मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|श्री स्वामी समर्थ सप्तशती| अध्याय सातवा श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा स्वामी समर्थ सप्तशती - अध्याय सातवा श्री दत्तावधूत विरचित ' श्री स्वामी समर्थ सप्तशती ' ही उपासना करण्यासाठी खूप दिव्य पोथी आहे. Tags : dattavadhootpothisamarthaदत्तावधूतपोथीसमर्थ अध्याय सातवा Translation - भाषांतर श्री गणेशाय नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ॥संतती संपत्ती आरोग्य । विद्या ज्ञान वैराग्य । आत्मज्ञान आणि योग । सर्वही मिळे भक्तांना ॥१॥अंधाशी नेत्र मिळत । दरिद्री होई श्रीमंत । व्याधी निवारण होत । समर्थकृपे करोनिया ॥२॥असो प्रज्ञापुरात । स्वामी समर्थ होते राहत । नित्य लीला करीत । उध्दाराया भक्तांसी ॥३॥नास्तिका आस्तिक करीत । अभक्ता मार्गा लावीत । दृष्टा सज्जन बनवीत । ऐसा महिमा तयांचा ॥४॥गर्विष्ठासी तडाखे देत । आणि मार्गावरी आणीत । अहंकार दवडूनी देवत्व । दिले कीत्येक भक्तांना ॥५॥एक साधू किमयागार । नित्य सुवर्ण करी तयार । दर्शना लोक थोर थोर । नित्य जाती तयाच्या ॥६॥आढयतेने बोले नित्य । म्हणे मी रसायन सिध्द । जो तांब्याचे सुवर्ण करीत । खरा सिध्द म्हणा त्यासी ॥७॥जो किमया करु शकत । त्यासीच म्हणावे खरा नाथ । इतर भोंदू असत । म्हणोनी लोका सांगतसे ॥८॥मच्छिंद्र आणि गोरक्ष । जालंदर आणि दत्त । सारे किमया करीत ।म्हणोनी मोठे होते ते ॥९॥मीच एक सांप्रत । सोने निर्माण करीत । नाथांनंतर सिध्द । एकची पाहा मी असे ॥१०॥ऐसे लोका सांगत । चिमलीतून सोने काढीत । लोक जयजयकार करीत । होते पाहा तयाचा ॥११॥पक्कान्नांच्या पंगती उठत । अनेक त्याते मानीत । म्हणोनी गर्व होत । सिध्द स्वत: सी म्हणत असे ॥१२॥घोडा गाडी वैभव । संपत्ती विपुल वैभव । सुखोपभोग सर्व । जवळी असती तयाच्या ॥१३॥म्हणोनिया माजत । म्हणे मीच एक सिध्द । मजविण या जगात । सिध्द कोणी असेना ॥१४॥रात्रीच्या अंधारात । गर्वाने तारे चमकत । सूर्योदय जव होत । पळोनिया जाती ते ॥१५॥सिंह न दिसे जोवरी । जंबुक गर्जती अपारी । पाहता सिंहाते सत्वरी । पळोनिया जाती ते ॥१६॥कोणी न भेटे सव्वाशेर । म्हणोनी गर्जे किमयागार । परी स्वामी ईश्वर । सारे काही जाणतसे ॥१७॥किमयागार नाशिकात । होता पाहा तेव्हा राहत । लोकांसमोर वल्गना करीत । मोठा सिध्द म्हणोनिया ॥१८॥नाशिकात बाबा घोलप । होते कपालेश्वर मंदिरात । वामनबुवा ब्रह्मनिष्ठा । येती दर्शना तयांच्या ॥१९॥बाबा घोलप वामन ब्रह्मनिष्ठा । उभयता असती बोलत । विषय किमयागाराचा निघत । कैसा गर्विष्ठ तो असे ॥२०॥जावे पाहावे तयास । ऐसे वाटे मनास । म्हणूनी निघाले दर्शनास । त्याच वेळी तेधवा ॥२१॥बाबा आणि वामन । तैसेची काही भक्तजन । जावोनी घेती दर्शन । किमयागार साधूचे ॥२२॥साधू म्हणे तयालागोन । आम्ही तयार करितो सोने । आम्हासम बलवान । नाही पाहा कोणीही ॥२३॥मच्छिंद्र गोरक्ष आणि दत्त । हेही होते किमया करीत । ज्यासी किमया न येत । साधू त्यासी म्हणो नये ॥२४॥तव वामन ब्रह्मनिष्ठ । तया किमयागारासी म्हणत । तुमचे बोलणे समजत । नाही पाहा आम्हासी ॥२५॥वैराग्य आणि ज्ञान । शांती आणि समाधान । हे साधूचे लक्षण । ऐसे आम्हा वाटते ॥२६॥ऐसे ऐकता वचन । साधू जाई खवळोन । म्हणे तुमचा गुरु कोण । काय नाव तयाचे हो॥२७॥वामन ब्रह्मनिष्ठ म्हणत । अक्कलकोटचे स्वामी समर्थ । तेची आमुची गुरु असत । ऐसे म्हणती तयांना ॥२८॥समर्थ नाव ऐकोन । साधू जाई खवळोन । समर्थांसी दूषण । देवोनी भक्ता पुसत असे ॥२९॥हे कैसे स्वामी समर्थ । ते का नाही किमया करत । जरी ते सोने निर्मित । तरीच आम्ही मानू तया ॥३०॥तव म्हणती समर्थ भक्त । ते नाही किमया करत । परी त्यांची कृपा होत । जग सुवर्ण दिसत असे ॥३१॥ते सर्पाचे सोने करीत । हाडांचेही सोने करीत । मातीचे सोने करीत । ऐसा महिमा तयांचा ॥३२॥ऐकोनी ऐसे वचन । साधू विस्मित होवोन । म्हणे तुमचे भाषण । सत्य का मी मानावे ॥३३॥जरी ते समर्थ असत । मज चमत्कार दावीत । तेव्हाच तुमचे सत्य । मानेन जाणा निर्धार ॥३४॥ना तरी या दुनियेत । किती तरी ढोंगी असत । आणि त्यांचेही भक्त । प्रचार करिती तयांचा ॥३५॥ऐसे म्हणोनी किमयागार । देई समर्थ भक्ता उत्तर । असो तेथूनी सर्व । परतले आपुल्या स्थानासी ॥३६॥आपुले स्थानी परतोन । सर्व एकत्र बैसोन । स्वामी समर्था लागोन । प्रार्थना करिती सर्वही ॥३७॥हे अवधूता दत्ता । सच्चिदानंद स्वामी समर्था । दावी आपुली सत्ता । तया किमयागारासी ॥३८॥ऐसे सर्वही प्रार्थून । झाले पाहा निद्राधीन । इकडे काय वर्तमान । घडले पाहा काय ते ॥३९॥प्रभातकाळी उठोन । चारी बाजूस पडदे लावून । किमया करण्या लागोन । साधू पाहा तो बैसला ॥४०॥सोने न होता झाले कोळसे । पाहोनी साधूस लागले पिसे । म्हणे हे ऐसे कैसे । झाले मजला कळेना ॥४१॥विचार करी मनात । निंदिले स्वामी समर्थ । जरी असती सिध्द । चमत्कार दावा म्हटले मी ॥४२॥तात्काळ माणसे पाठवीत । समर्थ भक्ता पाचारीत । म्हणे मी अपराधी असत । सच्चा स्वामी तुमचा हो ॥४३॥तेणे केली मज शिक्षा । गेली माझी सर्व विद्या । किमया न ये मज आता । सोने काही होईना ॥४४॥ऐसे पश्चात्तापे म्हणेन । धरी वामनाचे चरण । म्हणे मज गुरुदर्शन । सांगा केव्हा होईल ते ॥४५॥आता होईल जव दर्शन । तेव्हा अन्नग्रहण करेन । ऐसे म्हणोनी प्रयाण । अक्कलकोटासी तो करे ॥४६॥प्रज्ञापुरी येऊन । घेई स्वामी दर्शन । ‘माजलास का रे ’म्हणोन । स्वामी पुसती तयालागी ॥४७॥काय झाले किमयेचे । कोळसे झाले सोन्याचे । चमत्कार कसले पाहायचे । ऐसे म्हणती तयाला ॥४८॥‘ क्या देखता है इधर ’ । ‘ देख रे देख उधर ’ । ऐसे ऐकोनी उद्गार । साधू पाहो लागला ॥४९॥कडुनिंबाच्या वृक्षातून । पाणी वाहे सुवर्णवर्ण । तैसेची वृक्ष संपूर्ण । सुवर्णाचा दिसत असे ॥५०॥पाणी पडे जमिनीवर । ती भूमी होई सुवर्ण । साधू होई कंपायमान । पाहोनी लीला स्वामींची ॥५१॥ऐसे होता अकस्मात । समाधी त्यासी लागत । समाधी माजी पाहत । हिरण्यगर्भ श्री स्वामी ॥५२॥संपूर्ण विश्व हिरण्यमय । स्वामी समर्थ हिरण्यमय । हे विश्व सर्व चिन्मय । ऐसे ज्ञान होत असे ॥५३॥चार तासांनंतर । पुन्हा येई भानावर । करी साष्टांग नमस्कार । समर्थांसी तेधवा ॥५४॥म्हणे मी अज्ञान । पडलो मायेत गुंतोन । परी तू गुरु दयाळ पूर्ण । ओढोनी माते काढिले ॥५५॥काही सेवा न करता । उध्दार केला माझा आता । ऐसे करुणाकर्ता । समर्थ एकची आपण हो ॥५६॥काही सेवा नाही केली । निंदा परी बहु केली । दूषणे आपणा दिली । तरी माते उध्दरिले ॥५७॥न कळे ही काय करुणा । कैसे आपण दयाघना । ऐसे म्हणोनी चरणा । घट्ट साधू धरीतसे ॥५८॥दत्तगुरु स्वामी समर्था । पूर्ण परब्रह्म अवधूता । काय वर्णू तुझी सत्ता । धन्य माते उध्दरिले ॥५९॥ऐसे पुन्हा पुन्हा म्हणत । परमानंदे डोले चित्त । निंदकासीही उध्दरीत । समर्थ स्वामी सद्गुरु ॥६०॥सद्य: सिध्द समागमा । ऐसा वेद वर्णे महिमा । दत्तगुरु तू निष्कामा । उध्दरीले आज मजलागी ॥६१॥नाही काही सेवा केली । निंदा मात्र बहू केली । परी तू दयाळ माऊली । उध्दार माझा केला तू ॥६२॥हे दत्तगुरु स्वामी समर्था । सांगा आज्ञा काय आता । यापुढे प्रतिक्षण चित्ता । राहो ध्यान चरणांचे ॥६३॥ऐसे ऐकोनी नम्र वचन । स्वामी समर्थ दयाघन । बोलले जे गंभीर वचन । श्रोते तुम्ही अवधारा ॥६४॥माहूरगडी जावोनी । राहा म्हणती दत्तमुनी । मृगचर्म आणि कफनी । देती तया साधूला ॥६५॥साधू माहूरगडा जात । तेथे दर्शन देती समर्थ । साधूचा उध्दार होत । स्वामी क्रृपे करोनिया ॥६६॥निंदकाही करिती सिध्द । ऐसी कधी न ऐकली मात । परी स्वामी समर्थ । अगाध लीला त्यांची हो ॥६७॥जो त्यांसी शरण गेला । त्यासी सिध्दपदी बैसविला । ऐसा महिमा आगळा । श्री स्वामी समर्थांचा हो ॥६८॥निंदकासीही उध्दरीत । सद्भक्ता ज्ञान देत ।मूढा विव्दान करीत । समर्थ स्वामी सद्गुरु ॥६९॥ऐसा स्वामी समर्थ । भक्ताजना उध्दरीत । ते सर्व जन भाग्यवंत । पाहिले ज्यांनी डोळ्याने ॥७०॥॥ अध्याय सातवा ॥ ॥ ओवी संख्या ७०॥स्वामी थोडे उच्च आसनावर बसले आहेत. त्यांच्या बाजूला श्री साईबाबा , श्री गजानन महाराज, श्री कृष्ण सरस्वती, श्री गोंदवलेकर महाराज, श्री शंकर महाराज, श्री काळबुवा , श्री रामकृष्ण परमहंस, श्री बिडकर महाराज असे शिष्य बसलेले आहेत. N/A References : N/A Last Updated : January 14, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP