सिद्धसिद्धांन्तसंग्रह - चतुर्थोपदेश

काशीचे पण्डित बलभद्र यांनी १८व्या शतकाच्या शेवटी  सिद्ध-सिद्धांत पद्धति ग्रंथ संक्षिप्त करून सिद्ध सिद्धांत संग्रह नामक ग्रंथ लिहीला होता.


पिंडाधारमथो वक्ष्ये यज्‍ ज्ञानादात्मतत्त्ववित्‍ ।
पिंडाधारो भवेच्छक्ति: चित्प्रबुद्धाऽपरंपरा ॥१॥
ज्याच्या ज्ञानाने मनुष्य आत्मतत्त्वज्ञानसंपन्न होतो त्या पिंडाच्या आधाराचे आता वर्णन करतो. या पिंडाला आधारभूत अशी एक चित्‍शक्ती आहे. ती चैतन्याचा प्रकर्षाने बोध करणारी अर्थात्‍ ज्ञानस्वरुप व अपरंपरायुक्त म्हणजे जिला स्वत:ला कोणतीही परंपरा नाही अशी किंवा जी स्वत:च एक परंपरा आहे, अशी आहे.

कार्यकारणकर्तृणामुत्था (?) वस्थाकारं स्फुटम्‍ ।
कर्त्तु शक्नोति यत्तस्माच्छक्तिरित्यभिधीयते ॥२॥
ही चित्‍शक्ती  सर्व समर्थ आहे. हिला शक्ती हे अभिधान प्राप्त होण्याचे कारण असे की, कार्य, कारण व कर्ता या त्रिपुटीचे उत्थान करण्याला ही शक्ती समर्थ आहे.

नानासूत्रस्वरुपेण पटे तंतुर्यथाश्रय: ।
तद्वधारतां सेति देहे नानांशुभिर्जड ॥३॥
ज्याप्रमाणे वस्त्राला नानाप्रकारच्या सूत्ररुपाने असलेले तंतूच कारण अर्थात्‍ आधार असतात त्याप्रमाणे नानाविध अंशांनी किंवा किरणांनी या जड देहाला हीच चिच्छक्ती कुंडलिनी कारणीभूत म्हणजे आधार आहे.

अत्यंतस्वप्रकाशैकवेद्याभावैकसांख्यभू: ।
प्रत्यक्षसाक्षिणी यातां भावयेदपरंपराम्‍ ॥४॥
जी चित्‍ शक्ती स्वत: अत्यंत प्रकाशमान आहे, जाणण्याला योग्य अशी हीच एकमात्र आहे, सर्व तर्‍हेच्या ज्ञानाची जी जन्मभूमी आहे, जी प्रत्यक्ष सर्वसाक्षीभूत आहे व जी अपरंपरायुक्त आहे अशा चैतन्यरुप बुद्धिशक्तीची साधकाने भावना करावी.

सहजेनात्मलीला सा यदा संजायते तदा ।
निरुत्थानदशेत्युक्ता शिवसंज्ञापि तत्र हि ॥५॥
ही कुंडलिनी शक्ती आत्म्याची सहजलीलारुपिणी आहे किंवा ही स्वयंभू आहे. ज्यावेळी या शक्तीला नि:शेष अर्थात्‍ संपूर्ण उत्थानदशा प्राप्त होते म्हणजे मूलाधारातून ही शक्ती सहस्त्रारात येते तेव्हा तिला तेथे शिव हे नाव प्राप्त होते.

कुलाकुलस्वरुपोऽसौ सामरस्यस्वभूमिका ।
सत्ताहंता परा भासा स्फुरत्ता च कुलाकुलम्‍ ॥६॥
ही कुंडलिनीच कुल म्हणजे शक्तिस्वरुप व अकुल म्हणजे शिवस्वरुप आहे. सामरस्य अर्थात्‍ शिवाशी एकरसता हीच तिची स्वत:ची खरी भूमिका आहे. ही शक्ती सर्वसत्तारुप, अहंस्वरुपिणी, परम तेजस्विनी, सर्व स्फुरणरुपिणी व शिवशक्तियुक्त आहे.

परस्परनिराभासभासि सम्यक्‍प्रकाशिका ।
पराभासैकमेवास्तीत्येका सत्ता निरुच्यते ॥७॥
ही कुंडलिनी शक्ती अत्यंत निराभासालाही भासविणारी आहे. ती निराभास अशा आत्मस्वरुपाचे सम्यक्‍ प्रकाशन म्हणजे ज्ञान करुन देणारी आहे. ही शक्तीच सर्वांचे आभासन अर्थात्‍ सर्वांना प्रकट करणारी आहे.

अनादिनिधना मेयस्वभावांशुसुखोऽस्म्यहम्‍ ।
इत्यहन्ताज्ञानदशा स्फुरणात्मा स्फुरन्तिका ॥८॥
ही कुंडलिनी शक्ती म्हणजे अनादि ठेवाच आहे; कारण हिला उत्पत्ती व नाश दोन्हीही नाहीत. ही शक्ती साधनाने जाणली जाते. ‘मी आत्मसूर्याचा एक किरण आहे म्हणून अंशत: सुखी आहे’, अशी जी अहंभावना ती म्हणजे चिच्छक्ती कुंडलिनीच होय. ही शक्ती ज्ञानरुप, स्फुरणरुप व स्फूर्तिदायिनीही आहे.

शुद्धबुद्धस्वरुपस्य कलयत्यात्मवित्पदम्‍ ।
यतस्तत: कलेत्युक्ता कुलपंचकमस्त्यद: ॥९॥
ही कुंडलिनी शक्ती शुद्धबुद्धस्वरुप अशा आत्म्याच्या ज्ञानाला आकलन करते म्हणून तिला कला किंवा चित्कला असे म्हणतात. परा, सत्ता, स्फुरता व कला या पंचकाला कुल अशी योगपारिभाषिक संज्ञा आहे. (कुल म्हणजे कुंडलिनी शक्ती होय. त्यामुळे ही संज्ञा या चिच्छक्तीचीच आहे. या नावांमुळे ही कुलयुक्ता आहे.)

वर्णगोत्रादिराहित्यादेकमेवाकुल मतम्‍ ।
उमामहेशसंवादादर्थोऽयमवगम्यताम्‍ ॥१०॥
या कुंडलिनी शक्तीला वर्ण, गोत्र वगैरे काहीही नाही म्हणून ही शक्ती अकुल किंवा कुलरहित आहे. पार्वती व महेश्वर या दोघांच्या संवादावरुन हे सर्व जाणावे.

तथाच -
अनन्यत्वादखंडत्वादद्वयत्वादनाशनात्‍ ।
निर्धर्मत्वादनंगत्वादकुलं स्यान्निरन्तरम्‍ ॥११॥
तसेच आणखी - (अकुलाचा दुसरा अर्थ असा आहे की - ) ही शक्ती अनन्यसाधारण किंवा एकमेवाद्वितीय आहे. ती अखंड व अद्वैतस्वरुप असून तिचा कधीही नाश होत नाही म्हणजे ती अविनाशी आहे. ही शक्ती धर्म व अधर्म अर्थात्‍ पाप व पुण्य यांनी रहित असल्यामुळे निर्धर्मिणी आहे. त्याचप्रमाणे ती अवयवरहित आहे. या सर्व कारणांमुळे ही शक्ती नेहमीच अकुल अर्थात्‍ शिव आहे.

कुलस्य सामरस्येति सृष्टिहेतु: प्रकाशभू: ।
सा चापरंपरा शक्तिराज्ञेशस्यापरं कुलम्‍ ॥१२॥
सत्ता इत्यादि कुलाशी ही कुंडलिनी शक्ती समरस होते म्हणून ही सृष्टीच्या उत्पत्तीला कारणीभूत होते. ही कुंडलिनी शक्तीच ज्ञानप्रकाशाची भूमी किंवा आश्रयस्थान आहे. हिलाच अपरंपरा म्हणजे कसलीही परंपरा नसलेली अर्थात्‍ कोणत्याही संकुचित परंपरेत न बसणारी शक्ती म्हणतात. या शक्तीला ईश्वराची निरतिशय शक्तिशाली अशी दुसरी आज्ञाच म्हणतात.

प्रपंचस्य समस्तस्य जाग्रद्रूपप्रवर्त्तनात्‍ ।
एकैव कर्त्तु यच्छक्ता तस्मादाज्ञेचरीहसा ॥१३॥
समस्त अज्ञानजन्य संसाराला ज्ञानरुप जागृती देऊन प्रवृत्त करण्याला किंवा ज्ञानात परिवर्तन करण्याला हीच कुंडलिनी शक्ती एकटी समर्थ आहे. म्हणून ही शक्ती आज्ञेश्वरी आहे.

उक्तं ललितस्वच्छेदन -
अकुलं कुलमाधत्ते कुलाद्‍व्यहृतिर्भवेत्‍ ।
अत: कुलाकुलस्थित्यानीशईशोपि शडक्यते ॥१४॥
ही कुंडलिनी स्वत: अकुल म्हणजे शिवा असून कुल म्हणजे शक्तिस्वरुप धारण करते. या तिच्या कुलामुळे म्हणजे शक्तिस्वरुपामुळेच व्यवहार होतो. या शक्तीच्या कुलाकुल स्थितीमुळे तिच्या अनीशत्व व ईशत्वाविषयी शंका उत्पन्न होते.

अलृप्तशक्तिमान्नित्यस्सर्वाकारतया स्वयम्‍ ।
प्रस्फुरतं पुन: स्वेन स्वयमेकं प्रपश्यति ॥१५॥
सामर्थ्याचा अर्थात्‍ स्वशक्तीचा कधीही लोप होत नसल्यामुळे परमात्मा नित्य आहे. तो सर्व आकाररुपी असल्याने स्वतंत्र आहे. परमात्मा स्वमहिम्याने स्फुरण पावणारा असल्याने एक आहे व तो सर्वद्र्ष्टा आहे.

शिवोऽपि शक्तिरहित: कर्त्तु शक्तो न किंचन ।
शिव: स्वशक्तिसहितो ह्यभासाद्‍भासको भवेत्‍ ॥१६॥
शक्तीच्या मदतीवाचून शिव काहीच करु शकत नाही. तोच शिव स्वशक्तिसंपन्न झाला की, निराभासालाही भासवितो किंवा प्रकाशवितो अर्थात्‍ निर्गुणाला सगुणरुपाने व्यक्त करतो.

शक्तितत्त्वानदनित्यशक्तिमान्‍ परमेश्वर: ।
संविद्रूपोऽस्ति विषय इति सिद्धिमतं सताम्‍ ॥१७॥
परमेश्वर हा शक्तितत्त्वामुळे आनंदरुप, नित्य, शक्तिमान्‍ व ज्ञानरुप आहे असे सिद्धमत आहे अर्थात्‍ हा सिद्धांच्या बुद्धीचा विषय आहे.

परंपरास्वरुपा सा पिंडाधारतया श्रुता ।
भवेत्‍कुंडलिनी यद्वत्‍ पिंडसंसिद्धिकारिणी ॥१८॥
ही शक्ती परंपरास्वरुपिणी आहे. ती पिंडाला आधारभूत आहे. पिंडाला अर्थात्‍ देहाला सिद्धी प्राप्त करुन देणारी हीच कुंडलिनी शक्ती होय.

बुद्धाऽबुद्धा द्विधा प्रोक्ता द्विधा प्रोक्ता द्वितीया चेतनात्मिका ।
नानाचित्रक्रियोद्योगप्रपंचमयविग्रहा ॥१९॥
ही कुंडलिनी शक्तीच बुद्धा म्हणजे जागृत व अबुद्धा म्हणजे निद्रिस्त किंवा झोपलेली अशा दोन प्रकारची आहे असे म्हणतात. हिलाच चेतनस्वरुप असेही म्हणतात. नानाप्रकारच्या चित्रविचित्र क्रिया व उद्योगांमुळे ही शक्ती प्रपंचाकार धारण करणारी आहे.

सर्पकुंडलिनीभावाल्लोके कुंडलिनी मता ।
पूर्वास्तविकृते: पुंसो निवृत्त्युद्यमरुपिणी ॥२०॥
ही शक्ती सर्पासारखी वर्तुलाकार असल्याने हिला व्यवहारात कुंडलिनी असे म्हणतात. शारीरिक विकृती दूर झालेल्या (अर्थात्‍ श्रीगुरुकृपेने म्हणजे शक्तिपाताने ही कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर स्वतच: साधकाच्या सर्व विकृती दूर करुन त्याचे शरीर निर्मल करीत असल्यामुळे) पुरुषाला ही शक्तीच निवृत्तिमार्गाकडे उद्युक्त करणारी आहे.

ऊर्द्ध्वगामित्वमेतस्यामू र्द्‍ध्वाकुंचनतो भवेत्‍ ।
तदप्याकुंचनं मूलाधारबंधेन तन्मतम्‍ ॥२२॥
जडचेतनात्मक पिंडब्रह्मांडाची उभारणी किंवा जगाचे सातत्य मूलाधारक संवित्तीच्या म्हणजे ज्ञानाच्या अर्थात्‍ कुंडलिनी शक्तीच्या प्रसारानेच होते, असे योगशास्त्रीय मत आहे.

मूलाधारादिसकलचक्रेषु नव शक्तय: ।
नाथेन यदपि प्रोक्तास्तयाप्येकास्ति तत्र सा ॥२३॥
मूलाधारादि सर्व चक्रांमध्ये नऊ शक्ती आहेत असे नाथसंप्रदायात सांगितले असले; तरी (या सर्व शक्ती एकच शक्तीची रुपे असल्यामुळे) त्या त्या चक्रात एकच शक्ती आहे.

शक्तिप्रसरसंकोचौ जगत: सृष्टिसंहृती ।
भवतो नात्र संदेहस्तस्मात्तन्मू लमुच्यते ॥२४॥
या कुंडलिनी शक्तीचा प्रसर म्हणजे जगदुत्पत्ती किंवा जगताची उभारणी व हिचा संकोच म्हणजे जगदुपसंहार किंवा जगताची संहारणी होय, हे नि:संशय होय. यामुळेच हिला मूलशक्ती असे म्हणतात.

मूलाधारे प्रबुद्धे तु सिद्धिर्भवति योगिनाम्‍ ।
नियतोपाधिजीवात्मा वृथा भ्रांतिरपि स्वयम्‍ ॥२५॥
योगिलोकांना मूलाधारचक्राच्या म्हणजे कुंडलिनी शक्तीच्या जागृतीमुळे सिद्धी प्राप्त होते. जीव हा नानाविध उपाधींनी व्याप्त आहे ही केवळ त्याची स्वत:ची भ्रांती होय.

मध्ये स्वरुपतापन्नो यया सा मध्यकुंडली ।
सूक्ष्मासूक्ष्मस्वरुपेण द्विविधा सा प्रतीयते ॥२६॥
जीवाला (तो शिवस्वरुप असूनही) मध्यंतरी जी जीवस्वरुपता प्राप्त होते ती याच कुंडलिनी शक्तीमुळे होय. ही शक्ती स्थूल व सूक्ष्म अशी दोन प्रकारची असल्याची प्रतीती येते.

निश्चला निश्चलग्राह्या स्थूलान्या ध्यानरुपिणी ।
अर्थान्तपरिभ्रांतिहेतु: सर्वस्वरुपिणी ॥२७॥
ही शक्ती निश्चलचित्ताने ग्राह्य असल्यामुळे अर्थात्‍ ही शक्ती सुषुम्नावाहिनी झाल्यावर सूक्ष्म होत असल्याने तिची अनुभूती येते. मात्र ही शक्ती ध्यानावस्थेत स्थूलरुप असते. ही शक्ती सर्वस्वरुपिणी असल्याने भ्रांतीलाही तीच कारणीभूत आहे.

सर्वत्रास्तीति साकारा मध्यशक्ति: प्रकीर्तिता ।
सैव प्रसरसंकोचात्पर्य्यावृत्तिमुपागता ॥२८॥
सर्व ठिकाणी सर्वाकाराने भरुन असल्याने हिला मध्यशक्ती असे म्हणतात. ही शक्तीच संकोच व प्रसाराच्या स्वभावामुळे परिवर्तिनी झालेली आहे.

नित्यानंदतयाऽलोला सूक्ष्माख्यातानिराकृति: ।
बुद्धेति सिद्धास्तामाहु: प्रसिद्धा: सिद्धवर्त्मनि ॥२९॥
ही कुंडलिनी शक्ती नित्यानंदरुपा असल्याने निश्चला आहे. हिला आकार नसल्याने ही सूक्ष्म आहे. सिद्धयोगी हिलाच सिद्धमार्गातली बुद्धा म्हणजे जागृती असे म्हणतात.

तत्त्वसारेऽयमेवार्थो निरुपणपदे कृत: ।
यथासृष्टिस्तु कुंडली ख्याता सर्वभागवता हि सा ॥३०॥
"तत्त्वसार" नावाच्या ग्रंथात या अर्थाचे जे निरुपण केले आहे ते असे आहे. सर्व अंशांनी युक्त अशी ही कुंडलिनी शक्ती म्हणजे सृष्टीच होय.

बहुधा स्थूलरुपा च लोकानां प्रत्ययात्मिका ।
अपरा सर्वगा सूक्ष्मा व्याप्तिव्यापकवर्ज्जिता ॥३१॥
जगताच्या रुपाने ही शक्ती लोकांना अनुभवाला येत असल्यामुळे किंवा ती ज्ञानाला विषय होत असल्यामुळे प्राय: स्थूलरुपिणी आहे. दुसर्‍या बाजूने ती सर्वगत असल्यामुळे व्याप्तिव्यापकरहित आहे. म्हणून या शक्तीला सूक्ष्म म्हणतात.

तस्या भेदं न जानाति मोहित: प्रत्ययेन तु ।
तत: सूक्ष्मा परा संविन्मध्यशक्तिर्महेश्वरी ॥३२॥
इतर ज्ञानाने मोहित झालेल्या मानवाला या शक्तीचे भेद समजत नाहीत म्हणून ती परम सूक्ष्म व संविद्रूप किंवा ज्ञानरुप आहे. ही कुंडलिनी शक्तीच मध्यशक्ती महेश्वरी म्हणजे मोठी नियामक शक्तिरुपा आहे.

स्वस्वरुपदशायां सा बोधनीया गुरुश्रिता ।
प्रबोधनात्पिंडसिद्धिस्तस्या भवति योगिनाम्‍ ॥३३॥
स्वत:स्वरुपदशेत या कुंडलिनी शक्तीला श्रीगुरुकृपेने म्हणजेच शक्तिपातयोगदीक्षाद्वारा जागृत करता येते. या शक्तीच्या जागृतीमुळे योगिसाधकांना सिद्धीचा अर्थात्‍ स्वसंवेद्य आत्मस्वरुपाच्या प्राप्तीचा लाभ होतो.

ऊर्ध्वशक्तिनिपातोऽथ मुमुक्षूणां कृतेण्यते ।
सर्वत्तत्वोर्द्ध्ववृत्तित्वान्निर्नाम परमं पदम्‍ ॥३४॥
मोक्षेच्छू साधकांसाठी ऊर्ध्वशक्तिनिपात सांगितला आहे. सर्व तत्त्वांपेक्षा उच्चस्थानी असल्यामुळे या शक्तीला नाव नाही. ही कुंडलिनी शक्तीच सर्वश्रेष्ठ स्थान होय.

तत्स्वसंवेदसाक्षाद्‍भू: पिशुनोक्तोर्द्ध्वशक्तिका ।
निपात: स्वस्वरुपेऽथ नित्यं निरसनं मतम्‍ ॥३५॥
ही कुंडलिनी शक्ती स्वसंवेद्य स्वात्मस्वरुपज्ञानाची साक्षात्‍ आश्रयस्थान आहे. सामान्यांनी हिला ऊर्ध्वशक्ती असे म्हटले आहे. स्वस्वरुपात हिचे नित्य वास्तव्य असणे यालाच निरास किंवा निरुत्थान म्हणजे नि:शेष उत्थानदशा असे म्हणतात.

निरुत्थाने स्वस्वरुपाखंडैव प्रतिभाति सा ॥३६॥
जेव्हा या कुंडलिनी शक्तीचे नि:शेष उत्थान म्हणजे मूलाधारातून निघून सुषुम्नामार्गाने ही सहस्त्रारात येऊन शिवाशी एकरुप किंवा समरस होते तेव्हा स्वस्वरुपामध्ये या शक्तीचे अखंड प्रतिभान होते.

उक्तं च -
शिवस्याभ्यंतरे शक्ति: शक्तेरभ्यंतरे शिव: ।
अंतरं नैव पश्यामि चंद्रचंद्रिकयोरिव ॥३७॥
असे म्हटले आहे की, शिवात शक्तीचे व शक्तीत शिवाचे वास्तव्य आहे. चंद्र व चांदणे यात ज्याप्रमाणे अंतर किंवा भिन्नता असत नाही त्याप्रमाणे शिव-शक्तीत भेद असत नाही.

नानाशक्तिस्वरुपेण सर्वपिंडाश्रयत्वत: ।
पिंडाधार इतीष्टाख्या सिद्धांत इति धीमताम्‍ ॥३८॥
ही कुंडलिनी शक्ती अनेक प्रकारच्या शक्तींनी सर्व पिंडाला किंवा देहाला आधाररुप असल्याने हिला पिंडाधार हे नाव योग्य आहे असा योगिजनांचा सिद्धांत आहे.

सत्त्वे सत्त्वे सकलरचना संविदेका विभाति ।
तत्त्वे तत्त्वे परमरचना संविदेका विभाति ॥
ग्रासे ग्रासे बहलतरला लंपटा संविदेका ।
भासे भासे भजति भवता बृंहिता संविदेका ॥३९॥
प्रत्येक प्राणिमात्रात सर्व रचना करणारी अशी हीच शक्ती प्रकाशते सर्व तत्त्वांमध्ये उत्कृष्ट रचना करणारी अशी ही शक्तीच विराजते. प्रत्येक ग्रासात म्हणजे प्रलयात किंवा संहारणीमध्ये अतिशय चपल अशी ही ज्ञानशक्तीच शोभते. भासमान होत असलेल्या पिंडब्रह्मांडाच्या उभारणीत हीच श्रेष्ठ अशी चिच्छक्ती नेहमी भासमान होते.

॥ इति सिद्धसिद्धान्तसंग्रहे चतुर्थोपदेश: ॥
अशा प्रकारे सिद्धसिद्धांतसंग्रहातील चौथा उपदेश समाप्त झाला.

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP