आषाढ वद्य ७

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


“जो मित्र आमचा तो मित्र तुमचा !”

शके १६९१ च्या आषाढ व. ७ रोजीं श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आणि जयपूर संस्थानचे राजे पृथ्विसिंग यांच्यांत सलोख्याचा तह झाला.
पानिपतच्या भयंकर संहारामुळें उत्तर हिंदुस्थानांतील मराठयांची सत्ता कमजोर झाली होती. नजीबखान, सुजा उद्दौला, इत्यादि सरदारांना आताम मराठयांचें भय वाटेनासें झालें होतें. होळकर, भोंसलें, बुंदेले या सरदारांना ते जुमानीत नसत. मराठयांचा सर्व दरारा नाहींसा होऊन शत्रु - पक्ष बळावत चालला होता. ही परिस्थिति बदलून टाकून पानिपतच्या युध्दांत आलेलें अपयश धुऊन काढावें असा माधवराव पेशव्यांचा हेतु होता. आपल्या पराक्रमानें, तेजानें आणि बाणेदारपणानें पुन्हां एकदां उत्तरेंत सर्वाच्यावर विजय मिळवावा या प्रयत्नांत माधवराव होते. गोहदच्या लढाईत तह करुनहि पराभूत झालेले राघोबादादा परत आल्यावर पेशवे यांनीं प्रसिध्द शूर मुत्सद्दी रामचंद्र गणेश कानडे आणि विसाजी कृष्ण बिनीवाले या दोघांना उत्तरेचा बंदोबस्त करण्यास पाठविलें; आणि रजपुतांशीं सलोखा करण्याचेंहि बजावून ठेविलें. त्याप्रमाणें पेशवे आणि पृथ्विसिंग यांच्यांत तह आषाढ व. ७ या दिवशीं झाला. पृथ्विसिंगाचें म्हणणें असें होतें “परगणे रामपुरा आम्हांस द्यावा ... आम्ही आपणांसी स्नेहवृध्दि दिवसेंदिवस अधिक करावी, आमची फौज तुमचे फौजेस सामील व्हावी. जो मित्र आमचा तो मित्र तुमचा. हिंदुस्थानप्रांतीं मनसबा पडेल तो एकविचारें करावा ... आमची फौज जितकी येईल त्याचे हजिरीप्रमाणें आम्हांस वाटा द्यावा. ... आम्हाकडे बाकी शिंदे होळकर मारफत आहे, त्यापैकीं आठ लक्ष सोड द्यावी” यावर पेशव्यांचें म्हणणें असें कीम, “रामपुरा सरदाराकडे सरंजाम आहे. यास्तव सरदार हुजूर आलियावर त्यांस पुसून त्याची वाटाघाट झालियावर रामपुर्‍याच्या मोबदला तनखा वसूल बमोजीब तुम्हांपासून सरकार उपयोगी महाल घेऊन रामपुरा देऊं. तुमच्या फौजेचे चाकरीबरोबर बमोजीब तुम्हांस हिस्सा दिला जाईल. ... तुम्हांस आठ लाख रुपये सूट दिली असे.” येणेंप्रमाणें करारनामा होऊन पेशवे आणि पृथ्विसिंग यांच्यांत सलोखा झाला.
- २५ जुलै १७६९

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP