एष ते जनिता तातो यदर्थमिह जीवसि । वधिष्ये वीक्षतस्तेऽमुमीशश्चेत्पाहि बालिश ॥२६॥

मायामोहें कृष्णाप्रति । मोहूनि ब्ले खळदुर्मति । देवकी जठरीं तव उत्पत्ति । ज्यास्तव जाली तव देहा ॥२७॥
तो हा जन्मविता तव पिता । नंद गोप तो अन्नदाता । कंसभयापासूनि त्राता । तो हा तत्वता गोप नव्हे ॥२८॥
तुझ्या देहाचें जेथूनि जनन । तो हा तुझा जनक जाण । ज्या कारणें मथुराभुवन । यादव म्हणवून वसविसी ॥२९॥
तुझ्या देहाचा पोषक । नंद गोप अपर जनक । त्यातें टाकूनि येथ सम्यक । वृष्णि म्हणविसी ज्याचेनि ॥१३०॥
ज्याचेनि येथ तुझें जिणें । त्या या तव जनका कारणें । तुज देखतां घेईन प्राणें । निजलोचनें अवलोकीं ॥३१॥
यातें वधितों तुज देखतां । सोडवणेसी समर्थ पुरता । न होसी तरी जायी आतां । तोंड घेऊनि बालिशा ॥३२॥
सोडवणेचें सामर्थ्य आंगीं । धरिसी तरी ये युद्धालागीं । ऐसें बोलूनि ते प्रसंगीं । घातला खङ्गीं कर तेणें ॥३३॥

एवं निर्भर्त्स्य मायावी खङ्गेनानकदुंदुभेः । उत्कृत्य शिर आदाय स्वस्थं सौभं समाविषत् ॥२७॥

ऐसा निर्भर्त्सूनि यदुवीर । शाल्व कपटी मावकर । घेता जाला वसुदेवशिर । खङ्गें सत्वर छेदूनि ॥३४॥
गगनगर्भीं सौभा माजि । शिर घेऊनि रिघाला सहजीं । मोहभ्रान्ति अधोक्षजीं । मयमायाकृत योजूनियां ॥१३५॥

ततो मुहूर्त्त प्रकृतावुपप्लुतः स्वबोध आस्ते स्वजनानुषंगतः ।
महानुभावस्तदबुध्यदासुरीं मायां स शाल्वप्रसृतां मयोदिताम् ॥२८॥

त्यां नंतरें मुहूर्तमात्र । षङ्गुणैश्वर्य स्वतंत्र । तोही मायाभ्रमाचें पात्र । जाला विचित्र मनुजत्वें ॥३६॥
मानुषीप्रकृतीतें वश जाला । यास्तव मोहजळी बुडाला । स्वतःसिद्ध चिन्मात्रबोध पहिला । लोपूनि गेला ते काळीं ॥३७॥
वसुदेवातें मानिलें जनक । शाल्व मानिला दुष्ट मायिक । ऐसा स्वजनस्नेहाचा कळंक । अवगूनि शोक आंगविला ॥३८॥
माझा जनक मारिला दुष्टें । व्यसन घडलें हें अदृष्टें । ईश्वरें केलें कां उफराटें । जे निमिजे ज्येष्ठें मज असतां ॥३९॥
न होतां पितृऋणा उत्तीर्ण । पिता वसुदेव पावला मरण । जर्‍ही शाल्वाचे घेतले प्राण । तर्‍ही परतून हा नये ॥१४०॥
देवकीप्रमुख माझिया माता । शोक करितील मज देखतां । अपयश आलें माझिये माथां । हांसें समस्तां शत्रूंचें ॥४१॥
ऐसा प्राकृत मनुजा परी । स्वजनमोहाब्धीचे पूरीं । बुडता जाला मुहूर्तभरी । स्वयें श्रीहरी सर्वज्ञ ॥४२॥
त्या नंतरें हृषीकेश । स्वशौर्याचा परामर्श । करूनि म्हणे मी शाल्वास । सौभें सहित निर्द्दळीन ॥४३॥
जनकवधाचे प्रतीकारीं । कपटी सौभ मारीन समरीं । ऐसी आंगवितां वीरश्री । माया आसुरी हारपली ॥४४॥
मग म्हणे मी भूभारहरण । अवतरलों सहसंकर्षण । आसुरीमायेचें प्रावरण । आम्हां भुलवणकर जालें ॥१४५॥
द्वारकारक्षक राम असतां । शाल्व आणील माझिया ताता । अघटित गोष्टी हे कल्पान्ता । पासूनि तत्त्वता दूर असे ॥४६॥
विकर्त्तनातें खद्योत गिळी । कीं मृगेन्द्र भक्षिजे बिडाळबाळीं । हें अघटितही घडते वेळीं । शाल्व नाकळी रामातें ॥४७॥
महान् म्हणिजे निजानुभाव । तेव्हां स्मरूनि वासुदेव । म्हणे शाल्वें पसरिली माव । मयकृत प्रभाव हा तीचा ॥४८॥
मयोपदिष्टमायावशें । शाल्वें मोहिलें कळतां ऐसें । मायाभ्रमाचें फिटलें पिसें । कपट न दिसे तें ऐका ॥४९॥

न तत्र दूतं न पितुः कलेवरं प्रब्रुद्ध आजौ समपश्यदच्युतः ।
स्वाप्नं यथा चाम्बरचारिणं रिपुं सौभस्थमालोक्य निहन्तुमुद्यतः ॥२९॥

स्वप्नींचा प्रपंच जया परी । हारपे मिथ्यात्वें जागरीं । तेंव स्वबोधें श्रीहरी । पाहतां नेत्रीं भ्रम न थरे ॥१५०॥
न दिसे दूत देवकीचा । अथवा देह वसुदेवाचा । भ्रम निरसला मयमायेचा । जाला बोधाचा सूर्योदय ॥५१॥
आजौ म्हणिजे संग्राममही । गगनगर्भीं शाल्व ते समयीं । कृष्णें देखिला असतां पाहीं । विवंची हृदयीं वध त्याचा ॥५२॥
गगनचारी सौभस्थातें । कृष्णें देखूनियां शाल्वातें । उद्योग त्याचिया हननातें । विवरी चित्तें स्मरजनक ॥५३॥
शाल्व फलकट मर्कट धीट । याचें झाडीन आतां कपट । सौभें सहित करीन पीठ । मार्गण तिखट विन्धूनी ॥५४॥
असो ऐसें विवरी हरी । कुरुभूपातें गंगातीरीं । वक्ता श्रीभक्त विवरोत्तरीं । वदे वैखरी मतान्तरें ॥१५५॥

एवं वदन्ति राजर्षे ऋषयः केच नान्विताः । यत्स्ववाचो विरुध्येत नूनं ते न स्मरन्युत ॥३०॥

शुक म्हणे गा कुरुनायका । पूर्वराजऋषीं माजि तूं निका । कां पां न घेसी श्रवणीं शंका । व्याख्याविवेका विवरूनियां ॥५६॥
जर्‍ही तुज शंका फिरली नाहीं । तथापि निरूपितों मी तेही । प्राचीन ऋषि कित्तेक पाहीं । वदोनि संशयीं स्वयें पडिले ॥५७॥
पूर्वापर अनुसंधान - । रहित वदती जें कां वचन । यास्तव अनन्वित तें जाण । आपणा आपण् विरोधक ॥५८॥
अपरपूर्व वचनाप्रती । विरोधकता न विचारिती । श्रवणीं शंका करितां श्रोतीं । संशयावर्त्तीं पडती ते ॥५९॥
आपण पूर्वीं बोलिलो काय । पुढें कथितों जो अन्वय । पूर्वापार विरोध होय । ऐसी सोय न वदती ॥१६०॥
ऐसे कित्तेक अनन्वित । विरोध पूर्वापर वचनांत । पडे ऐसा लाविती ग्रंथ । तो तुज येथ निरूपितों ॥६१॥
एकसप्ततितमाच्या व्याख्यानीं । राजसूर्यार्थ चक्रपाणी । आज्ञा रामाची घेऊनी । निघाला म्हणूनी वाखाणिलें ॥६२॥
ये अध्यायीं विरोधवचन । कीजे दुर्निमित्तें देखून । आपना माजी आपण कृष्ण । बोले वचकून सचिन्त ॥६३॥
ऐसा स्ववाक्यें विरोध । बहुतेक न स्मरती ते बुध । असंभावनीय अनुवाद । करिती विशद तें ऐका ॥६४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP