लघुभागवत - अध्याय १ ला

लघुभागवत,पुराण,laghubhagavat,puran,मराठी,marathi


अथ लघुभागवतप्रारंभ: ।

वसुदेवसुतं देवं कंसचाणॄरमर्दनम्‍ ।
देवकीपरमानंदं कृष्णं वंदे जगद्‍गुरुम्‍ ॥१॥

अध्याय १ ला
जयजयाजी विघ्नहरणा । नमितो मी तव चरणां । दीन दासावरी करुणा । निरंतर करावी ॥१॥
वंदितो भावें सरस्वती । जीच्या प्रसादें शुद्ध मती । आणि कवित्वाची शक्ती । प्राप्त होय भक्तांतें ॥२॥
तैसेंचि नमितों आतां । हरिहरेश्वर कुलदेवता । ज्याच्या स्मरणें सर्वथा । मंगल होय दासांचें ॥३॥
संत सज्जन गुरु कवीश्वर । त्यांसि माझा वारंवार । असो साष्टांग नमस्कार । कृपा थोर व्हावया ॥४॥
बाळांसी करावा बोध । या उद्देशें चार शब्द । कथितों यथामति सानंद । अवधान तेथें असावें ॥५॥
भागवत ग्रंथ प्रसिद्ध । असती जयाचे द्वादश स्कंध । तेथील कथा सुबोध । अति संक्षिप्त निरुपितों ॥६॥
पठणें पुरतील कामना । बहुत बोध होईल मना । तैसेंचि होईल जाणा समाधान चित्ताचें ॥७॥
षड्गुणैश्वर्य भगवंत । लीली त्याच्या अपरिमित । कथिल्या जेथें तो ग्रंथ । भागवत जाणिजे ॥८॥
भक्तीच्या कथा प्रेमळ । मनोरम आणि रसाळ । भागवतामाजीं पुष्कळ । व्यासदेवें वर्णिल्या ॥९॥
बाळांनो त्याची आतां ऐका । वाचितां न धरावी शंका । तुमचा देखूनि आवांका । सुलभ भाषा योजिली ॥१०॥
ध्रुव आणि प्रल्हाद । बालभक्त सुप्रसिद्ध । कथा त्यांच्या विशुद्ध । पावाल आल्हाद ऐकतां ॥११॥
परमेश्वराची भक्ती । हाचि मुख्य विषय ये ग्रंथीं । भक्तीपासूनी मिळती । आरोग्य बुद्धि बल विद्या ॥१२॥
नारदाची अनुज्ञा ह्मणुनी । रचिता झाला व्यासमुनी । तो हा ग्रंथ त्रिभुवनीं । मान्य असे भाविकां ॥१३॥
श्रोते पुसतील प्रश्न । हे नारदमुनि कोण । तरी करावा श्रवण । इतिहास तयांचा ॥१४॥
हा ब्रम्हदेवाचा मानसपुत्र । अभिनव जयाचं चरित्र । ईश्वरभजनीं अहोरात्र । गुंतले मन तयांचे ॥१५॥
ऐसें वर्ततां एके दिनीं । पितृकार्य अवमानुनी । रंगला ईशकीर्तनी । पिता कोपुनी त्या योंगे ॥१६॥
तत्काळ वदला शापवाणी । नारदा तूं गंधर्व होउनी । फिरत राहें त्रिभुवनीं । वीणा हातीं घेउनी ॥१७॥
मग नारद तदनुसार । हरिनामाचा करीत गजर । त्रिभुवनीं करी संचार । निरंतर आनंदे ॥१८॥
जाणें येणें चहुकडे । कोठेंही प्रतिबंध न घडे । सहज वृत्तांत कानीं पडे । विनोद आवडे तयासी ॥१९॥
जनांसी सांगता वृत्त सकळ । हळूच लावावी कळ । दुरुनि देखावा आपण खेळ । हाचि उद्योग तयाचा ॥२०॥
ह्मणूनि कळीचा नारद ऐसें नाम झाले प्रसिद्ध । कलह लागतां आनंद । होय अपार तयांसी ॥२१॥
नारदाच्या गोष्टी अनेक । ऐकतां वाटेल कौतुक । त्यांतील एक दोन प्रमुख । प्रसंगेचे सांगतो ॥२२॥
इंद्राचे नंदनवन । तेथील पारिजातक सुमन । नारदें आणूनि केलें अर्पण । द्वारकेमाजीं कृष्णातें ॥२३॥
तें सादर घेउनि तत्काळ । रुक्मिणी होती उभी जवळ । तीस सप्रेम घननीळ । देता झाले विनोदें ॥२४॥
तें देखूनि नारदमुनी । लगबग जाय तेथूनी । ह्मणे आली कलहपर्वणी । न बोलतां सहजचि ॥२५॥
मग तो भामेच्या सदनीं । येऊनि ह्मणे गे भामिनी । समजत होतो ऐंसे मनीं । प्रीति तुजवरी पतीची ॥२६॥
परी सत्य गोष्ट सहज । प्रसंगे कळली आज । नसे हित सांगूनि तुज । होईल कारण कलहासी ॥२७॥
कलहापासूने दूर । राहतों मी निरंतर । तरीही मज घरोघर । ह्यणती नारद कळीचा ॥२८॥
तेव्हा भामा जोडूनि कर । ह्मणे दया करुनि सत्वर । सांगा समाचार सविस्तर । गुप्त कांही नसावें ॥२९॥
येरु ह्मणे नाहीं विशेष । ऐकूनि पावसील रोष । आणि कलहाचा मज दोष । कृष्ण लावील निश्वयें ॥३०॥
कृष्ण माझा परम स्नेही । ह्मणूनि बोलतां न ये कांहीं । सहज आलों तव गेहीं । हेतु नाहीं तिलमात्र ॥३१॥
न बोलावें तरी खंती । वाटेल भामे तुज चित्तीं । मज तेणें कष्ट वाटती । ह्मणूनी स्पष्ट बोलतों ॥३२॥
परी हें वृत्त साद्यन्त । ठेविसील तूं गुप्त । ऐशा विश्वासें निश्चित । सत्य सर्व सांगतों ॥
नंदनवनींचें भूषण । पारिजातकसुमन । कृष्णासी केलें म्यां अर्पण । भीमकीसि तेणें दीधलें ॥३४॥
तैं मी जाणिलें अंतरी । कृष्णाची प्रीति तुजवरी । वरिवरी असे नव्हे खरी । परी न करीं तूं खेद ॥३५॥
रुक्मिणीसी घेऊनी नाचे । हें न साजे कृष्णासि साचें । न बोलावें आह्मी वाचे । कृत्य थोरांचे कधींही ॥३६॥
परी अन्याय देखूनि प्रसंगी । मज न राहवे उगी । असो गत गोष्टीची वाउगी । आतां बडबड कायसी ॥३७॥
ऐसी  लावूनि कळ । नारद तेथूनि उतावीळ । तत्काळ काढी पळ । हर्ष मनीं मानुनी ॥३८॥
नारदे कथिला समाचार । तेणें भामेचा मत्सर । पेटला जैसा वैश्वानर । तळमळ जीवासि लागली ॥३९॥
सत्यभामा क्रोधें खवळे । भूमीसी गडबडा लोळे । नेत्रांचे पाणे न खळे । अनिवार दु:ख जाहलें ॥४०॥
सख्यांसी ह्मणे आजपासुनी । येऊं न द्यावें कृष्णासि सदनीं । मधुर गोष्टी बोलतो वदनीं । कपट मनीं बहुत भरलें ॥४१॥
कृष्ण येतां मंदिरीं । रुसोनि बैसे सुंदरी । प्रेमें पुसे तीस श्रीहरी । कां अंधारी बैससी ॥४२॥
काय कोणीं केला अपमान । किंवा काय पडलें न्य़ून । सांग सकळ वर्तमान । सांडूनि मौन सत्वरीं ॥४३॥
बैसवूनि तीस जवळ । ह्मणे सांडी हे पोरखेळ । क्रोधाग्नीची हे ज्वाळ । पेटली कैसी तव हृदयीं ॥४४॥
तेव्हां अधिकची तिचे डोळे । भरले, स्फुंदोनि कळवळे । कृष्ण ह्मणे तीस वेल्हाळे । वृथा करिसी कटकट ही ॥४५॥
मागशील ते देईन आतां । कां क्षोभसी ऐसी वृथा । तुजसारखी तूंचि सर्वथा । सुखी अससी या जगीं ॥४६॥
तेव्हां भामा म्हणे स्वयेची कपट । करुनि; दूषिता मज उलट । कीं मी करित्यें सदा कटकट । आश्चर्य थोर वाटतें ॥४७॥
मज ह्मणतां तुजवरी प्रेम । आहे भामे अनुपम । परी द्यावया स्वर्गीचें कुसुम । भीमकी योग्य वाटली ॥४८॥
तेव्हा नव्हती माझी स्मृती । ही काय ह्मणावी प्रीती । मुखीं एक भलतें चित्तिं । नव्हे कृति ही उचित ॥४९॥
तेव्हां करुनि हास्यमुख । तीस ह्मणे यदुनायक । काय तें कुसुम क्षुल्लक । अनर्थ केवढा त्यासाठीं ॥५०॥
पुष्पचि काय ? परी भामिनी । जाऊनियां नंदनवनीं पारिजातक वृक्ष आणूनी । तुझ्या अंगणी लावीन ॥५१॥
यावरी ती तिरस्कारें । ह्मणे हें नाटक पुरे । आतां तुमचें बोलणे खरें । वाटत नाहीं लेशही ॥५२॥
आजवरी होता भ्रम । मजवरी तुमचें दृढ प्रेम । परी कळलें सर्व वर्म । नुरला आतां भरवसा ॥५३॥
यावरी ह्मणे जगदीश । ऐक माझा हितोपदेश । दुजाचा करितां द्वेष । होतो नाश आपुला ॥५४॥
करिसी सवतीचा मत्सर । तेणें कल्याण नव्हे निर्धार । उलट दु:खाचा डोंगर । पुढे मस्तकीं परिणामीं ॥५५॥
आधींच स्त्रियांचा जन्म । क्लेशदायक परम । वरी विसरतां दयाधर्म । दु:ख भोगणें परजन्मीं ॥५६॥
तैसींच सवतीची लेंकुरें । वागवितां द्वेषमत्सरें । त्यायोगें आपुलेंचि साचारें । अकल्याण होतसे ॥५७॥
सवतीचें तें आपुले बाळ । ऐसी वृत्ति असावी निर्म्ळ । तरीच जगीं अनुकूळ । स्थिती ईश्वर देतसे ॥५८॥
पेरुनि कडू कारळ । कैसें मिळेल मधुर फळ । काय प्राशितां समुद्रजळ । येईल पुष्टि दुग्धाची ॥५९॥
तैसें पराचें आपण । मनीं चिंतीता अकल्याण । निजनाश होय ही खूण । ठेवीं पूर्ण अंतरी ॥६०॥
तेव्हां भामा म्हणे बोलतां तितुकें । आहे सारें मज ठाउकें । एकही शब्द मी नायकें । वृक्ष देखेन तोंवरी ॥६१॥  
ऐसें पूर्वी अनेक वेळ । पसरुनियां वाग्जाळ । मज फसविले केवळ । साधी भोळी पाहुनी ॥६२॥
असो मग सत्यभामेस्तव । इंद्राचा करुनि पराभव । पारिजातक तरु अभिनव । भूवरी कृष्णे आणिला ॥६३॥
या प्रलयाचें मूळ । पाहूं जातां सकळ । नारदाची कळ केवळ । कारण असे निश्चयें ॥६४॥
ऐसीच दुसरी एक । कथा असे मनोवेधक । ऐकतां वाटेल कौतुक । ह्मणनि सांगतो संक्षेपे ॥६५॥
एकदां सावित्री लक्ष्मी पार्वती । यांसी नारद ह्मणे, निश्चितीं । पतिव्रता ऐसी ख्याती । गाजे तुमची जगांत ॥६६॥
परी अत्रिऋषीची जाया । नामें प्रसिद्ध अनसूया तिच्या तुलनेसी वर्णावया । नाही दुसरी त्रिलोकीं ॥६७॥
हें ऐकूनी तिघिंचे मनी धुमसू लागे मत्सराग्नी । आह्मांहूनी अधिक गुणी । कैसी पाहूं अनसूया ॥६८॥
तिघींचाही झाला विचार । पाठवूनि तेथ निज भ्रतार । ब्रम्हा, विष्णु महेश्वर । न्यूनत्व आणू तियेतें ॥६९॥
मग स्वस्वपतींते चेतवुनी । धाडिले अत्रीच्या सदनीं । अनसूयेचें सत्व हरुनी । तुह्मी आणिले पाहिजे ॥७०॥
पाहूनी पत्नींचा आग्रह । तिघेही पावले मोह । ह्यणती जाउनि नि:संदेह । सत्व हरूं तियेचें ॥७१॥
यतिवेषें तिच्या द्वारीं । तिघेही गेले त्या अवसरीं । सती पुसे कवण अंतरीं । हेतु धरोनी पातलां ॥७२॥
तंव ते ह्यणती भोजन । देईं होऊनी वस्त्रहीन । नातरी करूं हरण । सत्व तुझें अवश्य ॥७३॥
त्या समयीत तीं पतिव्रता । करुं लागे थोर चिंता । ह्यणे काय करूं आतां । दैव कैसें ओढवलें ॥७४॥
विमुख जातां अतिथी । सत्व जाईल निश्चितीं । परी धीर धरुनी चित्तीं । बोले सती तयांसी ॥७५॥
अवश्य पुरवीन तुमचें कोड । पतिचरणीं माझा दृढ । भाव असेल तरी अवघड । कांही नाहीं मज जगीं ॥७६॥
मग नेऊनि गृहाभीतरीं । त्यांसी बैसवी आसनावरी । पतीचे चरण अंतरीं । करुनि स्मरण सद्भावें ॥७७॥
सतींचे दिव्य आचरण । तीस काय भयांचे कारण । अतिथीं वरी उदक प्रोक्षण । करुनि साध्वी तेधवां ॥७८॥
आला पाकगृहाआंत । वस्त्रहीन झाली तेथ । माझे पोटीं हे बाळचि जन्मत । अतिथी नसती मी ह्यणें ॥७९॥
मग घेऊनि आली शाकपाक । तंव ते सत्यची झाले बालक । पातिव्रत्याचा ऐसा धाक । देव तेही गडबडले ॥८०॥
अनुष्ठान करुनि अत्रिमुनी । नित्यावरी आले सदनीं । बालरुदन पडतां कानीं । चकित मनीं होउनी ॥८१॥
भार्येसी पुसती हीं अकस्मात । बालकें कोठूनि आलीं येथ । सांग सकल वृत्तांत । बहुत विस्मय मज वाटे ॥८२॥
ती ह्यणे हे तिघे योगी । येथ आले भोजनालागीं । परी वाढतां नसावें अंगी वस्त्र कांही मज वदले ॥८३॥
तेव्हां तुमचे चरन चित्तीं । स्मरुनि; त्यांची इच्छातृप्ती करुं जातां शिशुत्व स्थिती । प्राप्त झाली तिघांते ॥८४॥
मग मुनि पाहे लावूनि ध्यान । तेव्हां कळलें वर्तमान । करुं आले सत्वहरण । ब्रम्हा विष्णु महेश हे ॥८५॥
ऐकूनि स्त्रियांची मती । छळूं आले तुरप्रती । परीं शेवटीं पावले फजीती । ऐसें भार्येसी ऋषि वदे ॥८६॥
असो मग सावित्री सती । आणि लक्ष्मी पार्वती । जाणूनि पतींची स्थिती । आल्या आश्रमा अत्रीच्या ॥८७॥
आणि अनसूयेसी ह्यणती आह्मां । अपराधाची व्हावी क्षमा । नेणूनि तुझा अगाध महिमा । देवांसी धाडिलें छळावया ॥८८॥
आतां आमुचे भ्रतार । आह्यां देऊनि करीं उपकार । आमुचा मत्सर विकार । आह्मां पूर्ण बाधला ॥८९॥
अनसूया तेव्हां ह्मणें । आपुले पति ओळखूनि घेणें । पाळण्यांत खेळती बाळपणें । ना न ह्मणें मी तुह्मां ॥९०॥
परी तिघेही झाले बालक । स्त्रियांसी नुरली पतींची ओळख । लक्ष्मी उचली चतुर्मुख । आणि पार्वती विष्णुतें ॥९१॥
तेव्हा अत्रि आणि अनसूया । उभयही हांसती तयां । पतींची ओळख नाहीं जयां । पतिव्रता त्या कैशा ॥९२॥
हें जाणवूनि, त्यांचे पती । जीचा तीस दिधला हातीं । तिन्ही देवांचे अंश त्रिमूर्ती । तेच ठेवूनि सुर गेले ॥९३॥
अत्रीच्या आश्रमीं जन्म । ह्मणनि दत्तात्रेय ऐसें नाम । पति घेऊनि गेल्या क्षेम । उमा रमा सावित्री ॥९४॥
दुसरी एक कथा ऐसी । गालव नामें थोर ऋषी । अर्ध्य द्यावया सूर्यासी । अंजुळीत जळ घेईं ॥९५॥
तंव गंधर्व चित्रसेन । आकाशमार्गे करितां गमन । मुखींचा कफ होय पतन । अंजुळींत ऋषीच्या ॥९६॥
तेव्हां लागव सक्रोध तत्काळ । आला धर्मराजाजवळ । चित्रसेनाचें दुष्कर्म सकळ । सांगीतलें तयासी ॥९७॥
तेथेंचि होता श्रीकृष्ण । तेणेंही केले श्रवण । ह्यणती हें अधर्माचरण । आणि अपमान ऋषीचा ॥९८॥
तेव्हां कृष्ण क्रोधायमान । होऊनि बोले प्रतिज्ञावचन । चित्रसेनाचें करीन कदन । तरीच यादव मी खरा ॥९९॥
ऐकतांचि ऐसी मात । गंधर्व घाबरे अत्यंत । मग नारदाचें घेऊनि मत । निज मरण टाळिलें ॥१००॥
नारदें करुनि युक्ती । वळविली सुभद्रासती । वचन घेतलें तिच्या हातीं । वांचवीन चित्रसेनातें ॥१॥
मगे ती ह्मणे अर्जुनासी । रक्षीन चित्रसेनासी । भाक दिधली म्यां ऐसी । पूर्ण झाली पाहिजे ॥२॥
पत्नीच्या आग्रहासाठीं । कृष्णासीं झुंजला किरीटी । असो युद्ध मिटलें शेवटीं । ऐसा नारद कळीचा ॥३॥
श्रीकृष्णासी करुनि वश । शिशुपाल आणि कंस । यांचा करविला नाश । नारदेंचि युक्तीनें ॥४॥
लावीतसे नारद कळ । तैसें सत्कार्यही करी पुष्कळ । याच्याचि उपदेशें केवळ । अढळपदीं ध्रुव गेला ॥५॥
बाणासुरें अनिरुद्धासी । बंदिस्त केलें तैं कृष्णासी । वृत्त कळवूनि तयासी । करविले मुक्त नारदें ॥६॥
वीणा वाद्य मधुर मोहक । त्याचा आद्य प्रवर्तक नारदचि होय ऐसें अनेक । जनीं गायक बोलती ॥७॥
ऐसें नारदाचें संक्षिप्त । चरित्र कथिलें येथ । सांगूं जातां विस्तृत । वाढेल ग्रंथ अपार ॥८॥
भागवत ग्रंथ प्रसिद्ध । तेथील सार सुबोध । गातसे गोविंद सानंद । बालहिताकारणें ॥९॥
याचें करितां श्रवण पठण । आयुरारोग्य विद्याधन । प्राप्त होईन ऐश्वर्यं पूर्ण । ऐसें वरदान व्यासाचें ॥११०॥
इति श्रीलघुभागवते प्रथोमोऽध्याय: ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP