श्रावण शुद्ध ३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


राघोबादादांचा जन्म !

शके १६५६ च्या श्रावण शु. ३ रोजीं थोरल्या बाजीरावांचे तिसरे चिरंजीव रघुनाथराव ऊर्फ दादासाहेब पेशवे यांचा जन्म झाला. मराठयांचा भगवा झेंडा यांनींच अटकेपार फडकविला.
आपल्या पूर्वायुष्यांत यांनीं उत्तरेकडील राजकारण बरेंच गाजविलें. उत्तरेवरील दुसर्‍या स्वारींतील यांचा पराक्रम अवर्णनीय आहे. अब्दालीच्या पाठोपाठ यांनीं दिल्ली काबीज करुन मधुरा, वृंदावन, गया, कुरुक्षेत्र वगैरे गांवें सोडविलीं. पंजाबांत जाऊन अब्दालीचे लोक तेथून पिटाळून लावले व मराठयांचे झेंडे अटकेवर रोविले. यानंतर यांनीं उद्‍गीर येथील लढाईत शौर्य गाजविलें. पुढें माधवराव व रघुनाथराव यांचें सारखें बिनसत चाललें. माधवरावांच्या अटकेंतच यांना दिवस काढावे लागले. नारायणरावानें राज्यकारभार सुरु  केला त्या वेळीं यांना लोभ सुटला; आणि नारायणरावास धरावें असा यांना हुकूम सोडला; पण ‘ध’ चा ‘मा’ होऊन नारायणरावांचा वध झाला.
यांच्या घरभेदीपणामुळें मराठी राज्याचें फारच नुकसान झालें. आपल्याविरुध्द कांहीं कारस्थान होत आहे हें पाहून यांनीं कर्नाटकांतील हैदरशीं कल्याणदुर्गचा तह केला आणि माधवरावांनीं मिळवलेला पन्नास लक्षांचा मुलूख गमावला. त्याचप्रमाणें कृष्णा  तुंगभद्रा या नद्यांतील पाऊण कोट रुपये उत्पन्नाचा मुलूख फक्त सहा लक्ष खंडणीच्या करारावर शत्रूस देऊन टाकला. स्वकीयांशीं पटत नाहींसें पाहून हे अहमदाबादेस इंग्रजांचे आश्रयास गेले; आणि तेथून सुरतेस आल्यावर इंग्रजांशीं तह केला. इंग्रजी राज्याचे पांढरे पाय मराठी दौलतींत रुजण्यास सुरुवात झाली. पुढें सालबाईच्या तहामुळें इंग्रजांचा आश्रय यांना मिळाला नाहीं. तेव्हां निरुपाय होऊन गोदावरीतीरावर राहण्याचें यांनीं ठरविलें; आणि दरमहा पंचवीस हजारांची नेमणूक घेऊन हे कोपरगांवीं राहूं लागले. तेथेंच त्यांचा अंत झाला. नारायणराव पेशवे यांचा वध यांनींच करविल्यामुळें शेवटीं स्पष्ट कबुली देऊन यांनीं प्रायश्चित्तहि घेतलें. “हा चंचल असला तरी कोणत्याहि संकटांतून मार्ग काढण्यास, किंवा पेशवाई मिळवण्याकरतां प्रत्यत्न करण्यास हा मागें कधींच सरला नाहीं.”
- १ आँगस्ट १७३४

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP