कार्तिक वद्य १३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


" ज्ञानदेव बैसले समाधी ! "

शके १२१८ च्या कार्तिक व. १३ रोजीं महाराष्ट्रांतील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ, कवि आणि संतमुकुटमणि श्रीज्ञानेश्वर महाराज यांनीं मध्यान्हकाळीं समाधि घेतली. शके १२१८ च्या कार्तिक शु. १० ला ज्ञानदेवांनी पंढरपुरास पांडुरंगाला समाधि घेण्याचा आपला मनोदय कळवून परवानगी घेतली. आळंदीक्षेत्र समाधिस्थान म्हणून निश्चित झालें. समाधीचा दिवस उजाडला. ज्ञानदेवांनी गुरुचरणांचे ध्यान करुन लहानग्या सोपानास कुरवाळलें, ज्ञानदेव समाधिस्थानीं जाण्यास निघाले, त्या वेळीं - " देवऋषिगण सकळ । जयजयकार ध्वनि मंजुळ । स्तुतिस्तोत्रें सकळ । नक्षत्रादि गाती" अशी परिस्थिती झाली. आणि नामदेव ? - "नामा असे शोकाकुलित । चरणीं रत विठ्ठलाच्या ।" निवृत्तीनाथांची नित्य समाधिहि भंग पावली, त्यांनाहि अत्यंत दु:ख होऊन त्या योग्याच्या तोंडून शब्द निघाले :
"मायबापे आम्हां त्यागियेलें जेव्हां । ऐसें संकट तेव्हां झालें नाही" आईला मुकणारी पाडसें जशीं सैरावैरा धांवतात तशीं सोपान देव व मुक्ताबाई ज्ञानदेवांवांचून अनाथ होऊन स्फुंदून स्फुंदून रडूं लागली. ‘अलं ददादि’ म्हणजे पुरे म्हणण्यापर्यंत सर्व मनोरथ पूर्ण करणार्‍या अळंदी येथें सिद्धेश्वर देवालयाच्या शेजारीं असणार्‍या अजान वृक्षाखालीं दोन खणांची गुहा, -  समाधिस्थान - तयार केलें होतें. नामदेवांनी ते स्वच्छ केलें. तुळशी, बेल अंथरुन ज्ञानदेवांचे आसन तयार करण्यांत आलें. श्रीविठ्ठलांनी ज्ञानेश्वरांच्य कपाळी केशरी गंध लावून गळ्यांत हार घातला. समाधिस्थानांत शिरण्यावेळीं श्रीविठ्ठलांनी त्यांना हात दिला आणि ‘फार केले कष्ट जगासाठीं’ म्हणून त्यांना प्रेमानें आंत नेलें. ज्ञानदेव आसनावर स्थिर झाले आणि आपलीं करकमलें जोडून त्यांनी नेत्र मिटले. संतांनीं ‘घातियेली शिळा समाधीसीं.’ नंतर पुष्पवृष्टि करुन सर्व संतांनी त्या जागी कीर्तनमहोत्सव साजरा केला. ज्ञानदेव हे मराठी भाषेंतील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ व कवि आहेत. त्यांची ज्ञानेश्वरी’ वारकरी पंथाची ‘आई’ आहे. त्यांच्या अमृतानुभवाची गोडी चाखून आजहि लोक तृप्त होत आहेत.

- २६ आँक्टोबर १२९६

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP