वैशाख शुद्ध १३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


‘साम्राज्य - संस्थापका’ चा अंत !

शके १६६२ च्या वैशाख शु. १३ रोजीं नर्मदातीरीं रावेरखेडी येथें थोरले बाजीराव पेशवे यांचा अंत झाला !
बाळाजी विश्वनाथांपासून माधवरावांपर्यत मराठी राज्याचें जें संवर्धन झालें त्यांत थोरल्या बाजीरावांची योग्यता अधिक आहे. वीस वर्षाच्या कारकीर्दीत बाजीरावांनीं शिपाईगिरी व राजकारण यांची शर्थ. केली. निजामासारख्या सामर्थ्यवान्‍ प्रतिस्पर्ध्याला दमास आणून गिरिधर बहाद्दर, महंमद बंगश,सरबुलंदखान अशा बादशाही वीरांनाहि त्यांनीं नामोहरम केलें. एके काळचे मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल यांनीं आपल्या ‘Oriental Experiences' मध्यें बाजीरावासंबंधीं लिहिलें आहे कीं, “निरनिराळे सरदार एकमेकांशीं विरोध करीत असतां त्यांच्यांत ऐक्य निर्माण करणें, मुसलमानांच्या ताब्यांतला प्रदेश सोडवणें आणि हिंदूंची संघटणा करणें हीं महत्त्वाचीं कामें बाजीरावाला सिध्दीस न्यावयाचीं होतीं ... स्वरुपानें भव्य व रुबाबदार, वर्तनानें प्रेमळ, भाषणानें आकर्षक, बुध्दीनें कल्पक व तरतरीत आणि संकटांत युक्तिबाज असल्यामुळें त्याला लागोलग यश मिळत गेलें... युध्दसंग्रामांत तो सर्वापुढें निर्भयपणें ठासून उभा राहत असे. सभोंवार बंदुकीच्या गोळयांचा मारा होत असतां तो कधींच कचरला नाहीं. त्याचा स्वराष्ट्राभिमान जबर असून त्यापुढें कोणतीहि अडचण तो जुमानीत नसे. त्याचा सारा जन्म उन्हातान्हांत गेला. तसाच मृत्युहि उघडया आकाशाखालीं तंबूच्या आवरणांत झाला. लढवय्या पेशवा म्हणून त्याची ख्याति आजहि देशभर आहे.”
बाजीरावाचेम प्राणोत्क्रमण ज्या जागीं झालें तेथें वृदावनरुपांत एक छत्री उँभारला आहे. इंदूर - खांडवा लाइनवर रावेरखेडी सनावद स्टेशनपासून १५ मैलांवर आहे. नदीमध्यें बाजीरावाची दहनभूमि आहे,तेथें एक ओटा बांधून त्यावर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. जवळच श्रीमंतांचा वियोग असह्य होऊन प्राणत्याग केलेल्या त्यांच्या एका हत्तीचें व घोडयाचें अशीं दोन थडगीं आहेत.
- २२ एप्रिल १७४०

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP