वैशाख शुद्ध ३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


वसंत - गौरीचा गौरव !

वैशाख शु. ३ हा दिवस अक्षय्य तृतीया म्हणून प्रसिध्द आहे. या दिवशीं जें जें पुण्य करावें तें तें अक्षय्य होतें असा समज आहे. याच दिवशीं कृतयुगाचा प्रारंभ होतो. वर्षांतील साडेतीन मुहूर्तापैकीं हा एक आहे.
विष्णुप्रीत्यर्थ हा सण रुढ झाला असावा. पितृस्वरुपी जनार्दनास ब्राह्मणव्दारां उदककुंभदान देण्यांत येतें. वसंतमाधवाची पूजाअर्चा करुन वसंत देवतेप्रीत्यर्थ तृषाशमनासाठीं पाण्याच्या कुंभांचें दान देण्याची चाल आहे. हा दिवस वसंतोत्सवाचा आहे. चैत्र शु. ३ पासून अक्षय्य तृतीयेपर्यंत वसंतगौरीचा उत्सव सर्व सेवीच्या देवालयांत चालू असतो. मथुरा, वृंदावन, अयोध्या, काशी, व्दारका वगैरे ठिकाणाच्या देवालयांतील उत्सव अत्यंत प्रेक्षणीय होतात. वसंत ऋतु सर्व ॠतूंत अत्यंत आल्हाददायक असतो. “कौमार्मावस्थेंत माहेरीं असलेल्या वसंतगौरी यौवनावस्था प्राप्त होतांच अक्षय्य तृतीयेला श्वशुरगृहीं जातात.” असें म्हणण्याचा भावार्थ हाच कीं, याच सुमारास सृष्टींतील झाडें वैवाहिक स्थितीचा उपभोग घेऊन फलद्रूपो होतात. आम्रादिक वृक्षांना लुसलुशीत पालवी व सुंदर फुलें आलेलीं असतात; आणि वैशाखाच्या आरंभीं त्यांना फळे दृष्टीस पडतात... सृष्टीस यौवन व मातृत्व प्राप्त झालेलें अस्तें” ... आणि धर्मशास्त्रानें या दिवसाला सणाचें महत्त्व प्राप्त करुन दिलें. वैशाखाच्या आरंभीं कडक उन्हाळा भासूं लागतो, त्या वेळीं तान्हेलेल्यांना पाणी देणें हें पुण्यकर्म समजून उदककुंभ देण्याची वहिवाट पडली. दक्षिण भारतांत याच दिवशीं रहदारीच्या रस्त्यांवर पांथस्थांना गार पाणी पिण्यास देण्याची चाल आहे.
अक्षय्य तृतीयिएला कांही जण आखाजी किंवा आखेती असेंहि म्हणतात. या दिवसाच्या शुभमुहूर्तावर कोंकणांत शेतकरी लोक पेरणी करतात. वसंत - गौरीच्या या उत्सवास चैत्रा गौरी किंवा दोलोत्सव असेंहि नांव आहे. या दिवशीं वसंतकालास योग्य असे नृत्यगायनादि विधि व वसंतपूजा करण्याची वहिवाट आहे... शास्त्रकारांनीं या तात्त्विक, प्रणयोत्पादक व हर्षदायक कालास देवतेच्या ठिकाणीं मानलें आहे.
----
गुरु नानकांचा जन्म

शके १३९१ च्या वैशाख शु. ३ रोजीं शीख पंथाचे आद्य संस्थापक गुरु नानक यांचा जन्म लाहोरनजीक तलांवडी गांवीं झाला.
त्यांच्या आईचें नांव तृप्ता असून बापाचें नांव काळू होतें. बाप धान्याचा व्यापार करीत असे. त्यांच्या पत्नीचें नांव सुलक्षणी असें असून तिला जयचंद आणि श्रीचंद असे दोन पुत्र होते. बालपणापासूनच नानकजींची बुध्दि तीव्र असून त्यांनीं हिंदु व मुसलमान धर्माचे ग्रंथ चांगले वाचले होते. वृत्तींत विरक्तपणा भरलेला असल्यामुळें लौकिक प्रकारच्या शाळेंत त्यांचें मन रमलें नाहीं. त्यांच्या बोलण्यांत नेहमीं उच्च प्रकारचे तात्त्विक विचार येत असत. वादविवादांतहि ते फार कुशल बनले. वृत्ति विरागी बनत चालली होती. व्यापारासाठी बापानें दिलेले पैसे नानकांनीं गोरगरिबांस वाटून टाकले; अर्थातच स्वत:च्या घरांतून त्यांना बाहेर पडावें लागल्यावर ते दौलतखान नांवाच्या सुभेदाराजवळ पंडित या नात्यानें राहिले; आणि थोडयाच दिवसांत आपल्या मालकासच नानकांनीं आपले  शिष्य बनविलें. त्यानंतर आपल्या विविष्ट मतप्रचारार्थ त्यांनीं पर्यटन करण्यास सुरुवात केली. असें सांगतात कीं, त्यांनीं हिंदुस्थान, सिलोन, अफगाणिस्तान या ठिकाणीं पायीं प्रवास करुन आपलें धर्मकार्य केलें. नानकांच्या धर्माचा आधार जातिभेद नसावा, व मूर्तिपूजा करुं नये या दोन तत्त्वांवर मुख्यत: आहे. त्यांच्या धर्मपंथांत हिंदु व मुसलमान या दोघांत भेद नाहीं. प्रत्येकाजवळ हातांत कडें, डोक्यांत कंगवा व जवळ कटयार ठेवावी असा त्यांचा दंडक होता. नानकांच्या नांवावर प्रसिध्द असणारा ‘ग्रंथसाहेब’ नांवाचा ग्रंथ शिखांना अत्यंत प्रिय आहे. नानकांच्या शिकवणीचें सार असें आहे: “परमेश्वर एकच आहे. शुध्द अंत:करण ही पहिली महत्त्वाची बाब आहे. सर्व मनुष्यांनीं परमेश्वराची भक्ति केलीच पाहिजे. मागील गुरुंची अथवा साधु -संतांची शिकवण या वेळीं उपयोगी पडणार नाहीं.” नानकांनीं पुराणें वाचलीं होतीं, कुराणहि वाचलें होतें,  परंतु त्यांत त्यांना परमेश्वर दिसला नाहीं. तेव्हां ते सत्यालाच परमेश्वर मानूं लागले.
- १५ एप्रिल १४६९


N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP