कार्तिक शुद्ध १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


"तर मात्र आश्चर्य आहे !

कार्तिक शु. १० या दिवशीं सीतेच्या शोधासाठीं रामाला मदत करण्यास सुग्रीवाचें सर्व सैन्य सिद्ध झालें. वाली-वध झाल्यानंतर किष्किंधाचें राज्य सुग्रीवास परत मिळालें. रामरायांना मदत करण्याचें अभिवचन सुग्रीवानें दिलें होतें. परंतु बरेच दिवस झाले तरी सुग्रीवानें कांहीच खबर घेतली नाहीं तेव्हां राम चिंताग्रस्त झाले. ते लक्ष्मणास म्हणाले, "सुग्रीवास राज्य मिळालें, भार्याहि मिळाली. तो माझी आठवण कशाला काढील ? तूं सुग्रीवाची भेट घे." याप्रमाणें लक्ष्मण किष्किंधा नगरींत आला आणि सुग्रीवापुढें जाऊन म्हणाला, "सत्त्ववान्‍, जितेंद्रिय, दयाशील, कृतज्ञ व सत्यवादी असा पुरुष जगतांत लोकादरास पात्र होतो. परंतु कृतघ्नाला प्राय:श्चित्त नाहीं." सुग्रीवास आपली चूक समजून आली. हात जोडून तो म्हणाला, " लक्ष्मणा, गेलेली स्त्री आणि हे कपिराज्य रामाच्याच कृपेनें मला मिळालें आहे ..... राम आपल्या तेजानें सीतेला परत आणून रावणाचा नाश करील. मी केवळ साहाय्य केल्याचा अधिकारी आहें. युद्धाची समग्र तयारी आतांच करतों." याप्रमाणें बोलून सुग्रीवानें सैन्य जमविण्यास हनुमानास आज्ञा दिली. त्याप्रमाणें लागलीच चारहि दिशांना दूत पाठवून तीन कोटी वानरसेना सज्ज करण्यांत आली. आणि सुग्रीव या प्रचंड सेनेसह रामापुढें येऊन उभा राहिला. आणि बोलला, "रामा, तुझ्या प्रसादानें मला हीं सर्व संपत्ति व हें राज्य मिळालें आहे. उपकार फेडण्यास जो तयार होत नाहीं तो अधम पुरुष होय. विंध्य, हिम, मन्दर, मेरु, इत्यादि दूरदूरच्या ठिकाणांहून वानरसेना सज्ज आहे. हे सर्व तुमच्या कार्यासाठीं येतील. आणि त्या राक्षसाधमाचा विध्वंस करतील." हें ऐकून रामाला फारच संतोष झाला; रामानें म्हटलें, "इंद्र पर्जन्याचा वर्षाव करतो, किंवा सूर्य तमाचा नाश करतो यांत आश्वर्य आहे !" यानंतर सीतेचा शोध करुन रावणासारख्या दुष्ट राजाचा पराभव करण्यासाठीं सर्वांचे प्रयत्न सुरु झाले.

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP