वैशाख वद्य १२

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


‘होती ऐसी नाहीं झाली मुक्ताबाई !’

शके १२१९ च्या वैशाख व. १२ रोजीं प्रसिध्द संत ज्ञानदेव यांची बहीण मुक्ताबाई हिनें एद्लाबाद येथें समाधि घेतली.
ज्ञानेश्वरादि चार भावंडांत मुक्ताबाई आपल्या वैशिष्टयानें प्रसिध्द आहे. चौदाशें वर्षें जिवंत राहून गर्व करणार्‍या योगेश्वर चांगदेवाची ती गुरु होती.
“चवदाशें वर्षे शरीर केलें जतन । नाहीं अज्ञानपण गेलें माझें ॥१॥
अहंकारें माझें बुडविलें घर । झालों सेवाचोर स्वामीसंगें ॥२॥
अभिमानें आलों श्रीअलंकापुरीं । अज्ञान केलें दूरी मुक्ताबाईनें ॥३॥”
अशी चांगदेवांची कबुली आहे. समाजाकडून होणार्‍या छळाला कंटाळून ज्ञानेश्वर खिन्न झाले; आणि खोलींत बसून त्यांनीं खोलीचें दार ( ताटी ) लावून घेतलें. तेव्हां ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणून मुक्ताबाईनें म्हटलेले ताटीचे अभंग प्रसिध्द आहेत.
आपलें अवतारकृत्य संपवून ज्ञानेश्वर व सोपानदेव समाधिस्थ झाले होते. ‘तापसांचा मेळा फुटला’ म्हणून मुक्ताबाई खिन्न झाली. ‘मुक्ताई उदास झाली असे फार । आतां हें शरीर रक्षूं नये’ असे विचार तिच्या मनांत येऊं लागले. “वैशाखाचा महिना असल्यामुळें ऊन रखरख करीत होतें. तापी तीरावर वैषणवांचा मोठा समुदाय जमला होता. एदलाबादेहून दोन मैलांवर असणार्‍या माणेगांव येथें एकांतांत निवृत्तीनें गंगाधारेजवळ मुक्ताईला तिच्या ब्रह्मभावाचें स्मरण दिलें. “अंतरबाहेर स्वामीचें स्वरुप । स्वयें नंदादीप उजळीला.’ असें म्हणून स्वरुपाकार स्थितींत आकाश गर्जून विजेचा प्रचंड कडकडाट झाला व मुक्ताबाई सहजस्वरुपीं मिळून गेली. ‘एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनीं । जेव्हां निरंजनी गुप्त झाली ॥’ तो दिवस वैशाख वद्य व्दादशी हा होय. मुक्ताबाई डोळयांनीं न पाहतांच एकाएकीं गुप्त झाली म्हणून सर्वाना वाईट वाटलें. ‘होती ऐसी नाहीं झाली मुक्ताबाई । संत ठायीं ठायीं स्फुंदताती ।” अशी अवस्था सर्वाचीच झाली. मुक्ताबाई गुप्त झाल्या तेथून दोन मैलांवर त्यांचें देऊळ बांधलें आहे. त्यांचे अभंग गोड आहेत.
- १९ मे १२९७
------------------

वैशाख व. १२
केशवचैतन्यांची समाधि !

शके १४९३ च्या प्रजापति संवत्सरीं वैशाख व. १२ रोजीं राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व प्रसिध्द भगवद्भक्त तुकारामबोवा यांचे गुरु केशवचैतन्य ऊर्फ बाबा चैतन्य यांनीं पुणें जिल्ह्यांतील जुन्नर गांवाशेजारील ओतूर येथें समाधि घेतली.
शके १४४२ मध्यें तिनवेल्ली येथील तपोनिष्ठ ब्राह्मण नृसिंहभट्ट हा यवनांनीं त्रास दिल्यामुळें पुनवाडी म्हणजे पुणें येथें येऊन राहिला. त्याला त्र्यंबक, विश्वनाथ व बापू असे तीन पुत्र झाले.वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांमध्यें कलह सुरु झाले. विश्वनाथांची म्हणजे “ बाबांची वृत्ति उदासीन । त्रिकाळ करावें संध्यास्नान । धर्मालागीं उदार पूर्ण । गृहकृत्य कांहीं करुं नये” अशी परिस्थिति असतां दोघां बंधूंनीं यांना घराबाहेर काढलें. आपली पत्नी गिरिजाबाई हिला बरोबर घेऊन विश्वनाथबाबा तीर्थयात्रा करीत करीत ओतुरास आले. बाबा संसारानें तप्त झाले होते. “कानीं नाहीं बाळी बुगडी । मिळालीं नाहीं लेणीं लुगडीं । सुख नाहींच अर्धघडी । जालें यांचे संगतीनें” अशी तक्रार बायकोहि करुं लागली. याच समयीं ओतुरास यांना राघवचैतन्य भेटले. राघवचैतन्य हे “उत्तमनामनगरीं । मांडवी पुष्पावतीचे तीरीं ॥” फार दिवस तप करीत होते. उत्तम नगरी म्हणजे ओतूर. ‘जाल्या नखांच्या चुंबळी  । अंगावरी वाढली धूळी । जटा लोंबती भूतळीं । देह शुष्क जाहला ।’ अशी तीव्र तपश्चर्या राघवचैतन्यांची सुरु होती. विश्वनाथबाबांनीं वैतागून ‘संन्यासदीक्षा द्या’ असा आग्रह राघवा चैतन्यांजवळ धरला. पण पुत्र झाल्याशिवाय संन्यासदीक्षा घेतां येत नाहीं, असें सांगून त्यांनीं विश्वनाथाला परत पाठविलें. पुढें दीड वर्षानें बाबाजीस पुत्र झाल्यावर “वैराग्यें चित्त शुध्द जालें. । स्त्रीचें रीणही फिटलें ॥” म्हणून राघवचैतन्यांनीं त्यांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचें नांव केशवचैतन्य ठेवलें. त्यानंतर हे गुरुशिषय त्र्यंबकेश्वर, व्दारका, प्रयाग, काशी, इत्यादि तीर्थयात्रा करुन आले. जनांची उपाधि वाढल्यावर राघवचैतन्यांनीं समाधि घेतली. त्यांचे शिष्य केशवचैतन्य यांनीं त्यांचेनंतर शके १४९३ मध्यें वैशाख वद्य १२ ला समाधि घेतली.
- २० मे १५७१

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP