सिद्धसिद्धांन्तसंग्रह - षष्ठोपदेश

काशीचे पण्डित बलभद्र यांनी १८व्या शतकाच्या शेवटी  सिद्ध-सिद्धांत पद्धति ग्रंथ संक्षिप्त करून सिद्ध सिद्धांत संग्रह नामक ग्रंथ लिहीला होता.


निरुप्य सर्वं विषयमधिकारी निरुप्यते ।
अवधूतो भवेत्सोऽत्र तल्लक्षणमिदं यथा ॥१॥
अशा रीतीने सर्व विषयांचे निरुपण केल्यानंतर अधिकारी म्हणजे योग्य साधकाचे लक्षण सांगतो. अवधूत हाच येथील अधिकारी होऊ शकतो किंवा असू शकतो. त्याचे लक्षण पुढीलप्रमाणे आहे.

प्रकृतिजन्यविकारविधूननं कलयितुं भजतीह समर्थताम्‍ ।
यदवधूततया तदुदीर्यते रचतसंसृतिपारगतिर्जन: ॥२॥
प्रकतीपासून उत्पन्न होणार्‍या विकारांना झटकून टाकण्याचे सामर्थ्य ज्याच्यापाशी आहे त्याला अवधूत म्हणतात किंवा त्या समर्थतेला अवधूतता म्हणतात. असा माणूस संसृतीच्या पलीकडे जाण्याची शक्ती ठेवतो.

लक्षणान्तरमप्याह कश्चित्‍ -
केशपाशतरंगाणां व्रजं (वज्रं) येन विकुंठितम्‍ ।
सर्वावस्थाविनिर्मुक्त: सोऽवधूतोऽभिधीयते ॥३॥
अवधूताचे दुसरेही लक्षण कोणी कोणी असे करतात की, केशपाशतरंगांचे व्रज म्हणजे समुदाय ज्याने कुंठित केले आहेत अर्थात्‍ स्त्रीकेशपाशाला जो डगमगत नाही किंवा स्त्रीकेशपाशरुपी वज्राला (शस्त्रविशेषाला) ज्याने बोथट करुन टाकले आहे किंवा केस जटासंभार ज्याने वाढविलेला आहे व जो सर्व अवस्थांमधून सहीसलामत सुटला आहे त्याला अवधूत म्हणतात.

सकलोच्चं स्थिरं पीनं संवेद्यं वासनोक्तिततम्‍ ।
कौपीनकं कटौ यस्य सोऽवधूतोऽभिधीयते ॥४॥
सर्वोत्कृष्ट, स्थिर व पुष्ट असे ज्याचे ज्ञान आहे व ज्याच्या कमरेला केवळ कौपीन किंवा लंगोटी आहे म्हणजे ज्याने वासनासंग टाकला आहे त्याला अवधूत म्हणावे.

कस्य भावमयै: सूत्रै: स्वीकारस्थैर्य्यतां गतै: ।
कंथा विरचिता येन सोऽवधूतोऽभिधीयते ॥५॥
(सिद्धयोगमार्ग) स्वीकारल्यामुळे स्थिरत्व पावलेल्या भावमय सूत्रांनी ज्याने आपली कथा म्हणजे गोधडे तयार केली आहे त्याला अवधूत ही संज्ञा मिळते.

मुक्तिद्वारे मतिर्यो वै प्राप्तकोषप्रकाशक: ।
मायाविकारानापन्न: स सात्त्विक उदाहृत: ॥६॥
(कर्मानुरुप) प्राप्त झालेल्या (बर्‍या वाईट) शरीराचा अवलंब करुन मुक्तिद्वारात अर्थात्‍ सुषुम्नेच्या द्वारात आपली बुद्धी म्हणजे प्राण गुंतविणारा आणि मायोत्पन्न विकारांच्या सपाटयात किंवा सापळ्यात न सापडणारा साधक सात्त्विक होय.

क्षपणं चित्तवृत्तीनां रोगद्वेषविलुंठनम्‍ ।
कुरुते व्योममग्नो यस्तस्मात्‍ क्षपणको भवेत्‍ ॥७॥
चित्तवृत्तींना घालविणे, रागद्वेषांना ढकलून देणे किंवा लोळविणे व चिदाकाशात अर्थात्‍ सहस्त्रारात मग्न असणे अशा प्रकारच्या स्थितीच्या साधकाला क्षपणक म्हणतात.

भ्रांतिकौरं जनं कृत्वा योऽरक्तविवरे सदा ।
प्रबुद्धो य: स्वयं बुद्ध: सद्य: सोऽत्राभिधीयते ॥८॥
जो लोकांना भ्रांतिचक्रात टाकतो, जो आपली स्थिती कळू देत नाही, जो स्वत: हृदयाकाशात म्हणजे आज्ञाचक्रात अनुरक्त राहतो व जो स्वत: बुद्ध म्हणजे जागृत असून इतरांना अप्रबुद्धता म्हणजे आपण झोपलेले किंवा अज्ञानी आहोत असे भासवितो किंवा जो इतरांनाही तत्काल जागृत करतो तो अवधूत समजावा.

प्रसरं भासते शक्ति: संकोचं भासते शिव: ।
तयो: संयोगकर्त्ता य: स भवेद्योगयोगराट्‍ ॥९॥
शक्ती ही विस्ताररुपाने भासते व शिव हा संकोचरुपाने भासतो. या दोघांचा संयोग घडवून आणणारा सिद्धयोगसाधक हा योग्यांतील योगिराज समजावा.

विश्वातीतं यदा विश्वमेकमेवावभासते ।
संयोगेन यदा यस्य सिद्धयोगी भवेत्तु स: ॥१०॥
ज्याला शिवशक्तीच्या संयोगाने अर्थात्‍ समरसीकरणामुळे विश्वातीत असे विश्व म्हणजे तत्त्व एकरुपानेच भासते तो सिद्धयोगी होय.

सर्वासां निजवृत्तीनां विस्मृतिं भजते तु य: ।
स भवेत्सिद्धसिद्धान्ते सिद्धयोगी महाबल: ॥११॥
आपल्या सर्व वृत्तींची म्हणजे मनोव्यापाराची ज्याला विस्मृती होते तो महाबली सिद्धयोगी होय, असे सिद्धसिद्धांतात सांगितले आहे.

उदासीनवदासीन: स्वथोऽन्तर्निजभासक: ।
महानन्दमयो धीर: स भवेत्सिद्धयोगिराट्‍ ॥१२॥
उदासीनाप्रमाणे स्वस्थ असणारा, अंतरात आत्मज्ञानाने प्रकाशणारा, अतिशय आनंदी वृत्तीचा व महाधैर्यवान्‍ असा महात्मा सिद्धयोग्यांचा राजा होय.

परिपूर्ण: प्रसन्नात्मा सर्वासर्वप्रदोऽपर: ।
निरुत्थो निर्भरानन्द: स भवेत्‍ सिद्धयोगिराट्‍ ॥१३॥
जो परिपूर्ण आहे म्हणजे ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, जो प्रसन्नात:करणाचा आहे, जो आत्मसमाधीतून कधी उत्थान पावत नाही, जो आत्मानंदातच सदैव निमग्न असतो व जो अंतर्बाह्य निखळ आनंदमय असतो तो सिद्धयोग्यांचा राजा समजावा.

गतेन शोकेन भयेन विप्साप्राप्तेन हर्ष न करोति योगी ।
आनंदपूर्णो निजबोधलीनो न बाधते कालपथो न नित्यम्‍ ॥१४॥
ज्याला काहीही हरविल्याचे अगर नष्ट झाल्याचे दु:ख होत नाही व अनिच्छेने अर्थात्‍ सहज लाभ झाल्याचा हर्ष होत नाही तो योगी होय. आनंदाने भरलेला व आत्मज्ञानात लीन असणारा साधक भूतभविष्यवर्तमानकालांनी बाधित होत नाही किंवा मृत्युमार्गाला तो कधीच भीत नाही.

एतेषामुपदेशानां सूचितानां पृथक्‍ पृथक्‍ ।
जायते तत्र विश्रांति: सा विश्रांतिश्च जायते ॥१५॥
या वेगवेगळ्या प्रकारांनी सूत्रित किंवा एकत्रित केलेल्या उपदेशांना जेथे स्थान मिळते तेथेच खरी विश्रांती राहते. या उपदेशांचा अनुष्ठाता अर्थात्‍ सिद्धयोगाचे साधन करणारा साधक विश्रांतीचे म्हणजेच समाधानाचे खरे सौख्य उपभोगतो.

यो गंगापदपद्‍मभक्तिविमल: शांडिल्यगोत्रोद्‍भव: ।
चंचच्छारदचंद्रिकासहचरीं कीर्तिन्नयविष्ट्पे ।
शौर्य्यौदार्यमुखैर्गुणैरविरलैरालम्ब्यमानोऽनिशं ।
स श्रीकृष्णविभु: स्मरारिनगरे ग्रंथं मुदाचीकरत्‍ ॥१६॥
ज्याची गंगेच्या चरणकमली निर्मल भक्ती आहे, ज्याने शांडिल्य गोत्रात जन्म घेतला आहे, ज्याने शरदऋतूतील पोर्णिमेच्या मैत्रिणीसारखी असलेली स्वकीर्ती स्वर्गापर्यंत पोहोचविली आहे व जो शौर्य, औदार्यादि गुणसमुदायांचा आश्रय आहे, अशा श्रीकृष्णनामक कवीने काशी नगरीत हा ग्रंथ अत्यंत आनंदाने रचिला आहे.

कृष्णराजाज्ञया काश्यां सिद्धसिद्धान्तसंग्रह: ।
कृतो यो बलभद्रेण श्रीकृष्णस्तेन तुष्यतु ॥१७॥
श्रीकृष्णरायाच्या आज्ञेवरुन काशीमध्ये श्रीबलभद्र पंडिताने सिद्धसिद्धांतसंग्रह हा ग्रंथ केला आहे. या कृतीने श्रीकृष्ण संतुष्ट व सुप्रसन्न होवो.
॥ इति सिद्धसिद्धांतसंग्रहेऽवधूतादिलक्षण: षष्ठोपदेश: ॥
अशा प्रकारे अवधूत लक्षणांचे निरुपण करणारा सिद्धसिद्धान्तसंग्रहाचा सहावा उपदेश समाप्त झाला.

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP