निरंजन माधव - चरित्र व कवित्व

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


मराठी वाचकांपुढें एक उत्कृष्ट प्राचीन कवि आणावयाचा आहे. मराठी कविता व मराठयांचा इतिहास यांचा अन्योन्य संबंध असून मराठी, काव्याचें मार्मिक संशोधन व अभ्यास झाल्याविना मराठयांच्या इतिहासाचें खरें स्वरुप समजणार नाहीं. या सिध्दांताला बळकटी आणण्याकरितांच कीं काय कोण जाणें, गेल्या दोन चारशें वर्षातले कांहीं कवि माझ्या हस्तगत झाले आहेत; त्यांपैकीं एका चांगल्या कवीची अल्प माहिती जगापुढें प्रथमच मांडण्याचे काम करण्यास मला फार आनंद वाटतो. पहिले बाजीराव पेशवे हे शिवरायाप्रमाणें गुणग्राही असून गुणी पुरुषरत्नांचा संग्रह करण्याचा त्यांचे ठायीं गुण होता हें सर्वश्रुत आहे. त्यांनीं कित्येक वीर पुरुष उदयाला आणले आहेत, पण मराठी भाषेंतला एक चांगला कवि त्यांच्या गुणज्ञतेमुळें उदय पावला ही गोष्ट अद्याप कोणासही माहीत नाहीं. बनाजी ऊर्फ निरंजन माधव हें त्या कवीचें नांव होय. याचीं काव्यें व चरित्र आजवर अज्ञातवास भोगीत पडलीं होतीं. याचा ‘ज्ञानेश्वरविजय’ कांहीं वारकर्‍यांच्या पाहण्य़ांत आहे, व चिव्दोधरामायणाचें बांलकांड ’ इ.स १८८६ सालीं रा. रा. सीताराम रामचंद्र गायकवाड यांनीं प्रसिध्द केले आहे. रा गायकवाडांस सातही कांडें मिळलीं होतीं असें प्रस्तावनेवरुन दिसतें, पण नुक्ताच मीं शोध केला त्यावरुन तीं चोरीस गेल्याचें समजतें ! यापलीकडे निरंजन माधवाविषयीं बिलकुल माहिती आजवर उपलब्ध नव्हती.
==
मला या कवीची पांच चार हजार कविता सांपडली असून आणखी इतकीच मागें पुढें शोध केल्यास सांपडेलसें वाटतें. पण इतक्या थोड्या कवितेवरुनही मराठींत हा एक अलौकिक कवि होऊन गेला असें दिसतें. याचे श्लोक वामनाच्या श्लोकांप्रमाणें प्रासादिक आहेत. यानें आपल्या घराण्याची व आपली विस्तृत माहिती देऊन आपल्या गुरुसांप्रदायाचीही सुरेख हकीकत दिली आहे. हा कवि चांगला योगी असून सार्‍या भरतखंडभर यानें तीर्थयात्रा केल्या व राजकीय पुरुष या नात्याने राजेरजवाडयांच्या दरबारांत हा वागलेला आहे. बाजीराव व नानासाहेब पेशवे यांच्या आश्रयांत याचा बराच काळ गेला. याला संस्कृत व मराठीशिवाय कानडी, हिंदुस्थानी, गुजराथी वगैरे बर्‍याच भाषा येत असून एक ग्रंथ यानें गुजराथी ग्रंथाच्या आधारें मराठींत केला आहे. मोरोपंती रामायणाच्या पूर्वीं निरोष्ठ रामायण, मंत्ररामायण यानें मराठींत केलीं होतीं ! संस्कृत चंपूंच्या धर्तीवर सुभद्राचंपू म्हणून एक मोठें सरस काव्य यानें मराठींत केलें आहे ! कै. गोडबोले यांनीं वृत्तदर्पण केलें तेव्हां त्यांस व इतरांस हाच वृत्तावरचा प्रथम मराठी ग्रथ असें वाटलें, परंतु याचे वृत्तशास्त्रवर तीन ग्रंथ आहेत ! याचीं स्तोत्रें तर अतिशय गोड आहेत. याप्रमाणें बहुश्रुत पंडित व योगी, साधु व राजकार्यनिपुण असा हा चौरस कवि मराठींत होऊन गेल्यास अद्याप दीडशेंही वर्षें झालीं नाहींत, तरी कव्यरसिकावंच्या अनास्थेमुळें हा सुरेख कवि विस्मृतिपंथास चालला होता. मराठी कवीसंबंधानें लिहितांना निरंजनमाधवाचें नांवही काढीत नाहीं, पण याचें चरित्र व ग्रंथ व्यवस्थेनें छापून काढल्यास वाचकांचें लक्ष त्याकडे आपोआप वेधेल असा मला भरंवसा वाटतो. याचा आत्मचरित्रपर जो ग्रंथ आहे त्यावरुन पेशवाईंतल्या समाजस्थितीची बरीच अटकळ बांधता येते.
==
प्रथम कवीचें चरित्र त्याच्याच ग्रंथाधारें व त्याच्याच शब्दांनी सांगून मग त्याच्या काव्यांची मी संक्षिप्त माहिती देणार आहें. “ सांप्रदायपरिमळ ” नांवाचा एक ओवीबध्द आत्मचरित्रपर हजार ओव्यांचा ग्रंथ यानें इ.स. १७६३ मध्यें आपल्या पत्नीसाठीं रचिला. बध्दपाणी व पतिव्रता अशी गंगावती एकदां कवीला म्हणाली : -
“ आपण रचिलीं ग्रंथरत्नें । ती म्या केलीं हृदयाभरणें ।
आतां स्वसांप्रदायकथन । शिरोभूषण मज द्यावें ॥१॥
व आणखी एका शंकेचें निरसन करावें. आपण लक्ष्मीधर व बापदेव या दोन सद्रुरुंचें नेहमीं चिंतन करितां याचें कारण काय ? दोपणीं एकच वस्तु आहे असें पूर्वील ग्रंथांत सांगून गुरुव्दैत मनीं कां बाळगितां ? ”
हा भक्तिनम्र व प्रेमळ सतीचा प्रश्न ऐकून निरंजन योगी म्हणाले : -
तुझ्याच अर्थी जाण । म्या पूर्वीं ग्रंथ रचिले पावन ॥
आतां सांप्रदाय प्रकाशन । करणें वल्लभे तुजसाठीं ॥२॥
यानंतर कवीनें प्रथम आपल्या कुळाचा व आपला इतिहास स्वस्त्रीस निवेदन केला; व नंतर लक्ष्मीधर व बापदेव या दोन गुरुंचा त्यांच्या दोन्ही सांप्रदायांसह इतिहास सांगितला आहे. हा सर्व ग्रंथ फारच महत्वाचा आहे. आधीं आत्मचरित्र कोणाही थोर पुरुषाचें असलें तरी तें मनोवेधक व बोधप्रद असतेंच . त्यांतही बहुभाषाकोविद, बहुदेशसंचारी, राजकार्यनिमग्र अशा सत्कवीचें आत्मचरित्र म्हणजे रसज्ञांस तो खमंग मेवाच वाटला पाहिजे, व त्यांतही पतिपत्नींच्या प्रेमळ संवादामुळे त्याला जें माधुर्य व पावित्र्य येतें त्यानें तर असा ग्रंथ अद्‍भुत वाटलाच पाहिजे.
==
गोदावरीच्या दक्षिणेस वरखेडाच्या शिवेवर रामडोह नामक प्रसिध्द गांव आहे ती कवीची ‘ मातृभूमि ’ होय. याचे पूर्वज तेथील कुळकर्णी होते. हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, यांचें गोत्र विश्वामित्र, कुलदेव गिरीचा व्यंकटेश. अद्दिलशाहींत आजानें गांव सोडून व्यापारानिमित्त विजापूरशहरीं वस्ति केली. तेथील पातशहाची सेवा करुन प्रतिष्ठा मिळविली. कवीचे वडील माहदो बनाजी हे भक्त होते. त्यांनीं आपल्या चारी पुत्रांस अधिकार देऊन दक्षिणोत्तर यात्रा केल्या व कृष्णातीरीं जमखिंडीपासून ४ मैलांवर शूर्पारक्षेत्र ह्मणून नरहरीचें कडकडीत स्थान आहे, तेथें उत्तरवय घालवून ते निजधामाला गेले. मध्यमपुत्र तिमाजीपंत यांनीं दिल्लीपतीनें विजापूर घेतांच तें शहर सोडलें व गिरीस व्यंकटेशसेवा करण्यास्तव गेले : -
न करितां मनुजाचें सेवन । तिमाजीपंतीं आमरण ।
भगवद्भजन पुस्तक - लेखन । करोनि काळ दवडिला ।
यांची कीर्ति सर्वत्र पसरली होती यांचे नांव ‘त्या समयींचे पुरुष नेणती । ऐसें नाहीं वर्तलें !’
माधवरावाची स्त्री व कवीची माता भागीरथीबाई ही पवित्र माउली होती व ‘ प्रत्यक्ष स्वप्रदर्शन । प्रत्यक्ष करावें भाषण ’ अशा अधिकाराची होती. तिच्या उदरीं कंची प्रांतीं वेगवती नदीतीरीं पक्षितीर्थासमीप निरंजमाधवाचा जन्म झाला. बाप वारल्यावर त्याचा तो देश सुटून सातार्‍यास बाजीराव पेशवे यांच्या आश्रयास कवीचें जाणें झालें : -
काळकर्मऋणानुबंधें । तो देश सुटला प्रसिध्द ।
आह्मां येणें घडलें शुध्द । महाराष्ट्र देशांतरीं ॥१॥
शाहूभूपतीचा प्रधान । बाजीराव बल्लाळ पृथ्वीरत्न ।
परमयशस्वी पावन गुण । भूपाळमंडळशिरोमणी ॥२॥
गुणरत्नाचा परीक्षक । स्वयें सद्‍गुणपूर्व अशेख ।
तेणें संग्रह केला सम्यक । जेष्ठबंधू सह आमुचा ॥३॥
निरंजवमाधव यापुढें सातार्‍यास राहण्यास आले; व विद्याभ्यासास सुरवात झाली. पण यापुढची आपली हकीकत कवीनें आपल्या दोन्ही गुरुंच्या सांप्रदायाच्या हकीकतींत गुरफटल्यामुळे मी दोन्ही सांप्रदायांची हकीकत पृथकत्वानें देतों.
===
१ दत्तसांप्रदाय.

सातार्‍यास आल्यावर निरंजनासा संस्कृत शिकण्याची नि:सीम आवड उत्पन्न झाली, पण आतांप्रमाणें तेव्हांही सर्वत्र भाडोत्री शिक्षक उदरभरणार्थी होते. म्हणून आस्थेनें सांगणारा कोणी गुरु भेटेना ! कवि म्हणतो : -
आस्थापूर्वक सांगणार । कोणी न मिळती विप्रवर ।
सर्वही अर्थकामातुर । भरणें उदर मुख्य स्वार्थ ॥१॥
ही निरंजनाची चिंता लवकरच दूर झाली सातार्‍यास लक्ष्मीधर बरवे म्हणून कोणी चित्तपावन सत्कुळज सुपुरुष होते त्यांची कीर्ति ऐकून निरंजन त्यांच्या दर्शनास गेले.
हातीं महारुद्रवीणा । स्वरें ज्ञानेश्वरीपारायणा ॥
अशी गंभीर व मंदस्मित करणारी भव्यमूर्ति पाहून निरंजनाचें चित्त तेथें जडले. गुरुला ते शरण गेले. सिध्दांतकौमुदी आरंभिली. सहा महिने निरंतर सेवा करुन गुरुकृपा संपादिली. ते ‘अंतरंग - बहिरंग’ सर्व निरंजनास सांगूं लागले लक्ष्मीधर वीणावादनप्रवीण असून ज्ञानेश्वरभक्त असून त्यांनीं ज्ञानेश्वरीचा प्रसार केला. लक्ष्मीधराचे गुरु ब्रह्मानंदस्वामी यांनीं त्यांची कविताशक्ति व प्रबंध पाहून त्यांस लक्ष्मीधरकालिदास या नांवानें गौरविलें. निरंजनाचे वेळीं लक्ष्मीधराचें दर्शन घेत शाहूमहाराजांनी त्यांस गांव इनाम दिलें . ( त्यांचे वंशज अद्याप तिकडे तें उपभोगीत आहेत असें कळतें. ) निरंजनमाधव म्हणतो, ‘माझ्या दृष्टांतावरुन ‘श्रीची कृपा तुजवर पूर्ण आहे’ असें जाणून लक्ष्मीधरांनी मला महावाक्याचा उपदेश केला, व साक्षात्कार होऊन माझा उध्दार झाला’ गुरुचें प्रेमळ स्तवन कवीनें केलें आहे.
==
हे लक्ष्मीधर बरवे दत्तसांप्रदायी होते. श्रीदत्तमहामुनि हे या सांप्रदाय कल्पतरुचें मूळ होत. त्यांचे शिष्य विमलानंद; त्यांचे अमृतानंद; त्यांचे ब्रह्मानंद, त्यांचे शिष्य सचिदानंद, यांनीं गोकर्णमहाबळेश्वराच्या वनांत तपश्चर्या केली. त्यांची समाधि वर्ष सहा महिने टिकत असे. त्यांना नारदाचें दर्शन झालें. ‘मनुष्याच्या चर्मचक्षूला दुर्लभ देवदर्शन कसें झालें ?’ अशी शंका गंगावतीनें काढिली व तिला  ‘योग्यांना तें सुलभ आहे’ असें निरंजन योगी यांनीं उत्तर दिलें. सचिदानंदांचे शिष्य ब्रह्मानंद व त्यांचे शिष्य लक्ष्मीधर बरवे हे होत.
==
यानंतर बर्‍याच गोष्टी घडल्या, त्या पुढें सांगण्यांत येतील. निरंजन माधवानें काशीप्रयागादि त्रिस्थळी करुन उत्तर हिंदुस्थानांतील तीर्थक्षेत्रें पाहिलीं. त्याचें पहिलें काव्य इ.स. १७३५ मधलें आहे. पुढें बाजीरावासाहेब वारल्यावर नानासाहेबांनींहीं कांहीं वर्षे निरंजन माधवाचा सप्रेम समाचार घेतला. ब्रह्मानंद पुत्र शिवानंद बेलूरग्रामीं मठीं होते, तेथें सचिदानंदबावांनीं सुंदरकृष्णाच्या मूर्ति स्थापल्यामुळें या सांप्रदायाची गादि तेंच स्थान होतें. पुढें काय झालें तें पहा : -
बाजीराव भूपाळनंदन । नाना प्रभू अतिप्रवीण ॥
तत्सेवनीं रात्रिदिन । अवकाश न घडे सुटाया ॥१॥
सर्व संस्थांनीं मजप्रती । पाठवितां राजकार्यार्थी ॥
दाक्षिणात्या सर्व नृपती । करिती प्रीती गुणग्राही ॥२॥
बहुत कार्यभागभार । सुटावया नव्हे अवसर ॥
चित्तीं ध्यास लागला फार । तीर्थयात्रा घडावी ॥३॥
अस्मिन्नवसरीं पिशुनजनीं । असत्य भाषणें कथोनी ॥
अप्रीती उत्पन्न केली मनीं । बाळाजी पंडित प्रधानवर्या ॥४॥
हेही देवमाया घडली । संदेह नसतां चित्तवृत्ति फिरली ॥
पूर्ववत्‍ न देखतां ममता झाली । बुध्दि उव्दिग्र माझीही ॥५॥
इंगितें भाव कळतां जाण । तेंचि निमित्त करोनि पूर्ण ॥
केलें दक्षिणदेशाटन  । तीर्थाटन मुख्यत्वें ॥६॥
श्रीशैल, व्यंकटेश, रामेश्वर, कांची, कुंभकोण, श्रीरंगपट्टण, बेलूर, कोल्हापूर वगैरे अनेक क्षेत्रें पाहून पुण्यास निरंजनमाधव आले व  ‘इष्टमित्रा ’ च्या गांठी पडून महासमाराधन केलें. नानासाहेबांचा पुनरपि लोभ जडून शिबिकादि संपत्ति देऊन त्यांस महत्पद अर्पण केलें व श्रीरंगपट्टणीं पाठविलें. निरंजनांच्या हातून मोठालीं कार्ये झाली, पण मुख्य विश्रांतिस्थान त्यांच्या मनास अध्यात्मचिंतन व ह्रिभक्ती यांतच होतें. कृष्णानंदसिंधु ग्रंथ रचण्यास यांनी पुण्यास आल्यावर संपला. सुंदरकांड समाप्त होतांच आपण्णा पंडित ह्मणून एका सिध्दानें राममंत्र उपदेशून रामरहस्य निरंजनकवीस सांगितलें. त्यांच्या कृपेनें व त्यांच्या संगतींत हा ग्रंथ दोन वर्षांत संपला. वरील तीर्थयात्रेसंबंधीं कवि म्हणतो: -
सर्वदेवतादर्शनें । महानदीतीर्थस्नानें ।
महाक्षेत्रसेवनें । पाप हरलें जन्माचें ॥१॥
नाना देश संचार करितां । नानास्थळीं फिरतां ।
नाना परीचे सत्पुरुष संतां । पाहोनि झालों कृतार्थ ॥२॥
असो; दुसर्‍या गुरुची व त्यांच्या सिध्देश्वर सांप्रदायाची हकीगत त्यांच्या नवीनच उपलब्ध झालेल्या ग्रंथावरुन देऊन हा चरित्रभाग पूर्ण करितों.

२ सिध्देश्वरसांप्रदाय.

निरंजनमाधवाच्या चरित्राचा उत्तरार्थ व त्याच्या दुसर्‍या गुरुची व सिध्देश्वरसांप्रदायाची माहिती सांगून एकनाथमहाराजांच्या समकालीन अशा एका सिध्दानें रचिलेल्या व आजवर अनुपलब्ध अशा एका अनुपम ग्रंथाचाही स्फोट करावयाचा आहे.
==
गंगावतीनें पुनरपि विचारले, “ पहिला दत्तसांप्रदाय लक्ष्मीधरगुरुच्या कृपेनें धरिला असून दुसरा सिध्देश्वरसांप्रदाय आपण कां धरिला ? प्रथमांत काय पूर्णता नव्हती म्हणून दुसरा लोकीं रुढविलात ?” हा प्रश्न ऐकून निरंजनास हर्ष झाला : -
निजसुंदरीची प्रेमझरी । तथापि विज्ञापनाकुसरी ।
श्रवण करोनि हर्षितातरीं । प्रत्युतरीं प्रमोदवित ॥१॥
ज्ञानसुधेंत सांर्पदायपध्दति सांगितली असून कवीनें ती पुन: स्त्रीस येथें सांगितली.लक्ष्मीधराच्या कृपेनें सातार्‍यास सप्तवर्षींवर असतां २२ व्या वर्षी महाविद्या निरंजनास प्राप्त झाली. नंतर बाजीरवानें त्यास राजकारणासाठी तंजावरास पाठविलें: -
अस्मिन्नवसरीं बाजीरावप्रधानें । सेवा सांगोनि परम मानें ॥
शिबिकादि संपत्तिदानें । चंदावर संस्थाना पाठविलें ॥१॥
तेथील कार्यभागभार । पडला कांहीं संवत्सर ॥
येतां जातां सद्‍गुरुवर । भेटतांही तांतडी ॥२॥
निरंजनास कांहीं वर्षें तंजावर प्रांतीच काढावीं लागलीं स्वामिसेवातत्पर राहूनही जपादिकर्म व सद्‍ग्रंथव्यासंग त्यानें सोडिला नाहीं. तंजावरीं राहाण्यानेंच ‘ काव्यनाटककळाकुसरी । नानाविनोद राजसभांतरीं ’ वगैरे गुण त्यास प्राप्त झाले. पुण्यापासून तंजावरपर्यंत सर्व दक्षिण देश नेहमीं फिरावा लागल्यामुळें व्यावहारिक ज्ञान निरंजनास प्राप्त होऊन मोठमोठे पंडित, वैदिक व संतमहंत यांच्या गांठी पडल्या. निरंजनच म्हणतो कीं, पंडितसंगति, साधुसहवास, अनेक देशाटण, व बहुशाषानैपुण्य हे फायदे आपणांस झाले. ‘ सर्वभाषापरिज्ञान । घडों आलें देशाटणें ।’ तंजावराहून पुण्यास जातां येतां सातार्‍यास राहून लक्ष्मीधराचें दर्शन घेत निरंजनानें कांहीं वर्षे काढलीं
सर्वत्रस्थळीं मान्यता । सभास्थानीं निर्भयता ।
तत्काळ स्फूर्ति सुभाषता । चमत्कारता नृपादिकां ॥१॥
प्रतिवादि मुखस्तंभन । सर्व मान्य होय भाषण । ...
वगैरे प्रकारचें चातुर्य आपणांस कसें प्राप्त झालें हेंही निरंजनानें सांगितलेम आहे. अशी कांहीं वर्षे जातां सद्‍गुरु लक्ष्मीधर परलोकीं गेल्याचें निरंजनास कळलें. तेव्हां त्यानें अनिवार शोक केला. त्याचें गुरुभक्तिपूर्ण असें वर्णन त्यानें केलें आहे.
बाळक असतां स्तनंधय । मातृवियोग जैसा होय ।
तैसा ‘ उदरकार्यार्थ परिश्रमी ’ असतां निरंजनास शोक झाला . सात अहोरात्र त्यानें उदकप्राशनही केलें नाहीं. सातव्या रात्रीं लक्ष्मीधरानें स्वप्रांत दर्शन देऊन त्यांचे सांत्वन केलें व सांगितलें कीं, आजपासून सातव्या दिवशीं तुला आमची विभूती भेटेल. स्वप्रवाक्यांचा विश्वास प्राज्ञ पुरुष मानीत नाहींत, म्हणून निरंजन स्वस्थ होते; पण खालीं वर्णन केल्याप्रमाणें गुरुवाक्य खरें झालें. गणेशसुत बापजीपंडित म्हणून बाजीरावाचे स्नेही नियोगकर्मांत अत्यंत कुशल व मोठे राजकारणी होते; निरंजनाच्या बंधूचा व त्यांचा स्नेह फार. पण त्यांचे हृद्रत कोणासही कळायचें नाहीं, असें खोल बुध्दीचे होते. तसेच ‘ व्यापरवृतीमाजी कोणी । यासम नसे पुरुषमणी, ’ राजकारणासाठीं बाजीरावानें उभयतांना एकत्र पाठविलें.निंत्य राहटी पाहतां व ज्ञानकळेची गोठी कळतां परस्पर प्रेममिठी पडली . सर्व व्यवहार करीत असतां बापजींची समाधि स्थिर असे. त्याची जितेंद्रियता, शांति व सहज निर्विकल्प स्थिति पाहून निरंजनाची त्यांचे ठिकाणीं श्रध्दा बदली. त्यांचेजवळ शिष्यमंडळी होती त्यांस ते “ बाळबोध  ” ग्रंथ नित्य पढवीत. त्यांनी निरंजनावर पुरती दया  केली -
षण्मुखा खेचरी मुद्रा दोनी । दावोनी लक्षानुसंधानीं ।
मुक्त केलें अर्धक्षणीं । कोटि जन्मीं जें साधिजे ॥
ते एका पळांतरी । देवोनि कृतार्थ केले परी ।
तारक होवोनि संसारीं । तारिलें कृपाकटाक्षें ॥२॥
बापजी पंडितांच्या वरानें निरंजनास प्रत्यक्ष ब्रह्मदर्शन होऊन ते जीवन्मुक्त झाले. त्यांच्या कृप्रेनें: -
परमार्थविषयीं कोठें कांहीं । अणुमात्र गुंता राहिला नाहीं ॥
असें नि:संदेह पद निरंजनास प्राप्त झालें. याप्रमाणें लक्ष्मीधर व बापदेव हे दोन सद्‍गुरु निरंजनास मिळाले.
लक्ष्मीधरें महावाक्य उपदेश केला । बापदेवीं तो अर्थ प्रकट दाविला ॥
स्वानुभव आणोनि दिधला । हृदयीं लाविला ज्ञानदीप ॥१॥
गंगेत मिळण्यापूर्वीची यमुना जशी गंगेशीं एकरुप होऊन पुढें सिधेश्वरसांप्रदायांत मिळाला. चरम गुरु बापदेव म्हणॊन सिध्देश्वरसांप्रदायच निरंजनानें चालविला. याप्रमाणें दुसर्‍या गुरुची हकीकत देऊन निरंजनमाधव म्हणतात: -
मंत्रयोगीं लक्ष्मीधर । ज्ञानयोगीं बापदेव गुरुवर ॥
दोघेही एकाकार । मंगलचरणीं वंदिजे ॥१॥
==
या सिध्देश्वरसांप्रदायाचा उगम नाथांच्या काळी महाराष्ट्रांत जी घर्मजागृती झाली तींत आहे. या सांप्रदायाचा मूळ पुरुष त्र्यंबकराज असून त्याचा मुख्य ग्रंथ “ बाळबोध ” उर्फ “ बालावबोध ” हा होय. कृष्णदेवाचा सुत भैरव नामक माध्यंदिन शाखेचा यजुर्वेदी ब्राह्मण होता. तो राजयोगी व ब्रह्मनिष्ठ असून तुळजापुरची देवी अनुष्ठानानें त्यानें प्रसन्न केलीइ. तिनें त्यास तीन फळें दिलीं व सांगितलें की, तुला तीन पुत्र होतील व मधल्याच्या हातावर त्रिशूळ दिसेल. तो मदंश समज. याप्रमाणें भैरवास तीन पुत्र झाले. त्यांची नावे नरसिंह, त्र्यंबक व कौंडएण्य; आई भारव्दाजगोत्री अंबावती नांवाची होती. बापानें मधल्या मुलास विद्या दिली नाहीं तो लग्न करणार नाही ही भीति त्यास वाटे. बाप वारल्यावर त्र्यंबकानें आपणच गृहस्थधर्म चालविला. वडील बंधूनें उपदेश केला. नंतर ज्ञानी कमलाकर या साधूनेंही त्यास बोधिलें. पुढें चंडीची सेवा आरंभिली. नंतर सप्तशृंगीच्या डोंगरावर जाऊन देवी प्रसन्न करुन घेतल्यावर सिध्देश्वर ( श्रीशंकर ) यांनींही, पांच वचनें उपदेशिलीं. त्याचा विस्तार करुन त्र्यंबकरावानें ‘ बालबोध ’ नामक ग्रंथ केला ; तो शेक १९९४ वांत प्रारंभ करुन शके १५०२ मध्यें संपविला. ( या ग्रंथाची संपूर्ण प्रत निरंजनमाधवानेंच इ स. १७६४ मध्यें केलेली मला मिळाली आहे. दुसरीही एक अपूर्ण प्रत इ स. १७३८ मध्येंच त्यानें केली आहे. यावरुन पहिल्या बाजीरावाच्याच कारकीर्दीत निरंजनमाधवाचें सातार्‍यास येणें झालें व लक्ष्मीधर व बापदेव या दोन्ही गुरुंचा अनुग्रह होऊन त्यानें काव्य रचण्यासही सुरवात केली हें उघड दिसतें. ) त्र्यंबकरायानेंच वरील हकीकत आपल्या बालबोध ग्रंथांत दिली आहे. ह्या ग्रंथाचे खंड तीन असून ओवी संख्या ५२४० आहे. यांत ४५ कथनें आहेत. ग्रंथ मोठा प्रौढ असून वेदांतादि शास्त्रांचा खुलासा फार सुबोधपणें केला आहे. ‘ हे महाराष्ट्र परि बरवें । शास्त्रादोहन आहे. ’ असें त्र्यंबकराज योगी म्हणतात. हा ‘ बालबोध ’ नाथांचे भागवत, माधव. दासांचें योगवासिष्ट हे तीनही प्राकृत ग्रंथ महाराष्ट्र भाग्योदयाच्या वेळचे असून दहा पांच वर्षांच्या अंतरानें रचलेले आहेत. त्यामुळें शाहाजीच्या जन्मापूर्वींची महाराष्ट्राची सामाजिक व धार्मिक स्थिति समजण्यास हे व यांच्या काळचे दुसरे ग्रंथ फार उपयोगीं पडणार आहेत. मराठी भाषेविषयीं त्र्यंबकरायाचे उद्रार पहा : -
जैसव सुखासनाचा मार्गु  । तैसा महाराष्ट्र - प्रसंगु ॥
अंगीं बाणे राजयोगु । रोकडाची ॥१॥
ये मराठी पल्लवें । जीव उगमातें पावे ॥
तरी कासया उलथावे ।  पानाचे कवळे ॥२॥
वापीकूप देवराणी । मध्यें सखोल अर्थपाणी ॥
तें सुदेशीं सेंदनी भरुनि । आहाच कीजे ॥३॥
आणि संस्कृत केवळ । अथें करावें प्रांजळ ॥
येरवी रक्षितां फळ । कोण त्याचें ॥४॥
अर्थ ज्ञान पदें प्रासें । वरी बैसतीं प्रमाणें सुरसें ॥
ते मर्‍हाठी पुरवील भडसे । विव्दज्जनाचे ॥५॥
धन्य धन्य हे मर्‍हाटी । ब्रह्मविद्येची कसवटी ॥
हा ‘ बालबोध ’ म्हणजे दासबोधाचा पूर्व जन्मच दिसतो. याची भाषाशैली ३२५ वर्षांपोर्वीची असल्यामुळें ज्ञानेश्वरी - भाषेच्या जवळ जाते. या ग्रंथरुपी मालिकेत एकदां ओंवलेला शब्दमणी पुन: आणलेला नाहीं, संस्कृताची गोडी या ओव्यांत आणली आहे, हा मननपूर्वक वाचतांच सर्व शास्त्रांचें सार आकलन करितां येईल, व ब्रह्मसायुज्यता मिळेल, असें त्र्यंबकराय म्हणतात व ग्रंथ वाचल्यास त्यांचें म्हणणें प्रत्येकास यर्थाथ वाटेल असें मला वाटते. अस्तु .
==
त्र्यंबकरायाची थोडी माहिती निरंजनमाधवानें बापजीपंताचें वर्णन देत असतांना दिली आहे. बाळबोधाची प्रशंसा केली आहे व सांप्रदाय परंपरा खालीलप्रमाणें दिली आहे. त्र्यंबकराजाचे गुर परानंद; त्यांचे विज्ञाननंद, त्यांचे कमलानंद, त्यांचे शिवानंद, त्यांचे चिन्मयानंद व त्यांचे चिन्मयानंद व त्यांचे शिष्य गणेशसुत बापजीपंडित उर्फ महामौळी हे होत.
==
‘सांप्रदायपरिमळ’ ग्रंथांत कवीनें आत्मचरित्र व सांप्रदायपरंपरा दिल्या आहेत. त्यांच्याच शब्दांत मी एथवर हकीकत दिली आहे. पुढें कवीनें आपल्या सांप्रदायाचे नियम दिले आहेत. ते येथें देण्याचें कारण नाही. तरी निरंजनाचें धर्ममतौदार्य किती होतें हें दाखविण्यासाठीं ओव्या देतों: -
सर्व धर्माची साहायता । करावी सामर्थ्य असतां ॥
आपल्या धर्मविहिता । सदा फार जपावें ॥१॥
परधर्माचें आचरण । आपण कदापि न कीजे जाण ॥
परंतु परधर्म पाहोन । संतोष मानावा मानसीं ॥२॥
हें ईश्वराचें कौतुक । ईश्वर मायाचालक ॥
अनेकमार्गदर्शक । ईश्वर सर्व ॥३॥
यातीन ओव्यांत परधर्मसहिष्णुतेचें केवढें उदार तत्व गोवलें आहे तें पहा ! हा सिध्दांत परधर्माची निंदा करणार्‍या स्वधर्मोत्कर्षेच्छूनें हॄदयपुटीं ठेवावा !
==
ग्रंथसमाप्तीचे प्रसंगीं निरंजनमाधव आपल्या पत्नीस म्हणतात: -
तूं तंव भक्तिमती नारी । माझी परम प्रिय सुंदरी ॥
ह्मणोनि गुरुसांप्रदायकथा विस्तरीं । कथिलीं म्या प्रेमें ॥
गौरी शंकराची वल्लभा । किंवा सूर्याची प्रभा ॥  
अग्रिशक्ति शुभा । स्वाहा जैशी ॥२॥
किंवा चंद्राची दिप्ति । किंवा वायूची सदागती ॥
कुबेराची संपत्ति । तैशी तूं सती मम प्रिया ॥३॥
किंवा ब्रह्माणी ब्रह्माची । इंदिरा जैशी विष्णूची ॥
प्राणप्रिया आत्मयाची । चित्कळा तेंवि ॥४॥
जैशी शर्करेची मधुरता । कीं उदकाची शीतळता ॥
सुधेची शुभ्रता । नये निवडितां भिन्नत्वें ॥५॥
तुज मज भिन्नभाव तत्वता । नसोन दिसे बोलापुरता ॥
जललहरी हे वार्ता । उपाधीकृत ॥६॥
====
असो. आतां या दोन्ही लेखांतील महत्त्वाचे मुद्दे वाचकांनीं लक्षांत ठेवण्यासारखे आहेत ते,

पृथ्वीरत्न बाजीरावाची स्तुति कवीनें केलेली यथार्थ आहे. बाळाजी बाजीरावाची राजकार्यनैपुण्याची कवीनें तारीफ केली आहे. व “बाळाजीपंडित प्रभुवर । मुख्य प्रधान परि राजेश्वर” म्हणून त्याच्या वाढलेल्या सत्तेचा उल्लेख केला आहे. कवीचें व त्यांचें किंचित्‍ मधें बिनसलें होतें, तेव्हां इंगितज्ञ व निस्पृह अशा निरंजनमाधवानें तीर्थयात्रेच्या मिषानें पुण्यांतून पाय कां काढला याचेंहीं कारण त्यानेंच दिलेलें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. पिशुनजनांनीं असत्य भाषणें करुन नानासाहेबांचे मत आपल्याविषयीं कलुषित केलें असें कवि म्हणतो .

निरंजनमाधवाच्या प्रवासांवरुन व तीर्थयात्रांवरुन त्या काळच्या स्थितीची कल्पना होते. बापजी पंडितासारखीं प्रपंच व राजकारण हीं दक्षतेनें करणारीं माणसें वस्तुत: अलिप्त असून नित्य समाधिसुखाचा अनुभव घेणारीं अशीं शें - दीडशें वर्षांपूर्वी आपल्या समाजांत फार असत. नौकरीच्या पेशाच्या लोकांना स्नानसंध्येलाही वेळ मिळत नाहीं, म्हणून अलीकडे कांहीं लोक कुरकुरतात ! निरंजनाची योगांत व परमार्थांत गति फारच झाली होती.

निरंजनमाधव व त्यांची पत्नी गंगावती यांचे परस्परसंवाद वाचून व निरंजनानें तिच्यासाठीं काव्यें केलीं, तिला परोपरीने गोड, प्रेमळ व सन्मानपूर्वक शब्दांनी आळवून आपली शिष्यीण व सांप्रदायाची कर्ती शास्ती केली यावरुन व शेवटच्या पतिपत्नीच्या अभेदरुपाचें वर्णन वाचून आमच्या समाजांत स्त्रियांस शिक्षण कसें देत व किती मानीत हें कोणासही कळणार आहे. ‘निजसुंसरीची प्रेमझरी । तत्रापि विज्ञापना कुसरी’ या गुणांनी पतीस मोहणार्‍या स्त्रिया जुन्या पध्दतीच्या शिक्षणानेंही तयार होतील एवढें यावरुन दिसतें. आका, वेणू, जनाबाई, मुक्ताबाई, इत्यादि स्त्रियांचीं काव्यें, वामनानें आपल्या गिराबाई स्त्रीसाठीं प्रियासुधा ग्रंथ केला, निरंजनमाधवानें पांच सहा ग्रंथ केवळ स्त्रीसाठीं करुन तिला आपल्या योग्यतेला आणली, मोरोपंत आपलीं काव्यें मुलीकडून व सुनांकडून वाचवून घेत, वगैरे प्रकार डोळयांपुढें असूनही आपल्या स्त्रियांच्या अज्ञानाविषयीं, अशिक्षणांविषयीं जे वृथा प्रलाप काढतात त्यांना काय म्हणावें हेंच मला समजत नाहीं !

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP