भगवानपि गोविंदो हत्वा केशिनमावहे । पशूनपालयत्पालैः प्रीतिर्व्रजसुखावहः ॥२६॥

प्रभातें केला केशिवध । वना गेली मुकुंद । तेथें भेटला मुनि नारद । त्याचा स्तुतिवाद जो कथिला ॥४७॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो गोविंद श्रीभगवान । गोपां हातीं पशुगोपन । प्रीतीकरून जो करवी ॥४८॥
व्रजसुखावह ऐसा हरि । तेणें भावी मुनिवैखरी । ऐकोनि स्वीकेली अंतरीं । सूचना अवतारकार्याची ॥४९॥
वनीं क्रीडतां तदनंतर । वधिला कपटी व्योमासुर । नवां श्लोकीं तो विस्तार । व्यासकुमर वाखाणी ॥२५०॥
परी हे कथा मागील खरी । प्रलंबहनन केल्यावरी । व्योमासुरातें कृष्ण मारी । ये अवसरीं निरूपिली ॥५१॥
वेषधारी केशिदैत्य । त्याची कथितां कपटमात । प्रसंगें कपटी व्योमदैत्य । वधिला तो येथ निरूपिला ॥५२॥
शंखचूडवधापूर्वीं । व्योमवध वर्णिती कवि । असो हे पाठभेदाची पदवी । प्रस्तुत सर्वीं परिसिजे ॥५३॥

एकदा ते पशून्पालाश्चारयंतोऽद्रिसानुषु । चक्रुर्निलायनक्रीदाश्चोरपालापदेशतः ॥२७॥

हो कां कोण्हे एके काळीं । गोप पशूंतें सहवनमाळी । चारितां पर्वताचिये मौळीं । क्रीडा सकळीं मांडिली ॥५४॥
ऐका क्रीडेचा प्रकार । एक जाले मेषाकार । एक अर्भक झाले चोर । क्रीडा विचित पिहिताक्ष ॥२५५॥

तत्रासन्कतिचिच्चोराः पालाश्च कतिचिन्नृप । मेषायिताश्च तत्रैके विजह्रुरकुतोभयाः ॥२८॥

चोर झाले पांच सात । मेष झाले अर्भक बहुत । मेषरक्षक बल्लवसुत । जाले तेथ कितियेक ॥५६॥
ऐसा रचूनि क्रीडाकल्प । क्रीडते झाले निर्भयरूप । देखोनि व्योम कपटी गोप । झाला विकल्प कल्पूनी ॥५७॥

मयपुत्रो महामायो व्योमो गोपालवेषधृक् । मेषायितानपोवाह प्रायश्चोरायितो बहून् ॥२९॥

कपटी मयासुराचा कुमर । व्योमनामा महाअसुर । गोपाकृति धरूनि चोर । क्रीडापर त्यां माजी ॥५८॥
मेष स्ववाडां कोंडून । मेषपाळ झांकूनि नयन । निजती कांबळ्या पांघरोन । तों चोर येऊन मेष हरिती ॥५९॥
तंव ते श्वान करिती टाहो । चेइरा मेषपांचा समुदावो । मेंढरें दशदिशां लागलीं पाहों । करिती हाहूं चहूंकडे ॥२६०॥
तेथें मेंढराकृति जीं पोरें । तीं भोभाती मेषस्वरें । धावोनि मेषप धरिती त्वरें । चोर घाबिरे पळताती ॥६१॥
पुनः पुनः दिवस रजनीं । ऐसेंचि क्रीडती कल्पूनी । व्योमासुर तये स्थानीं । चोर होऊनि पातला ॥६२॥
लटकीं लावूनि नेत्रपातीं । मेषपाळ निद्रा करिती । दैत्यें घालूनि तमाची बुंथी । केले सुषुप्तिवरपडे ॥६३॥
मग जे चोररूपी गोप । त्यां माजी आपणही तद्रूप । मिळोनि नेले मेषकळप । गिरिसमीप गह्वरीं ॥६४॥

गिरिदर्यां विनिक्षिप्य नीतं नीतं महासुरः । शिलया पिदधे द्वारं चतुःपंचावशेषिताः ॥३०॥

सचोरकळप जो जो नेला । गुहागर्भीं तो सांठविला । शेवटीं शिला लावूनि आला । अवशिष्टांला न्यावया ॥२६५॥
चार पांच मेषपाळ । उरले होते जे गोपाळ । तेही घेऊनि चालिला कुटिळ । मनीं घननीळ विवंची ॥६६॥

तस्य तत्कर्म विज्ञाय कृष्णः शरणदः सताम् । गोपान्नयंतं जग्राह वृकं हरिरिवौजसा ॥३१॥

कृष्णपरमात्मा सर्वज्ञ । जाणोनि दैत्याचें विंदान । भक्तांसि ज्याचें अभयदान । तो भगवान कळवळिला ॥६७॥
अवशिष्ट गोप नेतां व्योम । देखोनि क्षोभला पुरुषोत्तम । जैसा आयुष्य खुंटतां यम । दावी निजधाम तत्काळ ॥६८॥
कीं सिंहाचीं पिलीं तान्हीं । लांडगा धरूनि नेतां ग्लानि । सिंह धरी त्या कव घालुनी । जेंवि क्षोभोनि प्रतापें ॥६९॥
तेंवि कृष्णें व्योमासुर । धरिला प्रतापें सत्वर । पुढें वर्तला प्रकार । ऐका साचार चतुर हो ॥२७०॥

स निजं रूपमास्थाय गिरींद्रसदृशं बली । इच्छन्विमोक्तुमात्मानं नाशक्रोद्ग्रहणातुरः ॥३२॥

कृष्णें दैत्य धरितां निकरें । हरपोनि गेलें कपटवारें । मूळींचें रूप धरिलें खरें । जें गिरींद्रें समसाम्य ॥७१॥
पर्वतप्राय महाबळी । घेतां कृष्णें सम फळी । मिठी न करवेचि मोकळी । दैत्य ते काळीं घाबिरला ॥७२॥
भगवंताच्या ग्रहणें करून । झाला आतुर विकळप्राण । कोण्या प्रकारें वेधी त्या कृष्ण । तें तूं श्रवण करीं राया ॥७३॥

तं निग्रुह्याच्युतो दोर्भ्यां पातयित्वा महीतले । पश्यतां दिवि देवानां पशुमारममारयत् ॥३३॥

मग अच्युते दोहीं बाहीं । दैत्य निग्रहें पाडूनि मही । सोमींच्या बस्तासारिखें पाहीं । प्राण लवलाहीं घेतले ॥७४॥
विमानीं पाहत असतां देव । आणि भूतळीं स्थिरचर सर्व । मारूनि श्वासनिरोधें दानव । कृष्णें लाघव दाखविलें ॥२७५॥

गुहापिधानं निर्भिद्य गोपान्निःसार्य कृच्छ्रतः । स्सूयमानः सुरैर्गोपैः प्रविवेश स्वगोकुलम् ॥३४॥

मग गुहामुखीं जे घातली शिळा । कृष्णें पायें लोटोनि हेळां । संकटापासूनि पशुपमेळा । कृष्णें अवलीळा काढिला ॥७६॥
कोंडोनि मरतां गुहापोटीं । प्राण पातले होते कंठीं । कृष्णें काढूनि उठाउठीं । अमृतदृष्टीं वांचविले ॥७७॥
दीप विझतां घालूनि तेल । स्थापिला निर्वात लक्षूनि स्थळ । तैसा कृष्णें गोवळमेळ । मर्दूनि खळ वांचविला ॥७८॥
ऐसीं कृष्णाचीं अमळ यशें । वर्त्तमानें भूतभविष्यें । सुरवर विमानीं गाती तोषें । स्तविती उल्हासें मुनिवर्य ॥७९॥
सुरवर स्तविती विमानयानीं । कुसुमें वर्षती कृष्णमूर्ध्नि । गोप नाचती कृष्णकीर्तनीं । व्रजीं स्वभुवनीं प्रवेशतां ॥२८०॥
कृष्णें व्योमासुराचा वध । वनीं करूनि एवंविध । फेडूनि गोपांचा निर्बंध । व्रजीं मुकुंद प्रवेशला ॥८१॥
सदतिसाव्या अध्यायांत । इतुका निरूपिला वृत्तांत । पुढिल्या अध्यायामाजि त्वरित । कृष्णा सात्वत भेटेल ॥८२॥
अक्रुराचें तें भक्तिप्रेम । परिसावया गुह्य परम । दत्तावधानें कैवल्यकाम । श्रोते सत्तम परिसतु ॥८३॥
कैवल्यदायक हा वाग्यज्ञ । श्रीमदेकनाथ यजमान । भेदपशूचें करूनि हनन । संस्कृत करूनि अभेदें ॥८४॥
सच्चिदानंदाचें भरूनि पात्र । पूर्णस्वानंदें पढूनि मंत्र । गोविंदाज्ञावषट्कार । तोषवी अध्वर दयार्णव ॥२८५॥
श्रोतयांचे श्रवणकुंडीं । इहीं वाक्यांहूनी उदंडी । अविद्याकामकर्मांची झाडी । केली ब्रह्मांडीं मखसिद्धि ॥८६॥
तें हें श्रीमद्भागवत । दशमस्कंध श्रीकृष्णचरित । जेथें मारिला केशिदैत्य । तो अध्याय समात्प सदतिसावा ॥८७॥
इतुकी दयार्णवकृत प्रार्थना । भोगप्रारब्धयोगें जाणा । प्रयत्नें साधिजे भगवद्भजना । हे खूण मना माजि धरिजे ॥२८८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां केशिवध - नारदस्तव - व्योमासुरवधो नाम सप्तत्रिंशत्तमोऽध्यायः ॥३७॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥३४॥ टीका ओव्या ॥२८८॥ एवं संख्या ॥३२२॥ ( सदतिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १७३७३ )

सदतिसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP