आषाढ वद्य ९

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


बाळाजी बाजीरावाची कामगिरी !

शके १६६५ च्या आषाढ व. ९ रोजीं बाळाजी बाजीराव पेशवे यानीं माळव्याची सनद मिळवली.
पंधरा वर्षापूर्वी भोपाळच्या लढाईत निजामुल्मुल्कानें बाजीरावाशीं तह केला होता. त्यांत माळव्याची सनद बादशहापासून मराठयांना देण्याचें कलम होतें; पण पुढच्या गडबडींत ही सनद पेशव्यांना प्राप्त झाली नाहीं. दिल्लीच्या पातशहास बाळाजी बाजीरावानें जयसिंग व निजामुल्मुक यांचेतर्फे पुष्कळ पत्रेंहि पाठवलीं. तेव्हां बादशहानें पंधरा लाख रुपये पेशव्यांना दिले; पण माळव्याच्या सनदेसंबंधीं नांव काढलें नाहीं. दरम्यान आपल्या मुलाचें - नासिरजंगाचें बंड मोडण्यासाठीं निजामुल्मुल्क दक्षिणेंत आला. लगेच बाळाजीनें पूर्णा नदीचे कांठीं एद्लाबद येथें त्याची भेट घेऊन त्यास मदतीसाठीं मराठयांचें एक पथक दिलें; आणि आपल्या सामर्थ्यानें अमल बसवण्यासाठीं बाळाजी माळव्यांत गेला; आणि तेथें होळकर, शिंदे, जाधव यांच्या हस्तें आपली सत्ता स्थापन केली. धवलपूर येथें सवाई जयसिंगाची भेट घेऊन बाळाजीनें स्नेह कायम केला व सहा महिन्यांच्या आंत माळव्याची सनद मिळवून देतों अशी त्यापासून हमी घेतली.  पुढें अलीवर्दीखान बंगालचा सुभेदार बनला. त्यानें ओरिसा प्रांतावर स्वारी करुन तेथील अधिकारी मुर्शिदकुलीखान यास हांकून दिलें. तेव्हां याचा दिवाण मीर हबीब अलिवर्दीखानाच्या नोकरींत राहूनच त्याच्या नाशाचा प्रयत्न करीत होता. आश्विन महिन्याच्या दुर्गापूजेच्या उत्सवाअंत मराठे दंग असतांना अलिवर्दिखानानें त्यांच्या लष्करावर हल्ला केला. भास्करपंताचा या वेळीं पराभव झालेला पाहून रघूजी भोसले यानें स्वत:बिहार प्रांतावर स्वारी केली. याच संधींत माळव्याची सनद देण्याचें कबूल करुन दिल्लीच्या पातशहानें बाळाजीस मदतीस बोलाविलें. बाळाजीनें तें मान्य करुन अलिवर्दीखानास मदत करण्यासाठीं म्हणून मुर्शिदाबादेकडे कूच केलें. आडवाटेनें शिरुन बाळाजीनें रघूजीचा मोड केला. येणेप्रकारें काम व्यवस्थित बजावल्यानंतर सनद देणें प्राप्तच होतें. त्याप्रमाणें आषाढ व. ९ (शके १६६५ ) ला पेशव्यांस माळव्याची सनद मिळाली.
- ४ जुलै १७४३

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP