कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रनतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ॥१६॥

कृष्ण वासुदेव हरी परमात्मा । प्रणतक्लेशहारी । गोविंद इत्यादि नामगजरीं । संतवैखरी संबोधी ॥५२॥
चतुर्थीयुक्त हृदयें सहित । साही महामनु हे समर्थ । वोपिती चार्‍ही पुरुषार्थ । सप्रेमभरित जपजाप्यें ॥५३॥
अथवा षण्मासात्मक एक । बत्तीस अक्षरी मंत्र सम्यक । अखिलक्लेशांचा नाशक । मोक्षदायक नृप पढती ॥५४॥
रमाकामभुवनेश्वरीं । प्रणववाग्भवबीजोच्चारीं । यामाजी एकाही बीजाक्षरीं । जपतां वैखरी कामद हा ॥१५५॥
साही माजी एक नाम । सबीज जपतां अमरद्रुम - । न्यायें पुरुषार्थ ओपी परम । एवं निःसीम महिमा हा ॥५६॥
इत्यादि नाममंत्रपठनीं । नृपांहीं स्तवितां चक्रपाणी । वदता झाला प्रसन्नवाणी । ऐकें श्रवणीं तें राया ॥५७॥

श्रीशुक उवाच - संस्तुयमानो भगवान्नाजभिर्मुक्तबंधनैः । तानाह करुणस्तात शरण्यः श्लक्ष्णया गिरा ॥१७॥

मागधबंधनापासोनि मुक्त । कृष्णदर्शनें भवनिर्मुक्त । तिहीं स्तविला श्रीभगवंत । करुणावंत शरण्य जो ॥५८॥
बंधविमुक्त नृपांची स्तुति । ऐकोनि करुणार्णव श्रीपति । वदता झाला तयांप्रति । अमृतभारतीकरूनियां ॥५९॥
कुरुसौभाग्यकंठमणि । अर्जुनपौत्रा कोदंडपाणि । सावध म्हणे बादरायणि । भगवद्वाणी परिसावया ॥१६०॥

श्रीभगवानुवाच - अद्यप्रभृति वो भूपा मय्यात्मन्यखिलेश्वरे ।
सुदृढा जायते भक्तिर्बाढमाशंसितं तथा ॥१८॥

अगा ये नृप हो म्हणे हरि । तुम्हीं स्तविलें मज वैखरी । तेणें तोषोनि अभ्यंतरीं । तुम्हां निर्धारीं वर वदतों ॥६१॥
अखिलेश्वर मी सर्व देहीं । आजिपासोनि त्या माझ्या ठायीं । सुदृढभक्ति याचिली पाहीं । निःसंशयी म्यां दिधली ॥६२॥
तुम्ही भूपाळ सत्यवादी । निश्चयात्मक हे तुमची बुद्धी । स्वमुखें वर्णूनि कृपानिधी । जें प्रतिपादी तें ऐका ॥६३॥

दिष्ट्या व्यवसितं भूपा भवन्त ऋतभाषिणः । श्रियैश्वर्यमदीन्नाहं पश्य उन्मादकं नृणाम् ॥१९॥

ऋतभाषणी तुम्ही विरक्त । नृप हो बोलिलां तितुकें सत्य । सप्रेम मद्भजनाचें कृत्य । केलें निश्चित संकल्पीं ॥६४॥
व्यवसित म्हणिजे निश्चयात्मक । मत्प्रेम निर्धारिलें निष्टंक । महत्कल्याण हें सम्यक । अक्षय सुख त्यामाजी ॥१६५॥
तुम्ही होऊनि भवीं विरक्त । जें जें प्रतिपादिलें तें तें सत्य । श्रीमद सर्वांसि करी भ्रान्त । विशेष त्यांत नृपसत्ता ॥६६॥
श्रीमद आणिनृपैश्वर्य । दोहींकरूनि जो उन्माद होय । तैं तो नरखे स्वधर्मसोय । भंगी त्राय विहिताची ॥६७॥
अविहितमार्गें यथेष्टाचरण । करूनि मानिजे मुक्तपण । परी तें केवळ उद्बंधन । पाहोनि पूर्ण त्रासलों ॥६८॥
हें यथार्थ वदलां तुम्ही । श्रीमद आणि ऐश्वर्योर्मी । पुरुषलागिं भवसंग्रमीं । दुःखधामीं आतुडवी ॥६९॥
गोडपणें रुचवूनि मना । प्रवर्तवूनियां यथेष्टाचरणा । बलात्कारें नरकयातना । भोगवी जना भुलवूनी ॥१७०॥
सामान्याची केउती गोठी । ऐश्वर्य आणि मदासाठीं । भ्रंश पावले कोट्यानुकोटी । अपरां मुकुटं मिरवूनी ॥७१॥
सूचनेसाठीं तयांचीं नांवें । कथितों रहस्य हें जाणावें । उभय मदांचे पडतां कवे । भ्रंश पावे निर्धारें ॥७२॥

हैहयो नृहुषो वेनो रावणो नरकोऽपरे । श्रीमदाद्भ्रंशिताः स्नानाद्देवदैत्यनरेश्वराः ॥२०॥

हरि म्हणे नृप हो सावधान । पूर्वील राजे ऐश्वर्यपूर्ण । मदें भ्रंशले कोण कोण । संक्षेप कथन तें ऐका ॥७३॥
हैहयवरिष्ठ कार्तवीर्य । महाप्रतापी नरेन्द्रधुर्य । जिंङ्कूनि समग्र उर्वीवलय । सार्वभौम चक्रवर्ती ॥७४॥
सुदर्शनाचा अवतार । सहस्रबाहु नृपभास्कर । ज्याचा करितां नामोच्चार । विघ्नें थरथर कांपती ॥१७५॥
अद्यापि ज्याचा मंत्रप्रयोग । कल्पप्रवीण करितां साङ्ग । असाध्य साधे कार्यभाग । ऐसा अभंग दिग्व्जयी ॥७६॥
( येथे ७७ नं. नाही. )
ऐशियातेंहे भ्रंशिलें मदें । तेंही व्याख्याण ऐका समुदें । त्रिजग जिंकोनि वैभवें विशदें । निरुतें ऐका संकेतें कथितों मी ॥७८॥
मृगयाव्याजें वनासि गेला । काननें भ्रमतां श्रान्त झाला । दमदग्नीच्या आश्रमा आला । तेणें पूजिला आतिथ्यें ॥७९॥
विष्णुचक्र जें सहस्रार । सहस्रार्जुन हा तदवतार । साक्षात् विष्णु नरेश्वर । जाणोनि मुनिवर सम्मानी ॥८०॥
सचिव मंत्रि अमात्यांसहित । हैहय येतां आश्रमांत । जमदग्नि म्हणे ममातिथ्य । अंगिकारा ये वेळीं ॥८१॥
राजा म्हणे सेना सकळ । भ्रमतां उष्णें झाली विकळ । सर्वांवेगळें म्यां फळजळ । घेणें केवळ अयोग्य ॥८२॥
जमदग्नि म्हणे सर्वांसहित । अंगीकारावें ममातिथ्य । ऐकोनि कार्तवीर्य विस्मित । पाहे अवात्यमर्गातें ॥८३॥
मंत्री म्हणती जी नृपवरा । तपःश्रीसंपन्ना मुनिवरा । समता न करवे सुरवरा । इन्द्रचंद्रांसह धनदा ॥८४॥
न कळे मुनीचें महिमान । यालागीं कीजे आज्ञा मान्य । सेनेसहित निमंत्रण । अंगीकारिलें मग रायें ॥१८५॥
कामधेनु प्रार्थूनि मुनि । सपरिवार नृप पुजूनी । दिव्योपचारीं जीवनीं अन्नीं । सर्वांलागूनि तोषवी ॥८६॥
अमोघ मुनीचें वैभव । देखोनि मंत्रियां पुसे राव । येथें कोठोनि उपचार दिव्य । संपादिले हें मज सांगा ॥८७॥
आश्रमीं लक्षूनियां प्रधान । म्हणती कामधेनु प्रसन्न । दिव्योपचार तिजपासोन । तुम्हां संपूर्ण मुनि अर्पी ॥८८॥
हें ऐकोनि हैहयपति । पाचारूनियां मुनीप्रति । कामधेनु हे नृपसंपत्ति । आम्हांप्रति अर्पावी ॥८९॥
धनधान्यादि लागेल तुम्हां । तें मी अर्पीन मुनिसत्तमा । सहस्रेंसहस्र नित्य होमा । सुदोहा धेनु समर्पीन ॥१९०॥
ऐशी ऐकोनि नृपाची गोष्टी । जमदग्नि आश्चर्य मानी पोटीं । म्हणे नृपा म्यां तवार्चेसाठीं । आणिली मठीं कामधेनु ॥९१॥
जे इन्द्राची सुरभि जाण । नंदिनीनामका तत्संतान । तुझिया आतिर्थ्यालागून । म्यां प्रार्थूनी आणिलीसे ॥९२॥
हें ऐकोनि मदोन्मत्त । राजा न मनी मुनिभाषित । धेनुहरणीं झाला उदित । निकट दूत प्रेरूनी ॥९३॥
दूतीं बलात्कारें धेनु । हरिली सवत्सा आश्रमींहून । परम दुःखिता क्रंदमान । गेले घेऊन नृपनगरा ॥९४॥
आश्रमीं ऐसी नृपाची करणी । ऐतां भार्गवें देखिली नयनीं । जनकजननीं कथितां वदनीं । अनय ऐकोनि प्रज्वळला ॥१९५॥
अग्नियंत्रींचा उसळे गोळ । तैसा क्षोभला जमदग्निबाल । परशु शरचाप आयुधमेळ । घेऊनि प्रबळ उठावला ॥९६॥
सवेग ठाकिली माहिष्मती । समरा पाचारिला हैहयपति । सेनेसहित महारथी । केली शान्ति सर्वांची ॥९७॥
सहस्र बाहु विखंडोनी । कुठारें मस्तक पाडिला धरणी । हैहयाऐशी अयोग्य करणी । मदें क्षोभोनि घडविली ॥९८॥
ज्याचे मठीं भक्षिलें अन्न । केलें तयाचें धेनुहरण । ऐसा उन्मत्त लुब्ध कृतघ्न । पावला मरण कार्यवीर्य ॥९९॥
पुढें तयाचे अयुत पुत्र । पळाले सांडूनि समरक्षेत्र । तया दुर्मदांचें चरित्र । ऐका विचित्र संक्षेपें ॥२००॥
रामें वधूनि कार्तवीर्या । आश्रमा येऊनि वंदिलें आर्या । जनकें बोधिलें स्वधर्मकार्या । तें नृपवर्या हर सांगे ॥१॥
हैहय वधिला सेनेसहित । होमदोग्धी सवत्सा मुक्त । करून आश्रमा आला त्वरित । कथिला वृत्तान्त निजजनका ॥२॥
जमदग्नि परम धर्मशीळ । म्हणे रामा हें पाप बहळ । सर्वदेवतामय भूपाळ । वधूनि कळिमळ संग्रहिलें ॥३॥
आतां होऊनि भगवत्पर । वृत्ति नियमूनियां समग्र । तीर्थयात्रा व्रत आचर । तेणें दुस्तर अघ निरसे ॥४॥
निजजनकाची वंदूनि आज्ञा । रामें आचरोनि तीर्थाचरणा । संवत्सरान्तीं पुनरागमना । आश्रमस्थानाप्रति केलें ॥२०५॥
कार्तविर्याचे अयुत सुत । निजजनकाच्या प्रतीकारार्थ । छिद्र लक्षूनिं आश्रमीं प्राप्त । परमदुष्कृत दुरात्मे ॥६॥
बंधुसहित परशुपाणि । वना गेला हें लक्षूनी । समाधिस्थ यज्ञभुवनीं । मुनि वधूनि शिर नेलें ॥७॥
रेणुकेनें भाकिली करुणा । दया नुपजेचि त्या निर्घृणां । जमदग्नीच्या करूनि हनना । झाले पितृऋणा उत्तीर्ण ॥८॥
परशुरामातें स्मरूनि माता । दीर्घस्वरें आक्रंदतां । आर्तस्वरातें ऐकतां । राम मारुतासम आला ॥९॥
बंधूपाशीं पितृदेहो । ठेवूनि राम महाबाहो । पितृहंत्यांचा निर्मूळ ठावो । गेला पहा हो करावया ॥२१०॥
सवें घेऊनियां कुठार । क्षत्रियकुळाचा संहार । करावया महावीर । परम क्रूर सक्रोधें ॥११॥
सवेग ठाकिली माहिष्मती । कळाहीन जे ब्रह्मघाती । समरा पाचारिले दुर्मती । महारथी हैहय जे ॥१२॥
कुथारें खंडूनि शिरःश्रेणी । पर्वत केले समराङ्गणीं । महानदी रक्तेंकरूनी । लोटली रणीं भयंकरा ॥१३॥
जमदग्निवधाचें निमित्त । क्षत्रकुळाचा पुरला अंत । क्षोभला भार्गवरूप कृतान्त । वर्तला आकान्त भूचक्रीं ॥१४॥
पुनः पुनः एकवीस वेळा । संहार केला क्षत्रियकुळा । प्रमाद घदला हैहयपाळा । ऐश्वर्यमदें यापरी ॥२१५॥
दत्तात्रेयासारिखा गुरु । जो ब्रह्मविद्येचा सागरु । ऐशियावरीही बलात्कारु । मदें ऐश्वर्यें हा केला ॥१६॥
ऐसाचि नहुष सार्वभौम । अमोघ ज्याचा पराक्रम । जेणें यजिले स्वाराज्यकाम । साङ्ग सनेम शत ऋतु ॥१७॥
प्राप्त झालिया शक्रासन । श्रीऐश्वर्यमदें भुलोन । यानीं नियोजिले ब्राह्मण । अधःपतन त्या तद्योगें ॥१८॥
श्रीऐश्वर्यमदें वेन । ब्राह्मणांतें अवमानून । भंगूनियां वेदविधान । ईश्वर आपणा मानूनी ॥१९॥
ब्राह्मणाच्या क्षोभहुङ्कारें । प्रजापीडकदुराचारें । श्रीमदऐश्वर्यमदें घोरें । सद्यः शरीरें सांडविला ॥२२०॥
तैसाचि रावण पुलस्तिकुळीं । ऐश्वर्यें मिळाला धुळी । मदोन्मत्त न साम्भाळी । वरदवचना शिवाचिया ॥२१॥
दृढ शिवाची उपासना । प्रमादें याची तदंगना । पतिव्रतेच्या करितां छलना । विधिवरदाना आंचवला ॥२२॥
अमरत्व अजय्यत्व ऐश्वर्यवंत । त्रिजगज्जेता राक्षसनाथ । निर्जर करूनि पादाक्रान्त । आयुष्मंत मनुचौक ॥२३॥
प्रमादें तोही पावला भ्रंश । नरवानरीं केला नाश । समरीं लाहूनियां अपयश । राक्षसवंश निर्दळिला ॥२४॥
तैसाचि अपर भौमासुर । जयासि कांपती निर्जरासुर । तेणें होऊनी प्रमादपर । हरिलें छत्र वरुणाचें ॥२२५॥
अदितिमातेचीं कुण्डलें । मणिमय सुमेरुशृंग हरिलें । सोळा सहस्र नृपांचीं कुळें । भंगूनि कन्या संग्रहिल्या ॥२६॥
ऐसा प्रमादें मदा चढला । मग म्यां समरीं तो निवटिला । अपरां नृपांचीं अवकळा । ऐशीच केली श्रीमदें ॥२७॥
त्रिजग जिङ्कूनि जालंधर । विष्णु निर्जर पुरंदर । केले आपुले आज्ञाधर । ऐसें अपार यश वरिलें ॥२८॥
श्रीऐश्वर्यमदें तोंही । उमाकामें समरमही । भ्रंश पावला हें सर्वांहीं । विदित नाहीं कीं काय ॥२९॥
केवळ दुर्वासा क्रोधाग्नि । तेणें इन्द्रासि प्रसन्नपणीं । मंदरमाळा संतोषोनि । प्रसाद दिधला कृपेनें ॥२३०॥
श्रीऐश्वर्यदास्तव । प्रमादें भ्रंशिला वासव । समुद्रीं पडिलें अमरविभव । त्रिलोकीराव बळि झाला ॥३१॥
श्रीमदास्तव सुरनरासुर । भ्रंश पावले थोर थोर । स्वपदापासोनि च्यवले फार । सांगतां अपार असो आतां ॥३२॥
ऐशिया थोरथोरांच्या गोष्टी । भ्रंशिले ऐश्वर्यभोगासाठीं । ज्या देहास्तव तो शेवटीं । नशरकोटीमाजि पडे ॥३३॥
ऐसें जाणोनि तुम्ही सकळ । मत्पर जालेति जरी केवळ । तरी पुनरपि न होनि बरळ । पाळिजे अढळ ममाज्ञा ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP