कार्तिक शुद्ध १

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


गोवर्धनगिरिधारी श्रीकृष्ण !

कार्तिक शु. १ या दिवशी श्रीकृष्णानें गोवर्धन पर्वत उचलून धरुन इंद्राच्या कोपापासून व्रजवासियांचे रक्षन केलें. एकदां शरद्‍ ऋतु सुरु झाला असतांना गोकुळांतील सर्व लोकांनीं इंद्राचा उत्सव करण्यास सुरुवात केली. इंद्र हा मेघांचा राजा असून त्याच्याच कृपेमुळें सर्व पृथ्वी, सुजला सुफला असें रुप धारण करते, ही व्रजवासियांची कल्पना होती. पण श्रीकृष्णानें या वेळी सांगितलें, "मेघवृष्टि होऊन पृथ्वी धनधान्यांनीं समृद्ध होते यासाठी इंद्राचा उत्सव करणें योग्य नाहीं. येथून दिसणारी हीं जंगलें आणि हा गोवर्धन पर्वत यांपासूनच आपली उपजीविका होते. तेव्हां या पर्वताचें पूजन करणें इष्ट असल्यानें तुम्ही गिरियज्ञ करण्यास प्रारंभ करा." कृष्णाचें हें म्हणणें सर्वांना पटल्यावर सर्व गोपांनीं गोवर्धन पर्वताचें पूजन केलें, मोठ्या उल्हासानें त्या पर्वताचाच उत्सव केला. अर्थात्‍ इंद्रास फारच राग आला. त्यानें गोकुळावर मुसळधार वृष्टि करण्यास प्रारंभ केला. हत्तीच्या सोंडेप्रमाणें पावसाची वृष्टि होऊं लागली. सर्व माणसें, पशु, पक्षी गांगरुन गेले. दोन दिवस गेले तरी पावसाचा मारा कमी होईना, तेव्हां व्रजांतील सर्व गोपाळ कृष्णाकडे आले : ‘कृष्णा तूंच आमचें आतां रक्षण कर.’ कृष्णानें सर्व म्हणणें ऐकून घेतलें आणि गोवर्धन पर्वतच वर उचलला तेव्हां त्याचे खालीं सर्व गोकुळ सुरक्षितपणें वांचलें. कृष्णानें आपल्या करांगुलीवर पर्वत उचलिला यांतील अतिशयोक्ति समजावून घेण्यासारखी आहे. गोवर्धन पर्वताचे सामर्थ्य गोपाळांना ठाऊकच नव्हतें. परंतु श्रीकृष्णानें पर्वताच्या आश्रयानें सर्व गोकुळाची व्यवस्था लाविली. गोवर्धन पर्वतावरील गुहांतून आणि विश्रामस्थानांतून व्रजवासीय जनता आनंदाने कालक्रमणा करुं लागली. थोदा सुद्धा त्रास त्यांना झाला नाहीं. आपला अन्नदाता आणि रक्षणकर्ता गोवर्धन पर्वतच आहे याची खात्री सर्वांना पटली आणि त्यांची कृष्णावरील भक्तिहि वाढली. शेवटीं इंद्र थकला आणि त्यानें वृष्टि बंद केली. पुन्हा सर्व लोक गोकुळांत आले. त्या सर्वांनी कृष्णाला म्हटलें, "कृष्णा, तूं उपेंद्र आहेस."

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP