आषाढ शुद्ध १४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


“मी गुन्हेगार नाहीं !”

शके १८३० च्या आषाढ शु. १४ रोजीं लोकमान्य टिळक यांच्यावरील राज्यद्रोहाच्या दुसर्‍या खटल्याचें काम सुरु झालें.
या वेळीं बंगाल्यांत क्रांतिकारकांचें युग सुरु झालें होतें. त्यावरील ‘केसरीं’ तील लिखाण सरकारला झोंबून टिळकांच्यावर खटला भरण्यांत आल. न्या. दावर यांचेपुढें काम सुरु झालें. टिळक स्वत:च काम पाहणार होते. स्वत:च्या बचावाचें भाषण टिळकानीं साडेचार दिवसपर्यंत केलें. त्यांतील विव्दत्तापूर्ण विवेचन पाहून कायदेपंडितांनीं माना डोलविल्या. इंग्लंडमधील राज्यद्रोहाचा कायदा, तेथील खटले, ज्यूरीच्या अधिकाराचें क्षेत्र, मुद्रणस्वातंत्र्याचा इतिहास, त्याचा कायदा आदि विषयांवर मुद्देसूद विवेचन टिळकांनीं केलें. त्याचा फारसा उपयोग झाला नाहीं. शिक्षा सांगण्यापूर्वी आरोपीस विनंति केली त्या वेळीं लो० टिळक बोलले:
All I wish to say is that in spite of the verdict of the Jury, I maintain that I am innocent. There are higher powers that rule the destinies of things and it may be the will of providence that the cause which, I represent, my prosper more by my sufferings than by my remaining free. ( मला सांगावयाचें असें फार थोडेंच आहे. ज्यूरीनें मला दोषी ठरविलें. तर खुशाल ठरवो. पण मी गुन्हेगार नाहीं. लौकिक गोष्टीचें नियंत्रण करणारी अशीहि एक शक्ति न्यायपीठाहूनहि वरिष्ठ आहे. कदाचित्‍ ईश्वराची इच्छाच असेल कीं, मला शिक्षा व्हावी आणि मीं शिक्षा भोगल्याच्या कारणानेंच मीं अंगीकारिलेल्या कार्याला ऊर्जित दशा यावी. ) यावर न्यायमूर्तीनीं शिक्षा सांगितली, “तुम्हांला शिक्षा सांगतांना मला दु:ख होत आहे. कमींत कमी शिक्षा म्हणून सहा वर्षाची काळे पाण्याची सजा मी तुम्हांस देतों.” रात्रीचा दहाचा सुमार होता तरी कोर्टाबाहेर लोकांची गर्दी पावसांत उभी होती. तिला चकवून, कोर्टाच्या मागील दारानें टिळकांना बाहेर नेऊन आगगाडींत बसविण्यांत आले. दुसर्‍या दिवशीं टिळक साबरमतीच्या तुरुंगांत दाखल झाले. तो दिवस ( २३ जुलै ) त्यांच्या बावन्नाव्या वाढदिवसाचा होता.
- १३ जुलै १९०८

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP