आषाढ वद्य २

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


रा. स्व. संघावरील बंदी उठली !

शके १८७१ च्या आषाढ व. २ रोजीं ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या विख्यात संघटणेवरील बंदी हिंद सरकारनें उठविली. एक वर्ष पांच महिने व आठ दिवसांचा वनवास संघाला भोगावा लागला.
महात्मा गांधी यांच्या वधानंतर दि. ४ फेब्रुवारीला सरकारनें रा. स्व. संघ बेकायदा ठरविला. हिंदुस्थानास मिळालेलें स्वातंत्र्य धोक्यांत आणून देशाच्या नांवास काळें फासणार्‍या अनेक विव्देषी व अत्याचारी वृत्ति निर्माण झाल्या होत्या, त्या सर्वांना आळा घालण्याचा विचार सरकार करीत होतें. अतिशय मोठया प्रमाणावर हिंदु समाजाचें सांस्कृतिक ऐक्य करणार्‍या संघाकडेहि सरकारची वक्रदृष्टी फिरली. संघ बेकायदा ठरवितांना अत्याचार, जाळपोळ, चोरी, दरोडेखोरी खून, शस्त्रें जमविणें इत्यादि प्रकारचे गंभीर आरोप संघावर ठेविण्यांत आले होते. सहासात महिने झाल्यानंतर बंदी उठविण्याचा विचार प्रांतिक सरकारच्या सल्यानें झाला. परंतु त्याला यश आलें नाहीं. पू. गोळवलकर गुरुजी यांनीं पं. नेहरु व सरदार पटेल यांच्या भेटी घेतल्या, पण त्याचा परिणाम त्यांच्या स्थानबध्दतेंतच झाला. त्यानंतर नऊ डिसेंबर रोजीं सबंध भरतखंडांत संघानें अभूतपूर्व असा सत्याग्रह सुरु केला. लक्षावधि स्वयंसेवक तुरुंगांत गेले. २० जानेवारीला ‘केसरी’ कार ग.वि. केतकर यांच्या मध्यस्थीनें संघ सत्याग्रह स्थगित झाला. ८ एप्रिल रोजीं दिल्लीस पंतप्रधानांचीं बैठक भरली होतीइ. त्यांत सरसंघचालकांनीं पाठविलेल्या घटनेच्या मसुद्याचा. विचार होऊन सत्याग्रहींना मुक्त करण्यास सरकार तयार झालें. मद्रासचे प्रागतिक पुढारी श्री. व्यंकटरामशास्त्री यांनीं संघ - घटनेचा मसुदा तयार करण्यास मोठेंच साहय केलें. परंतु त्यांचें आणि सरकारचें पटलें नाहीं. शेवटीं मध्यप्रांताचे गृहमंत्री श्री. व्दारकाप्रसाद मिश्र यांच्या प्रयत्नास यश आलें आणि आषाढ व. २ रोजीं संघ बंदी रद्द झाल्याचें जाहीर झालें. संघाच्या इतिहासांत ही मोठीच घटना आहे. प्रसिध्दीची हांव न धरितां संघानें आपला विस्तार अवघ्या पंचवीस वर्षातच हिंदुस्थानच्या कानाकोपर्‍यांतूनहि केला; आणि संघास लाभलेल्या या वनवसामुळें मात्र संघाचें नांव आपोआपच जगांत प्रसिध्द झालें.
- १२ जुलै १९४९

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP