N/Aइन्द्रप्रस्थं गतः कृष्ण आहूतो धर्मसूनुना । राजसूयेऽभिनिर्वृत्ते शिशुपाले च संस्थिते ॥६॥

धर्मराजें राजसूयार्थ । पाचारिलिया कृष्णनाथ । परिवासेंसीं इंद्रप्रस्थ । ठाकूनि तेथ स्थिरावला ॥३०॥
मखेन्द्रसिद्धीच्या साधना । सवें घेऊनि भीमार्जुनां । विप्रवेशें मागधहनना । करूनि नृपगणा सोडविलें ॥३१॥
राजसूययज्ञ सिद्धी नेला । निन्दितां चैद्य मुक्त जाला । त्यावरी परिवार द्वारके आला । कृष्ण राहविला युधिष्ठिरें ॥३२॥
जाणोनि धर्माचें अंतर । अंतःपुरेंसीं रुक्मिणीवर । इंद्रप्रस्थीं जाला स्थिर । जंव गान्धार भ्रम पावेर ॥३३॥
मयकृतसभावलोकनीं । दुर्योधनाची मानहानी । जालिया नंतर चक्रपाणी । निघे तेथूनी तें ऐका ॥३४॥

कुरुवृद्धाननुज्ञाप्य मुनींश्च ससुतां पृथाम् । निमित्तान्यतिघोराणि पश्यन्द्वारवतीं ययौ ॥७॥

कौरवांमाजि जे वृद्ध वडील । तैसाचि मुनीश्वरांचा मेळ । सुहृद आप्त सप्रेमळ । निघे गोपाळ पुसूनि तयां ॥३५॥
पांचही पुत्रां सहित कुन्ती । तयेतें पुसोनियां श्रीपती । सुभद्रे सहित द्रौपदी सती । अमृतहस्तीं स्पर्शोनी ॥३६॥
पृथा धर्मादि प्रार्थना करिती । द्वारके जावया कां श्रीपती । येव्हढी लगबग तुमचे चित्तीं । आमुचे संगती उबगूनी ॥३७॥
आम्ही अनाथ तुज वांचून । तुझेनि सनाथ श्रीसंपन्न । तुझ्या वियोगें अर्धक्षण । युगा समान गमे आम्हां ॥३८॥
धेनुवियोगें वत्स तान्हें । किंवा बाळक स्तनें वीणें । मत्स्य विघडिलिया जीवनें । तुज वीण जिणें तेंवि आमुचें ॥३९॥
पृथाप्रमुखपांडवग्लानि । ऐकूनि त्यांतें चक्रपाणि । म्हणे विघ्नें द्वारकाभुवनीं । दुष्टीं दुर्जनीं मांडियलीं ॥४०॥
दुर्निमित्तें दिसती घोर । वामबाहु वामनेत्र । स्फुरे आणि मानस स्थिर । नोहे दुस्तर भय मानी ॥४१॥
स्वप्नें पदताती वोखटीं । स्वप्नीं श्वानें लागली पाठीं । रजस्वला विधवा कंठीं । धांवे मिठी घालावया ॥४२॥
वणवया माज पडल्या धेनु । त्या बोभाती आक्रंदोन । ऐसीं दुश्चिह्नें देखून । मन उद्विग्न होत असे ॥४३॥
या लागि मी द्वारकापुरा । जावयास्तव करितों त्वरा । येरव्ही तुमचा मी म्हणियारा । नीचकिङ्करापासूनी ॥४४॥
तुमच्या वियोगें माझें मन । युगा येवढा मानी क्षण । तथापि दुश्चिह्नें देखून । द्वारके विघ्न घोर गमे ॥४५॥
या लागिं वसुदेवकीचरणां । पहावया मज देइजे आज्ञा । ऐसी करूनियां प्रार्थना । द्वारकाभुवना चालियला ॥४६॥
आज्ञा घेऊनि समस्तांची । मार्गीं जातां हरि विवंची । ते विवंचना श्रीकृष्णाची । वदे शुकाची वाग्देवी ॥४७॥

आह चाह मिहायात आर्य्मिश्राभिसङ्गतः । राजन्याश्चैद्यपक्षीया नूनं हन्युः पुरीं मम ॥८॥

मार्गीं जातां मानसीं हरी । म्हणे म्यां सोडिली द्वारकापुरी । बळरामेंसीं सैन्यसामग्री । घेऊन अध्वरीं स्थिरावलों ॥४८॥
येथ सर्वाच्या जाल्या भेटी । परस्परें सस्निग्ध गोठी । राजसूयाध्वर पाहिला दृष्टी । सुखसंतुष्टी दिन क्रमले ॥४९॥
चैद्य मागध निर्दाळिले । तेणें स्वपक्षीय नृप तोषले । चैद्यपक्षींचे संतापले । जळपूनि गेले पळोनियां ॥५०॥
ससैन्य मजवीण रिक्त पुरी । देखूनि मागें कपटी वैरी । बहुतेक माझी मारिती नगरी । ऐसें अंतरीं वाटतसे ॥५१॥
ऐसा सचिन्त बैसोनि रथीं । वितर्क करी चालतां पंथीं । पुढें ठाकिली द्वारावती । तंव ते विपत्ती देखियली ॥५२॥

वीक्ष्य तत्कदनं स्वानां निरूप्य पुररक्षणम् । सौभं च शाल्वराजं च दारुकं प्राह केशवः ॥९॥

आपुल्या प्रजांचें आक्रंदन । वनोपवनांचें विध्वंसन । पुरगोपुरें छिन्नभिन्न । आणि स्वसैन्य रिपुसमरीं ॥५३॥
मयमायाकृत अयस्मय । हरवरदानें त्रिपुरप्राय । कामग सौभ शाल्वराय । देखूनि यदुवर्य काय करी ॥५४॥
सौभपतीचें दुष्टाचरण । स्वकीयजनांचें देखूनि कदन । बळरामातें पुररक्षण । निरोपून पाठविलें ॥५५॥
अंतःपुर घेऊनि सवें । पुरी प्रवेशता बळदेवें । मग निःशंक श्रीकेशवें । मयकृतभावे अवगमिलें ॥५६॥
नगरी निरोविली बळरामा । स्वयें प्रवर्तला संग्रामा । आवेश आला मेघश्यामा । शाल्वा अधमा वधावया ॥५७॥
दारुकनामा निजसारथि । तयासि बोले रुक्मिणीपति । क्षणैक सावध होऊनि श्रोतीं । ते शुकोक्ति परिसावी ॥५८॥

रथं प्रापय मे सूत शाल्वस्यान्तिकमाशु वै । सम्भ्रमस्ते न कर्तव्यो मायावी सौभराडयम् ॥१०॥

सारथियातें म्हणे हरी । माझा रहंवर अतिलौकरी । शाल्वा सन्निध नेई समरी । आजि हा वैरी निर्द्दळणें ॥५९॥
मायावी हा सौभपती । सौभाश्रयें दुर्ज्जय क्षितीं । मज येणेंसीं भिडणें निगुती । झाडीन दुर्मती मी याची ॥६०॥
शिववराच्या सौभाश्रयें । त्रिजगीं म्हणवी हा दुर्जये । आजि वोपीन या पराजय । कृतान्तनिलय दावीन ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP