लघुभागवत - अध्याय ८ वा

लघुभागवत हे एक उपपुराण आहे.


एकदां नारद ऋषीश्वर । इंद्रलोकीं बोलिले सादर ।
जैसा पुरुरवा नृप सुंदर । तैसा कोणी दिसेना ॥१॥
तें एकोनि अप्सरा उर्वशी । मोहें इच्छा धरी मानसीं ।
वरुनि ऐशाचि वरासी । देह सार्थकीं लावीन ॥२॥
मग पुरुरव्यासी भेटोनी । ह्मणे इच्छा उदेली मन्मनीं ।
अर्पीन काया करग्रहणीं । तुझिया हातीं राजया ॥३॥
परी माझ्या  प्रतिज्ञा दोन । पाळीन ऐसें देसी  वचन ।
तरी तुजसंगें रात्रदिन । आयुष्य वेंचीन निर्धारें ॥४॥
माझे दोन अज प्रेमळ । पाळिले जैसे पोटीचें बाळ ।
त्यांसी उपद्रव होतां तत्काळ । स्वर्गलोकीं जाईन मी ॥५॥
तैसेंचि दुर्मिळ अमृत । त्याच्या अभावीं प्राशीन घृत ।
आणि अन्न वर्जीन सतत । इतुकें मान्य असावें ॥६॥
मग मी राजया । होईन आपली जाया ।
येविषयीं संशया । धरुं नये अंतरी ॥७॥
येरु ह्मणे शपथपूर्वक । सांगते घडेल ऐच्छिक ।
अनुभवें कळेल, आज अधिक । स्वमुखें काय बोलावें ॥८॥
त्यापरी बहु काळ आनंदें । पुरुरव्यासीं उर्वशी नांदे ।
तैसाचि येरु स्वच्छंदें । भोगी सुख तिजसंगें ॥९॥
इकडे स्वर्गी इंद्राप्रती । उर्वशीचा ध्यास चित्तीं ।
गंधर्वासी म्हणे कांहीं युक्ती ।योजूनि उर्वशी आणावी ॥१०॥
मग गंधर्वी कपटाचार। करुनि पळविले अज दूर ।
उर्वशीस कळतां समाचार । स्वर्गी सक्रोध परतली ॥११॥
तेव्हां राजासी विरहकष्ट । असह्य होऊनि जैसा भ्रमिष्ट ।
तैसा रानोमाळ फिरे; अदृष्ट । कोणातेंही चुकेना ॥१२॥
पुरुरवा चतुर गाढा । परी स्त्रीविरहें झाला वेडा ।
म्हणे कैसी टळेल पीडा । प्रारब्धाची कळेना ॥१३॥
मग सरस्वती नदीतटीं । फिरत असतां वाळुवंटीं ।
राजानें देखिली दृष्टीं । उर्वशी तैं अवचित ॥१४॥
तंव त्यासी येऊनि गहिंवर । वाहे अश्रूंचा नयनीं पूर ।
कंठ दाटुनि शब्दोच्चार । स्पष्ट ओष्ठीं उमटेना ॥१५॥
तीस म्हणे मी तुजसाठीं । विरहदु:खे झालों कष्टी ।
दुर्दशा माझी देखोनि दृष्टीं । करीं करुणा वेल्हाळे ॥१६॥
तेव्हां वदे ती नृपनंदना । गंधर्वांची करितां प्रार्थना ।
ते करितील कांहीं सूचना । तैसें तुवां वर्तावें ॥१७॥
तदनुसार पुरुरवा । प्रार्थिता होय गंधर्वा ।
त्यांनीं अर्पिला प्रसाद बरवा । अग्रिस्थाली तयासी ॥१८॥
मग त्या स्थालीची पूजा । नित्य करुं लागे राजा ।
त्या योगें निज उर्वशी भाजा । विसरुनि गेला अविलंबें ॥१९॥
आणि ईश्वराठायीं चित्त । वेधलें तयाचें सतत ।
गंधर्व लोक झाला प्राप्त । पुरुरव्यासी शेवटीं ॥२०॥
आतां परम पवित्र । ऐका रतिदेवाचें चरित्र ।
न देखतां सत्पात्र कुपात्र । दया करीजो सारखी ॥२१॥
रतिदेव नामें नृप एक । परम दयाळु धार्मिक ।
कीर्ति त्याची अलौकिक । भूतदयेकारणें ॥२२॥
राहे वनीं नित्य एकांती । ठेऊनियां संतुष्ट वृत्ती ।
देखतां कोणी क्षुधित अतिथी । त्याची तृप्ति करावी ॥२३॥
आपण आहों उपवासी ।  ही न धरितां स्मृति मानसीं ।
अल्प स्वल्प असेल पाशीं । तें क्षुधितासी अर्पावें ॥२४॥
ऐसा त्याचा नित्य नेम । कुटुंब सोसी केश परम ।
तरी त्याचा दान धर्म । लेशमात्र खंडेना ॥२५॥
एके प्रसंगीं दीड मास । कुटुंबासी घडला उपवास ।
तवं सुदैवें एक मानुष । आला आमान्न घेउनी ॥२६॥
उदक सांजा घृत क्षीर । ऐसे विपुल पदार्थ चार ।
अर्पितां होय संतोष अपार । सकलांतें कुटुंबीं ॥२७॥
कीं येणें होईल क्षुधाशांती । ऐसें निर्धारिलें चित्तीं ।
तंव व्दारीं एक अतिथी । उभा ठेला येउनी ॥२८॥
तेव्हां रतिदेव तोष पावे । त्यासी म्हणे आतृप्त जेवावें ।
मग शेषान्न समस्तीं घ्यावें । तोंचि शूद्र पातला ॥२९॥
शूद्र तरी आहेचि मनुष्य । त्यासी आरोग्य आयुष्य ।
पाहिजेचि अवश्य । म्हणोनि त्यासी वाढिलें ॥३०॥
सर्वांवरी सारखें  प्रेम । ठेवी तोचि मनुष्य उत्तम ।
उच नीच मानावें हा अधर्म । घडे ईश्वरदृष्टीनें ॥३१॥
ऐसें रतिदेवाचें होतें मत । ह्मणूनि शूद्रही केला तृप्त ।
तोंचि आणिक एक अवचित । शुनीसह पातला ॥३२॥
रतिदेवें क्षुधित श्वान । देखूनि द्रवलें दयेनें मन ।
म्हणूनि त्यांतें शेष अन्न । संतुष्ट केलें देउनी ॥३३॥
मग शेष होतें जळ । तंव पातला चांडाळ ।
म्हणे झाले प्राण व्याकुळ । त्यासी उदक पाजिलें ॥३४॥
हे तिघेही नसूनि अतिथी । प्रत्यक्ष देव त्रिमूर्ती ।
औदार्याची प्रतीती । पहावया पातले ॥३५॥
रतिदेवाची भूतदया । देखूनि गमे कौतुक तयां ।
नाहीं उपमा वर्णावया । सकल जगीं शोधिता ॥३६॥
देव होऊनि प्रसन्न । माग म्हणती वरदान ।
येरु म्हणे करुनि नमन । नलगे कांहीं मजलागीं ॥३७॥
कर्तव्य म्हणूनि केलें सकळ । काय मागावें त्याचें फळ ।
उदार बुध्दि सर्वकाळ । ऐशीच माझी असावी ॥३८॥
निष्काम करितां कर्म । प्रसन्न होतो पुरुषोत्तम ।
ऐसें या चरित्राचें वर्म । जाणूनि तैसें  वर्तावें ॥३९॥
आतां यादवांविषयीं । सांगतों तुम्हांसी कांहीं ।
सांठवूनि ठेवा हृदयीं । यादवांचा इतिहास ॥४०॥
जैसे कुरुचे पुत्र कौरव । किंवा पंडुपुत्र पांडव ।
तैसे यदुवंशोत्पन्न यादव । नाम प्रख्यात पावले ॥४१॥
कीर्ति उत्साह शौर्य । धर्मश्रध्दा पराक्रम धैर्य ।
न्याय नीति औदार्य ।  यादवांचे गुण ऐसे ॥४२॥
भागवत ग्रंथीं केवळ । यादवांच्या कथा पुष्कळ ।
त्यांतही विशेषें रसाळ । चरित्र पवित्र कृष्णाचें ॥४३॥
यादवकुळीं अगणित ।उपजले वीर विख्यात ।
परी शेवटीं त्यांनीं आत्मघात । केला कलह करोनी ॥४४॥
जैसा कां कुठारदंड । आपुलेंचि छेदी गोत्र उदंड ।
तैसे यादव अखंड । आत्मनाशीं प्रवर्तले ॥४५॥
ऐसा संपूर्ण यादववंश । परिणामीं पावला नाश ।
इतुका भयंकर व्देष । गोत्रजांत मातला ॥४६॥
किंवा जैसा काननीं । डोंगरीं लागतां अग्री ।
भस्म करी जाळुनी । वृक्ष समस्त तेथींचे ॥४७॥
तैसे कलहाग्रीनें यादव । नामशेष झाले सर्व ।
तेव्हांपासूनि कलहाग्रीचें नांव । यादवी जनीं बोलती ॥४८॥
येथील इतुकाचि सारांश । कलह कोणा न देई यश ।
उभय पक्षांचा होतो नाश । नाहीं लेश सुखाचा ॥४९॥
म्हणूनि कलहापासूनि दूर । असावें तुम्ही निरंतर ।
शब्दांनीं शब्द साचार । वाढूनि वैर वाढतें ॥५०॥
ध्यानीं ठेऊनि हा बोध । बाळांनो रहाल सावध ।
तरी तुम्हा संताप खेद । नाहीं होणार कदापि ॥५१॥
आतां पुढील अनुसंधान । ऐका तुम्ही सावधान ।
होईल निश्चयें चित्त प्रसन्न । तैसेंचि कल्याण जन्माचें ॥५२॥
पूर्वी यादववंशीं शूरसेन । राजा होता सद्रुण संपन्न ।
मथुरा नगरीं बहु दिन । राज्य केलें तयानें ॥५३॥
शूरसेनाचा सुत । वसुदेव नामें विख्यात ।
देवकीसंगें विधियुक्त । लग्र झालें तयाचें ॥५४॥
देवकीचा जनक चतुर । उग्रसेन होता उदार ।
त्याचे पोटीं कुलांगार । जन्मला कंस अति दुष्ट ॥५५॥
असो लग्र झालें दिवस चार । यथायोग्य केला सत्कार ।
सकळांसी आनंद अपार । त्याकारणें जाहला ॥५६॥
वधू चालली सासरीं । वाद्यें वाजती नानापरी ।
कंस ही त्या अवसरीं । तिच्या संगें चालला ॥५७॥
भगिनीसी व्हावया तोष । घेऊनि कनकरथ सुवेष ।
परमानंदें जाय कंस । वरात मिरवे बहु गजरें ॥५८॥
कंस हांकी रथाचे अश्व । कौतुक करी सकल विश्व ।
बंधु भगिनीचें तें प्रेमसर्वस्व । साचार दिसे जन वदले ॥५९॥
तव पडे कंसाचे कर्णी । अवचित अमंगल वाणी ।
कंसा तूं मूर्ख शिरोमणी । अससी वाटे आम्हांते ॥६०॥
करुनि थोर समारंभ । माजविसी वरातीचा दंभ ।
परी इचा अष्टम गर्भ । तुज वधील निश्चयें ॥६१॥
ऐकुनि ऐसी आकाशवाणी । कंस दचके अंत:करणीं ।
त्यासी वाटे ही नव्हे भगिनी । परी वैरिणी जन्माची ॥६२॥
मावळलें हृदयींचें प्रेम । मतीसी पडे थोर भ्रम ।
विपरीत झाला मनोधर्म । आतांचि ईस वधावें ॥६३॥
जियेपासूनि माझी हानी । तीस कैसी म्हणावें भगिनी ।
तरी वध इचा निर्दयपणीं । अवश्य केला पाहिजे ॥६४॥
ऐसें योजूनि, त्याचि अवसरीं । कंठासी तिच्या शस्त्र धरी ।
कळवळोनि ती करुणस्वरीं । गाय जैशी हंबरडे ॥६५॥
अगा सुज्ञा बंधुराया । लागत्यें मी तुझे पायां ।
अन्याय नसतां मज वायां । वधिसी कां हें कळेना ॥६६॥
देखुनि देवकीची स्थिती । वर्‍हाडी सकळ हळहळती ।
उग्रसेनाच्याही चित्तीं । शोकवह्री पेटला ॥६७॥
झाला एकचि हाहा:कार । रडती समस्त नारीनर ।
पुढें काय करावें हा विचार । पडला, कांहीं सुचेना ॥६८॥
तेव्हां वसुदेव विनवी त्यासी । ऐसा अविचारें कां वर्तसी ।
पापार्णवीं वृथा बुडसी । रडसील जाण भोगितां ॥६९॥
परी कंस महादुष्ट ।त्यासी रुचेना हिताची गोष्ट ।
ह्मणे चुकवाया पुढील कष्ट । आधींच सावध असावें ॥७०॥
वसुदेव ह्मणे आइक । घेईं माझी येथेंचि भाक ।
देवकीचा पुत्र नि:शंक । अर्पीन तूर्ते जन्मतां ॥७१॥
परी अबला निरपराध ।वधूं पाहसी हें अघ अगाध ।
ऐसें वागणें नीतिविरुध्द । आहे घातक सर्वथा ॥७२॥
वसुदेव बोलतां ऐसें । देवकी सोडिली कंसें ।
परी तो साशंक मानसें । अहोरात्र संचित ॥७३॥
त्याचें चित्तीं उदेली कल्पना । कीं रिपुहस्तीं निजनंदना ।
मारा वया कोण शाहाणा । देईल जगीं आस्थेनें ॥७४॥
काय वसुदेवाचा विश्वास । पुत्रप्रेमें त्याचें मानस ।
पालटतां मग कैंची आस । उरेल माझिया जीवाची ॥७५॥
ह्मणूनि त्याचें चित्त अस्वस्थ । तंव विचार सुचला अद्भुत ।
वसुदेव देवकी बंदिस्थ । करुनि ठेवूं उभयांसी ॥७६॥
परी हे गोष्ट कैसी आतां । घडेल ऐशी पडली चिंता ।
राज्याधिकारी उग्रसेन पिता । तो न देई अनुज्ञा ॥७७॥
ह्मणूनि प्रत्यक्ष निजपित्यासी । कसें घातलें बंदिशाळेसी ।
आणि नेलें अभीष्ट सिध्दीसी । दुरात्म्याने तेधवां ॥७८॥
कांहीं काळॆं देवकीसी पुत्र । झाला सुकुमार कोमल गात्र ।
रुचिर वदन कमलनेत्र । आनंद मातापितयांसी ॥७९॥
देखोनि बाळ सुंदर । कंसातें फुटे पाझर ।
ह्मणे रिपु तो आठवा कुमार । करुं संहार तयाचा ॥८०॥
तंव नारद येऊनि तेथ । ह्मणती कां भुललें चित्त ।
राजकारणीं हें अनुचित ।कारुण्य कंसा मज दिसे ॥८१॥
आधींच मर्कटचेष्टा अद्भुत । त्यांत वृश्चिकदंश बाधे भूत ।
वरी मदिरापान आतृप्त । मग काय खेळ पुसावा ॥८२॥
तैसा आधींच कंस दुर्मती । वरी नारदें अनुकूल युक्ति ।
बोधितांचि तो निजचित्तीं । आनंदाला अपार ॥८३॥
मग तयानें तत्काळ । वधिलें  देवकींचे बाळ ।
तैसेचि पुढील पांचही सकळ । मारिले पुत्र तियेचे ॥८४॥
यापरी साही गर्भ केले हनन । सतवा गेला पोटीं जिरुन ।
ऐसें भासलें परी त्याचें चलन । केलें योगमायेनें  ॥८५॥
वसुदेवाची दुजी पत्नी । नंदगृहीं होती रोहिणी ।
तिचे उदरीं गर्भ तत्क्षणीं । नेऊनियां स्थापिला ॥८६॥
त्यापासूनि बळिराम । शेषावतार घेई जन्म ।
पुढील कथा पवित्र परम । सावधान परिसावी ॥८७॥
पुन: देवकी झाली गर्भवती । ऐकुनि कंस भयाकुल चित्तीं ।
कीं आपुला मृत्यु आठव्याचे हातीं । तो आठवा गर्भ हा ॥८८॥
बंदिशाळेसी अनेक । कंसें ठेविले दक्ष रक्षक ।
जाणवाया वृत्त भयसूचक । आज्ञापूनी सकळां तें ॥८९॥
देवकीचा प्रसूतिकाळ । येई जैसा जवळ जवळ ।
तैसा कंस भयें व्याकुळ । मृतप्राय जाहला ॥९०॥
श्रावण कृष्ण अष्टमीसी । बुधवारीं मध्यरात्रीसी ।
जन्मले देवकीच्या कुशीं । श्रीकृष्णदेव जगत्पती ॥९१॥
देवकीतें प्रसूतिवेदना । असह्य होऊनि आली मूर्च्छना ।
प्रात:- काळपर्यंत ते अंगना । असावध राहिली ॥९२॥
तेव्हां रक्षावया आठवा पुत्र ।वसुदेव करी युक्ति विचित्र ।
गोकुळीं त्याचा परम मित्र । नंद नामें वसतसे ॥९३॥
त्याचे घरीं ठेविला बाळ । योग होता अनुकूळ ।
ह्मणूनि व्दाररक्षक सकळ । निद्रावश जाहले ॥९४॥
नंदभार्या याचवेळीं । कन्या प्रसवे गोकुळीं ।
तीस आणूनि देवकीजवळी । वसुदेवें ठेविलें ॥९५॥
ती कन्या नव्हे साचार । योगमायेचा अवतार ।
हा वसुदेवासी समाचार । होता समग्र ठाउक ॥९६॥
जैशी देवकी होती मूर्च्छित । तैशीच यशोदाही निश्चेष्टित ।
नेणे स्वयें कन्या कीं सुत । निज उदरीं जन्मला ॥९७॥
पाहे होऊनि सावध । तंव देखे श्रीकृष्ण विबुध ।
पुत्र पाहूनि आनंद । मानी मनीं यशोदा ॥९८॥
इकडे कंसासी कळे वृत्त । देवकी होऊनि प्रसूत ।
कन्या उपजली ह्मणूनि धावत । आला स्वयें त्या स्थळीं ॥९९॥
आदळूं पाहे कन्या भूवरीं। तंव ते निसटूनि गेली वरी ।
कंसासी ह्मणे तुझा वैरी । असे अन्यत्र सुरक्षित ॥१००॥
आतां दुष्टा मारुनि मज । काय प्राप्त होईल तुज ।
व्हावयाचें तें होई सहज । प्रयत्नेंही टळेना ॥१०१॥
कंस तळमळे मनीं । व्यर्थ छळिली भगिनी ।
सत्यचि ह्मणती जनीं । होणार कांहीं चुकेना ॥१०२॥
कंस भयें घाबरे । तंव मंत्री बोधिती सारे ।
मारावीं तान्हुलीं लेंकुरें । सहज अपाय चुकेल ॥१०३॥
ऐशी ऐकतां सूचना । टळली कंसविवंचना ।
मग तैशी दिधली आज्ञा । कंसरायें तत्काळ ॥१०४॥
भागवत ग्रंथ प्रसिध्द । तेथील सार सुबोध ।
गातसे गोविंद सानंद । बालहिताकारणें ॥१०५॥
करितां याचें श्रवण पठण । आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण ।
प्राप्त होईल विद्याधन । ऐसें वरदान व्यासाचें ॥१०६॥
इति श्रीलघुभागवते अष्टमोऽध्याय: ॥८॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP