सिद्धसिद्धांन्तसंग्रह - सप्तमोपदेश

काशीचे पण्डित बलभद्र यांनी १८व्या शतकाच्या शेवटी  सिद्ध-सिद्धांत पद्धति ग्रंथ संक्षिप्त करून सिद्ध सिद्धांत संग्रह नामक ग्रंथ लिहीला होता.


चार्वाकाश्चतुरा: स्वतर्कनिपुणा देहात्मवादेरता:
सर्वे संधिरता: सदैवपरताध्यानाश्रिता: सात्त्विका: ।
कार्त्तारं प्रभजन्ति चैव यमना: पापे रता निर्दया -
स्तेषामैहिकमल्पमेव हि सुखं सत्यं न मोक्ष: परम्‍ ॥१॥
चतुर चार्वाक हे देहात्मवादी व ऐच्छिक तर्क करणारे आहेत. काही सात्त्विक दार्शनिक देह व आत्मा या दोहोंमधील विज्ञानतत्त्वाला आत्मवस्तू समजणारे आहेत. काही दार्शनिक अर्थात्‍ मीमांसक आत्मा हा कर्ता आहे असे समजणारे आहेत. काही कर्मावर भर देणारे आहेत. काही स्वतंत्रप्रवृत्तीचे निर्दय लोक पापकर्मात निमग्न होतात. अशा लोकांना काही थोडेसे अल्पप्रमाणात ऐहिक सौख्य मिळेल; परंतु त्यांना मोक्षसुखाचा लाभ मात्र चुकूनही होत नाही.

सीहट्टे मस्तकान्ते त्रिकुटपुटबिले ब्रह्मरंध्रे ललाटे
भ्रूनेत्रे नासिकाग्रे श्रवणपथवरे घंटिकाराजदंडे ।
कंठे हृन्नाभिमूले त्रिकमकुहरे हयुड्डियानेऽथ मूले ।
ये त्वेवं स्थानमग्ना: परमपदमहो नास्ति तेषां निरुत्थम्‍ ॥२॥
मस्तकांतर्गत सीहट्टचक्र म्हणजे श्रीहाट, त्रिकूट, ब्रह्मरंध्र, ललाट, भुवयांचा व नेत्रांचा मध्यभाग, नाकाचे टोक, कर्णमार्ग, घाटी अर्थात्‍ गळ्याचा अंतभाग, राजदंड अर्थात्‍ पृष्ठवंश, कंठ, हृदय, बेंबीचे मूळस्थान, त्रिक म्हणजे नितंबभाग, उड्डियान व मूलाधारचक्र या सर्व स्थानात चित्त स्थिर करण्यात जे गुंतले आहेत त्याना कुंडलिनी उत्थानरुपी परमपद प्राप्त होत नाही.

आदौ पूरककुंभरेचकविधौ नाडीपथं शोधितं
कृत्वा हृत्कमलोदरे च सहसा चित्तं समं मूर्च्छितम्‍ ।
तस्मादव्ययमक्षयं परकलं चोंकारदीपं शुभं
ये पश्यन्ति समाहिता: पदमहो नास्ति तेषां निरुत्थम्‍ ॥३॥
पूरक, कूंभक व रेचक यांच्या विधीनुसार आधी नाडीमार्गाची शुद्धी करुन हृदयकमलात म्हणजे आज्ञाचक्रात वायूबरोबर चित्तालाही मूर्च्छित करुन त्यायोगे अक्षय, नाशरहित, श्रेष्ठाकलायुक्त व शुभ अशा ॐकारदीपाला जे समाहित चित्ताने पाहतात त्यांना कुंडलिनीचे उत्थान होऊन शिवशक्तिसामरस्यात्मक असे परमपद प्राप्त होत नाही.

गोहाटे दीप्तिपुंजं प्रलयशिखिनिभं संधुजालंधरे च
शृंगाटे ज्योतिरेकं तडिदिव तरलं ब्रह्मनाडयंतराले ।
कालान्ते विद्युदाभं तदुपरिशिखरे कोटिमार्त्तण्डचण्डे ।
ये नित्यं संशयते परमपदमहो नास्ति तेषां निरुत्थम्‍ ॥४॥
जे साधक गोल्हाट चक्रात तेजाचा पुंजका, सिंधुरुपी जालंधरबंधात प्रलयाग्नीसारखे तेज, शृंगाटात एक (दिव्य) ज्योती, ब्रह्मनाडीच्या मध्यात विजेप्रमाणे चंचल किंवा चपल तेज, कालांतचक्रात विजेसारखे स्थिरतेज व या चक्राच्या वरील भागात कोटिसूर्यासारखे तेज पाहतात आणि त्यांमध्येच नित्य रमून जातात त्यांना परमपदरुप कुंडलिनी उत्थानजन्य सौख्य प्राप्त होत नाही.

लिंगाच्चंडाकुलान्ते मनपवनगमै: ब्रह्मग्रंथ्यादिभेदे
कृत्वा बिंदुनयन्ते भ्रमरपदमहाशंखमंभोदरोधे ।
नेत्रांतर्नादघोषं गगनगुणमयं वज्रदंडी क्रमेण
ये कुर्वन्तीह कष्टात्परमपदमहो नास्ति तेषां निरुत्थम्‍ ॥५॥
जे साधक मूलाधारापासून ब्रह्मरंध्रापर्यंत मनपवनांच्या गमनागमनाने ब्रह्म, विष्णू व रुद्र या ग्रंथीच्या भेद करुन बिंदूला नेत्रात अर्थात्‍ आज्ञाचक्रात घेऊन जातात, भ्रामरी प्राणायाम व महाशंखमुद्रा यांच्यायोगे बिंदुरोध करतात आणि वज्रदंडीक्रमाने आकाशाचा गुण जो शब्द किंवा नादाचे श्रवण करतात, त्याना हे सर्व करण्यात महान्‍ कष्ट करावे लागतात. तरीपण त्यांची कुंडलिनी शक्ती नि:शेषपणे जागृत होत नाही व तद्‍द्वारा प्राप्त होणारे शिवशक्तीच्या समरसतेचे सौख्यही यांना मिळत नाही.

सम्यक्‍चालनदोहनेन सततं दीर्घीकृतां लंबिकां
ताल्वभ्यंतरदर्शितान्तदशमद्वारोदरे शंखिनीम्‍ ।
प्राप्तां मध्यमसंपुटे पुटां सप्तादशीं कोटरां
पीत्वा षडविधपानकाष्ठभजनं वांछंति ये मोहिता: ॥६॥
(आता खेचरीमुद्रा देखील कुंडलिनी उत्थान म्हणजे जागृती करु शकत नाही हे सांगतात.) जे साधक चालनदोहनादींच्या सतत प्रयत्नाने आपल्या लांब झालेल्या जिभेला तालूतील दशमद्वारामध्ये असलेल्या शंखिनीपर्यंत नेतात व मध्यम संपुटातील सतरावियेचे अमृतरुप उदक पिण्यात गुंग होतात ते बिचारे कुंडलिनी उत्थानसिद्धीपासून आचवितात.

गुह्यात्पश्चिमपूर्वमार्गमुभयं रुद्ध्‍वानिलं मध्यमं
नीत्वा ध्यानसमाधिलक्ष्यकरणैर्नानासमाध्यासनै: ।
प्राणापानगमागमेन सततं हंसोदरे संघटा
घेनास्यैव नयन्ति ये भवजले मज्जन्त्यहो दु:खिता: ॥७॥
(अष्टांग योगानेही कुंडलिनी उत्थान साधत नाही हे सांगताना ते म्हणतात की-) काही साधक मूलाधारापासून पूर्व-पश्चिममार्गाचा रोध करुन वायूला मध्यममार्गात आणून यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या योगाच्या आठ अंगांनी प्राणापानाला व श्वासोच्छ्‍वासाला सतत "सोऽहं हंस:" इत्यादि जप करायला लावतात व एतद्रूप कष्टसंघात उपसतात; परंतु एवढेही करुन त्यांना कुंडलिनी जागृतीची सिद्धी तर प्राप्त होतच नाही उलट ते संसारसमुद्रात बुडून दु:खी होतात.

शक्त्याकुंचनमग्निदीपकरणं चाधारसंपीडनात्‍
ज्ञात्वा कुंडलिनीप्रबोधनमनो नादादिना मूर्द्धनि ।
नीत्वा पूर्णगिरिं निपातनमन: कुर्वन्ति ये स्वाश्रये
खंडज्ञानरतास्तु ते निजपदं तेषां हृद्वरं परम्‍ ॥८॥
आधार संपीडनाने म्हणजे सिद्धसनावर किंवा वज्रासनावर बसून कुंडलिनी शक्तीचे आकुंचन करुन अग्नी प्रदीप्त झालेला पाहून आता कुंडलिनी शक्ती जागृत झाली असे जे समजतात ते खंडज्ञानी म्हणजे अपूर्णज्ञानीच समजावेत. आणि जे कोणी मस्तकातील नादादिकांनी अर्थात्‍ अनाहुत नाद ऐकून आपण म्हणजे आपले मन पूर्णगिरीपर्यंत म्हणजे ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचले आहे असे समजतात, ते स्वस्थानीच राहतात. त्यांना हृदयरुप निजपद फारच लांब राहते.

बंधं भेदं च मुद्रां गलबिलचिबुकं मध्यमार्गं सुषुम्णां
चंद्रार्के सामरस्यं शमदमनियमर्नादबिंदुं कलान्ते ।
ये नित्यं कलयन्ते तदनु च मनसामुन्मनी योगयुक्तं
तेषां लोकामयत्ने निजसुखविमुखा: कर्मदु:खौघभाज: ॥९॥
जालंधरादि बंध, ब्रह्मग्रंथ्यादिभेद, खेचर्यादि मुद्रा, गळ्याजवळील कंठकूपाला हनुवटी लावणे, सुषुम्नेच्या मध्यमार्गाने जाणे, चंद्रसूर्याचे अर्थात्‍ इडापिंगलेचे एकीकरण करणे, शमदमादि नियमांनी नाद, बिंदू व कलेचे आकलन करुन त्यांना ओलांडून पलीकडे जाणे इत्यादि गोष्टी जे साधक हठाने किंवा प्रयत्नपूर्वक करतात व उन्मनी अवस्था प्राप्त झाली आहे असे समजतात ते यत्नावाचून उत्तमलोकी जातील किंवा त्यांच्याकडे लोक आकृष्टही होतील; पण ते वरील कृतीतील कष्टाने दु:खी होतील व निजसुखापासून वंचित राहतील.

अष्टागं योगमार्गं कुलपुरुषमतं षण्मुखीचक्रभेद-
मूद्ध्‍र्वाधो बाह्यमध्ये रविकिरणनिभं सर्वतो व्याप्तिसारम्‍ ।
दृष्टयग्रे वीक्षयन्ते तरलजलसमं नीलवर्णं तमो वा
एवं ये भावयन्ते सुविमलमतयस्तेऽपि हा कष्टभाज: ॥१०॥
कुलपुरुषांना संमत असा अष्टांग योगमार्ग आचरणे, षण्मुखी इत्यादि मुद्रा व षट्‍चक्रांचा भेद करणे, ऊर्ध्वभागी, अधोभागी, आत, बाहेर, चहूकडे सूर्यकिरणांचे प्रखर किंवा व्यापक तेज आपल्या डोळ्यांसमोर पाहणे, चंचल जलाप्रमाणे नीळसर वर्ण पाहणे किवा गडद अंधकार पाहणे इत्यादि क्रियांबद्दल व दृश्यांबद्दल जे साधक हेच योगसार किंवा योगरहस्य आहे अशी भावना करतात ते निर्मल बुद्धीचे लोक सुद्धा कष्टाचेच भागीदार होतात. अर्थात्‍ त्यांना सद्‍गुरुकृपेने अनायासे जागृत होऊन स्वत: साधन करुन साधकाला ब्रह्मस्थानी पोहोचविणार्‍या कुंडलिनी शक्तिजागृतीचे सुख प्राप्त होत नाही. केवळ कष्टच त्यांच्या वाटयाला येतात.

आदौ सारणशंखसारणामत: कृत्वा महासारणं
संपूर्ण प्रतिसारणं विधिबलाद्‍दृष्टिस्तथानिर्मला ।
आज्ञाली हठयोगयोगकलया सद्दीप्तसंतुलिकां
ये कुर्वति च कारयंति च स भ्राम्यंति बाधंति च ॥११॥
जे योगसाधक आधी सारण, शंखसारण, महासारण व प्रतिसारणादि क्रिया शास्त्रोक्त मार्गाने करुन दृष्टी निर्मल करुन घेतात व आज्ञाचक्रात हठयोगाच्या साहाय्याने प्रदीप्त तेजोगोलाचा किंवा तेजाचा पुंजका ते पाहतात व दुसर्‍यांकडूनही जे असे पाहायला लावतात तेही योगमार्गात चक्रावतात, भ्रमण करतात व दु:ख भोगतात.

शंखक्षालनमन्तरं रसनया ताल्वोष्ठलीलासमं
वीते तूल्लुठनं कवाटममरीपानं त्रिधा खर्परी ।
वीर्य्यद्रावितमात्मजं विकलये ग्रासं च लेपंच वा
कुर्वे तीर्थजले स्यात्‍ तेन हि फलं तेषां तु सिद्धांतजम्‍ ॥१२॥
जे साधक शंखक्षालन क्रिया करुन नंतर जिभेने तालु ओठस्पर्शरुप लीला अर्थात्‍ खेचरीमुद्रा करतात, ब्रह्मकपाटोद्‍घाटन करुन अमृतपान करतात, ऊर्ध्वरेतत्व संपादन करतात, ग्रास-लेपादि क्रिया करतात त्यांना एवढे करुनही सिद्धांतोत्पन्न फल मात्र मिळत नाही. अर्थात्‍ त्यांना कुंडलिनी उत्थान साधत नाही.

घंटाकाहलमर्द्दलं त्वथ महाभेरीनिनादं यथा
सम्यड: नादमनाहतं ध्वनियुतं श्रृण्वन्ति ये तादृशम्‍ ।
पिंडे सिद्धि परं निरंतरतया ब्रह्मांडमध्येऽथ वा
तेषां सिद्धमतेस्कते: समुदितं सत्यं परं लभ्यते ॥१३॥
जे साधक (कुंडलिनी शक्ती गुरुकृपेने जागृत झाल्यावर तिच्या मुळेच उत्पन्न होणारे) घंटा, मर्दल, काहल (झांझ), दुंदुभी हे अनाहत नाद सम्यक्‍रीतीने ऐकतात त्यांना या अनाहत नादाच्या श्रवणाने पिंडसिद्धी प्राप्त होते. आणि पिंडब्रह्मांडाचे सर्व स्वरुप समान असल्याने त्यांना परम सत्याची प्राप्ती होते.

वैराग्यामृत पल्वलेन सलिलं कंदं फलं मूलकं
भुक्त्वा यो वनवास एव रमते चाऽनेकदेशांतरे ।
स्थित्वा सादितनिश्चयेन मनसा रात्रौ दिने वीक्ष्यते
स त्यक्त्वाखिलभावमेकममलं प्राप्नोत्यहो स्वं पदम्‍ ॥१४॥
जो भाग्यवान्‍ साधक वैराग्यरुप अमृताच्या जलाशयातील पाणी पितो, कंदमूळफळे खातो, वनामध्ये राहतो, अनेक देशात फिरतो किंवा राहतो आणि मनोनिश्चयामुळे प्राप्त झालेल्या ज्ञानावर रात्रंदिवस दृष्टी ठेवतो तो सर्व प्रकारच्या देहभावांचा त्याग करुन स्वपदाची प्राप्ती साधून घेतो अर्थात्‍ शिवशक्तिसामरस्याने आत्मज्ञानसंपन्न होतो.
॥ इति श्रीसिद्धसिद्धांतसंग्रहे सप्तमोपदेश: समाप्तिमगमत्‍ ॥
या प्रमाणे श्रीसिद्धसिद्धांतसंग्रहातील सातवा उपदेश समाप्त झाला.

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP