिती घेवोन । येरवी विदेहा लागून । चाड नसे किमपीही ॥७२॥
कोणा मनीं विकल्प येता । तात्काळ दाविती विदेहता । भक्तालागीं झाली माता । गरजवंत ॥७३॥
कोणी गाडी ओढती । कोणी उचलोन नेती । कोणी घोडयासंगे धांवती । बैसतावरी ॥७४॥
फौजदार भिकाजी श्रीपत । बताशा घोडा अर्पित । वाण सुंदर आणि मस्त । कोणासही नावरे ॥७५॥
वरी बैसता गुरुमाउली । निमुट झाले सरळ चाली । क्वचित स्वारी नाहीं झाली । तरी घाली धिंगाणा ॥७६॥
गुरुसेवेची आवडा भारी । मूक म्हणोनि दंगा करी । महाराज बसता वरी । वार्‍यासारिखा धांवतसे ॥७७॥
शाहूराव चिवटे यासी । घोडा दिधला पाळावयासी । तेथें तीन दिवस उपवासी । नेत्री येती अश्रुधारा ॥७८॥
परत दिधला आणोन । अश्व नव्हे सामान्य । हा भक्त दिसे अन्यन । वाहन एक श्रीगुरुचें ॥७९॥
गंगी नामें गाय लंगडी । सद्‍गुरुरुपीं झाली वेडी । कुरवाळिता राहे उगडी । तोंवरी मागें हिंडतसे ॥८०॥
वासना भूतें झडपिती । तीही सेवा करिती । संगतीनें उपरम पावती । तामसी बुध्दी सोडोनी ॥८१॥
आम्हां पिशाच्च योनीतून । सोडवी सेवा करूं गहन । तुमचें घडलें दर्शन । मुक्त करी दयाळुवा ॥८२॥
दुष्टबुध्दि पिशाच्चगण । त्यांचेहि पालटें मन । कैसें आमुचें अज्ञान । प्रपंच मोह सुटेना ॥८३॥
मानव भूतें मूकप्राणी । सेवा करिती अखंड चरणीं । सद्‍गुरु समस्तां लागोनी । रामरुप पाहती ॥८४॥
अनंत येती आणि जाती । सकळांवरी सारखी प्रीति । आलियां जेवूं घालिती । निघतां बांधिती शिदोरी ॥८५॥
दर्शना येती सुवासिनी । खणनारळें ओटी भरोनी । लेकुरां अंगीटोपी करोनी । आनंदे बोळविती ॥८६॥
नानासंसारी संकटें । निवारिती युक्ती वाटें । घरच्याहून प्रिय मोठें । वाटती लहान थोरां ॥८७॥
नाना हितगुजें सांगती । कन्या जशी माउलीप्रती । तैसी सकलां गुरुमूर्ती । संकटकाली तारितसें ॥८८॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते षष्ठोध्यायांतर्गत पंचमसमास: । ओंवीसंख्या ॥८८॥
॥ श्रीगुरूचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP