श्रावण शुद्ध २

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


विश्वासराव पेशवे यांचा जन्म !

शके १६६४ च्या श्रावण शु. २ रोजीं नानासाहेब पेशवे व गोपिकाबाई यांचे पराक्रमी पुत्र विश्वासराव यांचा जन्म झाला.
लहान वयांतच विश्वासरावांनीं मोठमोठाले पराक्रम केले होते. औरंगाबाद व शिंदखेड येथील लढाईत मराठयांनीं निजामचा पूर्ण पराभव केल्यानंतर उद्‍गीर येथील लढाईत विश्वासराव भाऊसाहेबांबरोबर होतेच. त्या वेळीं हत्तीवरुन उत्तम प्रकारें तिरंदाजी करुन विश्वासरावांनीं मोठेंच शौर्य दाखविलें. दहा हजारांची स्वतंत्र फौज विश्वासरावांच्या हाताखालीं दिलेली होती. अब्दालीचें पारिपत्य करण्यास भाऊसाहेब उत्तर हिंदुस्थानांत निघाले. त्या वेळीं त्यांनीं विश्वासरावास बरोबर घेतलें. सन १७६० मध्यें दिल्ली शहर हस्तगत करुन तेथें दरबार भरविला आणि सर्वाकडून विश्वासरावास नजरा करविल्या. नंतर विश्वासरावास नजरा करविल्या. नंतर विश्वासरावांनीं किल्ल्याची पहाणी लष्करी दृष्टीनें केली. या वर्षी आलेला दसर्‍याचा समारंभहि त्यांच्याच नेतृत्वाखालीं पार पडला. पानिपतच्या घनघोर संग्रांमास सुरुवात झाली त्या वेळी हे व भाऊसाहेब हत्तीवर बसून लढत होते. सकाळीं आटः वाजतां लढाईस तोंड लागलें. दुपारीं एक भयंकर घटना घडली. ‘मराठयांच्या दुर्दैवानें ऐन वेळेस जुंबरेदाराची गोळी लागोन विश्वासराव घोडयाखालीं आले. नानासाहेबांचें निधान हरपलें... हें वर्तमान भाऊसाहेबांनीं ऐकून अवसानें सोडिलें. बहुत विलाप केला.” जखमा झाल्यामुळें मृत्यूची वाटचाल करणार्‍या विश्वासरावांनीं भाऊस सांगितलें, “तुम्ही चला, लढाई बिघडेल” भाऊसाहेब ‘गिलचा खाशानिशीं मारीन’ म्हणत गर्दीत घुसले. विश्वासराव गोळी लागून ठार झाले. जवळच एका हत्तीवर पार्वतीबाई हाती. शेजारी हत्तीवर प्रेत पाहून तोंडावरील शेला काढण्यास शागिर्दास तिनें सांगितलें, तों विश्वासरावांचें सुंदर वदन दृष्टीस पडलें. उरांत दु:खाचा भडका होऊन ती रडूं लागली. नाना फडणिसांची आई बोलली, “बाई अजून रडें पुढेंच आहे.” पेशव्यांच्या घराण्यांत विश्वासराव फारच सुंदर होते. ते केवळ मदनाचे पुतळे दिसत.
- २२ जुलै १७४२
----------

श्रावण शु. २
राणोजी शिंदे यांचें निधन !

शके १६६७ च्या श्रावण शु. २ या दिवशीं मराठेशाहींतील प्रसिध्द वीर राणोजी शिंदे यांचें निधन झालें.
पहिल्या बाजीरावानें हिंदुपदपातशाहीच्या लौकिकासाठीं जो प्रचंड उद्योग केला, त्यांतून अनेक शूर आणि कर्तबगार माणसें उदयास आलीं. त्यांत मल्हारराव होळकर, उदाजी पवार, राणोजी शिंदे, गोविंदपंत बुंदेले, हे प्रमुख होते. हीं सर्व घराणीं आपल्याला रजपुतांपैकींच समजत असत. शिदे हें घराणें सुध्दां अस्सल क्षत्रियांचें होतें. प्राचीन काळच्या सेंद्रक नांवाच्या क्षत्रिय घराण्यावरुन शिंदे नांव आलें असें सांगतात. किंवा शिसोदे याचा अपभ्रंश शिंदे असा होऊं शकेल. शिंद्यांचें मूळचें गांव शिदखेड असलें तरी राणॊजी शिंदे हे मात्र सातारा जिल्ह्यांतील कोरेगांव तालुक्यांत कण्हेरखेड नांवाचें गांव आहे, तेथील पाटील घराण्यांतील होते. शाहूमहाराज कैदेंत होते तेव्हां याच घराण्यांतील मुलगी अंबिकाबाई ही त्यांना दिली होती. तिचे वडील औरंगजेबाच्या नोकरींत होते. त्यांच्याच घराण्यांत राणोजी शिदे प्रसिध्दीस आले. घरीं अत्यंत गरिबी असल्यामुळें राणोजींनीं प्रथम बाळाजी विश्वनाथाच्या पगिंत बारँगिराची नोकरी पत्करिली. पुढें राणोजींची स्वामिनिष्ठा पाहून पेशव्यांनीं राणोजींस इतर सरदारांबरोबर माळवा व उत्तर हिदुस्थान येथील कामगिरीवर पाठविलें. राणोजी शिंद्यांनीं तिकडे मोठाच पराक्रम करुन नांव कमावलें. “राणोजी स्पष्टवक्ता व धन्याची भीडभाड ठेवणारा नव्हता. त्याचीं पत्रें बाणेदार आहेत. राणोजीचा बाप जनकोची मुलाचा पराक्रम पाहण्यास हयात होता. पुण्याजवळच्या अनेक भानगडींत व गांवकींच्या कारभारांत राणोजीचें प्राधान्य होतें ही गोष्ट पुरंदरे रोजनिशींतील अनेक उल्लेखांवरुन व्यक्त होते. शिंद्यांच्या घराण्याचा मराठेशाहीच्या पुढील इतिहासाशीं निकट संबंध आहे. इतकेंच नव्हे तर पाऊण शतकाच्या मराठेशाहीचा इतिहास बराचसा या एका घराण्यानें बनविला आहे असें म्हणण्यास चिंता नाहीं” राणोजी शिदे श्रावण शु. २ या दिवशीं सुजावलपूर येथें मृत्यू पावले; पुढें त्या स्थळास राणेगंज असें नांव प्राप्त झालें.
- १९ जुलै १७४५
---------

श्रावण शु. २
वासुदेव बळवंतांना अटक !

शके १८०१ च्या श्रावण शु. २ रोजीं भारतांतील पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रज अधिकारी मेजर डँनिअल यांनीं देवरनावडगी येथे अटक केली.
या वेळीं वासुदेव बळवंत अज्ञातवासांत गाणगापूर येथें दिवस कंठीत होते. सरकार मोठया जारीनें तपास करुं लागलें. पुण्यास एका देवळांत पुराणास बायका जमल्या असतांना वासुदेव बळवंतांच्या वास्तव्याचा स्फोट झाला. मेजर डँनिअलची या कामगिरीवर नेमणूक होऊन त्या दृष्टीनें प्रयत्नहि सुरु झाले. हैदराबाद सरकारची मदत मिळाल्यानंतर शोध करण्यासाठीं जारीनें प्रयत्न होऊं लागले. अर्थात्‍ वासुदेव बळवंतांना ही वार्ता समजल्याखेरीज कशी राहणार ? लागलीच गाणगापूर येथील आपलें बिर्‍हाड आवरुन ते पंढरपूरच्या मार्गास लागले. इंगज अधिकारी डँनिअल हा पाठलाग करीत होताच. फडके यांची वृत्ति थोडी निराशेची होती. मोठया प्रमाणांत आपणांस यश मिळावें या दृष्टीनें यत्न होण्यासाठीं ते साधनसामग्रीच्या तजविजींत होते. पण आतां हा सरकारी ससेमिरा पाठीशीं आणि प्रकृतिहि ठीक नव्हती. अंगांत ताप होता. भीमा नदीच्या तीरावर एका सहकार्‍यासह ते आले तों नदीस महापूर आलेला ! पैलतीरावर जाणे तर अत्यंत आवश्यक. तेव्हां त्यांनीं एका नावाडयास भरीस घालून भीमेची प्रार्थना केली, आणि आपणांस सुयश दे असें म्हणून भरल्या नदींत नाव घातली. मजल दर मजल करीत फडके देवरनावडगी या गांवीं येऊन पोंचलें.या गांवाच्या शेजारी जुनें देऊळ होतें. त्या ठिकाणीं शीण घालवावा म्हणून त्यांनीं मुक्काम केला. अत्यंत श्रम झाल्यामुळें त्यांना गाढ झोप लागली. दाढी, जटा वाढलेल्या चेहर्‍यावर एक प्रकारचें गांभीर्य आणि तेज विलसत होतें. परंतु या खंबीर माणसाचें दैव आज ठीक नव्हतें. बाहेर मुसळधार पावसाची वृष्टि होत असतांनाच मेजर डँनिअल येऊन थडकला. झोंपेच्या अधीन झालेल्या सावजास डँनिअलनें प्रथम नि:शस्त्र केलें. आणि मग वासुदेव बळवंतांना गचांडी देऊन उठविलें. फडके हतवीर्य झाले. शत्रूच्या स्वाधीन होण्याखेरीज त्यांना दुसरा मार्ग नव्हता.
- २१ जुलै १८७९
------------

श्रावण शु. २
मदनलाल धिंग्रांचा देहान्त !

शके १८३१ च्या श्रावण शु. २ रोजी भारतांतील विख्यात क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांस ब्रिटिश राजसत्तेनें फांशीं दिलें.
गेल्याच महिन्याच्या शु. १३ रोजीं मदनलाल यांनीं कर्झनवायली यांचा खून केला होता. लागलीच खटल्यास सुरुवात होऊन त्यांस फांशींची शिक्षाहि झाली. त्याची अमलबजावणी श्रावण शु. २ रोजीं झाली. “आज मदनलालजी यांना झालेली देहान्ताची शिक्षा अमलांत येणार ! त्यामुळें प्रभातकाळींच या तुरुंगांत गडबड उडालेली आहे.आदल्या रात्रीं लागलेल्या गाढ झोंपेंतून जागे झालेले मदनलालजी उत्तम प्रकारचा पोशाख करुन आपल्या परलोकच्या प्रवासाठीं सिध्द झालेले आहेत. लौकरच त्यांचा देहांत होणार म्हणून दु:खित होऊन त्यांचे देशबंधु तुरुंगाच्या बाहेर घोटाळत आहेत... मदनलालांच्या या अलौकिक वर्तनाचा ज्यांच्या मनावर भलाबुरा परिणाम झाला, असे दोन - तीनशें इग्रजहि आतुरतेनें तुरुंगाबाहेर उभे आहेत. सकाळचा फराळ मदनलालजींनीं शांतपणें भक्षण केला. नऊच्या ठोक्याला घंटेचा घणघण आवाज होऊं लागला. ख्रिस्ती धर्माचे उपदेशक मदनलालजींजवळ आले, पण आपल्या हिंदुत्वाचा अभिमान बाळगणार्‍या धिंग्राजींनीं त्यांच्या तोंडून एक शब्दहि ऐकला नाहीं. आपणांस येणारा मृत्युहि हिंदु पध्दतीनें यावा असा त्यांचा आग्रह होता.  मदनलांलजी वधस्तंभाकडे निघाले. त्यांचा उघडा उन्नत शीर्षभाग त्यांच्या अचल चित्तवृत्तीची ग्वाही देऊं लागला. मदनलालजी वधस्तंभावर चढले ! पाशांत त्यांचा गळा गुंतला ! ठोकळा उडाला !! आणि मदनलालजी मृत्यूच्या साम्राज्यांत दाखलहि झाले.”
आदल्याच दिवशीं मदनलालजीचें प्रभावी वक्तव्य प्रगट झाले होतें. “परकी शस्त्रास्त्रांच्या साह्यानें दास्यांत जखडून टाकण्यांत आलेले राष्ट्र नेहमींच युध्यमान असतें. नि:शस्त्र जातीला उघड रणांगणांत उतरुन सामना देणें अशक्य होत असल्यामुळें, मीं दबा धरुन हल्ला चढवला. मला तूफा वापरुं देण्यांत आल्या नाहींत म्हणून मीं पिस्तुल काढलें व तें झाडलें.”
- १७ आँगस्ट १९०९

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP