श्रावण शुद्ध ११

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


विसोबा खेचरांची समाधि !

शके १२३१ च्या ‘शुध्द श्रावण मास एकादशी’ या दिवशीं विख्यात संत विसोबा खेचर हे समाधिस्थ झाले.
हे सत्‍ पुरुष ज्ञानदेव - नामदेवांच्या समकालीन असून नामदेवंच्या गुरुत्वाचा मान यांच्याकडे आहे. महाराष्ट्रांत कवि म्हणून जरी ते प्रसिध्द नव्हते तरी भागवत धर्माचे प्रवर्तक म्हणून त्यांची योग्यता फार मोठी होती. हे मूळचे रहिवासी आळंदीचे असून बारा ज्योतिर्लिंगापैकीं औंढया नागनाथ या पुरातन शिवक्षेत्रीं हे राहत असत. हे यजुर्वेदी ब्राह्मण असून सरपहीचा धंदा करीत. विसोबानीं आपल्या पूर्ववयांत ज्ञानदेवादि भावंडांचा बराच छळ केला. त्या वेळीं ज्ञानेश्वरानें आपल्या योगबलानें आपला जठराग्रि प्रदीप्त करुन त्यावर मुक्ताबाइकरवीं मांडे भाजवून घेतले. हा चमत्कार पाहिल्यावर विसोबा ज्ञानदेवास शरण गेले, अशी कथा भक्तिविजयांत आहे. सोपानदेवांनीं योगाची खेचरी मुद्रा देऊन यांच्या मस्तकावर हस्त ठेविला तर योगांचीं आणखी रहस्यें सांगून अव्दैतबोध व भक्तिमार्ग यांचा उपदेश ज्ञानेश्वरांनीं केला. नामदेव जेव्हां यांचा उपदेश घेण्यास बार्शीस आले तेव्हां त्यांना लोकांनीं महादेवाच्या देवळांत जा असें सांगितलें, म्हणून नामदेव महादेवाच्या देवळीं जाऊन पाहतात तों तेलानें लडबडलेल्या नव्या वहाणा पायांत घातलेला असा एक वृध्द पुरुष शंकरांच्या पिंडीवर पाय ठेवून निजला आहे व त्याच्या अंगावरील जखमांतून पू वाहत आहे, सर्वागावर माशा घोंगावत आहेत; ही आपल्या भावी गुरुची स्थिति पाहून नामदेवास आश्चर्य वाटलें. ते त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले, “महाराज, जरा उठा व पिंडीवर पाय पडले आहेत तेवढें बाजूला घ्या.” तेव्हां हे म्हणाले, ‘बाबा रे, मी वृध्द व पीडित आहें. तेव्हां तूंच माझे पाय तेवढे बाजूला कर.’ नामदेवांनीं हळूच पाय उचलून बाजूला ठेवले व पाहतात तों तेथें दुसरें शिवलिंग. हा चमत्कार पाहून नामदेव विस्मित झाले व देवानें सांगितलेला हाच तो योग्य पुरुष असें समजून त्यांच्या चरणावर त्यांनीं मस्तक ठेवलें. “नामा धरी चरण । अगाध तुमचें ज्ञान । आपुलें नाम कोण । सांगा स्वामी” “येरु म्हणे खेचर । विसा पै जाण । लौकिकीं मिरविणें । अरे नाम्या ॥” अशीं त्यांचीं प्रश्नोत्तरें झालीं.
- १९ जुलै १३०९
===
श्रावण शु. ११

(२) अरविंदबाबूंचा जन्मदिवस !

शके १७९४ च्या श्रावण शु. ११ रोजीं भारतांतील विख्यात क्रांतिकारक, राजकारणी, इंग्रजी भाषेंतील कसलेले लेखक, उत्कृष्ट कवि आणि एका अभिनव तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक बाबू अरविंद घोष यांचा जन्म झाला. अँलोपथीचे डाँक्टर कृष्णधन घोष हे यांचे वडील. अरविंद बाबूंचे प्राथमिक शिक्षण दार्जिलिंग येथें झाल्यावर हे वयाच्या सातव्या वर्षी इंग्लंडमध्यें शिक्षणासाठीं गेले. तेथे भाषाविषयक अभ्यासक्रमांत यांनी उच्च प्रकारचे यश संपादून नांवलौकिक मिळविला. आय्‍.सी.एस्‍. च्या परीक्षेतहि उच्च यश मिळून सुद्धां कांही इतर तांत्रिक गोष्टींत कमतरता निर्माण झाली म्हणून यांना ती पदवी मिळाली नाहीं. भारतांत आल्यावर बडोदें सरकारकडे प्रथम यांनी नोकरी स्वीकारली. तेथें क्रमाक्रमानें त्यांची प्रगती होत गेली. हिंदी भाषा, संस्कृति आणि धर्म यांकडे त्यांचें लक्ष होतेंअ. हळूहळू त्यांच्यांत बदल होऊं लागला. मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून द्यावें, स्वदेशबांधवांना सुस्थिति प्राप्त करुन द्यावी, आणि शेवटीं स्वत:ला ईश्वरी साक्षात्कार घडावा असे विचार यांच्या मनांत घोळूं लागले. बडोद्यास असतांनाच यांनी श्री. विष्णु भास्कर लेले नांवाच्या महाराष्ट्रीय गृहस्थाच्या साह्यानें योगाच्या अभ्यासास सुरवात केली. पुढें वंगभंगाच्या बेळीं ‘वंदे मातरम्‍’ नांवाचें साप्ताहिक सुरु केलें. त्यांतील लेख स्वातंत्र्य-प्रेमाच्या जळजळीत भावनांनीं भरलेले असत. त्यांच्या राजकीय स्वातंत्र्याच्या घोषणेचीं दोन अंगें होतीं. एक पूर्ण स्वातंत्र्य आणि दुसरें आध्यात्मिक राष्ट्रीयत्व. पैकीं पहिले अंग बर्‍याच अंशी पूर्ण झालें आहे. आता दुसर्‍या अंगाची पूर्णता होण्यासाठीं भारतीयांना यांचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरेल. राजकारणांतून संन्यास घेऊन पांडेचारीस योगाभ्यासास जातांना हे म्हणाले, "आमची चळवळ केवळ राजकीय नाहीं, तर ती धार्मिकहि आहे. सनातन धर्माचें पुनरुत्थान याच व्यापक अर्थानें ती चळवळ केली पाहिजे." अरविंदबाबू इंग्रजी भाषेंतील उत्कृष्ट कवि आहेत. अत्यंत कल्पकता हा त्याच्या काव्याचा विशेष आहे. यांच्या गीतेवरील ग्रंथांत यांए अभिनव तत्त्वज्ञान विशद झालें आहे.

- १५ आँगस्ट १८७२

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP