कार्तिक शुद्ध २

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


यमद्वितीयेचे रहस्य !

कार्तिक शुद्ध २ हा दिवस यमद्वितीया या नांवानें भारतवर्षांत आहे. पुराणांत अशी कथा आहे कीं, या दिवशीं मृत्युदेव यम यानें आपली बहीण यमी किंवा यमुना हिच्या घरीं जाऊन तिला वस्त्रालंकार देऊन तेथें मोठ्या आनंदानें भोजन केलें शास्त्रकारांनी या कौटुंबिक विधीस धर्माची जोड देऊन दिवस भाऊबीज म्हणून पाळणें हें बंधुभगिनींचे श्रेष्ठ कर्तव्य आहे असें ठरवून टाकलें. वेदांमध्ये यम व यमी या प्रसिद्ध जोडीचा उल्लेख काव्यमय भाषेंत रुपकाच्या आश्रयानें केला आहे. "यम मृत्यु पावला त्या वेळी यमीच्या डोळ्यांतील अश्रु कांही केल्यानें थांबेनात. कोणाहि देवाकडून तिचें सांत्वन होईना. शेवटीं देवांनी रात्र निर्माण केली. रात्र झाल्यावर यमी भावाच्या मरणाचें दु:ख थोडेसें विसरली. या रात्रीनंतर आज आणि असा क्रम सुरु झाला. त्यापूर्वी नेहमीं आजच असे !" भारतांत सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहानें साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावास घरीं बोलावून त्याला मंगलस्नान वगैरे घालते. सुग्रास भोजन करुन जेवावयास वाढते; आणि आपला संतोष प्रगट करते. भाऊहि संध्याकाळी तिला ओवाळणी घालीत असतो. भाऊ गरीब असो, श्रीमंत असो, त्यास घरी बोलावून त्याला गोड करुन खायला घालावें, त्याच्या संगतींत आनंद मानावा, हा बहिणीचा हेतु असतो; आणि बहीण गरीब असो, श्रीमंत असो, तिची विचारपूस करावी, तिच्या घरी जावें, तिची सुखदु:खे समजावून घ्यावींत, असें भावास वाटत असतें. असा हा भाऊबीजेचा दिवस आहे. बंधुभगिनीच्या उदात्त प्रेमाची साक्ष याच दिवशीं सर्वत्र पटत असतें. एर्‍हवीं व्यवहारांत थोडेफार मतभेद झाल्यामुळें रागलोभाचे प्रसंग येत असतील, पण या दिवशीं मात्र त्या सर्व किल्मिषांचा लोप होऊन एका आनंदाचेच साम्राज्य बंधुभगिनींच्या प्रेमांत असतें. ज्यांना सख्खी बहिण नसते, चुलत, आते, मामेबहिणीकडून ओवाळून घेऊन भाऊबीज साजरी करितात.

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP