गदा पडताळूनियां मुष्टी । लक्षूनि कृष्णातें सक्रोधदृष्टी । धांवतां येरें विन्धूनि काठी । बाहु भूतटीं पाडियला ॥४३॥
गदेसहित तोडूनि भुज । सावेश गर्जे गरुडध्वज । चक्र उचलूनि प्रळयार्कतेज । कैसा अधोक्षज विराजला ॥४४॥
जैसा उदयाचलपर्वत । प्रभाते अर्कमंडळा सहित । शोभे तैसा रुक्मिणीकान्त । सचक्रहस्त शोभतसे ॥२४५॥
उदयाचळाची उपमा हरी । रविवलया सम चक्र करीं । ऊर्ध्व संचरे रवि अंबरीं । तद्वत्प्रहारीं उच्चकरें ॥४६॥
देदीयमान सहस्रार । प्रभे लोपे कोटि भास्कर । हरनेत्रींचा प्रळयाङ्गार । तत्तुल्य क्रूर भासतसे ॥४७॥

जहार तेनैव शिरः सकुण्डलं किरीटयुक्तं पुरुमायिनो हरिः ।
वज्रेण वृत्रस्य यथा पुरन्दरो बभूव हाहेति वचस्तदा नृणाम् ॥३६॥

तया सुदर्शनचक्रें करून । शाल्वशिराचें केलें हरण । काये पासूनि छेदितां पूर्ण । आक्रमी गगन तीव्र जवें ॥४८॥
विमानीं पाहती सुरवरकोटी । नृपवर मुनिवर लक्षिती दृष्टी । मुकुटकुंडलमंडित सृष्टी । गगना पोटीं संचारतां ॥४९॥
जैसें वृत्रासुराचें मौळ । वज्रप्रहारें आखंडळ । खंडूनि उडवी तेंवि घननीळ । हरी शिरकमळ शाल्वाचें ॥२५०॥
तेव्हां जाला हाहाकार । अवशिष्ट शाल्वाचा परिवार । म्हणती निमाला शाल्ववीर । सखेद नर रसरसिती ॥५१॥
बहु मायावी शाल्व कपटी । त्यातें वधूनि रणतळवटीं । विजयी जाला त्रिजगज्जेठी । जाली सृष्टी अकंटक ॥५२॥
विमानीं पहावया हरिसमर । गगनीं दाटले होते सुर । तिहीं केला जयजयकार । तो समग्र अवधारा ॥५३॥

तस्मिन्निपतिते पापे सौभे च गदया हते । नेदुर्दुन्दुभयो राजन्दिवि देवगणेरिताः ॥३७॥
सखीनामपचिति कुर्वन्दन्तवक्त्रो रुषाभ्यगात् ॥३८॥

गदाप्रहारें तें भंगिलें असतां । चक्रप्रहारें शाल्वघाता । केल्या नंतर विमानस्थां । अमरां समस्तां सुख जालें ॥५४॥
सौभ मयकृत अयस्मय । कठोर दुर्गम त्रिपुरप्राय । सुरवर ज्याचें मानिती भय । त्रिजगीं दुर्जय सुरासुरां ॥२५५॥
अमरवरांचे आज्ञे करून । दुंदुभि त्राहाटिती देवगण । नंदनोद्भव कुसुमांचा घन । करिती संपूर्ण हरिमाथां ॥५६॥
यादव गर्जती जयजयकारीं । ठोकिती दुन्दुभि कुञ्जरभेरी । वरूनि संग्रामीं विजयश्री । उत्साहगजरीं परतले ॥५७॥
भाट पढती बिरुदावळी । वैष्णव नाचती धुमाळी । सुरवर पढती नामावळी । पूर्ण वनमाळी जयवंत ॥५८॥
मुनिजन आशीर्वादसूक्तीं । मंत्राक्षता घेऊनि हातीं । श्रीकृष्णावरी वर्षती । अक्षय्य म्हणती यशोलक्ष्मी ॥५९॥
ऐसे उत्साहें द्वारकापुरीं । माजि प्रवेशतां श्रीहरी । तंव अकस्मात अपर वैरी । पातला समरीं तें ऐका ॥२६०॥
कृष्णें मारिले आपुले सखे । मागधपौण्ड्रकां सारिखे । शिशुपाळशाल्वांच्या दुःखें । हृदयीं धडके क्रोधाग्नि ॥६१॥
व्हावया मित्रत्वा उत्तीर्ण । साच करावया सखेपण । श्रीकृष्णासीं समराङ्गण । वक्रदंत करूं आला ॥६२॥
क्रोधें फुम्पाटे जैसा व्याळ । भयंकर भासे प्रळयकाळ । सवें न घेतां सेनाबळ । पातला केवळ एकाकी ॥६३॥
यावरी तेणेंशीं संग्राम । करिता होईल मेघश्याम । तें व्याख्यान अत्युत्तम । श्रोते सत्तम परिसोत ॥६४॥
पुढिले अघ्यायें ते कथा । शुक निरूपील कुरुनाथा । तेथ सावध होऊनि श्रोतां । सेविजे तत्त्वता हरिवरदा ॥२६५॥
अध्याय सप्तसप्ततितम । एकादशिनी हे सप्तम । शाल्वकृष्णांचा संग्राम । वदला सुगम दयार्नव ॥६६॥
या वरी दशमाचे उपसंहरणीं । कथिजेल अष्टम एकादशिनी । बैसोनि तिचिये व्याख्यानीं । सुकृत सज्जनीं संग्रहिजे ॥६७॥
अष्टसप्ततितमाध्यायीं । वक्रदंत विदूरथ पाहीं । समरीं वधूनि शेषशायी । होईल विजयी त्रिजगांतें ॥६८॥
त्या नंतरें संकर्षण । तीर्थयात्रा करितां जाण । सूतें न देतां अभ्युत्थान । करील हनन तयाचें ॥६९॥
इतुकी वक्ष्यमाण कथा । अवधान देऊनि परिसिजे श्रोतां । दयार्णव भाषाटिप्पणीवक्ता । केला तत्त्वता गुरुनाथें ॥२७०॥
भागवतींचा दशम स्कंध । परीक्षितीतें शुक कोविद । कथिता जाला शाल्ववध । तो हा विशुद्ध वाखाणिला ॥७१॥
प्रतिष्ठानीं एकच्छत्र । एका जनार्दनकृपापात्र । अद्वयबोधें विश्वामित्र । गोत्रीं स्वतंत्र अवतरला ॥७२॥
चिदानंदें स्वानंदधणी । देतसे प्रनतां गोविन्दगुणीं । त्याचें संपूर्ण पायवणी । दयार्णवनिम्नीं सांठवलें ॥७३॥
तेणें निम्नता पूर्ण जाली । अक्रूपाराची अभिधा आली । साधकीं चिन्मुक्तें साधिलां । मग्न होऊनि तीर्थजळीं ॥७४॥
अभिमानमळ विसर्जून । निरभिमान शौचाचमन । करूनि श्रवणतीर्थीं स्नान । सायुज्यसदन प्रवेशिजे ॥२७५॥
इतुकी दयार्णवाची विनती । मान्य करूनि सज्जनीं श्रोतीं । चिदात्मबोधें कमलापती । कैवल्यप्रातीवरी भजिजे ॥७६॥
श्रीमद्भागवत दशमस्कंध । टीका हरिवरद अगाध । दयार्णवकृत परम विशुद्ध । अध्याय प्रसिद्ध सप्तसप्ततितम ॥२७७॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशमसाहस्त्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां शाल्ववधोनाम सप्तसप्ततितमोऽध्यायः ॥७७॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
कालयुक्ताक्षिके शुक्ले चाषाढे प्रतिपद्बुधे । सप्तसप्ततितमोऽध्यायः पिपीलिकपुरेऽर्थितः ॥१॥
श्लोक ॥३८॥ ओवी संख्या ॥२७७॥ एवं संख्या ॥३१५॥
खरवत्सरे मधुकृष्ण चतुर्दशी मंदवार प्रथम प्रहरीं एकादशिनी सप्तम समाप्त ।
( सत्त्याहत्तरावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३५०७३ )

सत्त्याहत्तरावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP