मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५५ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ५५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ५५ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर तामाह भगवान्कार्ष्णिर्मातस्ते मतिरन्यथा ।मातृभावमतिक्रम्य वर्तसे कामिनी यथा ॥११॥भगवान् म्हणिजे त्रिजगज्जेता । पुष्पधन्वा तो कार्ष्णि स्वता । रतीतें पुसे म्हणोनि माता । मति अन्वथा कां आजि हे ॥८९॥भो भो जननी आजि हे मति । का संभवली तुझ्या चित्तीं । सांडूनि मातृभावाची स्थिति । वर्तसी युवती समसाम्य ॥९०॥जैसी कुलटा गणिका चेटी । तैसिया चिह्नांची परिपाटी । वर्तसी काय तुझिये पोटीं । मज ते गोठी सांगावी ॥९१॥ऐसें ऐकोनि मन्मथवचन । परमोह्लासें हास्य करून । रति करितसे रहस्यकथन । तें व्याख्यान अवधारा ॥९२॥रतिरुवाच - भवान्नारायणसुतः शंबरेणाहृतो गृहात् ।अहं तेऽधिकृता पत्नी रतिः कामो भवान्प्रभो ॥१२॥म्हणे भो भो जी मनम्था । गुह्य ऐकें प्रभुसमर्था । मी तंव प्राचीन तुझी कान्ता । तवाधिकृता पत्नीत्वें ॥९३॥जननी म्हणसी मजलागून । तरी तें ऐक वृत्तान्तकथन । रुक्मिणीजठरीं तुझें जनन । कृष्णनारायण तव जनक ॥९४॥नारायणांश जो कां स्मर । तोचि तूं साङ्ग जालासि स्मर । शिवक्रोधाचा वैश्वानर । तोचि हा शंबर तव हर्ता ॥९५॥येणें प्रसूतिगृहापासून । षष्ठदिवसीं केलें हरण । येथें आणूनि वधितां पूर्ण । भविष्यमाण मति स्मरली ॥९६॥एष त्वानिर्दशं सिंधावक्षिपच्छंबरोऽसुरः ।मत्स्योऽग्रसीत्तदुदुरादितः प्राप्तो भवान्प्रभो ॥१३॥देखोनि तुझी हे कमनीयता । शंबर करूं न शकेचि घाता । मग सिंधूमाजी निक्षेपितां । मत्स्यें तत्वता तुज गिळिलें ॥९७॥धीवरीं मत्स्या धरूनि जाळीं । उचित आणिलें शंबराजवळी । शंबरें घेवोनि पाकस्थळीं । पाठवी सकळी सूदापें ॥९८॥सूदें शस्त्रें उघडितां मीन । बाळक देखिलें देदीप्यमान । तेणें होवोनि विस्मयापन्न । मजपें आणोनि समर्पिलें ॥९९॥म्यां अर्पावें शंबरापासीं । तंव अकस्मात् पावला देवर्षि । तेणें कथिलें वृत्तान्तासी । जें निश्चयेंसीं हा तव भर्ता ॥१००॥याचें करीं वो प्रवर्धन । शंबरा न करीं वृतान्तकथन । बहुता प्रयत्नें गुह्यगोपन । ऐकोनि रक्षण म्यां केलें ॥१॥पूर्णलावण्यें यौवनारूढ । देखोनि सुरताभिलाष प्रौढ । जाला म्हणोनि दाविलें उघड । भाव निबिड सुरताचे ॥२॥तस्मात् नोहे मी तुझी माता । तूं पूर्वजन्मींचा स्मर मम भर्ता । जाणोनि निःशंक करीं सुरता । आन वृत्तान्ता अवधारीं ॥३॥तमिमं जहि दुर्धर्षं दुर्जयं शत्रुमात्मनः । मायाशतविदं त्वं च मायाभिर्मोहनादिभिः ॥१४॥तुझा शत्रु हा शंबरासुर । तव हननार्थ प्रयत्नपर । प्रसूतिगृहापासूनि सत्वर । आणूनि सागरीं निक्षेपित ॥४॥यासि कळलिया तुझें नाम । तुज हा वधील तत्काळ अधम । देवां दानवां दुर्धर्म परम । मायानिगमशतवेत्ता ॥१०५॥अद्यापि जिंकिला नाहींच कोण्ही । परम मायावी कपटखाणी । ऐसिया तूंचि समराङ्गणीं । जाय वधूनि जननीपें ॥६॥शंबर दुर्धर्ष कपटराशि । केंवि समरीं भिडवे त्यासीं । ऐसें न धरावें मानसीं । ऐक येविशीं गुज कथितें ॥७॥त्रिजगज्जेता पंचबाण । तो तूं प्रद्युम्न कृष्णनंदन । तुझी अमोघ आंगवण । देतें स्मरोन तुज अवघी ॥८॥अहल्यालावण्यबाणीं शक्र । शक्रपदवीपासूनि वक्र । केला त्रिजगीं श्यामवक्त्र । ऐसें विचित्र तव शौर्य ॥९॥शंकरा भिल्लटीकटाक्षकाठी । भेदूनि भ्रमित फिरविला सृष्टी । गिरागौरवें हृदयपुटीं । शरें परमेष्ठी लोळविला ॥११०॥धीवरीनयनाब्जसायके । विंधूनि पराशर पाडिला तवकें । गाधिज नेला श्वानवेखें । तुवां मौनास्त्रें सुरलोका ॥११॥मनुजवेशें रावणमृत्यु । हे तव पुष्पबाणाचें कृत्य । शुंभनिशुंभ पावले अंत । कीं सुंदोपसुंद तव शस्त्रीं ॥१२॥विष्णु वृंदावृत्ताच्या शरें । भेदितां विकळ जालीं गात्रें । येथें नंदाचीं राखिलीं ढोरें । तर्ही न परिहरे हृच्छल्य ॥१३॥ब्रुहस्पतीसि भेदूनि शस्त्रीं । भरद्वाज केला औतथ्यक्षेत्रीं । उर्वशीच्या लावण्यशरीं । मैत्रावरुणि घटजात ॥१४॥मृगमैथुनावलोकबाणें । भेदितां विभाण्ड विकळ प्राणें । शृंगी ऋषीचें जन्मणें । हरिणीजठरीं तव महिमे ॥११५॥ऐसिया कुसुमबाणें धुरा । लोळविलिया थोरथोरा । शंबरदलनीं कोण दरारा । माया प्रचुरा तुजपासीं ॥१६॥मोहनास्त्रप्रमुख अस्त्रजाळें । जाणसी बहुविध मायापटळें । तो तूं बाळलीलेचे खोळे । माजि कोमळें केंवि लपसी ॥१७॥मोहनादि प्रचुर माया । स्मरोनि शंबरा पूर्णवैरिया । मारूनि मजला नेईं निलया । भेटवावया निज जनका ॥१८॥जैंहूनि हरिलें तुज शंबरें । तैंहूनि माता आर्तस्वरें । विलाप करिते तें उत्तरें । ऐक निर्धारें तुज कथितें ॥१९॥परिशोचति ते माता कुररीव गतप्रजा ।पुत्रस्नेहाकुला दीना विवत्सा गौरिवातुरा ॥१५॥कुररी म्हणिजे पक्षिणी टिटवी । अंडविनाशें विलपे जेंवि । तैसी तव माता शोकार्णवीं । गतप्रजत्वें पडलीसे ॥१२०॥रसने रस सेवितां न रुचे । शोकें शब्दार्थ न सुचे । स्पर्शज्ञान नोहे त्वचे । बळें उपभोग जाणविती ॥२१॥पदार्थ नोहळे दिसतां नयनीं । सुगंध दुर्गंध नुमजे घ्राणीं । ऐसी तव दुःखें रुक्मिणी । सचेत शोकाग्नीमाजि जळे ॥२२॥हृदयीं धडके शोकानळ । तेणें उद्विग्न व्याकुळ । गृहामाजि सर्वकाळ । कंठी वेळ म्लानत्वें ॥२३॥राजमंदिरीं वृश्चिकें चोर । डंखिला करूं न लाहे सोर । तैसी शोकवेदनाप्रचुर । धैर्यें कलेवर सांवरी ॥२४॥सांगों न शके कोणापासीं । विलाप करी बैसोनि रहसीं । वागतां स्फुंदे उकसाबुकसीं । सखिया दासी सान्तविता ॥१२५॥यास्तव विलंब न करिजे येथ । शीघ्र साधीं येथींचें कृत्य । शौर्यें वधीं पां शंबर दैत्य । माता शोकार्त जाणोनी ॥२६॥दीनवदना पुत्रस्नेहें । मूर्च्छित व्याकुळ पडे मोहें । विगतवत्साधेनुन्यायें । भर्जितलाहेसम मिडके ॥२७॥यास्तव आतां त्वरा करीं । विद्या कथितें ते स्वीकारीं । मायाप्रयोग मंत्राक्षरीं । अस्त्ररहस्यें घेई कां ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP