मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५५ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ५५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ५५ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर विज्ञातार्थोऽपि भगवांस्तूष्णीमास जनार्दनः । नारदोऽकथयत्सर्वं शंबराहरणादिकम् ॥३६॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । भूत भविष्य वर्तमान । विज्ञातार्थही भगवान । मौन धरून राहिला ॥२५०॥त्रिजगज्जनक जनार्दन । कर्ता जगाचें स्थितिलयसृजन । तोही जाला जाणोनि नेण । मनुष्यपण नटनाट्यें ॥५१॥ऐसिये समयीं नारदमुनि । अकस्मात गगनींहूनी । उतरला जेथ कृष्णरुक्मिणी । वसुदेव स्वपत्नीसमवेत ॥५२॥मुनीतें देखोनि कृष्णादि सकळीं । वंदिला चरणीं ठेवूनि मौळि । मग तो सांगे तयांजवळी । सर्व वर्तली स्मरवर्ता ॥५३॥शंकरक्रोधें जाळिला स्मर । क्रोधावतार तो शंबर । रतिविलापें द्रवोनि हर । वदला उत्तर कारुण्यें ॥५४॥मत्क्रोधनेत्राग्नीकरून । जालें तव कान्ताचें दहन । तो मत्क्रोधचि पावेल जनन । दैत्य होऊन भूलोकीं ॥२५५॥महामायावी शंबरासुर । तुवां वसविजे त्याचें घर । त्याचा करील जो संहार । तव भर्तार मन्मथ तो ॥५६॥ऐसी व्योमकेशेश्वरवाणी । रतीनें ऐकोनि आपुल्या श्रवणीं । काळ कंठितां शंबरसदनीं । विधीची करणी ते ऐका ॥५७॥रुक्मिणीजठरीं जन्मला बाळ । तोचि शंबरा तुझा काळ । ऐसें जाणवतां तो खळ । हरी तत्काळ कंदर्पा ॥५८॥तेणें देखोनि स्मरलावण्या । दैवयोगें उपजली करुणा । मग सागरीं करूनि निक्षेपणा । गेला सदना गतशल्य ॥५९॥अकूपारकबंधी निमग्न शिशु । होतां रक्षी त्या परेशु । नैसर्ग्यस्वभावेंण गिळतां झषु । झाला निवासु तज्जठरीं ॥२६०॥धीवरीं तो धरूनि मत्स्य जाळीं । उचिता नेला शंबराजवळी । तेणें धाडिला पाकस्थळीं । सूदाजवळी पाकार्थ ॥६१॥सूदा बाळक मत्स्यापोटीं । लाभतां घातलें रतीचे वोटीं । तिनें नेतां शंबकाभेटी । पूर्वोक्त गोठी म्यां कथिली ॥६२॥तिनें मायामोहें सकळां । भुलवूनि पालन केलें बाळा । तारुन्य लाहतां वृत्तान्त कथिला । मग येणें वधिला शंबर तो ॥६३॥ते हें पूर्वींची वनिता रति । तुमचा तनय हा ईचा पति । एवं स्नुषासुत दंपत्ती । सदनाप्रति आलीं पैं ॥६४॥हें ऐकोनि आश्चर्य थोर । सर्वां द्रवले स्नेहपाझर । परमानंदें सुखनिर्भर । करिती गजर तो ऐका ॥२६५॥तच्छ्रुत्वा महदाश्चर्यं कृष्णांतःपुरयोषितः ।अभ्यनंदन्बहूनब्दान्नष्टं मृतमिवागतम् ॥३७॥कृष्णान्तःपुरींचिया नारी । आनंदोनि अभ्यंतरीं । बहुत अब्दें चिरकाळवरी । मृताचे परी तो गेला ॥६६॥तो हा संप्राप्त रुक्मिणीतनय । धन्य मानिती परमोदय । विचित्र दैवाचें आश्चर्य । अमृतप्राय सुदिन हा ॥६७॥ऐशा आनंदें कृष्णवनिता । दंपती कवळूनि आह्लादभरिता । रामकृष्ण सतातमाता । वसुदेववनिता सर्वही ॥६८॥देवकी वसुदेवश्च कृष्णरामौ तथा स्त्रियः ।दंपती तौ परिष्वज्य रुक्मिणी च ययुर्मुदम् ॥३८॥रेवती रुक्मिणी जाम्बवती । प्रेमें आलिङ्गूनि दंपती । हर्षें ब्रह्माण्डीं न समाती । लोण उतरिती प्रीतीनें ॥६९॥अवघ्राण करोनि मौळें । हृदयीं कवळिती चिरकाळें । आनंदाश्रु स्रवती डोळे । भाग्य आगळें हें म्हणती ॥२७०॥देवकीनें मांडीवरी । दंपती घेतलीं सप्रेमभरीं । लोण उतरिती समस्त नारी । अक्षवाणें करूनियां ॥७१॥रति प्रवेशे रुक्मिणीसदन । रामकृष्णसहित मदन । प्रवेशले सभास्थान । मन्मथवदन जन पाहती ॥७२॥नष्टं प्रद्युम्नमायातमाकर्ण्य द्वारकौकसः ।अहो मृत इवायातो बालो दिष्ट्येति हाब्रुवन् ॥३९॥प्रसूतिकाळीं षष्ठदिवसीं । नष्ट बाळक अंगनेसीं । घेऊनि आला द्वारकेसी । हें सर्वासी चोज गमे ॥७३॥मेलें स्वर्गौनि भेटे पुढती । त्याहूनि आश्चर्य जन बोलती । विचित्र दैवबळाची गति । सभाग्य श्रीपति रुक्मिणी हे ॥७४॥गुढिया मखरें तोरणें ध्वजा । द्वारकेमाजि उत्साह वोजा । षोडशोपचारीं पूजूनि द्विजां । अहेरीं राजा गौरविती ॥२७५॥रुक्मिणीकृष्णांसी अहेर । वसुदेवदेवकीप्रमुख पितर । गौरविती लहान थोर । द्वारकानगरनिवासियें ॥७६॥वाजंत्रांची एक घाई । नृत्यें गायनें ठायीं ठायीं । वस्त्रें धनें वांटिती गायी । द्वारका सर्वही सुखभरित ॥७७॥नगरी सालंकृत साभरणें । घरोघरीं संतर्पणें । वांटिती वसनें रत्नें सुवर्णें । प्रमुदित मनें सर्वांचीं ॥७८॥रतिप्रद्युम्ना पाहोन । निवती द्वारकावासी जन । दंपतीचे वदती गुण । करिती लोण सर्वस्वें ॥७९॥दैवें उभयतांच्या सरिपाडा । ईश्वरें योजूनि दिधला जोडा । दुष्टदृष्टीची न बधो पीडा । अक्षय चुडा असो इचा ॥२८०॥ऐशीं अनेक आशीर्वचनें । द्वारकावासी वदती वदनें । दंपतीतें वस्त्रें भूषणें । विचित्राभरणें समर्पिती ॥८१॥असो ऐसा जनपदस्नेहो । प्रेमें करिती महोत्साहो । तो सविस्तर भारतीनाहो । वर्णूं पहा हो शकेना ॥८२॥रामा इतुकें प्रद्युम्नजनन । समासें केलें तुज हें कथन । विशेष मदनाचें लावण्य । तें उपलक्षण अवधारीं ॥८३॥यं वै मुहुः पितृसरूपनिजेशभावास्तन्मातरो यदभजन्नहरूढभावाः ।चित्रं न तत्खलु रमास्पदबिंबबिंबे कामे स्मरेऽक्षिविषये किमुतान्यनार्यः ॥४०॥अगाध प्रद्युम्नकमनीयता । कीं जें श्रीकृष्ण ज्याचा पिता । इंगितावयवीं सादृश्यता । देखोनि वनिता कृष्णाचिया ॥८४॥अवचट येतां देखोनि कामा । चित्तीं मानूनि मेघश्यामा । भजती पतिभावें संभ्रमा । सलज्ज पल्लव सांवरूनी ॥२८५॥उटोनि ठाती एकी सवा । वक्रभृकुटि श्रीकेशवा । मानूनि भ्रमिता दचकती जीवा । माजि अवयवसाम्यत्वें ॥८६॥कृष्णपत्न्या त्या मन्मथमाता । कृष्णसादृश्यें स्मरमोहिता । कृष्णभावना करूनि चित्ता । होती भ्रमिता अनुमानें ॥८७॥कामातुरा होती मनीं । निरूढभावना एकान्तसदनीं । आश्चर्य न मनिजे हें बुधजनीं । काय म्हणोनि तें ऐका ॥८८॥अनंगस्मरणें एकान्तस्थानीं । कामातुरा होती कामिनी । तो साङ्ग मन्मथ फावल्या करणीं । कां पां तरुणी न द्रवती ॥८९॥विशेष ज्याचे ठायीं रमा । स्मरमोहिता वांछी कामा । त्या कृष्णाची अपर प्रतिमा । देखोनि वामा न भजती कां ॥२९०॥बिंबा प्रतिबिंबाचे ठायीं । सादृश्य पाहतां भेद कायी । तो हा नटोनि शेषशायी । स्वरूपें मोही निज ललना ॥९१॥ज्याच्या रूपासि देखोनि माता । भ्रमिता होती स्मरमोहिता । तेथ इतरा प्राकृत वनिता । भजती मन्मथा कें नवल ॥९२॥निकट निरता श्रीकृष्णचरणीं । त्याही द्रवती स्मर देखोनी । मी इतरा रजात्मका रागिणी । काय म्हणोनि न द्रवती ॥९३॥रुक्मिणीजठरीं स्मर संभवला । तदारभ्य हे मन्मथलीला । पंचावन्नावा तुज कथिला । अध्याय संपला कुरुवर्या ॥९४॥इतुकी पंचम एकादशिनी । श्रीप्रभूचे आज्ञेवरूनी । अर्पिली सज्जनांचिये श्रवणीं । बोबड्या वचनीं दयार्नवें ॥२९५॥यावरी एकादशिनी षष्ठ । पुढें वाखाणिजेल स्पष्ट । श्रोतीं होऊनि प्रेमसंतुष्ट । एकनिष्ठ परिसावी ॥९६॥छपन्नाव्या अध्यायांत । जनापवादपरिहारार्थ । स्यमंतकमणीचा धरितां हेत । पर्णिली विवरांत जाम्बवती ॥९७॥इतुकी श्रीमद्भागवतीं । अष्टादशसहस्रगणती । पारमहंसी संहिता म्हणती । नृपशुकोक्तिसंवाद ॥९८॥त्यामाजि हा दशम स्कंध । पंचावन्नवा अध्याय प्रसिद्ध । प्रद्युम्नाख्यान विवरिलें विशद । तें सद्वृंद परिसतु ॥९९॥श्रीएकनाथ प्रतिष्ठानीं । विराजमान साम्राज्यभुवनीं । स्वपादप्रणतां कैवल्यदानी । भद्रासनीं परमात्मा ॥३००॥श्रीपदप्रक्षालनाम्बुवोघ । पिपीलिकेसि तें गौतमीगाङ्ग । दयार्णवें सेवितां साङ्ग । वक्तृत्वविभागफळलाभ ॥१॥शकीं सत्तावन्नोत्तरषोडशीं । राक्षसाब्दी आश्विनमासीं । शुक्लभार्गवसप्तमीसी । मन्मथाख्यान संपविलें ॥३०२॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविचितायां प्रद्युम्नावतारशंबरवधादिवर्णनं नाम पंचपंचाशत्तमोऽध्यायः ॥५५॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४०॥ टीका ओव्या ॥३०२॥ एवं संख्या ॥३४२॥ ( पंचावन्नावा अध्याय मिळून ओवी - संख्या २६४६९ ) अध्याय पंचावन्नावा समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP