आषाढ शुद्ध ३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


‘वन्दे मातरम्‍’ च्या जनकाचा जन्म !

शके १७६० च्या आषाढ शु. ३ रोजीं सुप्रसिध्द बंगाली कादंबरीकार, कवि व ‘वन्दे मातरम्‍ ’ या भारताच्या राष्ट्रंगीताचे जनक बंकिमचंद्र चतर्जी यांचा जन्म झाला.
आधुनिक बंगाली भाषेचे निर्माते व आद्य प्रवर्तक म्हणून बंकिमचंद्राचा लौकिक आहे. कलकत्त्याजवळ कान्तलपारा या गांवीं यांचा जन्म झाला. हुगळी काँलेज व प्रेसिन्डेसी काँलेजमध्यें शिक्षण घेतल्यावर डेप्युटी मँजिस्ट्रेटच्या जागेवर यांची नेमणूक झाली. सन १८७२ मध्यें बंकिमचंदांनीं ‘वंगदर्शन’ नांवाचें पत्र सुरु केलें. त्यानंतर यांच्या कादंबरी लेखनास सुरुवात झाली. “यांच्या कादंबर्‍या ऐतिहासिक, सामाजिक व संमिश्र अशा तीन स्वरुपांच्या आहेत. यांची भाषा अकृत्रिम, सुबोध, ह्रुदयस्पर्शी, आणि सरस अशी आहे. कल्पनाचातुर्याबरोबर मार्मिक व भारदस्त विनोदहि यांच्या लेखनांत भरपूर आढळतो. असंभाव्य व काल्पनिक सृष्टीपेक्षां नित्य व्यवहारांतील स्वभावचित्रण करण्याकडे यांचा कल अधिक असल्यानें वाचक पात्रांशीं समरस होतो. शिवाय विवेकाला चालना देऊन स्वाभिमानाला जागृत करण्याचा जिव्हाळाहि यांच्या लेखनांत आढळतो.” दुर्गेशनंदिनी, कपालकुंडला, मृणालिनी, रजनी, चंद्रशेखर, विषवृक्ष,आनंदमठ,कृष्णकांतेर विल,आदि यांच्या कादंबर्‍या फार प्रसिध्द आहेत. कादंबरी - लेखनाखेरीज अनेक ऐतिहासिक, धार्मिक व तात्त्विक, चर्चात्मक निबंध लिहून यांनीं बंगाली भाषेचें वैभव खूपच वाढविलें. हिंदु धर्म, संस्कृति, भाषा यांच्या उन्नतीसाठीं यांनीं फारच श्रम घेतले. यांच्या आनंदमठ कादंबरीतच ‘वंदे मातरम्‍ ’ हें राष्ट्रगीत प्रथम भारतीयांपुढें आलें. यांच्या कामगिरीचा गौरव म्हणून कलकत्ता विद्यापीठानें यांचा पुतळा सेनेट गृहांत उभारला आहे. यांच्या लिखाणांत संस्कृत भाषेचें सौंदर्य व बंगालीचा जोम यांचा सुरेख मिलाफ झाला आहे. यांचे ग्रंथ संदेश देणारे असूनहि त्यांत कलेची हानि झालेली दिसत नाहीं. यांचे ग्रंथ संदेश देणारे असूनहि त्यांत कलेची हानि झालेली दिसत नाहीं. “जुन्या संस्कृतीच्या अभिमानाची गुप्त सरस्वती यांच्या वाड्गमयांतून जुन्या दृश्यांच्या वर्णनानें मधून मधून प्रगट होते... इंग्लंडपासून शिस्त शिकावी व स्फूर्तीकरितां हिंदु धर्माकडे यावे असा यांचा संदेश होता.”
- २५ जून १८३८
-----------------

आषाढ शु. ३
आझाद हिंद सेना !

शके १८६५ च्या आषाढ शु. ३ रोजीं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे एक स्वप्न मूर्त स्वरुपास आलें.
सन १९४२ च्या फेब्रुवारींत सिंगापूरचें ब्रिटिशांचें हिंदी सैन्य जपानला शरण गेलें. या सैन्याच्या सहाय्यानें हिंदुस्थान ब्रिटिशांविरुध्द लढून स्वतंत्र व्हावा या गोष्टीस जपाननें मान्यता दिल्यामुळें पहिली आझाद हिंद सेना स्थापन झाली. परंतु मतभेदामुळें तिचें विसर्जन झाल्यावर सदर जनतेनें सुभाषबाबूंची वाट पाहिली. १९४३ च्या जूनमध्यें ते टोकियोला गेले. तेथें त्यांचें हिंदी आणि जपानी लोकांकडून प्रचंड स्वागत झालें. “ज्या शत्रूनें तलवार उपसली आहे त्याला तलवारीनेंच तोंड द्यावयास पाहिजे स्वातंत्र्य - प्रेमी हिंदी लोकांचें रक्त जेव्हां वाहूं लागेल तेव्हांच भारत स्वतंत्र होईल.” असें आग्रहाचें प्रतिपादन त्यांनीं सुरु केलें. त्यांच्या संघटन - कौशल्यांतून प्रचंड सामर्थ्य निर्माण झालें. अलौकिक वक्तृत्वामुळें व व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावानें शेंकडों लोक सैन्यांत दाखल झाले. आणि -
आषाढ शु. ३ हा दिवस उजाडला. -
नेताजींच्या स्वप्नाला मूर्त स्वरुप आलें. या दिवशीं हातांत शस्त्र घेतलेले, मातृभूमीच्या उध्दारासाठीं जिवावर उदार झालेले लाखों सैनिक त्यांच्यासमोर उभे होते. दुसर्‍या आझाद सेनेच्या स्थापनेचा तो दिवस होता. सैनिकांचें स्वागत करुन नेताजी बोलले “ब्रिटिश साम्राज्याच्या जोखडापासून भारताची सुटका करणारें हें सैन्य आहे. हिंदुस्थान स्वतंत्र झालेला पाहण्यास आपणांपैकीं कोण जिवंत राहणार याला महत्त्व नाहीं, तो स्वतंत्र होणारच. पण त्याच्या स्वातंत्र्यासाठीं आम्ही सर्वस्वाचा होम करणारच एवढा आत्मविश्वास मात्र पाहिजे”
भारताच्या स्वातंत्र्याची गर्जना करणारी १८५७ नंतरची ही हिंदुस्थानची पहिलीच सेना होती. आणि हिच्याचव्दारां या स्वतंत्र सरकारनें ब्रिटन व अमेरिका यांच्याविरुध्द युध्द पुकारलें.
- ५ जुलै १९४३

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP