श्रावण वद्य १

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) शहाजी राजे यांची कैद !

शके १५७० च्या श्रावण व. १ या दिवशीं शहाजी राजे यांना विजापूरच्या पातशहानें मुस्तफाखान याच्याकरवीं कैद केलें. पुण्याच्या जहागिरीवर शिवाजी आणि दादाजी कोंडदेव यांना नेमून शहाजी राजे वडील पुत्र संभाजी याच्यासह बंगलोरास गेले. शिवाजी स्वराज्य-संस्थापनेची तयारी तोरणा, चाकण, पुरंदर, रोहिडा, लोहगड, राजमाची, इत्यादि किल्ले घेऊन महाराष्ट्रांत करीत असतां शहाजींनींही कर्नाटकांत मोठा पराक्रम केला होता. शिवाजीच्या ‘पुंडाव्याला’ शहाजीचें आंतून सहाय्य असावें अशी भीति आदिलशाहीला वाटूं लागली. पातशाही अधिकार्‍याचा हुकूम शहाजीस सुटला : "शिवाजी राजे यानें शहासी बेमानगी करुन मावळे लोकांचा जमाव केला ... तूं त्यांत सामील होऊन वसूल देतोस ...... मगरुरीचे जबाब देतोस हें योग्य नाहीं. हुकूम पोचतांच अमीनाशीं रुजूं होणें. नाहीं तर शहा विजापुरीं नेऊन गर्दन मारतील." कर्नाटकातील लहानमोठे पाळेगार शहाजीस मिळाल्यामुळें त्याच्या सामर्थ्याचें भय आदिलशहास जास्तच वाटूं लागलें. आणि त्यानें शहाजीस दग्यानें कैद करविलें. शहाजीच्या वडील मुलानें (संभाजीनें) मुस्तफाखानास जर्जर करुन सोडलें. आदिलशहाकडून शिवाजीवर आलेल्या मुसेखान सरदाराचा पुरंदर येथें पराभव करुन शिवाजीनें त्याला ठार मारलें आणि तह होऊन शहाजीची सुटका झाली. असें सांगतात कीं, पातशहाच्या सल्लागारांनीं त्याला सुचविलें, कीं, मुलाच्या अपराधाबद्दल बापास शिक्षा देणें कुराणाविरुद्ध आहे. ‘बाप करी बाप पावे । बेटा करी बेटा पावे.’ त्यावरुन शहाजीला शिक्षा न करितां कांही अटींवर सोडून देण्यांत आलें. शिवरायांनीं स्वराज्य स्थापन केलें तरी त्याची पूर्वतयारी शहाजीच्या कारकीर्दीतच हळूहळू होत होती. शहाजहान बादशहाशीं अविरतपणें टक्कर देणारा शहाजी अत्यंत शूर खराच. त्यांचा पराक्रम आदिलशाहीचें रक्षण करण्यासाठीं खर्ची पडलेला दिसला तरी त्या काळांत त्याखेरीज दुसरा इलाज नव्हता.

- २५ जुलै १६४८
---------------------

श्रावण व. १

(२) महात्मा गांधींचे विलायतेस प्रयाण !

शके १८५३ च्या श्रावण व. १ रोजीं महात्मा गांधी दुसर्‍या गोलमेज परिषदेसाठीं विलायतेला जाण्यासाठीं निघाले. सन १९३० ची त्यांची प्रसिद्ध दांडी-यात्रा संपून १९३१ मध्यें लाँर्ड आयर्विन यांच्याशीं तात्पुरता तह होऊन गोलमेज परिषदेच्या द्वितीय अधिवेशनास गांधीनीं जाण्याचें ठरलें. पहिल्या परिषदेंत राष्ट्रसभेनें भाग न घेतल्यामुळें ‘तें रामावांचून रामायण’ झालें होतें. आणि आतां या वेळीं राष्ट्रसभेचें महत्त्व सहजच वाढूं लागलें. परंतु मध्येंच लाँर्ड आयर्विनच्याऐवजीं लाँर्ड विलिंग्डन हे व्हाइसराँय म्हणून आले. आणि आयर्विन समेटाचीं आश्वासनें मोडण्य़ाची संधि सरकारला आयतीच सांपडली. व्हाइसराँय - गांधी यांचें बिनसत चाललें होतें, पण शेवटीं सरकारनें नमतें घेतलें. अगदीं शेवटच्या क्षणाला व्हाइसराँयनीं तारेने गांधीना सिमल्यास बोलाविलें, बरोबर वल्लभभाई, जवाहरलाल आदि मंडळी होतीच. खूप वाटाघाटी होऊन सरकारनें जादा गाडी सोडून २७ आँगस्टला सिमल्याहून गांधींना मुंबईला पोंचतें केलें. २९ आँगस्टला गांधी निघाले. निरोप देण्याच्या समारंभांत ते बोलले - "राष्ट्रसभेनें नेमून दिलेलें कार्य मी प्रामाणिकपणें बजावीन." म. गांधींच्याबरोबर चिरंजीव देवीदास, महादेवभाई देसाई, प्यारेलाल, मीराबेन इत्यादि लोक होते. गांधीनीं अगदीं थोडें सामान बरोबर घेतलें होतें. पण इंग्लंडमधील थंडीमुळें महात्माजींना त्रास होऊं नये म्हणून त्यांच्या एका धनिक भक्तानें सातशें रुपयांची शाल त्यांना नकळत ट्रंकेंत घातली होती ! पण अपरिग्रही महात्माजींनीं, अर्धनग्न अशा त्या दरिद्री नारायणाच्या सेवकानें, "महादेव, ती शाल ताबडतोब मुंबईला परत पाटीव" असा हुकूम सोडला. परंतु तसें करण्यांत अडचण असल्यानें ती शाल सात हजार रुपयांस बोटीवर विकली गेली. वाटेंत एडन पोर्टसय्यद, मार्सेलिस, पॅरिस वगैरे ठिकाणीं स्वराज्याची शिष्टाई करण्यास निघालेल्या महात्म्याचा सत्कार करण्यांत आला. इंग्लंडमध्येंहि त्यांचा मोठा आदर झाला.

- २९ आँगस्ट १९३१

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP